‘‘लिमयेबाई, झाडावर दगड बसायला लागले की समजावे झाडाला फळे लागलीत. पण म्हणून ज्याने झाड लावले त्याने त्याची काळजी घेणे सोडायचे नाही.’’ सातत्याने येत असलेल्या अडचणींमुळे अत्यंत उद्विग्न अवस्थेत असलेल्या लिमयेबाईसाठी हे प्रोत्साहनपर शब्द असले तरी मतिमंदासाठी शाळा सुरू करण्यासाठी, त्यांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी, त्या झाडाला फळे येण्यासाठी त्यांना खूपच कठीण काळातून जावं लागलं. तरीही गेली ३६ वर्षे मतिमंदांसाठी काम करणाऱ्या नाशिकच्या रजनीताई लिमये यांचा हा जीवनप्रवास त्यांच्याच शब्दांत..
नुकताच प्रबोधिनी संस्थेचा वाढदिवस साजरा झाला. ३६ वर्षांची वाटचाल पूर्ण झाली. समोर ३०० विशेष मुले-मुली दाटीवाटीने बसली होती. बालवाडी, शाळा, कार्यशाळा, वसतिगृह आणि विशेष डी.एड. करणारे विद्यार्थी यांच्यासमवेत शंभर शिक्षक कर्मचारी. वाढदिवस म्हटला की केक हवाच. शाळेचा पहिला विद्यार्थी गौतम केक कापीत होता. मुले टाळ्या वाजवून ‘जन्मदिन की शुभकामना’ तालासुरात म्हणत होती.
३६ वर्षांच्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली? त्याचं असं झालं, मुलीच्या पाठीवर दहा वर्षांनी गौतमचं आगमन झालं. गोरा, घारा, बाळसेदार गौतम घरादाराचा लाडका होता. मी मनोरथ करत होते. याला खूप शिकवीन, अगदी परदेशातसुद्धा पाठवीन. पण तो दोन वर्षांचा झाला आणि सारे चित्र पालटले. त्याला एकाएकी आलेला खूप ताप, त्याचे वागणे बदलले. तो हातातील वस्तू फेकू लागला. तेच तेच पुन: पुन्हा बोलू लागला. प्रथम पुरुषी बोलेना. औषधोपचारासाठी सगळ्या ‘पॅथी’ पालथ्या घातल्या. मुंबई गाठली. परदेशात नातेवाईक होते. त्यांच्याकडून औषधे आणली. मुंबईचे न्यूरो सर्जन डॉ. गिडे यांनी मला समजाविले. गौतम मतिमंद आहे. तो नॉर्मल शाळेत शिकू शकणार नाही. त्याला विशेष शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी विशेष शाळेची आवश्यकता आहे. तुम्ही स्वत: शिक्षिका आहात. नाशिकला तुमच्यासारखे बरेच पालक असतील त्यांचा शोध घ्या आणि शाळा सुरू करा.
माझ्या पायाखालची भूमी सरकली होती. मन सैरभैर झाले. खूप नैराश्य आले. पण यातून मार्ग तर काढायलाच हवा होता. पहिली गोष्ट म्हणजे गौतमचा स्वीकार. त्याचे मानसिक अपंगत्व स्वीकारणे. त्याला प्रेम देणे, त्याला चांगले काम लावणे. माझ्यासारखीच समस्या असलेल्या पालकांचा शोध घेणे आणि विशेष शाळा काढण्यासाठी साहाय्य करणे.
मी स्वत: एका माध्यमिक शाळेत शिक्षिका होते. जमेल का आपल्याला अशी शाळा काढणे? पण मग, समदु:खी पालक भेटले. मी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांनी नाशिकला अशा शाळेची आवश्यकता आहे. लागेल ती वैद्यकीय मदत मी देईन, असे आश्वासन दिले आणि शाळा स्थापनेचे वेध लागले.
त्या वेळी अशी शाळा म्हणजे अंधारात उडी होती. चार मुले मुश्किलीने मिळाली. एक बालवाडीचा कोर्स झालेली शिक्षिका, एक सेविका, दोन खोल्यांची जागा. त्या वेळी नाशिकच्या एक उद्योजकांच्या पत्नीने आर्थिक मदत केली. पण काही कारणाने शाळा बंद पडली तर पैसे किंवा घेतलेले सामान परत करण्याच्या अटीवर. पत्रावर सही करताना थोडे वाईट वाटले. पण हा व्यवहार आहे असे मनाला समजाविले. दोन आडवे बाक, थोडी खेळणी, सतरंजाच्या पट्टय़ा असे जुजबी सामान घेऊन १ जानेवारी १९७७ रोजी शाळेचा श्रीगणेश झाला. पहिले चार महिने रविवार कामाचा दिवस ठेवला म्हणजे मला पूर्णवेळ शाळेत थांबता येईल आणि माझी स्वत:ची नोकरी संपल्यावर मुलांचा शोध घेऊ लागले. अशा कुटुंबात गेल्यावर स्वागत कसे झाले? ‘तुम्हाला कुणी तरी चुकीची माहिती दिलेली दिसतेय. आमचा मुलगा अवखळ आहे थोडा, पण तो मतिमंद नाही. त्याच्या पत्रिकेत आहे की तो मुंज झाल्यावर सुधारेल.’ येथपर्यंत ठीक आहे. पण काही घरात ‘आपला मुलगा मतिमंद आहे. म्हणून आल्या आमच्या मुलावर शिक्का मारायला,’ असेही बोलणे ऐकणे लागले. खूप सत्त्वपरीक्षेचे दिवस होते ते. मुलांची संख्या वाढत नव्हती आणि वीस मुले झाल्याशिवाय शाळेला मान्यता मिळणार नव्हती.
माझ्या एका ज्येष्ठ मैत्रिणीने सल्ला दिला. अशी शाळा चालवायची तर प्रशिक्षण हवे आणि ते तुम्ही स्वत: घ्यायला हवे. प्रसंगी बिनपगारी रजा घ्यायला लागली किंवा नोकरी सोडावी लागली तरी चालेल. दोन्ही दरडीवर हात ठेवून चालणार नाही. मग एक वर्ष रजा घेऊन पुण्यास कामायनीमध्ये प्रशिक्षण घेतले. कोर्स पूर्ण झाला आणि पहिली प्रतीक्षेची पाच वर्षे झाली. सन १९८२ मध्ये शाळेला मान्यता मिळाली. मी माझ्या नोकरीच्या शाळेत सकाळचे सत्र मागून घेतले व सकाळी ७ ते १२ नोकरी करून दुपारी साडेबारा ते साडेपाच अशी विशेष शाळा चालू केली. पहाटे ५ ते रात्री ८ असे कामाचे तास होते माझे. १९८९ मध्ये शाळा सोडण्यासाठी व्ही. आर. एस.चा कायदा संमत झाला. मी सेवानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ शाळेला वाहून घेतले.
त्यावेळी अनुदानाचे नियम वेगळे होते. वर्षांच्या शेवटी एकदम अनुदान मिळे. पहिले अकरा महिने शिक्षकांना कमी मानधनावर काम करायला लागे. पण पहिल्यापासून एक गोष्ट कटाक्षाने पाळली. वर्षांच्या शेवटी शाळेसाठी काहीही न ठेवता स्वत: काहीही मानधन न घेता प्रत्येकाला त्याच्या वाटेची पूर्ण रक्कम द्यायची.
मला आठवतंय, पहिल्या वर्षी अनुदान मिळाल्यावर आम्ही भगवंतराव हॉटेलमध्ये जाऊन मिसळ व चहा घेतला होता व आनंद साजरा केला होता.
बघता बघता मुलांची संख्या ५० झाली. पालकांना विश्वास वाटू लागला की मुलांची प्रगती होतेय. जागा अपुरी पडू लागली. नाशिक नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले व आम्हाला जुन्या कॉलनीत एक एकर खुली जागा मंजूर झाली. त्या वेळी नाशिकचे जिल्हाधिकारी गोविंद स्वरूप यांचे फार साहाय्य झाले. भूमिपूजनासाठी मुंबईचे गव्हर्नर आले. वास्तुकलातज्ज्ञ विसूभाऊ पाटणकर यांनी कोणताही मोबदला न घेता सुंदर इमारत बांधून दिली. इमारतीच्या उद्घाटनासाठी तात्यासाहेब शिरवाडकर आणि अरविंद इनामदार आले होते. परदेशी देणगी स्वीकारायची तर विशेष परवाना लागतो, हे माहीत नव्हते. कलेक्टरसाहेबांनी त्यांच्या स्वीय सचिवांना सांगून आमचा अर्ज भरून घेतला व आम्हाला परवाना मिळवून दिला.
त्याचा फायदा आम्हाला कॅनडा येथून मोठी देणगी मिळण्यात झाला. तो एक विलक्षण योग होता. कॅनडास्थित डॉ. जगन्नाथ वाणी यांनी खानदेशातील एका शाळेस आर्थिक मदत देता यावी म्हणून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला होता. पण त्या शाळेजवळ एफसीआरए नंबर नव्हता. तो लगेच मिळण्यासारखा नव्हता. डॉ. वाणी यांनी आमच्या शाळेच्या फिजिओथेरपी विभागास एकदा मदत केली होती. त्यांना आमची शाळा माहीत होती आणि सन १९९० मध्ये रात्री मला फोन आला. ‘लिमयेबाई, आम्ही पस्तीस लाखांची देणगी तुमच्या शाळेस देण्याचे ठरविले आहे.’ मी खरंच सांगते. मला त्या रात्री झोप आली नाही. जेमतेम चार आकडी पगार मिळविणारी मी. पस्तीस लाख म्हणजे पस्तिसावर किती शून्य ते मांडून पाहिले. त्या काळात एवढी मोठी रक्कम स्वीकारताना मानसिक दडपणही आले. पण सारे सुरळीत पार पडले.
गौतम आता मोठा झाला होता. अगदी लहान वयात या मुलांना विशेष शिक्षण मिळाले तर त्याचा खूप फायदा होतो. ती नॉर्मल झाली नाहीत तरी त्यांचे अपंगत्व रोखले जाते, हे अभ्यासाने कळले होते. माझ्या मुलाला त्याचा फायदा नाही मिळाला. पण प्रबोधिनीत बालवाडी आणि फिजिओथेरपी केंद्र सुरू झाले. गौतम १८ वर्षांचा झाला. पुढे काय? प्रबोधिनीत संरक्षित कार्यशाळा सुरू झाली. आम्ही पहिले शिक्षक पुणे-मुंबई येथे शिकलो. कुटुंबापासून वर्षभर दूर राहणे किती अवघड आहे, याचा अनुभव घेतला होता. तेव्हा शिक्षक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले.
गौतमला स्वावलंबी करण्यासाठी जे जे करता येईल ते ते मी केले. त्याला सायकल शिकविली. त्यासाठी त्याच्यामागून मला पळत जावे लागे. पण तो उत्तम सायकल चालवितो. त्याला दाढी करायला शिकविली. आंघोळ, शारीरिक स्वच्छता कटाक्षाने शिकविली. ही मुले एकदा गोष्ट शिकविली की ती कटाक्षाने पाळतात. तो खूप स्वावलंबी झाला. त्याच वेळी त्याच्या बाबांना डिप्रेशनचा त्रास सुरू झाला. गौतमच्या काळजीमुळे ही गोष्ट झाली. रात्र रात्र त्यांना झोप नसे. मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले की, औषधे पण तुम्हालाच त्यांना आठवणीने द्यावी लागतील. माझी बाहेरील कामे वाढत होती आणि ‘तू आता घरी राहा’ असा यांचा आग्रह वाढू लागला. तशातच आणखी एक प्रकार झाला. गौतमला स्वत:शीच बोलण्याची सवय आहे. गॅलरीत उभे राहून हातवारे करून तो काही तरी बडबडत होता. समोरच्या सोसायटीतील एक मोलकरीण माझ्याशी भांडायला आली. ‘तुमचा मुलगा गॅलरीत उभा राहून हातवारे करून मला बोलावतो. सांभाळा त्याला नाही तर ठोकून काढीन.’ मी चांगलीच दचकले. पण माझ्या मदतीला माझी मोलकरीण धावून आली.’ ‘सखू, तुला अक्कल आहे का नाही? हा कसा आहे तुला माहीत नाही काय? म्हणे मला बोलावतो. मी इथं दहा वर्षे काम करतेय अगदी भाबडं पोर आहे ते. निघ इथून.’ घरात वादंग झाला. ‘पुरे तुझं लष्करच्या भाकरी भाजणं. आधी पोराकडे बघ.’ मी सुन्न झाले. माझ्या नातेवाईकांनासुद्धा वाटते. ‘ही दिवसभर बाहेर असते. त्यामुळे बाबा एकटे पडतात. हिनं आता घरीच राहावं.’
मनापुढे प्रश्नचिन्ह असतानाच मला कर्करोग झाला. ओव्हरीजवर टय़ूमर निघाला. मोठे ऑपरेशन व त्यानंतर केमोथेरपी. माझे दुखणे कळल्यावर शाळेत आता प्रमुख कोण यावर वादंग होऊ लागले. पण मी केमोथेरपी धीराने घेतली. मात्र यातून उठायचे आहे, अशी मनोधारणा असल्याने मी खरंच पूर्ण बरी झाले. विग घालून कामावर हजर झाले. ‘या आता येत नाहीत’ म्हणणाऱ्यांची मी निराशा केली. ‘ही आता तरी घरी राहील’ असे माझ्या नातेवाईकांना वाटत होते. पण मी पुन्हा जोमाने कामाला उभी राहिले.
अजून वसतिगृह उभे करायचे होते. कारण आमच्या मुलांना चार दिवस कुणी बोलवील अशी शक्यता नाही. अडीअडचणीला मुलांना कुठे ठेवायचे? आमच्या कार्यकारी मंडळाचाही विरोध होता. पण ज्याचे जळते त्यालाच कळते. माझी खटपट चालू होती. त्याच सुमारास कॅनडातील मोठी देणगी मिळाली होती. डॉ. वाणींनी एम.एस.एस.ओ. तर्फे माझा कॅनडाचा दौरा निश्चित केला. महाराष्ट्र सेवा समिती ऑर्गनायझेशनतर्फे सर्व व्यवस्था झाली. माझी चुलत बहीण न्यूयॉर्कला राहात होती. लंडनला नाशिकचेच एक परिचित राहत होते. तेव्हा न्यूयॉर्क – कॅनडा – लंडन असा चाळीस दिवसांचा दौरा झाला. तेथील वसतिगृहे पाहिली व वसतिगृहात काय काय सोयी हव्यात याची कल्पना आली. आपल्याकडे निरपेक्ष काम करणारी मंडळी आहेत फक्त सरकारी सुविधांची कमतरता आहे, हे लक्षात आले. तेथून परत आल्यावर वसतिगृहाचे नियोजन झाले. कधीही विमानात न बसलेल्या लिमयेबाई असे तीन देश हिंडून आल्या. वसतिगृह सुरू झाले. सगळे सुरळीत पार पडले का?
वसतिगृहात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होत्या. काय काय अडचणी येतील, याचा अंदाज घेण्यासाठी मी वर्षभर तेथे राहिले घर बंद करून. गौतम आणि बाबा यांचे जेवण-खाण्याचे पैसे मी देत होते. नाशिकला एक वृत्तपत्र होते. त्यात छापून आले की ‘लिमयेबाईंनी मतिमंद मुलांसाठी पंचतारांकित होस्टेल काढले आहे. मतिमंद मुलांना फोमच्या गाद्या आणि पलंग हवेत कशाला? आणि त्या आपल्या कुटुंबाला घेऊन तेथे राहिल्या आहेत. म्हणजे विनाखर्चाची आयती सोय झाली.’ २५ वर्षे मला साथ देणारी विश्वस्त मंडळीही विरोधात गेली. बाईंना अवाजवी महत्त्व मिळते आहे, त्यांना रोखले पाहिजे, अशी धारणा करून विरोधास सुरुवात झाली. फार कठीण दिवस होते ते. मी साधी, मध्यमवर्गीय मास्तरीण ते सारे प्रतिष्ठेत, धनवान. माझी मैत्रीण म्हणालीसुद्धा ‘कशाला साऱ्यांची बोलणी खात काम करतेस आण मर मर मरतेस? राजीनामा फेक आणि बाजूला हो.’
मलासुद्धा काम करणे कठीण होते. पण मुलांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न बाकी होता आणि मानसन्मान मी मागितले थोडे होते? शिक्षकासाठी राष्ट्रीय पुरस्कार, दलितमित्र पुरस्कर, मुलुंडचा गद्रे पुरस्कार, कोल्हापूरचा अपंग मित्र पुरस्कार आणि अनेक स्थानिक पुरस्कार लाभले. पण आपण पुरस्कारासाठी काम केले होते का? प्रत्येक वेळी पुरस्काराची सर्व रक्कम मी संस्थेस दिली. कारण पुरस्कार व्यक्तीला नसून तिच्या कामाला असतो आणि एकाची जिद्द आणि हजारोंचे सहकार्य लाभले तरच कार्य पूर्णत्वास जाते. पुणे विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्कार दिला व राज्यपालांकडून सिनेटचे सभासदत्वही लाभले. सगळ्याचे श्रेय मी मला साहाय्य करणाऱ्या शिक्षक, कर्मचारी व माझे कार्यकर्ते यांना आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.
पण हे नसे थोडके असा आणखी एक अनुभव, एक सत्त्वपरीक्षा द्यायची होती. लिमयेबाईंनी परदेशी देणग्यांचा हिशेब नीट ठेवला नाही. याबाबत चौकशी व्हावी असा एक अर्ज समाजकल्याण खात्याकडे गेला. साहेब गेली अनेक वर्षे माझे काम पाहात होते. पण तेसुद्धा चक्रावले. त्यांनी त्यांच्या स्वीय सचिवाला बोलाविले. अर्ज दाखविला. अर्ज वाचून ती सचिव हसायला लागली. ‘साहेब, बाई अजून पांचालच्या बिडाच्या शेगडय़ा वापरतात. पापड कुरडय़ा टीनच्या डब्यात ठेवतात. सायकलवरून शाळेत येतात. शाळेच्या बागेतले फूल डोक्यात घातले तरी चार आणे देतात. त्या कसल्या पैसे खाणार? ती हुशारी त्यांच्याजवळ नाही. माझे ऐकाल तर अर्ज फाइल करून टाका.’
इतके प्रामाणिक कष्ट करून हेचि फळ काय मम तपाला असा अनुभव आल्याने मीही खूप वैतागले. त्याच दरम्यान ‘तरुण भारत’चे वयोवृद्ध संपादक तेव्हा माझ्याकडे आले होते. ते म्हणाले, ‘‘लिमयेबाई, झाडावर दगड बसायला लागले की समजावे झाडाला फळे लागलीत. पण म्हणून ज्याने झाड लावले त्याने त्याची काळजी घेणे सोडायचे नाही. ही जगरहाटीच आहे. काम चालू ठेवा.’’
मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वि मोलाची
तू चाल पुढे तुला र गडय़ा भीति कुणाची?
परवा भि कुणाची ?
हे ‘माणूस’ सिनेमातील गीत जीवनाचे तत्त्वज्ञान समर्पक दृष्टीने सांगते. म्हणूनच वयाची पंचाहत्तरी झाली तरी न थकता, चेहऱ्यावरील उत्साह कमी न होऊ देता अजुनि चालतेच वाट..
संपर्क- प्रबोधिनी ट्रस्ट, रजनी लिमये, जुनी पंडित कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक-४२२ ००२.
फोन- ०२५३-२५८०२४९, २५७९७१६. वेबसाईट- http://www.prabodhinitrustnsk.org / prabodhinitrust@yahoo.com
अजुनि चालतेचि वाट
‘‘लिमयेबाई, झाडावर दगड बसायला लागले की समजावे झाडाला फळे लागलीत. पण म्हणून ज्याने झाड लावले त्याने त्याची काळजी घेणे सोडायचे नाही.’’ सातत्याने येत असलेल्या अडचणींमुळे अत्यंत उद्विग्न अवस्थेत असलेल्या लिमयेबाईसाठी हे प्रोत्साहनपर शब्द असले तरी मतिमंदासाठी शाळा सुरू करण्यासाठी, त्यांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी, त्या झाडाला फळे येण्यासाठी त्यांना खूपच कठीण काळातून जावं लागलं.
आणखी वाचा
First published on: 16-02-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of rajani limaye founder of prabodhini trust