-कल्पना दुधाळ

एकदा शाळा सुटल्यावर वाट वळवून मैत्रिणीच्या मळ्याकडं निघालो होतो. चालतोय चालतोय दोघी. दिवस मावळतीला गेलेला, आभाळ भरून आलेलं, काळेभोर ढग दाटले, चौफेर अंधारून आलं, पावसाचे थेंब सुयांसारखे टोचत रपारपा सडकून काढायला लागले. प्रचंड गडगडाट, विजांचा कडकडाट, तशात आम्ही चिर्र ओरडत माघारी पळतोय. ओढा ओलांडतोय. काट्याकुट्यांसह पाण्याचे लोंढेच्या लोंढे आम्हाला ओढून नेत होते. घट्ट धरलेले हात सुटत होते, थरथरत, कुडकुडत कसंबसं घरी पोचलो तर सगळे घरात एका कोपऱ्यात उभे, वरून बदाबदा पाऊस पडतोय. छप्पर उडून गेलंय. भिंत पडलीय. कुट्टकाळी, गारठलेली रात्र. पृथ्वीवर एवढाच कोपरा जिवंत आहे, बाकी कुठेच कुणी नाही, काही नाही, नंतरचं काहीच माहीत नाही, असा संमिश्र भयकाल. दुसऱ्या दिवशी समजलं की, जिथून आम्ही पळत माघारी वळलो तिथल्या उंबराच्या झाडावर वीज पडली होती. लहानपणी भीतीचा सुकाळ होता खरं…

जवळच्या गावात एका आत्त्याचं सासर होतं. तिला मूल नसल्यानं आम्हाला हौसेनं घेऊन जायची. आत्त्याच्या अवतीभवती खेळायचं, हुंदडायचं. ती आम्हाला वळणबिळण लावायच्या फंदात पडत नसल्यानं काही करा आपलंच राज्य. पण मामा घरी आले की जीव मुठीत धरून भित्र्या सशासारखं बसायचं. का? तर साधं भांडं वाजलं की ते तिकडून ओरडणार, ‘‘भांडी फोडायची का क्काय? टिकू द्या चार दिस, आम्ही हाय तवर तरी.’’ जेवताना ताटलीतलं थोडंसं खाली सांडलं की, ‘‘याच्यावर एक कुतारडं जोगवल. असंच शिकवलंय का खायला.’’ चालताना पाय वाजला तरी तिकडून बेक्कार हुंकारणार. मामा दिसताच बशीतला चहा हमखास हेंडकळणार, मग ते जोरात खेकसणार, उरलेला चहा अजूनच हेंडकाळून सांडणार…आत्त्याच्या गावातही बरेच सवंगडी झाले होते. एका संध्याकाळी खेळताना गुडघा फुटला, ठेच लागून पायाच्या अंगठ्याचं नख उचकटलं. रक्ताचा ओघळ बघून मी पसरला भोंगा. बघू बघू कुठं लागलं, किती लागलं, म्हणत बाकीचे माझ्याभोवती सांत्वनाला गोळा व्हायला आणि मामा तिथं यायला एकच गाठ पडली. आता ते भयंकर खवळणार म्हणून मी इतकी घाबरून गेले की फ्रॉकखाली पाय लपवत, ‘नाय काय, काय नाय झालं. कुठं काय झालं. चला चला निघा,’ असं सावरत होते. आत्ता हेंद्रटागत भोकाड पसरलेली पोर घटकंत नीट बोलायला लागली म्हणून बाकीचे अवाक!

हेही वाचा…पंचतारांकित पर्यटनाचा ‘प्रलय’

वस्तीवरच्या मैत्रिणीकडनं पुस्तक आणायचं नेमकं सवंसाझंला आठवायचं, नाहीतर दुसऱ्या दिवशी वर्गात छड्या मिळणार. मग कंदील घेऊन चालताना उजेडात वाट हेलकवायची. पायापुरती उजळायची. मागं काळोखात मिसळून जायची. वाऱ्याच्या भराक्यानं वाढलेली वात उजेडाला आत अडवून धरत काचंवर काजळी आणायची. कुत्र्यांचं भुंकणं जवळ यायचं. भिरदिशी दगडं भिरकावली की भुंकणं लांब जायचं. पण भीती राहायचीच, मागनं येऊन पोटरी धरली तर? फडफडती वटवाघळं धडकली तर? रातकिड्यांचं किर्र कानात घुमताना गवत पायात आलं की अंगावर काटा यायचा. गारढोण सळसळीला धक्का लागू नये म्हणून सावध चालावं तर पावलापुढची वाट ओलांडून गवताचा भांग पाडत सळसळ निघून जायची शांतपणे. श्वासाचा दगड व्हायचा. चालणाऱ्याला एक वाट, सळसळीला हजार वाटा, असं भीतीला समजावत वाट कापायची. त्यातच आणखी एक भीती सापाची. चुलीपुढच्या सरपणाखाली, वैरणीखाली, खुराड्यात, गोठ्यात, वळचणीला, गवत काढताना, पडसात साप हमखास दिसणार. कुठं फरकांडी दिसली तरी जोरजोरात फुसकारणं, फणा डोलवणं, पान लागणं आठवणार.

घर ते गावातली शाळा हे चारपाच किलोमीटर अंतर. बांधावरची पायवाट. चालत येता-जाता दाटदडप झाडाखोडांची, पिकांची भीती. आडबाजूला कुणी लपलं तर नसेल ना? पालापाचोळा खुसपूस वाजला तरी धूम पळायचं. चिटपाखरांचा, शेणाचे गोळे ढकलणाऱ्या किड्यांचादेखील आधार वाटायचा. येता-जाता कुणी जाणतं माणूस भेटलं तर देव भेटल्यासारखं वाटायचं. सांगोवांगी आलेल्या भुताखेताहाडळींच्या गोष्टी होत्याच. एकदा मी न दिसलेल्या भुताच्या हुबेहूब वर्णनासह आवई उठवून इतरांना घाबरवून सोडलं होतं. तेव्हा ‘Ghost nonsense’ या इंग्रजी पुस्तकातल्या धड्यानं भुतांची भीती घालवली होती.

सातवी-आठवीपासूनच वर्गातल्या मुली लग्न होऊन जाऊ लागल्या. आपल्याला असली काही झंझट नको म्हणून रात्ररात्र जागून अभ्यास करायचा. मुलगी हुशार आहे, शिकू द्या, असं शिक्षकांनी सांगितलं की लग्न पुढे ढकलायचं. मला नांदण्याचं, नवी नाती पेलण्याचं भय. आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जायचं. तेही कायमचं. तिथल्या धबडग्यात उटारेटा काढा, संसार करा. नको रे बाबा. असह्य विचार होता तो. पण चाकोरी काही चुकवता आली नाही. शिकून स्वावलंबी व्हायचं स्वप्नच राहिलं. प्रत्येक वर्गात पहिला नंबर काढत होते जेणेकरून कुणी म्हणू नये की बास झालं शिक्षण. पण पदवीनंतर ते थांबवावंच लागलं आणि मी लग्न करून शेतकरी कुटुंबात आले. सुरुवातीला ही भीती असायची की, शेतातली कामं करताना आपल्याला कुणी पाहील. ओळखीच्यांनी तर नयेच पाहू. पण तसं व्हायचं नाही. एकदा माहेरच्या एका बाईनं पाहिलं. आईला म्हणाली, ‘‘काय उपेग झाला पोरीला साळा शिकवून. बायांसंगं पातच धरली की शेवटाला.’’ गोबरगॅसमध्ये रोज शेण कालवावं लागायचं. असंच एकदा हात रेडबाडलेले, शेणापाण्यानं अवतार झाला होता. तशात पाचसहा मैत्रिणी आल्या, खुसखुस, फुसफुस, रडूनबिडून मग गप्पाटप्पा झाल्या. पण धास्ती ही की, पुढे जाऊन त्या काय म्हणतील, घरी जाऊन काय सांगतील. जगण्याला चिकटलेल्या भयाच्या तथाकथित गोष्टी झटकता येत नव्हत्या.

हेही वाचा…शिक्षणाचे ‘निपुण’ उद्दिष्ट!

जोडीदाराच्या समजूतदारपणानं रुळवलं शेतीमातीत. एकमेकांच्या संगतीत वाट उरकणं सोपं झालं. हळूहळू का होईना अटळ वाटांवर खरडणारे पाय रुळले. उन्हातान्हात, चिखलापाण्यात रमायला परिस्थितीनं शिकवलं. शेताशिवारातली कामंधामं जगण्याचा भाग झाल्यावर भीती गळून पडली. वास्तव स्वीकारलं. पारंपरिक कुटुंबातल्या धारणांशी कधी मिळतंजुळतं घेत, कधी चिडचिडत मळवाट धरली. हेही क्षुल्लक नव्हतं म्हणा!

शेती करणाऱ्यांना वा वा छान, महान, थोर वगैरे म्हणणं म्हणजे दुरून डोंगर साजरे. लहरी निसर्ग आणि प्रचंड कष्टाच्या तावडीत सापडल्यावर आपल्या आवडीनिवडी, स्वत्त्व जपणं किती अवघड, हे प्रत्यक्ष अनुभवातूनच कळतं. आर्थिक अनिश्चिततेच्या धाकधुकीतली जिंकण्याची कसरत ही. हरेक पीक लावताना, पेरताना आपणच आपल्याला सकारात्मक धीर द्यायचा. नैसर्गिक, अनैसर्गिक नुकसानीची हमी हमखास पदरी पाडून घ्यायची. सततच्या तडजोडी, ओढाताणीतून होरपळलेल्या मनावरचे कातीव चरे सोलताना कल्पनेचे मनोरे आपोआप गळून पडतात. मग व्यापक झळींवर सोनसळी मुलामा चढवता येत नाही.
वयाच्या पंचेचाळिशीत मागच्या घटना उलगडताना माघारी वळून आयुष्य पुन्हा जगता यावं असं वाटतं. पण नव्या वहिवाटीवरही अडथळे असणारच की. या टप्प्यावर बंडखोरी करताना, न झुकता आपली मूल्यं सांभाळताना बरं वाटतं. रूढीप्रिय भवतालात अधिक डोळस, निर्भय बनवणारं लेखनवाचन नेटाने धरून ठेवलं, ठेवतेय. ते वगळून आयुष्यात फार काही उरत नाही. म्हणून चिरकुंड्या वेळा टोकरत कधीही, कुठेही, कसंही असंख्य आडवाणांतनं चिवट बळकटीनं साहित्याचा धागा धरून ठेवायचा. भयमुक्तीचा हा मार्ग आश्वासक वाटतो.

हेही वाचा…सांधा बदलताना : हा खेळ आभासांचा

फक्त पेरणी आयुष्यभर, रास आयुष्यानंतर असे दीर्घकालीन हंगाम पेलल्यावर जे पीक आठवेल, तसा वास येतो हातांना. हरेक पेरा आपल्या ओटीत शेरपसा टाकत नाही, निमूटपणे ओल्या मातीच्या हजार मतींचे हुंकार जपावेत, गवताच्या सावल्या पांघराव्यात, खदखदीचा ताळमेळ सुसह्य जुळवत जैविक धगाटा थंडावू द्यावा.

पोटापाण्यापलीकडची ही समजउमज, हे सारं सहज हाताशी नाही आलेलं. समजुतीच्या सांदीकोपऱ्यात हिरव्या वर्तमानाला भयकातर भविष्याचं अस्तर आहेच. अकाली खांद्यावर ओघळलेले अश्रू पुसताना, हुंदके सावरताना, नाइलाजाचे चटके सोसल्यावर जेव्हा कुणी कायम चांगलं वागतं, अचानक मायेनं भेटून जातं, दुखण्याभाण्यात काळजीनं विचारपूस करतं, जिवापाड जीव लावतं, पाठोपाठ आनंदाला उधाण येतं, मन चरकतं की, या जिव्हाळ्याचं काही होणार तर नाही ना?

dudhal.kalpana@gmail.com