आपल्याला कॉलेजमध्ये जाणारा एक मुलगा आहे, अनेक अडचणी आणि प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं ती दोघं विसरून गेली होती.. आता जणू ती दोघं नव्हतीच. द्वैत संपून अद्वैत निर्माण झालं. पराकोटीच्या प्रेमानं आणि निष्ठेनं जवळ आलेले ते दोन जीव म्हणजे ‘दोन शरीरं पण एकच प्राण, एकच आत्मा’ अशी भावावस्था झाली होती. भर रस्त्यातही त्यांचं एक अस्पर्शी जग तयार झालं होतं, पण..
रणरणता उन्हाळा सरला आणि पावसाच्या शीतल धारा बरसू लागल्या, तसं रागिणीनं नवऱ्याला म्हटलं, ‘बरं झालं बाई! पाऊस वेळेवर आला एकदाचा! नाहीतर या ग्लोबल वॉर्मिगमुळे जीव राहतो की जातो असं झालं होतं!’
‘अगदी बरोबर बोललीस. मग काय? जाऊ या पावसात? अगं, पावसाचं स्वागत असं घरात बसून थोडंच करायचं का? थोडं पायी पायी जाऊ, मग मस्तपैकी सीसीडीत कॉफी घेऊया.. नाहीतर वरळी सी फेसवर जायचं का? भाजलेली कणसं खायला?’ अविनाशमधला प्रियकर आता एकदम ताजातवाना झाला होता. रागिणी सुखावली. तिनं भराभरा निळा ड्रेस घातला. अविनाशच्या आवडीचा! त्यानंही तिला आवडणारा नेव्ही ब्ल्यू कलरचा टीशर्ट आणि थ्रीफोर्थ घालून म्हटलं, ‘रागिणी, हवेचा कसला जबरदस्त परिणाम असतो नाही?’ रागिणीनंही त्याला हसून प्रतिसाद दिला. दोघंही गाडीत बसले आणि अध्र्या तासात वरळी सी फेसवर येऊन धडकले. वयाची चाळिशी उलटलेली रागिणी आणि अविनाश पंचेचाळिशीतला! पण आज जणू ती दोघं कॉलेजमधली तरुण पोरं झाली होती. पाऊस खरोखरच मस्त लागला होता. मुसळधारही नाही आणि अगदी रिपरिपही नाही. छान हवाहवासा. चिंब भिजा असं सांगणारा. हवेतला गारवा आणि वातावरणातलं ढगाळपण मनाला अगदी मऊ करून गेलं. मन कितीतरी मागे गेलं..
अविनाशनं हलकेच तिचा हात हातात घेतला. म्हणाला, ‘रागिणी, आज तू खूऽऽप छान दिसतेस गं!’ रागिणीही त्याच्या शब्दांनी खुलली. आज कितीतरी वर्षांनी अविनाशमधला तो प्रियकर ती अनुभवत होती. दोघांनी भाजलेली कणसं घेतली, खाल्ली. भुरभुरणारे केस नि ओढणी सावरणाऱ्या रागिणीला अविनाश डोळे भरून पाहत राहिला. आपल्याला कॉलेजमध्ये जाणारा एक मुलगा आहे, अनेक अडचणी आणि प्रॉब्लेम्स आहेत हे सगळं ती दोघं विसरून गेली होती.. त्यांना आठवत होते ते सोनेरी क्षण! प्रेमाच्या लपंडावाचे दिवस! साक्षीला असा बरसणारा पाऊस! ‘केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली, ओठांवर त्यांची माझ्या किती फुले झाली..’ या पावसाळी दर्दभऱ्या प्रणयाची उत्कटतेनं याद येऊ लागली. ‘दिस अमुचेही होते पावसात भिजण्याचे, गार गारव्यात ऊब देत घेत फिरण्याचे..’ या ओळीनं अंगावर तर शहाराच आला दोघांच्या! ती दोघं या जगात नव्हतीच जणू! त्यांचं दोघांचं असं एक सुंदर जग होतं. एकेक लाजवाब गाणी जणू ते जगत होते. ‘बरसात में हमसे मिले तुम सनम’ आठवताच रागिणी तर एखाद्या नववधूसारखी त्याला बिलगली. आता जणू ती दोघं नव्हतीच. द्वैत संपून अद्वैत निर्माण झालं. पराकोटीच्या प्रेमानं आणि निष्ठेनं जवळ आलेले ते दोन जीव म्हणजे ‘दोन शरीरं पण एकच प्राण, एकच आत्मा’ अशी भावावस्था झाली होती. जणू त्यांना तो प्रतीक्षा असलेला क्षण लाभला होता. मुक्तीचा! तृप्तीचा! भर रस्त्यातही त्यांचं एक अस्पर्शी जग तयार झालं होतं.. दोघांचंच!
पण छे, त्यांच्या त्या स्वप्नवत जगाला तडा गेलाच तो एका तारस्वरातल्या आवाजानं.. बाजूच्याच झोपडपट्टीत राहणारा पाचसहा वर्षांचा काळासावळा पण गुटगुटीत मुलगा ओरडत गेला. नेहमीचंच गाणं! ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा..’ त्याच्या त्या बेसूर ओरडण्यानं त्या दोघांचीही भावसमाधी भंग पावली. तोच त्या मुलाची आई त्याच्यापाठी ओरडत आली. करवादून म्हणाली, ‘गप बस रं काटर्य़ा! कशापायी बोलावतुस त्या राक्षसाला!’ तिच्या आवाजानं पोरगा तिच्याजवळ आला. तशी त्याला बखोटीला धरून ती बाई म्हणाली, ‘आरं, त्या मुसलधार पावसानं आपल्या खोपटाची छपरं उडनार नाय का रं? समदं वाटुलं करतो बग हा पाऊस! आरं, आपलं छप्परच उडालं तर ऱ्हायाचं कुटं आपण? आणि कसं? चल, गुमान घरला! पाऊस नको बरं आपल्याला. आपलं जगच संपवतो बघ तो! आरं, त्या पावसाचं कवतिक या या मजबूत छप्परवाल्यांना रं! आपलं समदं वायलं असतं बाबा!’ बोलता बोलता रागिणी आणि अविनाशकडे एक उदासवाणी नजर टाकून पोराला हाताला धरून ती बाई निघून गेली.
इतका वेळ शृंगार आणि प्रेमरंगात दंग झालेले रागिणी नि अविनाश आता भानावर आले. आपल्या नगण्य प्रॉब्लेम्सशी तिच्या अस्तित्वाला, धोका असणाऱ्या डोंगराएवढय़ा संकटाशी त्यांना तुलनाच करता आली नाही. स्वत:च्या पलीकडच्या जगाच्या वास्तवतेच्या धगीची त्यांना तीव्रतेनं जाणीव झाली. त्यांना आता खरी जाग आली होती. दोघंही घरी यायला निघाले. पण त्यांच्या कानी घुमत होते-
नगं, नगं रे पावसा, बिगी बिगी नगं येऊ
माज्या लेकराची आन, नगं छप्परा उडवू!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा