मंगला आठलेकर

भयाच्या वैयक्तिक भावनेचा अनुभव प्रत्येकानं घेतलेला असतो. पण ज्यावर सामान्य माणसाच्या हाती उपायच नाही, अशा भयाचं काय?.. हे भय अमानवी शक्तीचं नाहीच. ते आहे सूडानं वेडया झालेल्या माणसांचं. देशच्या देश उद्ध्ववस्त करून जग पेटवणारं. अंत नसलेली ही भयभावना थांबवणार कोण?

Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Marathwada Socio economic backwardness,
मराठवाड्याच्या अस्वस्थतेची पाळंमुळं
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या शेजारी राहणाऱ्या नववीतल्या मुलाला एकदा रात्री साडेबारा-एकच्या दरम्यान टेरेसवर जाताना पाहिलं. दुसऱ्या दिवशी त्याला मी विचारलं, तेव्हा तो म्हणाला, ‘‘रात्री खूप अंधार झाला, की नक्षत्रं, तारे पाहायला मजा येते.’’
मी म्हटलं, ‘‘तुला भीती नाही वाटत?’’
तो म्हणाला, ‘‘कशाची?.. अंधाराची? भुताखेतांची?. असली भीती मला वाटत नाही. उलट भुतं आली तर मला ती पाहायचीच आहेत! मात्र माणसांची भीती वाटते. चेहरे झाकलेली, हातात चाकू-सुऱ्या घेतलेली माणसं आली, तर मी निश्चितच पळत सुटेन!’’
भयाचा जन्म अज्ञानातून होतो असं आपण म्हणतो. थोडंफार खरंही आहे ते. पण त्या मुलानं भयाची जी व्याख्या केली होती, ती अधिक खरी, चिंता करायला लावणारी आहे. तसाही माणूस कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत भयभीत असतो. भय हा कुठल्याच व्याख्येत न सामावणारा भलामोठा काळोखी डोह आहे. याच्या तळाशी अनेक अज्ञात, रहस्यमय गोष्टी दडलेल्या आहेत. त्या अज्ञात, रहस्यमय गोष्टी माणसाच्या मनातल्या भयनिर्मितीला कारणीभूत ठरतात.
आपण अंधाऱ्या रस्त्यावरून चालतोय. रस्ता निर्मनुष्य आहे. घाईघाईनं मुक्कामी पोहोचत असताना हळूच केव्हातरी मनात भीती घर करायला लागते. आपल्याच पावलांचे आवाज.. पण मागून कोणीतरी येतंय असं वाटायला लागतं. आपण गती वाढवतो, मागून येणाराही गती वाढवतोय असा भास व्हायला लागतो. दरदरून घाम सुटतो, हृदयाचे ठोके वाढायला लागतात, हातापायांना कंप सुटतो. आता संपलंच सगळं, या भावनेनं घसा कोरडा पडतो. भयानं आपला पूर्ण कब्जा घेतलेला असतो. ही अवस्था नेमकी काय असते? या उदाहरणापुरतं बोलायचं झालं, तर आपण निर्मनुष्य रस्त्यावरून एकटे चालतोय याची जाणीव जेव्हा गडद व्हायला लागते तेव्हा अशा प्रसंगांशी निगडित असलेल्या आठवणी मनात जाग्या व्हायला लागतात. मेंदूतला अमिग्डला नावाचा न्यूरॉन काम करायला सुरुवात करतो. आपल्या मज्जासंस्थेला काहीतरी अकल्पित घडू शकतं असा इशारा देतो, सावध करतो. त्यामुळे अनेक भीतीदायक स्मरणं, वाचलेल्या घटना आठवायला लागतात आणि पाहता पाहता भीती सर्व शरीराचा ताबा घेते. मनात निर्माण झालेली ही भयभावना मुक्कामी पोहोचल्यानंतर मात्र नाहीशी होते. ओळखीची माणसं दिसतात, सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याची जाणीव होते. आता भ्यायचं कारण नाही, अशी मनाची खात्री पटते. न्यूरॉनचं काम संपतं आणि भीतीमुळे शरीरात घडलेले सर्व बदल नाहीसे होऊन शरीर पूर्ववत होतं. हा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो.

हेही वाचा : इतिश्री : ‘आईगिरी’चं ‘बेबीसिटिंग’

आमच्या एका मित्राचं शेत आहे. जवळपास वस्ती नाहीच म्हटलं तरी चालेल. समोर एक मोठा तलाव. रात्री बऱ्याचदा वीज नसते. तलावाचं पाणी काळंभोर दिसत असतं. तलावाच्या पलीकडे पसरलेलं मोठं जंगल! नाग, विंचू आहेतच. कधी कधी शेतात एखादं रानटी जनावरही येतं. अशा ठिकाणी एकटयानं राहणं म्हणजे.. आम्ही त्याला विचारतो, ‘‘तुला भीती नाही वाटत?’’ त्याचं उत्तर- ‘‘फार फार तर काय होईल? मरण येईल. पण त्याला आता पर्यायच नाही हे मान्य करून समोरची परिस्थिती स्वीकारली की भीती संपते. भीती कुठपर्यंत? मागे पळून जायला जागा आहे तोपर्यंत. पर्याय आहेत तोपर्यंत ते आपण वापरत राहतो आणि तोपर्यंत भीतीही पाठलाग करत राहते. पर्याय संपले की माणूस निर्भय होतो.’’
भयभावना मनाचा ताबा घ्यायला लागते, ती अगदी साध्या साध्या गोष्टींपासून. उदा. परीक्षेत पास होणार का? नोकरी मिळणार का? आजच्या स्पर्धेच्या जगात ती टिकणार का? नंतर लग्न, मुलाबाळांच्या काळज्या, आयुष्यात अचानक होणारे बदल, एकाकीपणा, अपयश, नकार, अनिश्चितता, दुखावलं जाणं, आपल्याविषयी चुकीची मतं बनणं, अपूर्णतेची जाणीव, बंधनं, न्यूनगंड, अगदी साधं वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचणं.. अशी अनेक कारणं माणसाच्या मनातल्या भयभावनेमागे कार्यरत असतात. पण भीतीमागची कारणं प्रत्येक वेळी जीवघेणी ठरतातच असं नाही. माणसं त्यातून मार्ग काढत राहतात, विचार करतात, पर्याय शोधतात. खरंतर भीती आहे म्हणून सुरक्षितताही आहे. भीतीची जाणीव असते म्हणून त्यांचा मेंदू त्यावरची उपाययोजनाही शोधून काढत असतो. म्हणूनच भयभावनेचा समावेश षड्रिपूंमध्ये होत नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया, यांचा प्रसंगी अतिरेक होतो तेव्हा त्या भावना माणसाचा घात करणारे शत्रू म्हणून ओळखल्या जातात. पण भयभावना माणसाचा शत्रू म्हणून ओळखली जात नाही, हा या भावनेचा विशेष. मनात निर्माण होणारी भीती माणसाला सावध होण्याची सूचना देते. कुठल्याही संकटापासून सुटका कशी होईल याचा विचार करायला लावते. उदा. समुद्रात तुफान उसळलंय, होडी घालू नकोस. कोनाडयात अंधार आहे, न बघता हात घालू नकोस. गाडी भरधाव येतेय, रस्ता सावकाशीनं ओलांड. रस्ता निसरडा आहे, पडशील.. अशा सावधगिरीच्या सूचना आपलं मन आपल्याला देत असतं. त्यामुळे आपल्याला संकटात पडण्यापासून वाचवणारं या प्रकारचं भय हा खरं तर आपला मित्र आहे.

या रोजच्या छोटया छोटया भीतींचा म्हणूनच फार विचार करण्याचं कारण नाही. ही भीती नैसर्गिक आहे. अशा ज्या अनेक गोष्टींचं भय माणसाला वाटतं, त्या बहुतेकांच्या जीवनाचा अपरिहार्य भाग असतात. काही काळानंतर माणसं त्यातून बाहेरही पडलेली असतात. नुसतीच बाहेर पडत नाहीत, तर आपण कशी एखाद्या संकटावर मात केली हेही अभिमानानं सांगतात. ते सांगताना त्यांच्या मनात भीतीचा लवलेशही नसतो. पण ‘माणसाइतकं भयानक काही नाही,’ असं सुचवणाऱ्या माझ्या शेजारच्या ‘त्या’ मुलानं दाखवलेला भीतीचा चेहरा चिंताजनक आहे. या भीतीचं दुसरं नाव दहशत! माणसाच्या दहशतवादी कृतींमागे विशिष्ट उद्देश असतो. दुसऱ्याला जाणूनबुजून इजा पोहोचवण्याचा, थंड डोक्यानं घेतलेला निर्णय असतो. हवं ते साध्य करण्यासाठी त्यांनी भय नावाच्या मानसिक शस्त्राचा वापर केलेला असतो. बंदी बनवलेल्यांची मुंडकी कापणं, त्याचा व्हिडीओ बनवून तो प्रसारित करणं, यांसारखे अमानुष प्रकार आतंकवादी करत असतात, ते लोकांच्या मनात आपल्याविषयी भय निर्माण करण्यासाठी आणि आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी.

हेही वाचा : माझं ‘सीझर’ होईल का डॉक्टर?

याची हवी तेवढी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आज काय घडतंय जगभर?.. दिलासा देणारं, मनाला सुखावणारं फार काही दिसत नाही सभोवार. कानावर येतात त्या बॉम्बस्फोटाच्या बातम्या, उन्मत्त जमावांनी केलेल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या कत्तली, अत्याचारग्रस्त स्त्रियांचे आक्रोश, निराधार बालकांचं रुदन.. शस्त्राच्या बळावर जगावर राज्य करू पाहणाऱ्या धर्माध शक्तींचा नंगानाच! काही देश घाबरलेले, काही देश घाबरवणारे. जगाच्या नकाशावरच्या जवळपास प्रत्येक देशाचं चित्र भयावह. सर्वत्र पराकोटीची असहिष्णुता. धर्माविषयीचे तीव्र मानापमान, त्यासाठी दैवतांचं निमित्त केलं जातं. पुतळयांच्या अपमानाचं भांडवल केलं जातं. मग दगडफेक, मारामाऱ्या, जाळपोळींचं सत्र. हजारो लोकांचे प्राण जातात. पाहता पाहता सारा आसमंत अशांत होऊन जातो.

राजकारण, सत्ताकारण, दुसऱ्याची भूमी पादाक्रांत करण्याची ईष्र्या, देवाज्ञेच्या नावाखाली दुसऱ्याचा धर्म संपवत आपला धर्म जगभर स्थापन करण्याची अमानुष वृत्ती, प्रत्येक स्त्री आपल्या उपभोगासाठीच आहे, ही लिंगपिसाट पुरुषांतली विकृती, नातेसंबंधांतला संपलेला कोमल भाव.. यातून माणसानंच निर्माण केलेली अनेक भयं. मृत्यूच्या भयापेक्षा ती अधिक घात करणारी आहेत. भयाचा हा प्रकार नुसता मनुष्यदेहाला मरण देणारा नसून, त्याहून घातक- म्हणजे माणसातलं माणूसपण संपवणारा आहे.
काही वर्षांपूर्वी घडलेली घटना- पेशावरच्या एका शाळेला लक्ष्य करून, पहिली ते दहावीच्या वर्गात शिरून अनेक शाळकरी मुलांना जवळून डोक्यात गोळया घालून दहशतवाद्यांनी ठार केलं. १३२ मुलांना आपले प्राण गमवावे लागले. शाळेतल्या लहान मुलांच्या अख्ख्या वर्गाला बंदुकीच्या गोळयांनी रक्तात न्हाऊन टाकणारा दहशतवाद. त्याच्यापुढे साक्षात मृत्यूदेखील लज्जित होईल.
निरपराध नागरिकांना बंदी बनवणारी, स्त्रियांवर बलात्कार करणारी, हजारोंच्या रक्ताच्या नद्या वाहवणारी रशिया-युक्रेन, इस्रायल-पॅलेस्टाईन यांची अमानुष युद्धं. ती थांबवण्याऐवजी दोघांच्याही सूड भावना पेटवत त्यांच्या बाजूनं मदतीसाठी उभे राहणारे देश, याहून भयानक काय असू शकतं? सूडानं पेटलेली माणसं, देशच्या देश बेचिराख करणारी अत्याधुनिक शस्त्रास्त्रं आणि जगभर दाटून आलेला भयाचा घनघोर अंधार!

हेही वाचा : चांदणे शिंपीत जाशी..

अशानं वैर वाढतच राहतं. ‘तू हे केलंस? आता मी त्याचं उत्तर तुला असं देतो..’ ‘तू असं उत्तर देतोस? त्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहात नाही..’ या सूड घेण्याच्या खेळात कितीकांचे प्राण का जाईनात! सूड पूर्ण झाला पाहिजे. त्यात कितीही पिढया बरबाद झाल्या तरी चालतील. सूडाच्या, वैराच्या वणव्यात अख्खं जग होरपळून निघालं आहे. आंधळया धर्मप्रेमानं, सत्तालालसेनं, सूडभावनेनं साऱ्या मनुष्यजातीचा विनाश घडवणाऱ्या माणसाच्या या विकृत चेहऱ्याइतकं भयंकर काही नाही.
महात्मा गांधीजींना जाऊन पंचाहत्तर वर्ष झाली. त्यांचं भाकीत खरं ठरावं अशा स्थितीला आज जग येऊन पोहोचलंय की काय? सूडभावनेचं थैमान आणि त्यातून जन्मलेल्या भयाच्या शेवटाचं भाकीत करताना गांधीजी म्हणाले होते- ‘अॅान आय फॉर अॅमन आय ओन्ली एन्ड्स अप मेकिंग द होल वल्र्ड ब्लाईंड!’ याहून अधिक भयंकर काय असू शकतं? ..
या भयापासून साऱ्या मनुष्यजातीचं रक्षण करण्याचा कोणता उपाय आपल्याकडे आहे?

mangalaathlekar@gmail.com

Story img Loader