‘‘..पण तिच्या बापूंचे मोठे होणे मात्र थांबले आहे. आणि खरी काळजी तीच आहे. सुहानी मोठी होणार. मग आपल्याला दुसरा विरंगुळा शोधावा लागणार. आजच्या तिच्या वयातली कविता उद्या राहणार नाही. रोज नवनवीन प्रसंग निर्माण होणार नाहीत- मग काय करायचे आपण?..’’
वयाची साठ वर्षे पूर्ण झाली म्हणजे म्हातारपण आले असे हल्ली समजत नाहीत. निवृत्तीचे वय साठ असते म्हणून तो एक पडाव मानला जातो हे खरे. कार्यालयीन आयुष्य संपलेले असते, नातवंड झालेले असते म्हणून म्हातारे झालो असे समजाचे का? क्वचित एखादी व्याधीदेखील उपटलेली असते, नाही असे नाही. पण त्याने काही फारसे बिघडलेले नसते. प्रवृत्तीत किंचित फरक पडतो. मन थोडे नाजूक होते हे खरे आहे, मात्र हे सगळे इतके हळुवार, अलवार असते की सांगणेदेखील अवघडच होऊन बसते. हा प्रवृत्ती-बदल जो असतो त्यासाठी प्रामुख्याने जबाबदार घटक असतो तो म्हणजे नातवंडं.. माझ्याबाबतीत माझी नात- सुहानी अशीच जबाबदार आहे. गोष्टी अनेक आहेत. त्यातल्याच काही सांगायच्या आहेत. पण हे सगळं सांगताना माझा खूप गोंधळ उडतो आहे.
आणि नेमकी इथेच ही गोष्ट जन्म घेते.
आता ही गोष्ट आजोबांची की नातीची तुम्हीच ठरवा.
सुहानीकडे जाण्याची तयारी करण्यात आठ दिवस जातात. महिन्या-दीड महिन्यातून आजी-आजोबा येतात हे तिलाही आता कळले आहे. प्रत्येक खेपेस काही ना काही घेऊन जाणे ही तर अगदी साधी मागणी. पण हल्ली तिला ‘गोष्ट’ ऐकण्याचे वेड लागलेय. हे प्रकरण इतके अवघड असेल असे मात्र मला वाटले नव्हते. पण बासष्ट वर्षांच्या आयुष्यात छोटय़ाच्या बासष्ट गोष्टीदेखील धडपणे आपल्याला ठाऊक नाहीत हे माझ्या लक्षात आले आहे. अर्थात इथे सुहानीची आजी माझा पराभव करते आणि गोष्ट सांगायला न येणाऱ्या बापूंची (सुहानी मला बापू म्हणते) गोष्ट ऐकत सुहानी कधीतरी झोपते..
सुहानीकडे जायची आमची तयारी चालू असते. सासू-सुनेच्या संभाषणातून (येताना काही आणायचंय का?) सुहानीला कळते की आजी अन् बापू आता येणार आहेत. मग ती अचानक फोन करते..
‘तूऽऽ मी काय कलता?’ (तू दीर्घच!)
‘काई नाही टीव्ही पाहतोय.’
‘आजी काय कलते?’
‘ती पण टीव्ही पाहतेय.’
‘तुमी कधी येनाल?’
‘येणार, अगदी लवकर येणार.’
‘रिझव्‍‌र्हेशन झाले?..’
‘होऽ.’
अशा काहीबाही चौकशा सुहानी करीत राहते. तिच्या अखेरच्या प्रश्नावर मात्र माझी गाडी अडखळते, ‘किती दिवस राहणार?’ या प्रश्नाचे उत्तर देताना मी एकदम नव्‍‌र्हस व्हायला लागतो. काय कारण आहे समजत नाही. खरे तर त्यात अवघड काही नसते. पण उत्तर पटकन् ओठावर येत नाही. मी कितीही दिवस सांगितले तरी ते तिला कमीच वाटणार या कल्पनेने मी अवघडतो का? कुणास ठाऊक?
सुहानी पलीकडे बडबडतच असते- अन् मी मात्र..
सुहानीच्या आजीच्या हे लक्षात येते. ‘तुम्ही पण ना..’ असे काहीतरी पुटपुटत ती फोनचा ताबा घेते..
 ‘खूपऽ खूऽऽप दिवस राहणार पिलू..’
‘किती..? खूप म्हणजे?’
(माझ्या ओठावर न आलेले उत्तर असते आठ दिवस)
‘खूऽप म्हणजे तू टेन वेळा निन्नी केलीस तरी मी जाणार नाही.’
‘गोष्ट सांगशील?’
‘होऽऽ खूप गोष्टी सांगणार.. मज्जा करू आपण.’
‘बापूंनी रिझव्‍‌र्हेशन केले? विंडो मिळाली?’ असलेही प्रश्न विचारून होतात. ‘विंडो मिळाली?’ या प्रश्नावर माझा मूड पुन्हा येतो. जाण्याच्या तयारीचा मूड. (मुख्य म्हणजे ‘गोष्टी’ हुडकायच्या असतात. तेही सुहानीला बोअर न करणाऱ्या..
आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी सुहानीचे शाळेचे स्नेहसंमेलन होते. एवढय़ाशा चिमण्या वयातल्या मुलांचे ते विविध गुणदर्शन. सुहानी लवकर झोपावी म्हणून मानसी धडपडत होती. पण त्या रात्री ती झोपायलाच तयार नव्हती. गप्पा झाल्या, खेळ झाले, गोष्टी झाल्या, पण सुहानी झोपायचे नाव घेत नव्हती. ओरडून रागावूनदेखील झाले. मीही त्यातल्या त्यात आवाज चढवून म्हणालो, ‘सुहानीऽ झोप बरं लवकर. तो वॉचमन आला बघ!’ (मला खरे तर असली भीती दाखवायला आवडत नाही)
‘तो काय करतो?’
‘तोऽ नं! रागावतो. कुठल्या घरातून लहान मुलांचा आवाज येतोय? म्हणतो.. चला चला, झोपा आता.’
क्षणभर ती चूप होते. पण पुन्हा दबल्या आवाजात सांगते.. ‘बापूऽऽ.’
‘काय गं..?’
‘मला न..’
‘काय गं? शू शू आली का?’
‘नाही.. मला न टेन्शन आलंय!’
आता चकित होण्याची माझी वेळ होती, टेन्शन? एवढय़ाशा चिमुरडीला? अन् कुठे ऐकला हा शब्द तिने? अन् त्याचा अर्थ..?
‘कशाचं गं?’
‘उद्या माझा डान्स आहे नं- त्याचं..’
‘अगं, तो तर तू छान करतेस. उद्या फक्त स्टेजवर करायचा.’
‘मी आत्ता करून दाखवू?’
ही धोक्याची घंटा होती. सुहानीला टेन्शन आले होते, हे खोटे कसे म्हणणार? पण मग ते घालवायचे कसे? अशा परिस्थितीत तिला दरडावून झोपवणे भाग होते. पण मला ते शक्यच नव्हते. ते काम तिची आई-आजी करू शकतात. त्यांनी ते केलेही. सुहानी झोपली. मी मात्र जागा राहिलो. खूप वेळ!
सुहानीच्या मेंदूत किती कल्लोळ असेल, या विचाराने मी हैराण होतो. पण हे असे विचार करायचे नसतात हे काही मला समजत नाही. तिची आजी हे सहजपणे करते. ती माझ्यासारखा विचार करीत नाही.. सुहानीच्या आईचे- मानसीचे बाबा अचानक गेले होते. त्या वेळी सुहानीची चाहूलदेखील लागली नव्हती. मानसीने तिच्या बाबांचा एक फोटो त्यांच्या बेडरूममध्ये ठेवला आहे. आजतागायत सुहानीने त्या फोटोबद्दल कधीच विचारले नाही.. हे कसे? तिच्या अंतर्मनाची ठेवण तशी झाली होती का? की त्या प्रश्नाचे उत्तर आईकडे देखील नसणार हे सुहानीला ठाऊक असेल?
आणि हेदेखील आश्चर्यच नाही का?
‘आश्चर्य कसले त्यात? मुलांना सगळे कळते.. तुम्हाला नाही ते कसं मनात येते हो?’ आजीचं हे विधान चुकीचं नसेलही कदाचित. पण मग माझ्या प्रश्नांचे काय?
सुहानीलादेखील हे कदाचित ठाऊक असेल, पण तिच्याजवळ शब्द नाहीत. पण खरे तर त्यात तरी काय अर्थ आहे?
शब्द माझ्याकडे खूप आहेत. पण नेमकं उत्तर माझ्याकडे कुठे आहे?
एकूण काय, तर सुहानी आता मोठी होते आहे. या वयात (आता ती पाच वर्षांची आहे) मुलं हट्टी होतात. आपलेच खरे करतात. पण त्यातूनच ती मोठी होतात.
..पण तिच्या बापूंचे मोठे होणे मात्र थांबले आहे.
आणि खरी काळजी तीच आहे. सुहानी मोठी होणार. मग आपल्याला दुसरा विरंगुळा शोधावा लागणार. आजच्या तिच्या वयातली कविता उद्या राहणार नाही. रोज नवनवीन प्रसंग निर्माण होणार नाहीत- मग काय करायचे आपण?
अशा सगळ्या रिझव्‍‌र्हेशनची गरज वगैरेबद्दल उल्लेख होतात. मला हे सुहानीपुढे बोलायला आवडत नाही. पण नकळत बोलले जाते आणि तिच्या कानावर ते पडतच असते. तिच्या न संपणाऱ्या प्रश्नांना उत्तरे कोण देणार? कशी द्यायची?
म्हटले तर सोपे असते -आजी.
म्हटले तर अवघड असते -आजोबा.
सुहानीला इथेही राहायचे असते आणि आम्ही जाऊ नये, असेही वाटत असते. हे कसे शक्य आहे? मधूनच मग ती विचारते,
‘बापू, तुमी सोलापूरला का जाता?’
तिच्या प्रश्नाने माझ्या पोटात खड्डा पडल्यासारखे वाटते. अर्थातच् आजी सांभाळून घेते.
‘अगं बापूंचा रेडिओवर कार्यक्रम असतो ना? त्याचे रेकॉर्डिग असते- म्हणून जातो.’
क्षणभर मला परिस्थितीचा खूप राग येतो. पण मग हेदेखील कळते की म्हणून काही आपण इथे येऊन राहणार आहोत का? तिकडे आजी-सुहानी संवाद चालूच असतात.
‘रेकॉर्डिग संपलं की पुन्हा येणार आम्ही.’
‘मला सुट्टी लागली की येनाल?’
‘होऽऽ नक्की.’
– किती कोंडमारा होत असेल नाही मुलांचा? – ही माझी अवजड चौकशी.
‘अहोऽ असे काही नसते हो. मुलांना सगळं कळत असतं..
शिवाय मुलं सगळं विसरतात.’
आजीचे हे मात्र खरेच असते. त्या दिवशी आम्ही निघताना सुहानी नेमकी जागी झाली होती. एरवी ती उठायच्या आत घर सोडायचा माझा आग्रह असतो. डोळे चोळत तिने ‘बाऽय’ केले. तिला जे कळले होते ते मला कळले नव्हते हेच खरे.
मी घाईघाईने पायऱ्या उतरलो.
त्या क्षणी मी तिला बाऽऽयदेखील करू शकत नव्हतो. मला डोळ्यातले पाणी कशाचे होते समजत नव्हते.
सुहानी मोठी झाली हेदेखील मला आवडत नव्हते का?
कुणास ठाऊक!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा