अपंगत्व हे शरीराला आलेले असते, पण अशा व्यक्तीमध्ये आत्मविश्वास भरला, त्यांना आधार दिला तर हे अपंगत्व मानसिक पातळीवर जात नाही. हे काम ३२ हून अधिक वर्षे करताहेत नसीमा हुरजुक. त्यांनी स्वत:च्या अपंगत्वावर मात करत असंख्य मुलांना आपल्या पायावर उभं केलं- शारीरिकदृष्टय़ा आणि आर्थिकदृष्टय़ाही. त्यासाठी त्यांना अनेक चांगल्या वाईट अनुभवातून जावं लागलं. हे अनुभव त्यांच्याच शब्दांत..
व याच्या सोळाव्या वर्षी जर कोणी मला सांगितले असते की, यापुढील माझे सर्व आयुष्य मला चाकाच्या खुर्चीवरच जगावे लागणार आहे, तर मी त्यावर विश्वासच ठेवला नसता, कारण तोपर्यंत मी चाकाची खुर्ची बघितलीही नव्हती. शाळेत अभ्यासाबरोबर नृत्य, क्रीडा, नाटय़, शिवणकाम यात रमणारी मी अचानक पाठीच्या, मणक्याच्या दुखण्याने बिछान्याला खिळले.
१९६७ साल होते ते. त्या वेळी अपंग पुनर्वसनाच्या कोणत्याच सोयी महाराष्ट्रात उपलब्ध नव्हत्या. उपचार, कृत्रिम साधन, शिक्षण यांपासून मध्यमवर्गीय अपंग वंचितच होते. अर्थातच अशा परिस्थितीत कुटुंबावर अवलंबून जगण्याची इच्छाच नव्हती. त्यांना आपल्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचं ओझं वाटत होतं. आत्महत्येचा विचार आला नाही असा एकही दिवस गेला नाही, परंतु ते  करण्याइतक्याही शारीरिक हालचाली करता येत नव्हत्या. रोज देवाजवळ मृत्यू मागत असतानाच १९७० साली माझ्यासारख्याच शारीरिक परिस्थितीत जगत असलेल्या बाबूकाकांची भेट झाली. त्यांनी नवीन दृष्टी दिली. माझ्याहूनही वाईट परिस्थितीत जगत असलेल्या असंख्य अपंग बांधवांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कार्य करण्यातील आनंद अनुभवण्याची आणि एक प्रकारे माझा पुनर्जन्मच झाला. पूर्वी स्वत:चे भवितव्य काय? या विचाराने झोप उडायची. आता इतर हजारो-लाखो अपंगांचे भवितव्य कसे उज्ज्वल करता येईल या विचाराने झोप उडते..
कार्याला सुरुवात अपंग बालकांपासून केली. पालकांची आíथक परिस्थिती उपचार,  शस्त्रक्रिया करण्याची वा कृत्रिम साधन खरेदी करण्यासारखी नव्हती. अपंग बालकांचे वडील कामावर जात. आईच अपंग बालकाला उचलून शाळेत नेत होती. त्यामुळे तिचेही पाठीचे, कमरेचे दुखणे वाढत होते. म्हणून सर्वप्रथम अपंग बालकांना चाकाची खुर्ची किंवा तीनचाकी सायकल मिळवून देण्याचा निश्चय केला. कार्याला नुकतीच सुरुवात झाली होती. पैसा जमवणे, कोणाकडे मागणे खूपच कठीण होते. पहिली चाकाची खुर्ची खरेदी करायला तब्बल वर्ष लागले. मोठय़ा उत्साहाने ती घेऊन त्या बालकाच्या घरी गेलो, पण कळलं महिन्यापूर्वीच तो वारला होता.. सुन्न करणारा अनुभव होता तो. त्या वेळी चाकाची खुर्ची किंवा कोणतेही कृत्रिम साधन अथवा त्याचे भाग मुंबई, कानपूर, दिल्ली येथून आणावे लागत.
 रांगत किंवा घसटत जाणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर शस्त्रक्रिया व उपचार यांच्या साहाय्याने उभे करणे अत्यंत गरजेचे होते, कारण ते कोणी दया वा कीव करण्यासाठी नसतात, तर त्यांनाही आपुलकीची वागणूक मिळायला हवी. शिवाय अपंग व्यक्तींमध्ये आत्मसन्मानाची भावना जागृत होण्यासाठी आणि त्यांच्या भोवतालच्या जगाची दृष्टी बदलवण्यासाठी ४८ विद्यार्थ्यांना कॅलिपर देऊन ‘चालते’ करण्याचा निश्चय केला. या ४८ कॅलिपरसाठी नव्वद हजार रुपयांची गरज होती. एका ट्रस्टकडून ही रक्कम मिळणार होती, पण काही तात्त्विक मतभेदामुळे ही रक्कम कॅलिपर तयार झाल्यावर मिळाली नाही. मग आम्ही संस्थेच्या (हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर) विश्वस्तांनी वैयक्तिक कर्ज काढून अगदी वेळेत त्या ४८ विद्यार्थ्यांना कॅलिपर देऊन आपल्या ‘पायावर’ उभं केलं. त्यांचा पुढचा निर्धार होता स्वत:च, अपंगांनी अपंगांसाठी कृत्रिम साधने बनवण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे.
सहा महिन्यांतच अपंगार्थ व्यवसाय प्रशिक्षण केंद्र (जून १९९३) सुरू केले. आजवर असंख्य अपंगांना दरवर्षी लाखो रुपयांची कृत्रिम साधने या केद्रांतून पुरविली जातात. २०१२ सालापासून महाराष्ट्र शासनाने अपंगांना कृत्रिम साधने पुरविण्यासाठी आमच्या संस्थेची निवड केली आहे. त्यानंतरचा टप्पा होता, अपंगांच्या मोफत शस्त्रक्रिया, पण हा प्रवास वाटला तेवढा सोपा नव्हताच. अगदी सुरुवातीच्या काळातच एका विद्याíथनीचे ऑपरेशननंतर निधन झाल्यावर पालकांना कोणी तरी चिथवले आणि ते पालक डॉक्टरांविरुद्ध कोर्टात जाण्याची भाषा करू लागले. त्या क्षणी इतर अपंग बालकांच्या शस्त्रक्रियेवर- पुढच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं, पण सुदैवाने ते वादळ माझ्या एका फोनवरून पालकांना समजावण्याने शांत झाले.
 गेल्या ३१ मार्च २०१२ अखेर ‘हेल्पर्स’ने (हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर) २७२८ अपंगांना उपचार व शस्त्रक्रियेसाठी ५५ लाख ४५ हजार रुपयांचे सेवा साहाय्य पुरविले आहे. आज ती मुलं पाहिली की समाधान वाटतं. सातवीत शिकणारी अश्विनी अपंगत्वामुळे चालू शकत नव्हती. तिचं दप्तर तिची आईच घेऊन यायची, पण तिच्या पायावर शस्त्रक्रिया करवली व संस्थेत बनलेले कॅलिपर तिला घालायला दिले. त्याच अश्विनीने एस.एस.सी.ला ९१ टक्के मिळवले. तिला डॉक्टर व्हायचे होते. तिच्या अपंगत्वामुळे तिला प्रवेश मिळत नव्हता, तेव्हा ‘हेल्पर्स’ने त्यासाठीही मदत केली. पहिल्या वर्षी ती नापास झाली, कारण तिला तिच्या कॉलेजच्या ५० पायऱ्या रोज कॅलिपरने चढताना जखमा होत होत्या. स्वच्छतागृह खालच्या मजल्यावर होते. अश्विनी एकदा वर चढली की परत होस्टेलला जातानाच खाली उतरायची. नापास झाल्याने ती खूप खचली. त्या कॉलेजला स्टाफसाठी लिफ्ट होती. अश्विनीने मदतीचा हात मागितला व परत परीक्षा दिली आणि संपूर्ण पुणे विद्यापीठातून पहिल्या क्रमांकाने पास झाली. त्यानंतर प्रत्येक वर्षी पहिली, दुसरी येऊन तिने एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर मुंबईत राहून एम.डी. झाली. तिच्या कर्तृत्वामुळे एका सुदृढ तरुणाने तिला लग्नासाठी विचारले. अश्विनीने आधी नकार दिला, पण नंतर आईवडिलांच्या आग्रहाने विवाह केला. वैवाहिक जीवनात सुखी असलेली अश्विनी आज एका मोठय़ा हॉस्पिटलमधलं आपलं करिअरही यशस्वीपणे सांभाळते आहे.
शासकीय अपंग बालगृहात जेव्हा माझ्या डोळ्यांदेखत दोन्ही हात नसलेल्या अपंग बालकाला प्रवेश नाकारण्यात आला, तेव्हा अपंगांसाठी ‘घरौंदा’ वसतिगृहाला बनवण्याचे ठरविले व प्रत्यक्षात आणलेही. बघता बघता आज ‘घरौंदा’ वसतिगृहाला १७ वष्रे झाली. या ‘घरौंदा’चे उद्घाटन शासनाने नाकारलेल्या बालकाच्या पायाने फीत सोडून केले. आज तो पदवीधर असून नोकरी करतो. पायाने कॉम्प्युटर ऑपरेट करतो. काखेत बॅट धरून उत्तम क्रिकेट खेळतो.
 शस्त्रक्रियेनंतरचा एक अतिशय रोमांचकारी अनुभवही सांगावासा वाटतो. एका झोपडपट्टीत राहणारा एक बालक ‘हेल्पर्स’च्या ‘घरौंदा’ वसतिगृहात राहायला आला. एका कार्यक्रमात शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आले होते. त्यांना त्याने स्वत:च ‘डॉक्टर, माझे ऑपरेशन लवकर करा, मला चालत शाळेत जायचे आहे,’ असं सांगितलं आणि त्याची इच्छा पूर्णही झाली.
अशीच आणखी एका मुलाची कथा. त्याला चालता येत नाही. तो घसटत चालतो. त्याला बाथरूमला जाता येणार नाही म्हणून शाळाचालकांनी प्रवेश नाकारला होता. त्या मुलावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर डोळे उघडताच त्याचा पहिला प्रश्न होता, ‘‘आता मी शाळेला जाऊ शकेन?’’
‘घरौंदा’ वसतिगृहाचा आतापर्यंत २५२३ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. त्यासाठी समाजाच्या सर्व थरांतून ४ कोटी ५८ लाख ४९ हजार रुपयांची मदत मिळवून देण्यात आली. आज ‘हेल्पर्स’चे विद्यार्थी- विद्यार्थिनी डॉक्टर, प्रोफेसर, बँक अधिकारी, चार्टर्ड अकाऊंटंट, शिक्षक अशा अनेक क्षेत्रांत सन्मानाने जगत आहेत याचा रास्त अभिमान आम्हा ‘हेल्पर्स’ना वाटतो.

आम्हा अपंगांच्या (शासनाने विशेष व्यक्ती असे आमचे नामकरण केले आहे.) समाजाकडून, शासनाकडून काही अपेक्षा आहेत.
* देवळात, दग्र्यात व अनेक सार्वजनिक ठिकाणी अपंगांना चाकाची खुर्ची, कुबडय़ा, कॅलिपर घेऊन प्रवेश नाकारण्यात येतो. याचा अनुभव नागपूरला ताजबाबा दग्र्यात, शेगाव येथे गजानन महाराजांच्या मंदिरात मी स्वत: घेतला आहे. हेल्पर्सच्या २९ वर्षांच्या वाटचालीनंतर मात्र आज महालक्ष्मी मंदिरातील गणपतीची दुसऱ्या दिवशीची पूजा चाकाच्या खुर्चीतून माझ्या हातून करवून घेतली. केवढा हा बदल. हा बदल भारतात प्रत्येक शहरात, खेडय़ात होणे गरजेचे आहे.
*आज ‘हेल्पर्स’च्या स्वप्ननगरी प्रकल्पातील काजू प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रात ६० अपंग व ४० महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. अपंगार्थ प्रशिक्षण केंद्रात उत्तम प्रतीची कृत्रिम साधने व वसतिगृह व शाळेला लागणारे फर्निचर बनते. अपंगांच्या उत्पादकतेवर समाजाने विश्वास ठेवावा व त्याला रोजगार देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यायला हवे.
* ग्रामपंचायत, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांनी अपंगांनी चालवलेल्या संस्थांना शेतसारा, वसतिगृहावरील घरफाळा, काजूवरील व्हॅट अशा करात सवलत द्यावी. वीजदरात सवलत दयावी, जेणेकरून हेल्पर्ससारख्या ज्या संस्था शासनाकडून अनुदान न घेता दीर्घकाळ फक्त अपंगांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत त्यांना भविष्यातही आपले प्रकल्प यशस्वीपणे चालवणे शक्य होईल.
* कोणत्याही उच्च शिक्षणसंस्थेत अपंगांना प्रवेश नाकारला जाऊ नये. उलटपक्षी अपंगांसाठी इमारतीत सोईची स्वच्छतागृहे, रॅम्प, वसतिगृहातील काही खोल्या अपंगत्वाची मैत्री करणाऱ्या असाव्यात.

Lightning and rain in Diwali What will the weather be like
ऐन दिवाळीत विजांची रोषणाई आणि पावसाची झडही? कसे असणार हवामान?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
what happens to the body if you brisk walk 2 kms every day
जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Sale of panati by female prostitutes thane news
देहविक्री व्यवसायातून बाहेर पडत साकारले “स्वयंरोजगाराचे प्रकाशपर्व”; देहविक्री करणाऱ्या महिलांकडून पणत्यांची विक्री
Loksatta article on Competitive Examination education
स्पर्धा परीक्षा देणं उत्तमच, पण किती काळ? पुढे काय?
Loneliness-Free Seoul
एकाकी मृत्यू म्हणजे काय? त्यांची संख्या का वाढतेय? ते रोखण्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक कशासाठी?
In sambhajinagar minor girl is caught driving scooty shocking video
“मुलांआधी पालकांना शिकवा” संभाजीनगरमध्ये चिमुकलीच्या हातात गाडी देऊन वडील निवांत; VIDEO पाहून संतापले लोक
article about mangesh kulkarni life
व्यक्तिवेध : मंगेश कुलकर्णी

पण तरीही खंतावणाऱ्या अनेक गोष्टी आहेतच. ‘घरौंदा’ वसतिगृहात प्रवेश दिलेल्या अपंग बालकांना सर्वसामान्य शाळेत प्रवेश नाकारण्यात येऊ लागला. फक्त प्रबुद्ध भारत शाळेने ‘हेल्पर्स’च्या ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे सौजन्य दाखवले. तेथे आम्ही अपंगांच्या सोईचे स्वच्छतागृह बांधले व एक आया मुलामुलींच्या मदतीसाठी नेमली. वसतिगृहात ८० पेक्षा जास्त विद्यार्थी होते. या वसतिगृहाची वास्तुरचना अशी आहे की, येथे पराकोटीचे अपंगत्व असलेली व्यक्ती ही मदतनिसाविना स्वावलंबनाने राहू शकते. येथे स्वयंपाक, टेलिरग, भरतकाम व कॉम्प्युटरचेही शिक्षण दिले जाते. शिक्षण क्षेत्राला उद्योगधंदा बनवणारी संचालक मंडळी आम्हाला उपदेश देऊ लागली, तुमची अपंगासाठी स्वतंत्र शाळा काढा. त्या वेळी रागाने त्यांना सुनवावे लागले होते, ‘‘अस्थिव्यंग, अपंगांची बुद्धी सर्वसामान्य माणसासारखीच असते. त्यांना स्वतंत्र शाळेची गरज नाही. तुम्ही प्रवेश दिला नाहीच तर आम्ही स्वतंत्र शाळा काढू. अपंग व सुदृढ यांची एकत्रित शाळा काढू, पण अशी शाळा आम्ही काढली तर ते भूषणावह नसून लज्जास्पद गोष्ट असणार आहे, कारण समाजाने,  शिक्षणसंस्थांनी अपंगांना आपल्यात सामावून घेतले नाही याचे ते प्रतीक आहे. आज हेल्पर्सच्या समर्थ विद्यामंदिरमध्ये सन २००० पासून अपंग व सुदृढ असे ५१३ विद्यार्थी- विद्यार्थिनी (बालवाडी ते १० वी) शिक्षण घेत आहेत. प्रशस्त ग्रंथालय, वाचनालय, उपक्रम वर्ग, रिमोट शिक्षण देणारी वर्गखोली, दृक्-श्राव्य सभागृह विभागाबरोबरच कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, स्वच्छतागृह आहे. केवळ वरच्या मजल्यावर जाण्यासाठी नव्हे, तर टेरेसवरही चाकाच्या खुर्चीतून जाता येईल अशी प्रशस्त रॅम्प आहे.
‘हेल्पर्स’ची स्वत:ची शाळा सुरू करणे हे खूप आव्हानात्मक होते. शाळेसाठी शासनाकडून २ एकर जागा मोफत मिळवायला ५ वष्रे लागली. वसतिगृहासाठी जागा मिळवताना १० वष्रे लागली होती. म्हणजे शासनाकडून जमीन मिळवण्याचा वेळ निम्मा झाला ही खूप मोठी प्रगतीच आहे. शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळाली नाही. एक वर्ष थांबून सर्व अपंग बालकांना घेऊन उपोषणाचा मार्ग अवलंबल्यावर शाळेला परवानगी मिळाली.
पण मला सर्वात महत्त्वाचं वाटतं ते पालकांनी अशा मुलांना आपलं म्हणण्याची. अनेकदा या मुलांजवळ त्यांचे पालक नसतात. पाल्याच्या शस्त्रक्रियेवेळी तरी निदान या पालकांनी त्यांना मानसिक आधार द्यायला हवा. २३ वर्षांची सुचिता पोलिओने अपंग असून घसटत चालत होती. ‘हेल्पर्स’कडे आल्यावर चाकाच्या खुर्चीतून काजूवर प्रक्रिया करू लागली. शस्त्रक्रियेनंतर ती कॅलिपर कुबडय़ाच्या साहाय्याने इतर मुलींप्रमाणे चालणार आहे, पण शस्त्रक्रियेवेळी तिच्या कुटुंबातील तिच्याबरोबर दवाखान्यात राहायला तयार नाहीत. सुचिता खूप रडते. संस्थाच तिच्या सेवेला, जरा कमी अपंगत्व असलेली कर्मचारी ठेवणार आहे. एका अपंग मुलीच्या बाळंतपणातही तिची आई आली नाही. शेजारच्या स्त्रीने तिच्या सर्व गरजा आईच्या प्रेमाने भागवल्या. हे  ही उदासीनता का? हा छळणारा प्रश्न आहे. चित्र पालटायला हवे. अपंग स्त्री-पुरुषांचे विवाह आमच्या संस्थेने नव्हे, तर पालकांनी करून घ्यायला हवेत.  सगळ्याच स्तरांवर या अपंग मुलांना आपलेसे केले तरच ते स्वत:च्या पायावर उभे राहणार आहेत.
संपर्क- नसीमा महंमदअमीन हुरजुक
हेल्पर्स – ‘नशेमन’, २३५/११ ई , ताराबाई पार्क,
कोल्हापूर – ४१६ ००३
दूरध्वनी- (०२३१) २६८००२६
कुडाळ, सिंधुदुर्ग येथील स्वप्ननगरी कार्यालय : (०२३६२) २३८१५३
वेबसाइट- http://www.hohk.org.in
 ई-मेल : klp_crusade@sancharnet.in किंवा nhurzuk@yahoo.co.in