रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांसाठी वयाच्या सत्तराव्या वर्षी ‘हमारा स्कूल’ची स्थापना करणाऱ्या मंगलाताई वागळे म्हणजे एक उत्साही, प्रेमळ व्यक्तिमत्त्व. मासळी बाजारातल्या एका कोपऱ्यात सुरू झालेल्या त्यांच्या शाळेत आज ७० मुलं सन्मानाने जगत आहेत, उच्च शिक्षणाकडे, वेगवेगळ्या कलांकडे वळताहेत. या मुलांची बडी टीचर असलेल्या मंगलाताईंविषयी..
गोव्यातला १९९८ चा नाताळ. पणजीमधील मांडवी हॉटेलमध्ये एक वेगळीच धामधूम सुरू होती. त्या वेळी नावारूपाला येत असलेल्या वेंडेल रॉड्रिक्स (जो या वर्षी पद्मश्री पुरस्काराचा मानकरी ठरलाय) या डिझायनरने बनवलेल्या खादीच्या डिझायनर कपडय़ांचा फॅशन शो बघण्यासाठी गोवेकर मोठय़ा संख्येने हजर होते. या कार्यक्रमाच्या आयोजनामागे एक भावनिक झालर होती. यातून मिळणारा नफा ‘कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट’ या सेवाभावी संस्थेच्या गोवा शाखेला दिला जाणार होता. अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद आला. पहिल्या तासाभरात जोरदार विक्री झाली. सर्व खर्च वजा जाता ८० हजारांची पुंजी जमा झाली. माझा जीव भांडय़ात पडला. अनेक दिवसांचे कष्ट सार्थकी लागले. तेव्हापासून वेंडेलचे फॅशन शो हे ट्रस्टच्या उत्पन्नाचे एक साधन ठरलं.. कस्तुरबा ट्रस्टच्या गोव्यातील मुख्य प्रतिनिधी मंगलाताई वागळे माहिती देत  होत्या.
१९९१ पासून मंगलाताईंनी ट्रस्टच्या माध्यमातून पणजीतील दुर्बल घटकाच्या स्त्रियांसाठी अनेक लहान-मोठे प्रकल्प राबवलेच, पण वयाच्या ७०व्या वर्षी रस्त्यावर इतस्तत: फिरणाऱ्या मुलांसाठी त्यांनी केलेली ‘हमारा स्कूल’ या उबदार घराची स्थापना आणि पुढची १४ वर्षे (आजपर्यंत) या मुलांसाठी सुरू असलेली त्यांची धडपड याला तोड नाही. २००१ साली पणजीतील फिश मार्केटच्या एका कोपऱ्यात १० मुलांना घेऊन सुरू केलेल्या ‘हमारा स्कूल’मध्ये आज ८० मुलं सन्मानाने जगत आहेत. त्यातली ५० तिथेच राहणारी तर ३० जागा नाही म्हणून फक्त झोपण्यापुरती घरी जाणारी. गोवा सरकारने या मुलांना राहण्यासाठी जागा दिलीय (२ बेडरूमचे २ फ्लॅटस्). तिसऱ्याची मागणी विचाराधीन आहे. ज्या वयात आयुष्याची निरवानिरव सुरू होते त्या वयात सुरू केलेलं आणि गेली १४ वर्षे ‘तनमनधनाचं’ सिंचन घालून जोपासलेलं त्यांचं हे काम म्हणजे मनाच्या सामर्थ्यांपुढे वयाची बेडी कशी निष्प्रभ ठरते याचं जिवंत उदाहरण.
आयुष्याच्या उत्तरार्धात सेवेचा वटवृक्ष उभारणाऱ्या मंगलाताई पंचेचाळिशीपर्यंत निव्वळ गृहिणी होत्या हे सांगूनही खरं वाटणार नाही. गोव्यातील काणकोण हे त्यांचं माहेर. सतराव्या वर्षी लग्न झालं आणि यजमानांच्या नोकरीनुसार कोल्हापूर, सातारा अशी गावं फिरत शेवटी मुंबईत शिवाजी पार्क इथे स्थिरावल्या. मुंबईत आल्यावर यजमानांनी नोकरी सोडली व मासेमारीचा धंदा करण्यासाठी एक मोठी बोट घेतली. हा धंदा डबघाईला गेला तेव्हा मंगलाताईनी कंबर कसली आणि मोठय़ा कंपन्यांच्या उपाहारगृहांना व पंचतारांकित हॉटेल्सना मासे पुरवण्याचं काम सुरू केलं. १९८३ मध्ये पतीला देवाज्ञा झाली तेव्हा त्यांच्या उपजीविकेचं हेच साधन होतं. त्या दिवसात एकदा त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला, ‘माशांचाच धंदा करायचाय तर आपण गोव्यात परत का जात नाही?’ हा विचार त्यांच्या मनात रुजला आणि त्यांनी आपल्या मातृभूमीत गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला.
१९८८ पासून त्या पुन्हा गोवेकर झाल्या. गोव्यात हॉटेल्सचा सुकाळ. त्यामुळे धंद्याला मरण नव्हतं. दोन्ही मुलींची लग्न झाली होती. जबाबदारी फारशी नव्हती. त्यामुळे त्यांनी ‘ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स’चं काम करायला सुरुवात केली. याच संदर्भातील एका परिषदेत त्यांची शोभनाताई रानडे या थोर समाजसेविकेची भेट झाली. शोभनाताई कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्टचं काम गोव्यात सुरू करण्यासाठी योग्य व्यक्तीच्या शोधात होत्या. मंगलाताई भेटताच त्यांचा शोध संपला. त्यानंतर लगेचच पणजीत मध्यमवर्गीय महिलांसाठी खाद्यपदार्थाचं विक्रीकेंद्र सुरू झालं. हे काम त्यांनी १९९१ ते ९५ अशी चार र्वष पाहिलं (हे केंद्र आजही सुरू आहे.). मध्यंतरात त्यांना दुसरा धक्का बसला. त्यांच्याबरोबर राहणारा त्यांचा एकुलता एक मुलगा ‘हार्ट अ‍ॅटॅक’ने हे जग सोडून गेला, पण ट्रस्टच्या कामांच्या सोबतीने त्यांचं आयुष्य पुढे सरकत राहिलं.
त्यानंतर ६ वर्षांनी म्हणजे २००१ साली वयाच्या ७०व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात टर्निग पॉइंट आला. त्या वेळी त्या मासे आणायला फिश मार्केटमध्ये गेल्या असताना त्यांना काही कोळणी ७/८ छोटय़ा मुलांना पकडून मारताना दिसल्या. चौकशी केल्यावर त्यांना समजलं की, ती मुलं गेली कित्येक दिवस माशांच्या ट्रकमधून मासे चोरून परस्पर विकत होती आणि नेमकी त्या वेळी त्या बायकांच्या तावडीत मिळाली होती. या घटनेचा मंगलाताईंच्या मनावर खोल परिणाम झाला. त्या विचार करू लागल्या, ‘या मुलांचं भवितव्य काय? त्यांची परिस्थितीच त्यांना असे गुन्हे करायला भाग पाडतेय मग तो त्यांचा दोष कसा? या नरकातून त्या मुलांना बाहेर काढता येईल का आणि कसं?’ त्यांना एकच मार्ग दिसत होता, तो म्हणजे त्या मुलांना शिक्षण व संस्कार देऊन स्वावलंबी करणं. त्या क्षणी तिथेच त्यांनी निर्णय घेतला. ‘हे शिवधनुष्य मी उचलणार..’ वाट अवघड होती, पण जिद्द अफाट होती.
मंगलाताईं प्रथम त्या मुलांच्या आयांना भेटल्या. त्या अशिक्षित बायांचा पहिला प्रश्न होता, ‘मुळात शिक्षणाची गरजच काय?’ हे ऐकून त्या अजिबात नाउमेद झाल्या नाहीत, कारण त्या पक्क्या जाणून होत्या की आई कुठल्याही परिस्थितीत का असेना, लेकराचं हित हा तिच्यासाठी परवलीचा शब्द असतो. तोपर्यंत त्या महिलांना शिक्षणाचा अर्थच माहीत नव्हता. त्यांनाही आधार मिळाल्यासारखं वाटलं. मंगलाताईंनी पहिली लढाई जिंकली.
१० मुलं शिकायला तयार झाली, पण जागा कुठे होती? मंगलाताईंच्या नजरेला फिश मार्केटमधलाच एक कोरडा कोपरा दिसला. तिथेच सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी १० पाटय़ा आणल्या आणि दोन कन्नड भाषिक मैत्रिणींना घेऊन (त्या मुलांना तीच भाषा येत असल्याने) मुळाक्षरं गिरवायला सुरुवात झाली. २ ते ६ महिन्यांत नगरपालिकेने जवळच्या बागेत वर्ग घ्यायला परवानगी दिली. सकाळी मुलं मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या (मासे घेण्यासाठी) विकत आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत बागेत एबीसीडी शिकत.
वर्षभरानंतर अशोक कुमार या आय.ए.एस. अधिकाऱ्याच्या ओळखीने एक २/३ खोल्यांचं घर मिळालं आणि बागेतली शाळा छपराखाली आली. वापरात नसलेलं ते घर, राहातं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. या घराला, किंबहुना या प्रकल्पाला मुलांनीच नाव सुचवलं, ‘हमारा स्कूल’. मुलं आली की मंगलाताईंचं पहिलं काम असायचं ते म्हणजे त्यांना नळावर नेऊन खसाखसा आंघोळ घालणे. आंघोळीनंतर घालण्यासाठी त्यांनी युनिफॉर्म शिवून घेतले. त्यांचं म्हणणं, युनिफॉर्मने मनाला व शरीराला एक प्रकारची शिस्त लागते. या मुलांना एका जागेवर बसवणं, स्वच्छता व इतर चांगल्या सवयी लावणं म्हणजे एक आव्हानच होतं.
थोडीशी घडी बसल्यावरचा प्रश्न होता तो त्यांच्या भुकेचा. डॉ. धुमे या आहारतज्ज्ञाने सुचवल्याप्रमाणे गहू, तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ व अख्खे मूग अशी पाच धान्यं एकत्र भाजून, दळून त्यात तूप व गूळ टाकून त्याचे लाडू बनवायला त्यांनी सुरुवात केली. हा लाडू, १ कप दूध व १ केळं खाल्ल्याने मुलांच्या पोटाला आधार मिळू लागला. एव्हाना मुलांची संख्या २५ झाली होती. फॅशन शोमधून मिळालेली पुंजी हाताशी होती, पण ती आयुष्यभरासाठी थोडीच पुरणार होती?
त्यातच आपण देत असलेला आहार मुलांच्या भुकेसाठी पुरेसा नाही हे त्यांच्या लक्षात आलं. मुलांना पोटभर जेवण देण्याची गरज होती. त्याच सुमारास एका लग्नात त्यांना ‘युनो’मध्ये काम करणारा त्यांचा भाचा मोहन तेलंग भेटला. त्याला हे समजताच त्याने तिथल्या तिथे दोन लाख रुपयांचा चेक लिहून दिला. मुलांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लागला.
सुरुवातीला मंगलाताई स्वत: डाळ, तांदूळ व भाज्या अशी एकत्रित खिचडी शिजवून आणत. पण लवकरच त्यांची तळमळ, जिद्द व चिकाटी पाहून मदतीचे हात पुढे येऊ लागले. त्यांची एक मैत्रीण व्हेरोनिका व्हेल्वो हिने पुढचे ८/९ महिने संपूर्ण स्वयंपाक घरी करून आणण्याची जबाबदारी आनंदाने घेतली. वैयक्तिक दाते पुढे येऊ लागले. ‘स्माइल फाऊंडेशन’ या संस्थेने तर एकरकमी ३ लाख रुपये दिले. गोवा सरकारने २५ लाख रुपयांची देणगी दिली. शिवाय २००६ साली पणजीत ९०० स्क्वेअर फुटांची जागा (फ्लॅट) दिली. ‘हमारा स्कूल’चं कामच इतकं बोलकं होतं की, शासनाकडून दुसरा फ्लॅट मिळायलाही कष्ट पडले नाहीत. या हक्काच्या जागेत २५ मुलगे व २५ मुली आनंदात राहू लागली.
आता या मुलांना शाळेत घालून रीतसर शिक्षण देणं गरजेचं होतं. ‘नगरपालिकेच्या शाळेत या मुलांना भवितव्य नाही’ हे एका शिक्षणतज्ज्ञाने व्यक्त केलेलं मत मंगलाताईंना पटलं. पण खासगी शाळेत घालायचं तर पैशाचा प्रश्न तर होताच, त्यापेक्षा मोठी समस्या होती ती त्यांच्या जन्म तारखेसंदर्भाची. जन्मतारखेची नोंद एकाही मुलाच्या आई-बापाजवळ नव्हती. मग कोर्टात जाऊन अ‍ॅफिडेव्हिट करून अंदाजाने प्रत्येकाची जन्मतारीख निश्चित केली गेली. नंतर त्यांची समज बघून त्यांना त्या त्या वर्गात प्रवेश मिळवला. हे लिहायला मला दोन मिनिटं लागली, पण हे सर्व उद्योग करण्यासाठी त्यांनी किती खस्ता काढल्या असतील याचा नुसता विचारच केलेला बरा. जाळावाचून नाही कढ आणि मायेवाचून नाही रडं, म्हणतात ना तेच खरं!
बडी टीचर हे मंगलाताईंना मुलांनी दिलेलं नाव. या बडी टीचरबद्दल मुलांच्या मनात उदंड प्रेम तर आहेच त्याबरोबर आदरयुक्त धाकही. एकदा त्यांच्या एका मुलाने शाळेत कसलीशी चोरी केली म्हणून शाळेच्या व्यवस्थापनाने त्याची रवानगी थेट बालसुधारगृहात केली. मंगलाताईंना हे समजताच त्या धावत गेल्या आणि त्यांनी त्या मुलाला जामीन भरून सोडवून आणलं. त्यांचं म्हणणं, ‘माणूस प्रेमाने बदलतो. शिक्षेने नव्हे.’ त्यांना असंही वाटतं की, या मुलांना आपण कोण शिक्षा देणार? त्यांना अशा परिस्थितीत जन्माला घालून परमेश्वराने अगोदरच शिक्षा दिलीय. त्यांच्या अशा मातृवत प्रेमामुळे मुलं त्यांचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत.
मंगलाताईंचा जिव्हाळा झिरपत झिरपत आता अनेक गोवेकरांच्या हृदयापर्यंत पोहोचलाय. या मुलांचा अभ्यास घ्यायला आता गोव्यातील सर्वोत्तम शाळेच्या शिक्षिका येतात. त्याना वेस्टर्न म्युझिक शिकवायला एक व्यावसायिक ग्रुप येतो. काही मुलांनी या कलेत चांगलीच प्रगती केलीय. त्यांना खेळासाठी प्रोत्साहन दिलं जातं. सॅव्हिओ या १६ वर्षांच्या मुलाला गोवा क्रिकेट असोसिएशनने निवडलंय आणि त्याच्या एक वर्षांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारलीय. परिणिता प्रसाद गेली ३ र्वष मुलांचं रात्रीचं जेवण तयार करून आणत आहेत व स्वत:च्या हाताने त्यांना वाढताहेत. या मुलांसाठी आता तीन शिक्षक, एक लेखापाल, दोन अधीक्षक असे सहा ते सात पगारी कर्मचारीही कार्यरत आहेत.
मुलांची प्रगती सांगताना मंगलाताईंनी तिथे राहणाऱ्या चार भावंडांची गोष्ट सांगितली.. वडील पक्के दारूडे आणि आईचा खून झाला त्यामुळे सात, चार, तीन व दोन अशा वयांची ती मुलं जवळजवळ अनाथ अवस्थेत राहात होती. चार वर्षांची मुलगी धाकटय़ा दोघांना बघत होती. ‘हमारा स्कूल’मध्ये आल्याने त्या चौघांचं आयुष्य मार्गी लागलंय. या वर्षी मोठा भाऊ बी.कॉम.ला आहे. बहीण बारावीला तर धाकटे ९वी, १०वीत. ‘हमारा स्कूल’ची सहा मुलं कॉलेज शिक्षण घेत आहेत. पुढील वर्षी त्यात पाच मुलांची भर पडेल. बडी टीचरचं स्वप्न साकार होऊ लागलंय.
८४ वर्षीय मंगलाताईंनी आता ‘हमारा स्कूल’च्या खालच्या मजल्यावर स्वत:साठी जागा घेतलीय. तिथे त्या एकटय़ाच(!) राहतात. दिवसातला बराच वेळ मुलांच्यात असतात. आजही सकाळी उठून प्राणायाम व सुदर्शन क्रिया न चुकता करतात. नेहमी खादीच वापरतात. त्यांच्या २ मुलींपैकी गोव्यात राहणाऱ्या शीला जयवंत या लेखिका आहेत तर मुंबईस्थित गीता कपाडिया चित्रकार. या दोघींना (व त्यांच्या कुटुंबीयांना) आपल्या या असामान्य आईबद्दल विलक्षण अभिमान आहे.
मंगलाताईंचं समाजाकडे एकच मागणं आहे, ‘सुशिक्षित व सुजाण नागरिकांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी थोडा वेळ द्यायला हवा. त्यांना हाताला धरून मुख्य प्रवाहात आणायला हवं.’
 त्यांची ही या हृदयीची हाक त्या हृदयी पोहोचेल?

Story img Loader