‘स्पर्श दिव्यत्वाचा’ या सुलभा वर्दे व उषा धर्माधिकारी यांनी संपादन केलेल्या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील शब्द आहेत.. ‘जन्माला आलेलं आपलं मूल बहिरं-मुकं, आंधळं, मतिमंद किंवा विकलांग आहे हे कळलं की प्रथम जबरदस्त धक्का बसतो. पण मग त्यातून सावरलेल्या या पालकांना विशेषत: आईला एक असाधारण शक्ती प्राप्त होते. सर्व तऱ्हेच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत ती आपल्या दुबळ्या मुलाचं संगोपन करते. समर्थपणे जगाला सामोरं जाण्यासाठी त्याला तयार करते. या काळात कसोटीला लागते ती तिची जिद्द. ती प्रयत्नांची पराकाष्ठा करते आणि आपल्या बालकाला जीवनप्रवाहाच्या मुख्य भागात आणून ठेवते. हा प्रदीर्घ प्रवास कष्टमय, यातनामय असतो. परंतु या प्रवासात तिला धीर लाभतो तो तिच्या मन:शक्तीचा!’
जेमतेम २१व्या वर्षी लग्न झालं तिचं! मनासारखा जोडीदार मिळाला आणि केळकरांची ही लाडकी लेक माधवी डोळय़ांत खूप सारी स्वप्नं घेऊन कुंटय़ांच्या घरी आली. नव्या नवलाईचे दिवस. त्यातच बाळाच्या येण्याची चाहूल लागली. सुखाचा प्याला शिगोशिगभरला होता, पण नियतीला हे सुख मंजूर नव्हतं. तिचं बाळ पूर्ण दिवस भरण्याआधीच जन्माला आलं. वजन एक किलोपेक्षा किंचित जास्त. पाय वेडेवाकडे, एकमेकात गुंतलेले, हातही वाकडे. त्याला जन्मल्याबरोबर ऑक्सिजन कमी पडला होता. त्यामुळे शरीराचा तोल सांभाळणाऱ्या पेशींवर परिणाम होऊन तो बहुविकलांग झाला. जगाच्या पाठीवर या आजाराला कोणताच उपाय नव्हता. एवढंच नव्हे तर त्याच्या बुद्धीवरही परिणाम झाला होता. दृष्टीही अधू बनली होती. जेमतेम ५ इंचांच्या मर्यादेतलं त्याला दिसू शकत होतं. चेहऱ्यावर कोणत्याही भावना नाहीत. सहा महिन्यांपर्यंत कुठलीही हालचाल नाही. आठ वर्षे तो अंथरुणातच होता.
माधवी आणि तिचा पती मोरेश्वर दोघांची कसोटी सुरू झाली. हौसमौज हा शब्दच आयुष्यातून पुसला गेला. डोक्यात सतत त्याचाच विचार, त्याचीच काळजी. दोघांनी फिजिओथेरपी शिकून घेतली. तोच तर एकमेव आधार होता. २२ वर्षांची माधवी एकदम प्रौढ बनली. नवरा कामावर गेल्यावर सगळी जबाबदारी तिचीच तर होती. सतत लाळ पुसावी लागे. वाकडी मान सरळ करण्यासाठी ती तासन्तास मानेला आधार देत बसे. मान सरळ व्हायला आणि लाळ गळायची थांबायला बारा-तेरा वर्षे वाट बघावी लागली. एक तपश्चर्याच होती. तो प्रत्येक दिवस कसोटीचा होता. आजही आहे.
अजित बारा वर्षांचा झाल्यावर ऑपरेशन करून त्याच्या पायांची अढी सोडवली. खूप अवघड ऑपरेशन होतं ते! मनावर सतत ताण असायचा. हे सगळं स्वीकारणं अवघड होतं. वैफल्य, निराशा यामुळे माधवीला कधी कधी सगळं सोडून पळून जावं असं वाटे. पण अजित अतिशय गुणी मुलगा. हसण्या-बागडण्याच्या वयात त्याच्या नशिबात ऑपरेशन्स, इंजेक्शन्स, अगतिकता याशिवाय दुसरं काही नव्हतं. मात्र सहनशीलता हा गुण त्याच्या पारडय़ात देवाने भरभरून टाकला होता.
घरामध्ये सरपटत पुढं कसं जायचं हे त्याला आईने आठव्या वर्षी प्रात्यक्षिक करून करून शिकवलं, पण बाहेर जाताना त्याला उचलून घ्यावं लागे. लोक विचित्र नजरेने बघत. पण आईबाबांना त्याची कधीच लाज वाटली नाही. लग्नसमारंभात, बागेत, कुणा नातलगाकडे ते जिथे जात तिथे त्याला घेऊन जात. त्याचं बालपण रम्य करण्याचा दोघांनी आपल्या परीने प्रयत्न केला. वयाच्या १६व्या वर्षांपर्यंत खांद्यावर बसवून पूर दाखवला. गर्दीत घुसून गणपती दाखवले. त्याच्याशी सतत संवाद ठेवला. मैत्री ठेवली.
अजितला अपंगांच्या विशेष शाळेत घालायचं ठरवलं खरं, पण बसपर्यंत त्याला नेताना व आत चढवताना-उतरवताना माधवीताईना ब्रह्मांड आठवे. मात्र त्यांनी हार मानली नाही. हळूहळू त्याला शाळा आवडू लागली आणि माधवीताईंच्या लक्षात आलं की, त्याचं पाठांतर चांगलं आहे. शाळेतल्या कविता तो घरी आल्यावर जशाच्या तशा म्हणून दाखवायचा.
दैवाने एक दार किलकिलं केलं होतं. अजितची दृष्टी अधू असल्याने मोठा फाँट करून आईने त्याची वेगळी पुस्तकं तयार केली आणि त्याला वाचायला शिकवलं. त्याला वाचनात गोडी वाटू लागली. तो उत्तम वाचक बनला. त्याच्यासाठी गोष्टींच्या शेकडो कॅसेट घरी आणल्या आणि देवाची आणखी एक देणगी लक्षात आली. अजितची स्मरणशक्ती उत्तम होती. कथेतला शब्दन् शब्दच नव्हे तर विरामचिन्हंही तो विसरत नसे. त्यानंतर माधवीताई वक्तृत्व कथाकथन, नाटय़वाचन अशा स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी त्याला नेऊ लागल्या. त्याच्या खुल्या गटात बाकी मुलं सर्वसामान्य. हा एकटा विशेष. नाव पुकारलं की स्टेजवर सरपटत जायचा. पण एकदा बोलायला लागला की कुठेही कमी पडायचा नाही. अजित बक्षिसं मिळवत गेला आणि आईचा उत्साह वाढत गेला, पण विशेष शाळांच्या नियमांप्रमाणे १८व्या वर्षी त्याची शाळा बंद झाली. आईचं घरी अभ्यास घेणं मात्र सुरूच होतं.
अजित घरी बसल्यावर आईने विचारपूर्वक आणखी एक पाऊल पुढे टाकलं. कुबडय़ा आणून त्याला त्यांच्या मदतीने शरीराला हेलकावे देत चालायला शिकवलं. बाबांनी बाहेर फिरण्यासाठी चार चाकी गाडी घेतली. वात्सल्याचा कळस म्हणजे अजितला संगणक यायला पाहिजे म्हणून माधवीताई स्वत: वाचून घरीच कॉम्प्युटर, इंटरनेट शिकल्या आणि मग त्याला शिकवलं. अजितचा उजवा हात काम करत नाही, पण डाव्या हाताने तो कॉम्प्युटर चालवतो. गाणी लावतो. फेसबुकवरून मित्रांशी संपर्क ठेवतो.
आज अजित २६ वर्षांचा आहे. पुण्यातील बिबवेवाडीतील कुंटय़ांच्या घरात अजितला सोप्पं पडावं म्हणून अनेक सोयी करून घेतल्या आहेत. अंगणातून थेट घरात येण्यासाठी रॅम्प आहे. पलंग, बेसिन, लाइटची बटणं सगळं त्याच्या उंचीप्रमाणे आहे. ठिकठिकाणी आधारासाठी रॉड लावलेत. स्वत:ची आंघोळ, स्वच्छता तो एकटा करतो. एवढंच नव्हे तर ‘इडार्च सेंटर’ या कंपनीत प्लॉस्टिक मोल्डिंगचं कामही करतो. रिक्षावाले काका त्याला जपून नेतात व आणतात. ते त्याचे जिवाभावाचे मित्रच झालेत.
कथाकथनाच्या कार्यक्रमासाठी आईबाबा त्याला महाराष्ट्रात कुठेही नेतात. पु.लं.च्या व.पुं.च्या कथा तो बारकाव्यांनिशी सादर करतो आणि बक्षिसं घेऊन येतो. बहुविकलांग लिम्का बुकसाठी त्याचं नामांकन झालंय. सध्या तो टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांचा अभ्यास करतोय. त्यामुळे त्याची आणि त्याच्या लेखनिकाची सर्व विषयांची तयारी करून घेणं हे सध्या माधवीताईंपुढचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे.
अजित रिक्षाने शाळेत एकटा जायला लागल्यापासून माधवीताईंना थोडा वेळ मिळू लागला. माहेरून सामाजिक कामाचं बाळकडू मिळालं होतंच. त्यांचे वडील विनायक केळकर यांनी नोकरी सांभाळून ३० वर्षे मुलांसाठी संस्कार वर्ग चालवले होते. माधवीताई आजूबाजूच्या कष्टकरी बायकांना रांगोळी घालणे, कागदाची फुलं बनविणे, अत्तर करणे अशा कला शिकवतात. ज्ञानप्रबोधिनीमार्फत पुण्याच्या आसपासच्या छोटय़ा-छोटय़ा गावांत जाऊन महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमात सहभागी होतात. तसंच रोटरी क्लबतर्फे चालणाऱ्या पोलिओ डोस, स्त्रियांची वैद्यकीय तपासणी अशा शिबिरांत काम करायला त्यांना आवडतं. अट एकच, ‘अजित घरी यायच्या आत घरी परतायचं.’
गेल्या वर्षी ठाण्यात आचार्य अत्रे कट्टय़ावर मातृदिनानिमित्त माधवीताईंच्या मुलाखतीचा व अजितच्या कथाकथनाचा कार्यक्रम झाला. त्या वेळी अजितला विचारलं की, तुला तुझ्या आईबद्दल काय वाटतं? यावर दाटलेल्या कंठाने त्याने डॉ. संजय ओक यांच्या कवितेच्या या चार ओळी म्हणून दाखवल्या,
तुम्हा सगळ्यांसमोर सांगतो
खरे काय ते ईश्वरसाक्ष
हिच्यापोटी जन्म असावा,
हवा कुणाला तो मोक्ष?
पुन्हा पुन्हा मी जन्मा यावे
वेगळे नको काही
जन्म कोणत्याही परिस्थितीत असू द्या
हवी फक्त हीच आई
हवी फक्त हीच आई।
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा