वाढत्या प्रपंचामुळे कोकणातली सावकारी सोडून आलेल्या केशव भिकाजी, महादेव भिकाजी आणि गणेश भिकाजी ढवळे या तीन बंधूंनी सुरू केलेलं ‘केशव भिकाजी ढवळे’ प्रकाशन. धार्मिक ग्रंथांना, पुस्तकांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या या प्रकाशन व्यवसायानं बघता बघता ११२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला. प्रकाशन व्यवसायात ‘धार्मिकते’नं नांदणाऱ्या ढवळेंच्या चार पिढय़ांविषयी..
सन १९००; मुंबई, गिरगाव, गजबजलेला, विशेषकरून सुशिक्षित वस्ती असलेला माधवबागेचा परिसर. पिंपळाच्या पारावर एका अनाहूत विक्रेत्याचं आगमन झालं. अशा ठिकाणी काय विकलं जाईल..? मुलांसाठी बोरं, चिंचा, आवळकाठी फार तर पेपरमिंट.. पण हे दुकान थोडं वेगळं होतं. पुस्तकांचं दुकान.. मनाचे श्लोक, रामरक्षा अशी छोटी छोटी पुस्तकं विकणारं. वाढत्या प्रपंचामुळे कोकणातली सावकारी सोडून आलेल्या तीन बंधूंनी काढलेलं. केशव भिकाजी, महादेव भिकाजी आणि गणेश भिकाजी ढवळे यांचं.
सातासमुद्रापलीकडून इंग्रज येतात.. इथं ‘बायबल’ फुकट वाटतात. ज्ञान कोणतंही वाईट नसतं, पण आपण आपल्या हिंदू धर्मासाठी काय करतो, या जाणिवेनं बेचैन होऊन केशव भिकाजींनी त्या काळात रामरक्षेची हजार हजार पुस्तकं मोफत वाटलेली आहेत. चांगल्या विचारांची, चांगले संस्कार करणारी पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या तळमळीतूनच या तीन बंधूंनी थोडय़ाच अवधीत स्वत:च्या प्रकाशन व्यवसायाला प्रारंभ केला. त्यांचं पहिलं पुस्तक होतं, ‘मुलामुलींचे चिमुकले पुस्तक’. या चिमुकल्या गंगोत्रीचा पुढे प्रचंड ग्रंथसागर झाला. परंपरेनं चालत आलेले नित्य पाठात असणारे धार्मिक ग्रंथ प्रकाशित करायला ढवळ्यांनी प्रारंभ केला. त्यांचा खप भरपूर आहे हे लक्षात येताच सावधपणे अशा ग्रंथांचे हक्क विकत घेतले आणि नंतर त्या आवृत्त्यांमध्ये निरनिराळ्या सुधारणा करण्याचा धडाकाच लावला.
सार्थ मुक्तेश्वरी, भगवद्गीता, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम गाथा हे तर होतेच, पण वा. अ. भिडय़ांनी सोपी केलेली ज्ञानेश्वरी आणि ल. रा. पांगारकरकृत दासबोधानं या प्रकाशन संस्थेचा पाया मजबूत केला. ‘संतकृपा जाली इमारत फळा आली’ हा संतकृपेचा वर्षांव ढवळ्यांनी शब्दश: अनुभवला, ‘भक्तीमार्गप्रदीप’ या पांगारकरांच्या ग्रंथामुळे! १९२६ साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथानं पुढे अनेकदा खपाचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले.
‘‘पुस्तक चांगलं दिसलं पाहिजे. पाहिल्याबरोबर आवडलं पाहिजे आणि लगेच विकत घेणं परवडलं पाहिजे,’ ही त्रिसूत्री हा केशव भिकाजींचा कटाक्ष होता. त्या तीनही बंधूंनी एकदिलानं काम केलं. निष्ठा, सचोटी आणि गुणवत्ता ही तत्त्वं आयुष्यभर पाळली. त्यामुळेच की काय, ढवळे प्रकाशनच्या प्रत्येक कृतीला मांगल्याचा.. पावित्र्याचा स्पर्श झाला. हे पावित्र्य राखून केशव भिकाजींनी काळानुरूप गरजा हेरल्या. ‘श्रीरामदास रोजनिशी’ हे त्याचं ठसठशीत उदाहरण. कोकणबोटींचं वेळापत्रक.. बेस्टचे बसमार्गसुद्धा सांगणारी ही रोजनिशी, अनेक संस्कृत शब्द टाळून सुटसुटीत मराठीत बनवलेली ढवळे पंचांगं यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि टिकवली.
गणेश भिकाजी ढवळे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र बाळकृष्ण ऊर्फ सोन्याबापू ढवळेंनी संस्थेचा मुख्य भार स्वीकारला. भक्कम पाया आणि अनेक विषयांतला विस्तार घराण्यातून लाभलाच होता. सोन्याबापूंच्या कौशल्यानं त्यावर मोठी झेप घेतली. त्यांना मुद्रणकलेत विशेष रुची होती, गती होती. केशव भिकाजींचं मार्गदर्शन लाभत होतं.
सोन्याबापूंनी परंपरागत प्रकाशनं अधिक देखणी केली. रंगसंगती, बांधणी, अक्षरं अगदी पुस्तकासोबत देण्याची खूणफीतही आकर्षक केली. पांगारकरकृत ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’, शं. दा. पेंडसेकृत ‘ज्ञानेश्वरांचं तत्त्वज्ञान’ अशी मराठी वाङ्मयाचं वैचारिक दालन समृद्ध करणारी पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. पूर्वी पोथी म्हटलं की त्याची पानं सुटीच असायची. सोन्याबापूंनी प्रथम रेशमी बांधणीची गुरुचरित्राची पोथी प्रकाशित केली. सुरुवातीला थोडी टीका झाली, पण पुढे ही सोय लोकांच्या अंगवळणी पडली. कामाचा झपाटा वाढवण्यासाठी सोन्याबापूंनी ‘कर्नाटक मुद्रणालय’ आणि ‘कर्नाटक प्रकाशन संस्था’ही विकत घेतली. स्वत:चं हाऊसजर्नल, मुलांसाठी खेळगडी मासिक.. सोन्याबापूंच्या कर्तृत्वाला मर्यादाच नव्हती. ‘न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज्’ हा रियासतकार सरदेसाईंचा त्रिखंडात्मक ग्रंथ आणि ‘इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स’ हा वीर सावकरांचा ग्रंथ; याची निर्मिती त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची केली.
काळ नेहमी सारखा नसतो. उत्कर्षांच्या चढत्या कमानीला संकटांचं ग्रहण लागलं. काही व्यावहारिक.. काही माणसांनी केलेल्या विश्वासघाताची, तर काही फसलेल्या योजनांची.. अनेक कारणं पण परिणामी उतरती कळा.. अशा वेळी प्रकाशन संस्थाही विकेंद्रित करावी लागली.
केशव भिकाजींच्या पत्नी श्रीमती सीताबाई यांच्या मार्गदर्शनाखाली सोन्याबापूंचे चिरंजीव धनंजय यांनी प्रकाशन संस्थेची जबाबदारी स्वीकारली. परंपरागत व्यवसायात पुण्याई पाठीशी उभी असली तरी डबघाईचे व्यवहारही धनंजय यांना वारसाहक्कानं स्वीकारावे लागले. अवघ्या तेविसाव्या वर्षी त्यांनी शांतपणे परिस्थितीचं अवलोकन करून, नवीन प्रकल्प न स्वीकारता, धार्मिक पुस्तकंच फक्त काढून आर्थिक कोंडीतून मार्ग काढला. वडिलांच्या, देखणेपणा आणि उत्कृष्टतेच्या अतिरेकापायी, सतत नवनवीन आव्हानं अंगावर घेण्यापायी आलेली संकटं धनंजयला खूप काही शिकवून गेली. प्रकाशन व्यवसायात आजवर नसलेलं कठोर वाटणारं ‘फक्त रोख व्यवहार’ हे धोरण त्यानी अंगीकारलं.
चांगलं बस्तान बसवल्यावर मात्र त्यांनी अनेक आगळेवेगळे प्रकल्प हाती घेतले. ‘रामकृष्ण विलोमकाव्यम’ हे रामासाठी एक ओळ, तर कृष्णासाठी दुसरी, असं विलक्षण काव्य.. मुखपृष्ठावर त्रिमितीचा भास.. एका बाजूनं राम, तर दुसऱ्या बाजूनं कृष्ण- अशा प्रकारचं हे देशातलं पहिलंच प्रकाशन. ‘भृगुसंहिता’ दुर्मीळ पोथ्यातून सोडवून पुस्तकरूपात सर्वाना उपलब्ध करून देणं हे धनंजय ढवळेचं एक ऐतिहासिक काम आहे.
खरं तर एखादा लेखक- संपादक जेवढा काळावर आपला ठसा उमटवतो, तेवढाच एखादा साक्षेपी प्रकाशकही. पण प्रकाशक अंधारात राहून साहित्याची दालनं प्रकाशित करतो. म्हणून धनंजय ढवळे यांनी खास प्रकाशकांसाठी पुरस्कार सुरू केले, हे त्यांचं विशेष योगदान!
साहित्याच्या विविध दालनांमधली वेगवेगळी पुस्तकं प्रकाशनासाठी हाती घेत असतानाच धनंजय ढवळे यांचं अचानक कर्करोगानं निधन झालं. तेव्हा त्यांचा मुलगा आंजनेय होता अवघा १२ वर्षांचा. पत्नी ज्योती आजवर एकत्र कुटुंबाचा मोठा व्याप सांभाळण्यातच मग्न होत्या. प्रकाशन किंवा घराच्या खालीच असलेल्या दुकानाच्या व्यवहारात त्यांनी कधीच लक्ष घातलं नव्हतं. पण त्यांच्या सासूबाईंनी त्यांना उमेद दिली, धीर दिला अन् म्हटलं, ‘‘चांगली ग्रॅज्युएट आहेस.. मन घातलंस की सगळं येईल तुला’’. दुकानातले जाणते ज्येष्ठ कर्मचारी महाजन, राजे यांच्या सहकार्यानं ज्योतीताईंनी सारे व्यवहार समजून घेतले. सुदैवानं धनंजय ढवळे यांनी प्रत्येक पुस्तकासाठीच्या विस्तृत नोंदी ठेवल्या होत्या. कुठला कागद, किती वापरला, खर्च किती, किती प्रती खपल्या.. या पाऊलखुणांचा वेध घेत घेत ज्योतीताईंनी आपला प्रवास सुरू केला. नियमित खपाच्या पुस्तकांच्याच आवृत्त्या काढल्या. त्यांचं पहिलं नवीन पुस्तक होतं  डॉ. रविन् थत्ते यांचं ‘जाणीव’. आज त्याच्या ७ आवृत्त्या निघाल्या आहेत. ज्योतीताई नम्रपणे सांगतात, ‘‘मी फार नवीन काही केलं नाही, पण चालत्या गाडीच्या गतीला खीळ नाही बसू दिली. रोजमेळ लिहायला शिकले अािण दरवर्षी नफा चढा राहील एवढा कटाक्ष ठेवला.’’
खरं तर स्त्रीला स्वयंपाकघरातून माजघरात आणि माजघरातून दिवाणखान्यात यायला एक शतक लागलं असा हा देश. पण आव्हान स्वीकारलं की स्त्री त्या कसोटीला उतरते, हे इतिहासानं अनेक वेळा सिद्ध केलंय.
आज ढवळे यांची चौथी पिढी म्हणजे आंजनेय आणि त्याची पत्नी कस्तुरी हे ज्योतीताईंच्या मदतीला आहेत. आंजनेयनं अवघ्या १९ व्या वर्षी व्यवसायात पदार्पण करण्यापूर्वी ६ महिने महाराष्ट्राचा पूर्ण दौरा केला. वितरक-पुस्तक विक्रेते यांच्याशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. तोवर कॉम्प्युटरवर टाइपसेटिंग आरेखनं त्यानं स्वत:च्याच मेहनतीवर शिकून घेतलं होतं. आंजनेय आणि कस्तुरीचा ध्यास आहे, ढवळे प्रकाशनची ध्वजा सातासमुद्रापार फडकली पाहिजे. दिवाकरशास्त्री घैसासांकडून त्यांनी ज्ञानेश्वरी आणि दासबोधाचा सोपा इंग्रजी अनुवाद करून घेतला. त्याच्याही अनेक आवृत्त्या निघाल्या. इंग्रजी एकनाथी भागवतही चांगलं खपतंय. कस्तुरीनं पंचतंत्र, नवलकथा या मुलांच्या पुस्तकांच्या इंग्रजी आवृत्त्या सिद्ध केल्या. काळाबरोबर चालताना धार्मिक पुस्तकांपासून रेकीपर्यंत अनेक विषय चौथ्या पिढीनं हाती घेतले आहेत. ई-बुक्सना पर्याय नाही. तेव्हा त्या स्पर्धेतही ते उतरले आहेत. भारतीय संस्कृती आणि अध्यात्म परदेशात लोकप्रिय आहेच; फक्त आपण उत्तम ते निवडून इंग्रजी भाषेत छापून तिकडं पोहोचवायचं आहे. हाच चौथ्या पिढीचा प्रयत्न आहे.
संगीताच्या क्षेत्रात नामवंत घराणी असतात. परंपरा सांभाळून नवतेचे प्रयोग करीत असतात. तसाच ग्रंथप्रकाशन- ग्रंथप्रसाराचा हा पवित्र वारसा जपणारं हे ढवळे घराणं ‘केशव भिकाजी ढवळे’ या नावाचा मंगल सुगंध जपत नवे नवे प्रयोग करीत आहे. ‘ढवळ्यांची तुकाराम गाथा द्या’ किंवा ‘ढवळ्यांची गुरुचरित्राची पोथी द्या’ अशी मागणी ग्राहक करतात. प्रकाशकानं अशी नाममुद्रा कोरणं ही शतकभराची पुण्याई आहे. ढवळे प्रकाशन आता ११२ वर्षांचं झालं आहे. त्यांना शुभेच्छा देताना काय म्हणू या? जीवेत शरद: सहस्रम्।
५ं२ंल्ल३्र५ं१३ं‘@ॠें्र’.ूे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा