एकदा ह्य़ांना ‘कोंडून’ मी खाली आले आणि माझ्या कामात हरवले. अर्थातच कामाच्या नादात मी किल्ल्या कुठं ठेवल्या ते विसरले आणि तासाभराने वर जाऊन कुलूप काढायलाही विसरले! हे ‘कोंडदेव’ हाका मारताहेत वरून आणि मला खाली पत्ताच नाही! सासरेबुवांनी मला घरात आल्या आल्या फैलावर घेतलं, वर जाऊन ह्य़ांना ‘रिहा’ करण्याचा हुकूम दिला आणि तेव्हाच भीतीने गर्भगळीत झालेल्या मला जाणवलं की, किल्ल्या कुठं ठेवल्यात ते आपल्याला मुळीच आठवत नाहीये! आता?..
माझ्या विवाहानंतर नव्या घरातल्या एकेकाशी माझी ओळख होत गेली आणि सगळ्यांना समजून घेण्याची जबाबदारी माझ्यावर पडली, आणि एक अगदीच आगळी, नवीन जबाबदारी अवचित येऊन पडली. किल्ल्या सांभाळ्ण्याची! सगळीकडे कुलपं लावून, ती कुलपं आणि त्यात बंद झालेली संपत्ती सांभाळण्याची! किल्ल्या सांभाळणे ही तुम्हाला वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीय बरं का! मुख्य म्हणजे घरादाराच्या किल्ल्या सांभाळत ‘किल्लीदार’ होण्याऐवजी घरातल्या यच्चयावत कामांचा फडशा पाडणं सोपं असा दस्तूरखुद्द माझाचा अनुभव आहे. पण करणार काय? आलीया भोगासी.. म्हणत मी दोन्ही जबाबदाऱ्या घेतल्या. (त्या काळात दुसरा ऑप्शनच नसायचा म्हणा! )
तर या कुलूप-किल्ली जोडीशी माझं पूर्वीपासूनही कधीच पटलं नाही. एक तर माझ्या माहेरी आम्ही वाडय़ासारख्या घरात राहत होतो, जिथं दोन-दोन खोल्यांच्या बिऱ्हाडात तब्बल पाच कुटुंबं राहत होती. इवल्या इवल्या त्या खोल्या, त्या काय आणि त्यातले किडुकमिडुक संसार ते काय, ते सांभाळण्यासाठी हवीत कशाला कुलपं? जरा उंबरठय़ावर डोकावलं तरी चार ओळखीचे चेहरे दिसणार. पूर्वी माझी आई दार सताड उघडं टाकून शेजारच्या काकूंना सांगायची, ‘वहिनी, जरा बघाल का हो पंधरा मिनिटं घराकडे. मी बाजारातून भाजी घेऊन येतेय. ही कार्टी खेळतेय (म्हणजे मी!) बरं का समोरच्या अंगणात. आणि तुमच्यासाठीही िलबं, हिरव्या मिरच्या आणते हं का!’ एवढं बोलून आई वळली की अस्मादिकही पसार! घर तसंच उघडं! शेजारच्या वहिनीसुद्धा एखादी नजर टाकून आपल्या कामात गुंतलेल्या! कोण बघतंय त्या घराकडे! आणि त्याला कशाला ती कुलपं लावत बसायचं? असा सगळा मामला होता. मला शाळेत पोहोचवायला, दवाखान्यात नेऊन आणायला तर आई नुसतं दार ओढून कडी घालायची. कुलूप म्हणजे दुर्मीळ वस्तूसारखं पेटीतून काढून गावाला जाताना दाराला लावायचं असे. असा हा काळ. त्यातच मी लहानाची मोठी झाल्यामुळे कुलूप-किल्ली ही संकल्पनाच मला फारशी पटणारी नसे. पण सासरी नेमकं उलट!
माझं सासरचं घर गावापासून अंमळ लांब. त्यातही आजूबाजूची बरीच जागा रिकामी. त्यात घर मोठ्ठं, दुमजली आणि स्वतंत्र. घरातल्या माणसांना कामानिमित्त बाहेर पडावं लागायचं. घरी कोणीच नाही. त्यामुळे मी बाहेर जायचं असेल तर कुलूप-किल्ली अगदी ‘मस्ट’! इथंच माझी कुलूप-किल्लीशी गाठ पडली! आधीच माझा वस्तू सांभाळण्याचा आनंदी आनंद! त्यातच प्रत्येक कुलपाचं ज्यावाचून अडेल ती किल्ली म्हणजे अगदीच बोटभर वस्तू! अशा छोटय़ा छोटय़ा वस्तू हरवण्यात तर माझा लहानपणापासूनच हातखंडा!
त्यामुळे खरं तर कुलूप-किल्लीचा मला रागच यायला लागला होता. पण या जोडीने मात्र माझ्या सर्वच व्यवहारात तोंड खुपसायला सुरुवात करून टाकली. (त्यातही प्रत्येक वेळी कुलपात किल्ली खुपसावीच लागते हा अधिकच वैतागाचा भाग!) यातून सुटण्याचा उपाय म्हणून कुत्रा पाळायचं ठरवलं. मग एक छोटं पिल्लू मिळवलं आणि त्याला पाळायला सुरुवात केली. आता हे पिल्लू जरा मोठं झालं की निदान अध्र्या वेळाना माझा कुलपाचा त्रास वाचेल! जवळची छोटी कामं दाराची कडी आणि पिल्लू यांच्यावर घर सोपवून करता येतील. लांब जातानाच काय ते कुलूप लावावं लागेल आठवणीने! त्यातही एखाद्या वेळी मी कुलूप लावायला विसरलेच तरी, पिल्लू काही माझं नाव घरातल्या मेंबर्सना सांगू शकणार नाही हा मजेचा भाग! त्याने सांगण्याचा प्रयास केलाही तरी मेंबर्सना काहीच कळणार नाही हा तर जाम मज्जेचा भाग! मग स्वत:वरच खूश होऊन मी पिल्लाचं संगोपन मोठय़ा प्रेमाने करू लागले. पण कसलं काय? अवघ्या चार दिवसांत ते दिसेनासं झालं. एवढासा जीव, असा किती लांब जाणार म्हणून मी पायपीट करून शोधत होते, तर पलीकडल्या रांगेतल्या काकू भेटल्या. त्यांना सगळं सांगितलं, तर त्या म्हणतात कशा, ‘‘अगं बाई! आधीच तुमचं घर अगदी एकटं असतं. एवढं मोठ्ठं अंगण अन् व्हरांडा! रात्रीचं ते पिल्लू कोणी उचलून नेलं तरी काय कळणार आहे? ते काय ओरडणार आहे ‘वाचवा! वाचवा!’ म्हणून? तुला माहीत नाही, आमच्याकडचं पण कुत्र्याचं पिल्लू असंच कोणी तरी चोरून नेलं होतं. मग पुढल्या वेळेपासून आम्ही पिल्लाला ग्रिलमध्ये ठेवून कुलूप लावायला लागलो, निदान रात्री तरी!’’
काकूंचं बोलणं ऐकून मी कपाळाला हात लावला. ‘कुत्रा सांभाळायला पण कुलूप लागतं? अरे देवा!’ असं म्हणताना मला चक्कगरगरायला लागलं. पण माझ्या गरगरण्याचा त्या गरगरीत काकूंनी वेगळाच अर्थ घेऊ नये म्हणून मी तिथून सटकले. आता मात्र कुलूप-किल्लीशिवाय गत्यंतर नाही हे मी समजून चुकले. आता रोज रात्री अंगणातल्या यच्चयावत सर्व वस्तू (उदा. बादल्या, पाइप, बागेतली अवजारं वगरे) घरात आणून ग्रिलला कुलूप लावणं आलं, ज्या वस्तू घरात आणणं अगदीच शक्य नाही (उदा. स्कूटर, मोटारसायकल वगरे) त्यांच्यासाठी फाटकाला कुलूप लावणं आलं, घराच्या दोन लाकडी दरवाजांना कुलूप लावणं आलं, मोलकरणीच्या दाराचा चोरमहाशयांनी उपयोग करू नये म्हणून त्याला कुलूप लावणं आलं, आणि एवढं कमी म्हणून की काय, जिना चढून वर गेले की जिन्याच्या दाराला कुलूप आणि खोलीत शिरलं की खोलीच्या दाराला कुलूप लावणं आलं! हा भरगच्च कार्यक्रम रोज रात्री करता करता एखाद्या वेळी सकाळच व्हायची म्हणून मी अगदी धास्तावून गेले होते! त्यात सकाळ झाली की पुन्हा कुलपं उघडायचा कार्यक्रम! या कुलपाकुलपीमध्ये माझ्या नवविवाहित आयुष्यातला सगळा रोमान्स संपून जातो की काय असं वाटायला लागलं, कारण कुलपांचा क्रम मी रोजच विसरायचे. शिवाय किल्ल्या कुठं ठेवल्यात तेही रोजच विसरायचे आणि मग रोजच मला ‘ह्य़ांची’ बोलणी खावी लागायची! नव्या नव्या एकुलत्या एक बायकोवर इतकं चिडायचं नसतं ही गोष्ट ‘हे’ विसरायचे आणि मी तरी कशी सांगणार? कारण इथं माझ्या तोंडाला कुलूप!
एकदा फाटकाला कुलूप लावून वर झोपायला गेले. सकाळी सासरे नेहमीप्रमाणे फिरायला जायला निघाले तर फाटकाला कुलूप! किल्ल्या जागेवर नाहीत! मग काय विचारता? नुसता गोंधळ! मी धडपडत उठून किल्ल्या घेऊन खाली येऊन एकदाचं त्यांना ‘खुल जा सिम सिम’ करून देईपर्यंत त्यांनी मला अगदी धारेवर धरलं! माझी सकाळच अशी टेन्शनमय झाल्यामुळे स्वाभाविकच मी किल्ल्यांच्या झुबक्याची जागा नकळत बदलली आणि मागल्या दाराशी मोलकरीण आली, पुन्हा महाभारत सुरू..
मी नेहमी लवकर उठून खाली जायला लागले की ‘हे’ हमखास आवाज द्यायचे आणि.. (नाही हो! तसं काही न करता) ‘बाहेरून कुलूप लावून घे. मी झोपणार आहे थोडा वेळ’ असं फर्मान सोडायचे! आता चांगली सकाळ झालेय नं? मग आता कशाला कुलूप? हा माझा जीव नसलेला प्रश्न ह्य़ांना अगदीच ‘हा’ वाटायचा. ‘वेळ काही सांगून येत नसते’ हे ठरावीक उत्तर देऊन हे कूस बदलून झोपायचे. वर ‘एक तासाने मला उठव हं कुलूप उघडून!’ असंही सांगायचे. (वेळ म्हणजे चोर! हा शब्दकोशात नसलेला अर्थ लावायला मला बराच काळ लागला!)
तर असंच एकदा ह्य़ांना ‘कोंडून’ मी खाली आले आणि माझ्या कामात हरवले. अर्थातच कामाच्या नादात मी किल्ल्या कुठं ठेवल्या ते विसरले आणि तासाभराने वर जाऊन कुलूप काढायलाही विसरले! तेव्हा मोबाइलही नव्हते, की पटकन वरच्या खोलीतून खाली फोन केला! हे ‘कोंडदेव’ हाका मारताहेत वरून आणि मला खाली पत्ताच नाही! सासरे बाहेरून फिरून आले तेव्हा ह्य़ांनी त्यांना वरच्या खिडकीतून आवाज देऊन काय झालंय ते सांगितलं. सासरेबुवांनी मला घरात आल्या आल्या फैलावर घेतलं, वर जाऊन कुलूप उघडून ह्य़ांना ‘रिहा’ करण्याचा हुकूम दिला आणि तेव्हाच भीतीने गर्भगळीत झालेल्या मला जाणवलं की आपण किल्ल्या कुठं ठेवल्यात ते आपल्याला मुळीच आठवत नाहीये! पुढल्या प्रसंगाची तुम्हीच कल्पना करा! मला अगदीच सांगवत नाहीये!
अशा या रंगारंग कार्यक्रमात गोदरेजच्या कपाटाच्या कुलपाच्या किल्ल्या, गाडय़ांच्या किल्ल्या, सुटकेसच्या किल्ल्या अशी यथावकाश भर पडतच होती. माझं आधी किल्ल्या हरवणं आणि नंतर ‘तू छुपी है कहा?’ करून आक्रोश करीत सगळं घर उलथापालथ करणं सुरूच होतं. पण गंमत म्हणजे नवीन लग्न झालेल्या सुनेवर सासू स्वयंपाकघर जसं ‘टाकते’ ना तशा या किल्ल्या पण सगळ्यांनी माझ्यावर ‘टाकल्या’ होत्या. कोणीच ती जबाबदारी घेणार नव्हते. मी ‘खानदान की बहू’ असल्यामुळे मीच ती जबाबदारी घ्यायची होती. माझा तर किल्ल्यांची जागा बदलण्याचा, हरवण्याचा विक्रम सुरू होता. माझ्या घरी जर चोर शिरलाच, तर कपाटाच्या, सुटकेसेसच्या किल्ल्या शोधण्यापायी तो इतका बेजार होईल, की त्यापायी तो चोरी करणंच सोडून देईल. मी सगळ्या किल्ल्या वेगवेगळ्या ठेवून पाहिल्या तरी त्या हरवतात, झुपका केला तर फारच सहज हरवतात. एकदा माझ्या हैराणीने हैराण झालेल्या माझ्या भावाने मला एक छोटीशी शिट्टी दिली होती आणि तिची ‘सेट’ केलेली जोडीदार शिट्टी किल्ल्यांच्या झुपक्याला जोडून दिली होती. माझ्या जवळची शिट्टी वाजवली की किल्ल्याच्या झुबक्यातून प्रतिध्वनी येत होता. आता माझ्या किल्ल्या कधीच हरवणार नाहीत. म्हणून मी प्रचंड म्हणजे तुडुंब खूश होते. पण माझा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण?.. कारण काही दिवसांतच शिट्टी हरवली!!                                                                                                अजूनही माझा किल्ल्या हरवणं आणि शोधणं हा कार्यक्रम सुरूच आहे. त्यातच इतक्या किल्ल्यांमधली समोरच्या कुलपाची किल्ली कुठली याचा सराव अजूनही होत नाहीए! वर्षांनुर्वष तीच कुलपं वापरूनही, अजूनही कुलपं उघडायला गेल्यावर मी कमीत कमी तीन वेळा चुकीची किल्ली कुलपात घालतेच. तीन चान्स! एक देवाचा! एक नवऱ्याचा आणि एक माझाच! तेव्हा कुठं बरोबर किल्ली लागते आणि ते कुलूप उघडतं. ती किल्ली तशीच त्या कुलपातच लटकवून ठेवली तर हमखास पडून जाते, पदराला बांधून ठेवली तर किल्लीसकट साडी धुवायला टाकली जाते, बोटात अडकवून ठेवली तर शंभर टक्के अंतर्धान पावतेच आणि रात्री कुलुपायण सुरू झालं की मला पुन्हा शोधाशोध सुरू करावी लागते. ‘खानदान की बहू’ला किल्ल्यांचा जुडगा देऊन ‘अब ये जिम्मेदारी तुम्हारी!’ असं का म्हणत असतील, ते मला आत्ता आत्ता खरं कळलंय, आणि माझ्या अनुभवावरून पटलंयसुद्धा! सुनेला गुंतवून ठेवायला याच्यासारखा ‘सन्माननीय मार्ग’ नाही! बस म्हणावं, जोडय़ा लावत आणि कुलपं उघडत! सासूबाईंची आयतीच सगळ्यातून सुटका! भले शाब्बास!
एक मात्र खरं! रोज रात्री योग्य किल्लीने योग्य कुलूप लावून आणि सकाळी सकाळी (यो.कि.यो.कु.) उघडून मला आता पक्की सवय व्हायला लागली आहे. अहो, चक्क रात्री एखादं कुलूप लावायचं राहिलं तर मध्येच दचकून जाग यायला लागली आहे! स्वप्नातही कुलूप-किल्ली दिसायला लागली आहे! आणि झोपेतच चालायची सवय असूनही सकाळी मी व्यवस्थित कुलपं उघडायला लागली आहे! ‘कुलुपाळलेली’ आहे म्हणा ना आता मी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा