तीस-पस्तीस वर्षांपूर्वीच्या काळात ‘कुंवरनी’ सारख्या कादंबरीत एक धीट विषय स्त्रीवादी भूमिकेतून आक्रस्ताळेपणानं न मांडता कणखरपणानं मांडणाऱ्या जोत्स्ना देवधर आकाशवाणीवर निर्मात्या म्हणूनही प्रगल्भतेने वावरल्या. सतत आसपास ‘माणसं’ हवी असलेली, अत्यंत रसिक शेवटपर्यंत ‘लिहीत’ राहाणारी, शेवटपर्यंत जाणिवा पूर्णपणे जागृत असलेली ही एक संवेदनशील लेखिका नंतरच्या काळात मात्र माणसांची भुकेली राहिली..
आ युष्यात अगदी आपल्याला हवं ते मिळणं हे भाग्य फार कमी लोकांच्या वाटय़ाला येतं. सुदैवानं माझ्या वाटय़ाला ते भाग्य रेडिओच्या नोकरीमुळे लाभलं. भरभरून बौद्धिक खाद्य देणारं त्यावेळचं रेडिओसारखं जबरदस्त माध्यम माझ्या भाळी लिहिलं गेलं होतं, हे माझं कुठलं तरी पुण्यं म्हणावं लागेल. कारण ज्योत्स्ना देवधरांसारखी प्रसिद्ध लेखिका, व्यंकटेश माडगूळकरांसारखा  लेखक, पुरुषोत्तम जोशींसारखा ‘पॉवरफूल’ आवाजाचा अभ्यासू निर्माता आणि या अस्सल कलावंत निर्मात्यांमुळे बाहेरच्या जगातले प्रसिद्ध लेखक, गायक, अभिनेते यांची आकाशवाणीवरची सततची वर्दळ असं हे भारलेलं वातावरण.. आणि ‘त्यात’ आपण काम करतोय.. आम्हीही भारलेलेच असायचो.
ज्योत्स्नाबाईंच्या मृत्यूची बातमी ऐकली आणि त्यांचं ‘गृहिणी’ हे सेक्शन, त्यांची कामाची पद्धत, त्यांचा आणि माझा आलेला काही प्रोजेक्टनिमित्ताने आलेला संबंध.. त्या सगळ्या आठवणी मनात गर्दी करू लागल्या.
मी आकाशवाणीत लागले त्यापूर्वी ज्योत्स्नाबाईंच्या ‘कल्याणी’ आणि ‘घरगंगेच्या काठी’ कादंबऱ्या कमालीच्या लोकप्रिय होत्या. ‘कल्याणी’ची तर खूपच चर्चा होती. त्या काळी ती कादंबरी फारच आवडली होती. रेडिओत कामाला सुरुवात केल्यानंतर पहिले अनेक दिवस या ‘मोठय़ा’ लेखकांकडे भारावून पाहण्यातच गेले. एखाद्या सेलिबेट्रीचं स्टेटस् असलेली ही प्रसिद्ध माणसं आपल्या अवतीभवती वावरतायत याचं फार मोठं अप्रूप मला वाटत होतं. परंतु ज्योत्स्नाबाईंच्या स्वभावानुसार त्या फारच लवकर जवळ आल्या. सरस व्यक्तिमत्त्व, सुरेख राहणी आणि अगदी स्वंपाक – पाण्याच्या, साडय़ांच्या गप्पांपासून आसपासच्या प्रत्येक स्त्री सहकाऱ्यांच्या कंपूत त्या सहज मिसळत असत.
आम्हा अनाऊन्सर मंडळींचा ऑफिसमधल्या सर्वच मंडळींशी सतत संपर्क येत नसे. कारण आमच्या शिफ्ट्स असायच्या. अनेक वेळा सकाळची शिफ्ट झाल्यानंतर आम्ही घरी जाताना आणि ज्योत्स्नाबाई गाडीतून येताना गाठभेट व्हायची.. त्यांच्या छानशा साडीचं कौतुक केलं की त्यांना फार बरं वाटायचं.. मग इतर गप्पा सुरू.. त्यावेळी मी थोडंफार लिहीतही होते आणि भरपूर वाचतही होते.
एखाद्या लेखकानं निर्माता म्हणून काम करणं हे आकाशवाणीसारख्या माध्यमात सुवर्णकांचन योग असतो तो योग पुणे आकाशवाणीत ज्योत्स्नाबाई आणि व्यंकटेश माडगूळकरांच्या रूपानं उत्तम जुळून आला होता.
