स्त्रीमुक्ती चळवळीतील एक महत्त्वाचे नाव, ज्योती म्हापसेकर. गेली सदतीस वर्षे स्त्रीजागृतीसाठी सजगतेने प्रयत्न करणाऱ्या ज्योतीताईंनी स्त्री समस्या निवारण कंेद्रे, पाळणाघरे, साक्षरता मोहीम,  रेशिनगची चळवळ, मासिक ‘प्रेरक ललकारी’ आदी उपक्रम राबवलेच; शिवाय ‘मुलगी झाली हो’ या नाटकाचे ठिकठिकाणी ३००० प्रयोग करून स्त्रीजन्माविषयी जनजागृती केली. त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत..
स्त्री मुक्ती चळवळीकडे मी ओढले गेले ते वर्ष होते १९७५, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष! ‘समानतेकडे’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला होता. भारतातील स्त्रियांच्या सद्यस्थितीविषयी वर्तमानपत्रात अनेक लेख प्रसिद्ध होत होते. आतापर्यंत न जाणवलेल्या अनेक गोष्टी नव्याने कळत होत्या. माझे लग्न होऊन मुलगी होईपर्यंत मी सामाजिक चळवळीकडे काठावरूनच पाहत होते. वाचन, संगीत, ग्रंथपाल म्हणून नोकरी आणि संसार यात मी रमून गेले होते. या माझ्या छोटय़ा विश्वाला तडा गेला माझ्या आईच्या फेब्रुवारी १९७५ मधील अपघाती मृत्यूमुळे! आईच्या आयुष्याकडे मी वळून पाहू लागले.
माझी आई (सुमन कात्रे) स्त्रीवादी, संस्कृतची शिक्षिका आणि वडील (लक्ष्मण मिस्त्री) स्वातंत्र्यसैनिक. ते गिरणी कामगारांसाठी काम करणारे पूर्णवेळ कार्यकर्ते होते.  स्वातंत्र्य चळवळीतच त्या दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. माझी आई कविता करीत होती, तर वडील चळवळीमधील गाणी अतिशय उत्तम गायचे. आई नोकरी सांभाळून स्त्रीशिक्षिकांना युनियनमध्ये (टी.डी.एफ.) आणण्यासाठी झटत होती. दोघेही लालनिशाण पक्षाचे सदस्य! लाल निशाण पक्षाच्या विस्तारित कुटुंबातील सगळे लोक असंघटितांना (शेतमजूर, ऊसतोडणी कामगार, वनकामगार गिरणी कामगार, कोतवाल) संघटित करण्यासाठी अहोरात्र मग्न होते. अशा कुटुंबात वाढलेल्या माझ्यासारख्या एकुलत्या एक मुलीला असमानतेचा अनुभव कधीच आला नव्हता. माझा रुईया कॉलेजमधील मित्र आणि नंतरचा जोडीदार सुभाष याचे वडीलही स्वातंत्र्यसैनिक. त्यामुळेच सासरच्या घरातही समानतेचे वातावरण होते.
माझ्या लग्नात आईने लिहिले होते..
जाई तू पुढती सये जरा
मागे वळुनी पाहशी
देखी तात तशीच जननी आहे तुझ्या पाठीशी
पण प्रत्यक्षात आईच्या पाठोपाठ वडीलही त्यानंतरच्या काळात वारल्यामुळे माझे माहेरच संपले. तिची गाणी म्हणणे एवढय़ा मर्यादित कारणांसाठी त्या वेळच्या समविचारी मैत्रिणींबरोबर काम करू लागले. मग स्त्रीमुक्ती संघटना हेच माझे माहेर झाले.
त्या वेळी ऑक्टोबर १९७५ मध्ये पुण्यात होणाऱ्या स्त्रीमुक्ती संघर्ष परिषदेची आम्ही तयारी करू लागलो. आणीबाणी असतानाही परिषद दणक्यात झाली. महाराष्ट्रातील निरनिराळय़ा जिल्ह्य़ांतून कामगार, कष्टकरी, शेजमजूर, आदिवासी, देवदासी, नोकरदार मध्यमवर्गीय स्त्रिया त्यात सामील झाल्या होत्या. आमच्या कलापथकाने त्यात खणखणीत हजेरी लावली. तिथे झालेल्या भाषणामुळे आम्ही सर्वच प्रभावित झालो. या परिषदेने आम्हांला स्त्रीचा आत्मभानाचा संघर्ष कसा व्यापक आणि दूरगामी परिणाम करणारा आहे याचे भान दिले.
पुण्याहून परतल्यानंतरचा काळ हा परिषदेने भारलेला होता. आमच्या छोटय़ा गटाने स्त्रीमुक्ती म्हणजे काय हे समजून घ्यायला सुरुवात केली. त्यापुढची चार वर्षे स्त्रीच्या प्रश्नांचा अभ्यास, कलापथकासाठी नवीन गाणी, पोस्टर प्रदर्शन, भाषणाची तयारी यातच गेली. मात्र ‘स्त्रीमुक्ती’ हा शब्द त्या काळात टिंगलीचा होता. त्यामुळे प्रश्नोत्तरातला बराच वेळ ‘कुणापासून मुक्ती’ यातच जायचा. याच काळात आम्ही स्त्रीमुक्ती संघटनेचे जाहीर निवेदन तयार केले. ज्यामध्ये सामाजिक, राजकीय, मानसिक (सांस्कृतिक) क्षेत्रातील दुय्यम स्थानापासून मुक्ती म्हणजे स्त्रीमुक्ती अशी सोपी व्याख्या तयार केली. हे करताना सर्वसामान्यांना विशेषत: पुरुषांना स्त्रीमुक्तीचा विचार पुरुष विरोधी नसून पुरुषी वर्चस्वाविरुद्ध आहे हे आवर्जून सांगावे लागत होते. गेल ओमवेट, शारदा साठे, छाया दातार यांच्याकडून शिकत आम्ही काम करू लागलो. त्यांच्यामुळेच चळवळीत आम्ही सर्वजणी वाढलो आणि टिकलो.
१९७५ सालानंतर पुढील दशक महिला दशक म्हणून जाहीर करण्यात आले. जगभर स्त्रियांच्या प्रश्नांसंबधी विचारमंथन सुरू झाले आणि भारतातील अनेक राज्यांत त्याचे परिणाम जाणवू लागले. घटनेने स्त्री-पुरुष समानता हे मूल्य मान्य केले असले तरी वास्तवात वेगळीच परिस्थिती होती. ते दिवस संघर्षांचे होते. १९७९ साली मंजुश्री सारडा हिचा गूढ मृत्यू आणि १९८० साली मथुरा बलात्कार घटना यातून हुंडा आणि बलात्कारविरोधी मोहिमेने वेग घेतला. त्यासाठी लेख लिहिणे, मोर्चे काढणे, सभा संघटित करणे, देशव्यापी परिषदेत सहभाग घेणे यातून आम्ही घडत गेलो. स्त्रियांच्या प्रश्नांची जाणीवही वाढत गेली. याच काळात मी गाणी लिहायला सुरुवात केली. मधल्या काळात मुलाच्या जन्मामुळे थोडा खंड पडला. तरी मुलगा झाल्यामुळे स्त्रीकडे पाहण्याची समाजाची दृष्टी कशी बदलते हेही कळले आणि त्यातूनच ‘मुलगी झाली हो’ हे नाटक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. १५ मे १९८३ रोजी ‘मुलगी’चा पहिला प्रयोग आम्ही दिल्लीतील कार्यशाळेत केला. स्त्रीमुक्ती संघटनेच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाला या नाटकापासून सुरुवात झाली. आपल्या नोकऱ्या, व्यवसाय, शिक्षण पूर्ण करत, थोडे झपाटल्यासारखे आम्ही गावोगाव िहडत होतो, अजूनही फिरतोय. कौटुंबिक अडचणी, मुलांची आजारपणं, क्वचित घरच्यांचा विरोध, रात्रीच्या कार्यक्रमांमुळे निर्माण होणारे ताणतणाव या सगळय़ांना तोंड देत आम्ही नवनवे अनुभव घेत होतो आणि आमची जाणीव वाढत होती. मी स्वत: ‘अ‍ॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चर’ या महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करत होते. तिथल्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मला मिळाले.
या नाटकातून कार्यकर्त्यांचा एक भक्कम संच उभा राहिला, ज्यातून सुरू झाली स्त्री-पुरुष समानता यात्रेची साखळी. पश्चिम महाराष्ट्र (१९८५), विदर्भ (१९८६), कोकण (१९८७) आणि मराठवाडा (१९८९), उत्तर प्रदेश (१९९१) आणि उत्तर महाराष्ट्र (२०००) असे झंझावाती दौरे, ज्यात एका वेळी ५० ते ६० स्त्री-पुरुष सहभागी झाले. विद्यार्थ्यांशी चर्चा, पोस्टर प्रदर्शन, परिसंवाद आणि नाटकाचे जाहीर प्रयोग असा कार्यक्रमच रोज असे. यात्रांमधून परत आल्यावर या तरुण कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे स्त्री मुक्ती संघटनेच्या कामाचा विस्तार झाला.
स्त्रीमुक्ती संघटनेचे एक वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक प्रश्नाचा सांगोपांग अभ्यास. त्यामुळे संघटनेने कायम स्त्रीप्रश्नांचा अभ्यास करून मगच त्यांना हात घातला. संघटनेने प्रकल्प हाती घेतले, पण स्त्रीमुक्ती चळवळीचा विचार आणि प्रकल्प यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. जास्तीतजास्त कार्यकर्त्यांना त्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. एखादे काम/ प्रकल्प नीट पार पडतोय म्हटल्यावर त्यावर पुस्तक प्रकाशित करून किंवा गाणी लिहून वैचारिक भूमिकेसकट ती माहिती सर्वदूर पोहोचविली.
 ‘मुलगी झाली हो’च्या प्रयोगानंतर सतत स्वत:वरील अन्यायावर दाद मागण्यासाठी अनेक स्त्रिया आमच्याकडे येऊ लागल्या. मग संघटनेने अधिकृतपणे समस्या निवारण कंेद्र काढले. महाराष्ट्रातील ६ कंेद्रांचा आजवर हजारो स्त्रियांनी लाभ घेतला आहे. पाळणाघरांची मागणी करण्यासाठी राजू कालेलकर याने लिहिलेले ‘हा प्रश्नच चुकीचा आहे’ हे नाटक आम्ही १९७९ साली सादर केले होते. त्यानंतर पाळणाघरांना जागा मिळायला हवी यासाठी ४०,००० स्त्रियांचा अर्ज आम्ही सरकारला दिला. ६ पाळणाघरे चालविली आणि त्यावर पुस्तकही काढले. ‘मुलगी’,‘ हुंडा नको गं बाई’, ‘समतेकडे वाटचाल’, ‘बाप रे बाप’ ही नाटके सादर करतानाच नाटकांची पुस्तके, नाटकांच्या आणि घनकचऱ्यावरील सी.डी. प्रसिद्ध करून नाटके समाजापर्यंत पोचविली. त्यामुळे आम्ही ज्याप्रमाणे ‘मुलगी झाली हो’चे ३,००० प्रयोग केले. त्याच्याबरोबर इतरही संस्थांनी अक्षरश: शेकडो प्रयोग त्यांच्या त्यांच्या गावात केले.
स्त्री समस्या निवारण कंेद्रे (१९८५), पाळणाघरे (१९८९) साक्षरता मोहीम आणि रेशिनगची चळवळ (१९८९) सर्वदूर विचार पोहोचविण्यासाठी मासिक ‘प्रेरक ललकारी’ (१९८६) आणि स्त्रीप्रश्नांवरील पुस्तकांचे प्रकाशन असे कार्यक्रम धडाक्यात सुरू झाले, आजही चालू आहेत. समस्या निवारण कंेद्रांमध्ये काम करणाऱ्या केसेस हाताळताना मुलींची शिबिरे घेणं चालूच होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील मुला-मुलींसाठी ‘हुंडा नको गं बाई’ या नाटकाचे जवळजवळ एक हजार प्रयोग करण्यात आले. विवाहपूर्व समुपदेशनही सुरू झाले. १९९३ च्या दंगलीमध्ये या मोहिमांना थोडा सेट बॅक मिळाला, पण १९९५ च्या बीिजग परिषदेनंतर तरुण मुलांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने १९९६ मध्ये नव्या दमाच्या कार्यकर्त्यांबरोबर वस्तीतील कुमारवयीन मुलांसाठी ‘जिज्ञासा’ हा जीवनशिक्षण उपक्रम सुरू झाला. त्यांचे आधारस्तंभ होते कै. हेमंत करकरे आणि डॉ. आनंद नाडकर्णी!  ह्य़ा कार्यक्रमाचा विस्तार अनेक जिल्ह्य़ांत झाला. कुमार वय, ताणतणावांशी सामना, व्यसनमुक्ती, लैंगिकता शिक्षण आणि मूल्यशिक्षण या विषयांच्या कार्यशाळा घेऊन आजवर महानगरपालिकांच्या शाळांमधील ९ वीच्या ५ लाख मुलांमुलीपर्यंत हा ‘जीवन शिक्षण उपक्रम’ आला आहे.
वस्तीतील साक्षरता आणि रेशिनग चळवळीच्या कार्यक्रमांमुळे मुंबईतील कचरावेचकांच्या जीवनाची थोडीशी कल्पना आली होती. त्यावर विचारमंथनही चालू होते. त्यातूनच परिसर विकास हा एक वेगळा उपक्रम सुरू झाला, ज्यात केवळ कोरडय़ा कचऱ्यावर लक्ष कंेद्रित न करता बचत गट, आरोग्य आणि महिलांचे प्रशिक्षण, विमा योजना, बचतगटांची फेडरेशन, कंत्राटे मिळविण्यासाठी सहकारी संस्था असे एकापाठोपाठ एक उपक्रम सुरू झाले. पुन्हा कार्यकर्त्यांची, हितचिंतकांची एक फौज कामाला लागली. मीही २००२ साली स्वेच्छानिवृत्ती घेऊन संघटनेचे काम पूर्ण वेळ करू लागले. सर्वेक्षण करण्यापासून विविध तंत्रे शिकण्यापर्यंत सगळी कामे त्या करू लागल्या. माझ्या नोकरीतून मला पर्यावरणाचे भान आले होते. २००२ साली भाभा अणुशक्ती संशोधन कंेद्राच्या डॉ. शरद काळेंनी महानगरांच्या कचऱ्यासाठी विकसित केलेल्या निसर्गऋण बायोगॅस प्रकल्पाने तर ज्ञानाचे एक नवीनच दालन आमच्या समोर खुले झाले. यात कचरा, पर्यावरण, हवामान बदल या सर्वाची सांगड असल्याने यातून आमच्या जाणिवा प्रगल्भ करण्याचे काम या प्रकल्पाने केले. आमच्या परिसर भगिनीही उत्साहाने हे तंत्र शिकल्या आणि या प्रकल्पात काम करू लागल्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाचे प्रश्न आम्ही मांडू लागलो. हे करता करताच त्यांच्या मुलांनी शिकावे यासाठी शिक्षण साहाय्य अभियान सुरू झाले. त्यासाठीही शेकडो संघटित कर्मचाऱ्यांचे मदतीचे हात पुढे आले. जुने उपक्रम करता करता नव्या कामाची व्याप्तीही वाढत गेली. कचऱ्याच्या प्रश्नावर काम करताना संघटनेच्या कार्यकर्त्यांचेही फार मोठे प्रबोधन झाले. घनकचऱ्याचा प्रश्न हा आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि पर्यावरणाशी अत्यंत निगडित असा प्रश्न आहे. आपल्या देशात अनेक गोष्टींचा सतत पुनर्वापर केला जातो. पण मध्यमवर्ग आणि नवश्रीमंत वर्गात ‘वापरा आणि फेका’ संस्कृती रुजते आहे. प्लास्टिकचा वापर बेसुमार वाढत चालला आहे. ‘स्वच्छ सुंदर हरित मुंबई’च्या घोषणा दिसत असल्या तरी जिथे उत्पन्न होतो तिथेच कचरा वेगळा करण्याचे कुठलेही शिक्षण नागरिकांना दिले जात नाही. ज्यांच्या घरातला कचरा वाढतो आहे ते नवश्रीमंत पर्यावरण प्रदूषणाविषयी बोलतात. पण आपणच याला जबाबदार आहोत याबद्दलची जाणीव त्यांना नाहीच, पण उदासीनता आणि बेपर्वाई दोन्ही आहे. अफाट लोकवस्तीमुळे मुंबई शहराच्या नागरी सुविधांवर पडणारा ताणही आहे. मुंबईतील ३५ हजार सफाई कामगार या दररोजच्या ६,००० टन कचऱ्यासाठी अत्यंत अपुरे पडतात. या कामामुळे त्यांच्या आरोग्याला गंभीर धोकाही निर्माण होतो आहे. एकूण मुंबईकर नागरिक केवळ ग्राहक झाला असून निसर्गाशी त्याचे नातेही तुटत चालले आहे. ‘वापर कमी करा, पुनर्वापर करा’ ही पर्यावरणवादी चळवळीची घोषणा आहे. नागरिक साध्या साध्या गोष्टी करून आपली जबाबदारी पार पाडू शकतील. लोकांचा सहभाग असल्याशिवाय कोणतीही सामाजिक सुधारणा यशस्वी होत नाही. म्हणून आम्ही या सर्वाची अपूर्व अशी साखळी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत.
स्वातंत्र्य चळवळीतील माझ्या आईच्या पिढीला स्वातंत्र्य मिळाल्यावर समानता मिळेल असे वाटत होते. पण नंतरच्या २५ वर्षांत त्यांचा भ्रमनिरास झाला आणि पक्षीय राजकारणाच्या बाहेर जाऊन स्त्रीमुक्ती चळवळ असावी अशी गरज त्यांना वाटू लागली होती. आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा समानता प्रस्थापित होईल आणि स्त्रियांना राजकारणात आणि निर्णय प्रक्रियेत स्थान मिळेल असे आम्हाला वाटत होते. आम्ही स्त्री संरक्षण देणारे कायदे करून घेतले, पण अंमलबजावणीसाठी शासन आणि राज्यकर्ते यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. स्वायत्त चळवळीला आज ४० वर्षे होत आली आहेत. बऱ्याच गोष्टी निश्चिपणे झाल्या आहेत, पण अनेक गोष्टी व्हायच्या राहिल्या आहेत. ‘फुलू द्या, वाढू द्या, माणसासारखं जगू द्या’ ही आमची यात्रेतील घोषणा होती, तर आता ‘जन्मू द्या, मुक्ती नाही जन्मू द्या’ असे म्हणावे लागत आहे. ‘आमच्या शरीरावर आमचा अधिकार’ ही ८० च्या दशकातील घोषणा पुन्हा एकदा द्यावी लागत आहे. आíथक प्रश्न सामाजिक समस्या, विज्ञान, पर्यावरण, पंचायत राज्यातील सहभाग या सर्वच क्षेत्रांत, सर्व स्तरांतील स्त्रिया सक्रिय भागीदारी करताना दिसतात. या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने पुरुषाची साथ मिळाली तर भविष्यातील चित्र सुंदर असणार आहे, यावर आमचा दृढ विश्वास आहे. अर्धे आकाश आमचे आहे, पण ते अजून बरेच ढगाळलेले आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशाची वाट पाहत आहे.
संपर्क – ज्योती म्हापसेकर
स्त्री मुक्ती संघटना -३१, श्रमिक, पहिला मजला, लोकमान्य टिळक वसाहत, रोड क्र. ३, दादर (पूर्व) मुंबई- १४
वेबसाइट- http://streemuktisanghatana.org
ई-मेल – smsmum@gmail.com
दूरध्वनी-०२२-५५७४५८४८

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
Maitri Clinic , Clinic , Maitri Clinic for boys and girls,
किशोरवयीन मुला-मुलींसाठी ‘मैत्री क्लिनिक’ ठरतेय आधार! साडे सोळा लाख मुला-मुलींना मार्गदशन…
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
Story img Loader