‘स्त्रियांसाठी’चा विभाग सांभाळताना ज्योत्स्नाबाईंनी स्वत:तल्या सगळ्या ऊर्जा पूर्णपणे उपयोगात आणल्या होत्या. उत्तमोत्तम शीर्षकांचे कार्यक्रम हे त्यांचं वैशिष्टय़ होतं. ‘स्त्रीसाठी दाहीदिशा लक्ष्मणरेषा’ हे त्यातल्याच एका कार्यक्रमाचं शीर्षक.. त्यांचा अगदी उजवा हात असलेल्या त्यांच्या सहकारी संजीवनी आपटे आणि ज्योत्स्नाबाई यांचं ‘गृहिणी’तलं निवेदन म्हणजे सहजसुंदर आविष्कार असायचा. ज्योत्स्नाबाईंनी एखादी कल्पना मांडायची आणि संजीवनी आपटेंनी ती उत्तम निर्मिती करून अमलात आणायची हे ठरलेलं..विशेष म्हणजे  तो कार्यक्रम ठाशीव व्हायचाच.
शरद्चंद्र चॅटर्जीच्या जन्मशताब्दी वर्षांत माझा आणि त्यांचा जवळून संबंध आला. त्यापूर्वी माझी काही नाटकं तसंच डॉक्युमेंट्रीज प्रसारित झाल्या होत्या. शरद्चंद्रांच्या शताब्दी वर्षांत ज्योत्स्नाबाई मला म्हणाल्या, ‘‘आपण त्यांच्यावर काहीतरी करू..’’
शरद्चंद्र हे माझेही अत्यंत आवडते लेखक.. त्यांच्या दोन कादंबऱ्या मी सुचवल्या. ‘गृहदाहं’ आणि ‘चरित्रहीन’! त्या दोन्ही कादंबऱ्यांवर रेडिओसाठी मी नाटय़रूपांतर केलं. त्या स्वत: उत्तम लेखिका आणि उत्तम वाचक असूनही माझ्या या निवडीत त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. आणि लेखनाला मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यांनी आणि संजीवनी आपटेंनी अत्यंत सुंदर निर्मिती करून त्या कादंबऱ्यांना परिपूर्ण न्याय दिला. त्या संपूर्ण काळात मला दिसलेलं ज्योत्स्नाबाईंचं रूप अतिशय लोभसवाणं होतं. कुठेही निर्मात्या असल्याचा ताठा नाही, सारख्या सूचना नाहीत, सहकाऱ्यांवर माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आम्हा मंडळींना संपूर्णपणे रिलॅक्स वातावरणात काम करण्याचे त्यांचे प्रयत्न अजूनही आठवतात.
नंतर वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ मिळालं तेव्हा त्यांच्या निवडीची बातमी येताचक्षणी त्यांनी मला खांडेकरांवर फीचर लिहायला सांगितलं. आजही आठवण झाली तरी फार आश्चर्य वाटतं. जेमतेम पंचविशीतली मी आणि त्यांनी एवढं मोठं फीचर ‘मला’ लिहायला सांगणं हा त्यांचा मोठेपणाच होता, परंतु वयाचा विचार न करता समोरची व्यक्ती काय करू शकेल याची खात्री त्यांना असायची.
‘पंचामृत’ ही वैद्यकीय माहितीवरचा कार्यक्रम, ‘हो नाहीच्या उंबरठय़ावर’ ही पत्रांवर आधारित तरुण पिढीच्या मानसिकतेवरची मालिका असे अनेक वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम आठवतात. मला वाटतं ‘रेडिओमालिका’ हा प्रभाग ज्योत्स्ना देवधरांनीच सुरू केला. ‘स्मृतिचित्रे’, ‘पण लक्षात कोण घेतो’, नंतर ‘मृत्युजंय’ कादंबरीवरची मालिका गो. नि. दांडेकरांच्या ‘मृण्मयी’या नितांत सुंदर कादंबरीवर ज्योत्स्नाबाईंची तितकीच सुंदर मालिका-निर्मिती ही ठळक उदाहरणं त्यांच्यातल्या अत्यंत संवेदनशील अशा निवडीचं दर्शन घडवणाऱ्या होत्या.
रेडिओसारख्या माध्यमात मेंदू आणि विचार सतत आव्हान पेलणारे असावे लागतात. अशा वेळी उपजत लेखक असलेली मंडळी दिमाखदार काम करून जातात. ज्योत्स्नाबाईंचं हे रूप सतत पाहायला मिळालं. स्वत: निर्मात्या असूनही इतर स्त्री सहकाऱ्यांपासून किंवा कनिष्ठ पदावरच्या माणसांपासून त्यांनी कधीही स्वत:ला विशिष्ठ अंतरावर ठेवलं नाही. त्यामुळेच कुणाही बरोबर साडय़ांबद्दल, पदार्थाबद्दल अगदी असोशीनं गप्पा मारणं त्यांना छान जमायचं.
मुळातून त्या स्वत:ही छानशा अगदी घरगुती अशा गृहिणीच होत्या. उत्तम सुग्रण होत्या. उत्तमोत्तम रंगसंगतीच्या सुरेख सिल्कच्या साडय़ा वापरणं त्यांच्या सुरेख रूपाला शोभून दिसायचं. त्यावेळी नारायणपेठी साडय़ांची हवा होती. मग ही अमुक साडी बघ गं मी मागावर विणून घेतली; ही साडी खास कांचीपूरमहून आणली अशा खास गप्पा व्हायच्या. कधी कधी पदार्थाच्या रेसिपी सांगणं व्हायचं.
आणि या घरगुती रूपातून एकदम निर्मातीच्या रूपामधला एखादा सुंदर, अर्थपूर्ण कार्यक्रम तयार होताना त्यांच्यातली बुद्धिमान आणि संवेदनशील लेखिका पाहायला मिळायची.
तो काळ सर्वार्थानं त्यांच्या दृष्टीनं भरभरून जगण्याचा होता. छानसा संसार, मनाजोगतं काम, लौकिकासाठी लेखिका म्हणून प्रसिद्धी आणि आनंदानं स्वीकारलेली रेडिओतली निरनिराळी आव्हानं! छान चाललं होतं सगळं पण अचानक मुलाच्या अवेळी मृत्यूनं त्यांच्यातली आई मनानं उद्ध्वस्त होताना दिसली.. त्या अवस्थेतही त्यांची उत्तमोत्तम कार्यक्रमनिर्मितीही चालू होती. पण मनाला विलक्षण हळवेपण आलं होतं. कुठल्याही क्षणी त्यांचे डोळे भरून यायचे. पण हा आघात पचवून त्या आणखीन आणखीन लिहीत राहिल्या- माझ्या नोकरीबाहेरच्या कार्यक्रमांबद्दल आवर्जून फोन करायच्या. दाद द्यायच्या.
नोकरी संपल्यानंतर एकदा अचानक संध्याकाळी घरी आल्या. दारात साक्षात जोत्स्नाबाईंना पाहून क्षणभर आनंद आश्चर्यानं थबकलेच.. नंतर भरपूर वेळ गप्पा मारता मारता जुन्या आठवणी, लेखन याबद्दल भरपूर बोललो. त्या दिवशी त्या निघून गेल्यानंतर पहिल्यांदा जाणवलं ते त्यांचं मनातून एकाकी असणं! आत्ता आत्तापर्यंत त्यांच्याशी फोनवर बोलायची. त्यांच्या चौकशा व्हायच्या. ‘एकदा ये गं गप्पा मारायला’ हा त्यांचा आग्रह शेवटपर्यंत मला पुरा करता आला नाही याची आता खंत वाटते. कारण काहीच नव्हतं पण नाही जमलं खरं.
सतत आसपास ‘माणसं’ हवी असलेली अत्यंत रसिक शेवटपर्यंत ‘लिहीत’ राहाणारी, या वयापर्यंत जाणिवा पूर्णपणे जागृत असलेली ही एक संवेदनशील लेखिका नंतरच्या काळात माणसांची भुकेली राहिली. तीस-पस्तीस वर्षांपूर्वीच्या काळात ‘कुंवरनी’ सारख्या कादंबरीत एक धीट विषय हाताळणाऱ्या, एकंदरीत ‘स्त्री’ हा विषय स्त्रीवादी भूमिकेतून आक्रस्ताळेपणानं मांडतानाही स्त्रीला त्यांनी कणखरपणानंच मांडली, हे विशेष!
त्यांच्या मृत्यूच्या बातमीनं स्त्री लेखिकांमधलं एक लोभसवाणं पर्व संपल्याची मनोमन खंत वाटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा