दरवर्षी वसंत येतो वृक्ष असेच बहरतात, असेच सडे पडतात पण त्यांच्यामुळे मिळणारा आनंद कधी कमी होत नाही. उलट सडे पडून गेल्यावर आपण प्रतिसडे पाडत असतो. कधी पायघडय़ांच्या स्वरूपात तर कधी रांगोळ्यांच्या.
मा झ्या लेकीला, तिच्या लहानपणी वाचून दाखवलेल्या गोष्टींपैकी माझी सर्वात आवडती गोष्ट आहे, जेनिफर रीडने लिहिलेली ”The falling flowers”. ही गोष्ट मला माझ्या बालपणात घेऊन जाते. अजूनही वसंतात, ती गोष्ट, त्या आठवणी मनात दाटून येतात. गोष्ट तशी साधीच, पण हृदयात घर करून राहणारी आहे. एक आजी आपल्या ‘मायुमी’ नावाच्या लहानशा नातीला काही तरी अद्भूत-अलौकिक दाखवायला शहराकडे नेण्याचा घाट घालते. प्रवास लांबचा, गाडीतून टोकियो शहराची रोषणाई, चकाकणारे दिवे दिसतात. मायुमीला वाटतं ‘हेच’! पण नाही, ‘याहूनही खूप सुंदर दाखवायचे आहे!’ प्रवासाच्या दरम्यान आजी-नातीचं नातं हळूवार उलगडत जातं, त्याचबरोबर आजीला काय बरं दाखवायचं असेल हे बघण्याची उत्सुकता वाढत जाते. शेवटी टोकियो शहरात आजी तिला एका रस्त्याजवळ नेते, त्या रस्त्याच्या दुतर्फा चेरीचे वृक्ष नाजूक गुलाबी रंगाच्या फुलांनी नखशिखांत फुललेले असतात. छोटी मायुमी खूपच खूश होते, मन भरून फुलांकडे बघत बसते, मग झाडाखाली पडलेल्या फुलांच्या सडय़ाकडे वळते, हे स्वप्नतर नाही नं म्हणत खाली पडलेल्या सडय़ातली फुलं अलगद उचलून त्यांना स्पर्श करते, स्वत:च्या अन् आजीच्या गालाला त्याने गुदगुल्या करते. त्यांचा मनसोक्त आनंद लुटते. शेवटी हे सगळं सोडून जायालाच हवं. आठवण म्हणून लहानशा ओंजळीत काही फुलं नेते!
वृक्षांवरची फुलं तर छान दिसतातच, पण आपल्या जवळची असतात ती खाली पडलेल्या सडय़ातली. कारण, मान वर करून वरची फुलं न्याहाळून नेत्रसुख तर घेता येतं, पण त्याचा मऊ स्पर्शाचा अनुभव घेणं, पायांना त्या मखमली स्पर्शाने गुदगुल्या होणं, त्यांच्या मंद सुवासाची अनुभूती घेणं किंवा नुसतंच ओंजळीत घेऊन आपलंसं करायला ही पडलेली फुलेच लागतात. माझं बालपण नागपूरला गेलं, आजीच्या अंगणात एक पारिजातक होता. अगदी साधं झाडं, त्याची सावली नव्हती. आणि त्याला रूपही नव्हते. वेडय़ा-वाकडय़ा फांद्यांच्या या झाडावर मात्र आजीचं खूप प्रेम होतं. पावसाळ्यात त्याच्या शेंडय़ावर कळ्या दिसू लागल्या की तिची त्या भोवतीची लगबग वाढायची, खालची माती चोपून-चापून ती जमीन सारवत असे. मग, हळूच तो परिजातक बहरायचा आणि मध्यरात्री झोपेत असतानाच त्याच्या मधाळ परिमळाचा भास व्हायचा. सकाळी उठून बघावे तर त्या सारवलेल्या स्वच्छ अंगणात पांढरी-केशरी टवटवीत, तजेलदार, नाजूक, मुलायम, अतिसुंदर फुलं पसरलेली असायची. रात्री कितीही पाऊस पडला तरी आमचं एकही फूल मातीने माखलेलं नसायचं. याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. श्रावणात लक्ष फुलं वाहून उपासना करणारे असंख्य लोक अक्षरश: वार लावून ही फुलं वेचून नेत. किती लक्ष फुलं किती कोटी देवांच्या शिरी वाहिली गेली देव जाणे, पण त्याचं थोडं तरी पुण्य आजीच्या पदरात पडलं असेलच.
मग, बाबांची बदली बंगळुरुला झाली. बंगळुरु म्हणजे ‘गार्डन सिटी.’ जगभरातून किती तरी नवीन वृक्ष पहिल्यांदा इथेच आणून लावले गेले. मार्च महिन्यात एकदा बाबांनी आम्हाला भल्या पहाटे उठवून इथल्या जगप्रसिद्ध ‘लाल बागला’ नेलं. इतक्या पहाटे का हो? जरा उशिरा नसतो का जाऊ शकलो? अशी आमची कुर-कुर सुरूच होती. लाल बागला पोहचलो तोवर जरा फटफटलं होतं. जेव्हा स्पष्ट दिसू लागलं तेव्हा पहिला दिसला तो तेजस्वी पिवळ्या फुलांचा ताटवा आणि दुसरीकडे तसाच निळ्या-जांभळ्या फुलांचा गालीचा! पिवळ्या सडय़ाने डोळे दिपले तर निलकांती फुलांनी शीतल केले! पिवळ्या फुलांचा ‘टाबेबुया’ आणि निळ्या-जांभळ्या फुलांचा ‘जकरंडा’ (नीलमोहोर), दोन्ही ब्राझीलहून आपल्याकडे आणलेले. बंगळुरु-पुणे-नाशिक दिमाखात फुलून रस्त्यांवर आपल्यासाठी जणू पायघडय़ाच घालतात! बंगळुरुला वास्तव्य असताना दरवर्षी नित्यनियमाने हा सोहळा बघायला जायचो! त्या वेळी हवं तेव्हा-हवे तेवढे फोटो काढायची चंगळ नव्हती, रंगीत फोटो तर नव्हतेच, त्यामुळे ती आठवण डोळ्यात-मनात-पुस्तकात जपून ठेवत. डोळे मिटले की स्क्रिन सेव्हर म्हणून तेच रंगीत सडे दिसायचे!
पण या सडय़ाची खरी मजा ‘चाखली’ ती मध्य प्रदेशातल्या पचमढी या ठिकाणी. आमच्या घरामागे एक अतिविशाल-अतिप्राचीन वृक्ष होता. त्याच्या घनदाट सावलीत आम्ही भरदुपारी खेळायचो. कसला वृक्ष आहे हे विचारायचे भानही नव्हते. मग वसंत अवतरला. वृक्ष गडद किरमिजी रंगाच्या पालवीने भरून गेला आणि अचानक त्याच्या खाली नाजूक मोतिया रंगाचे ओले मांसल कॅप्सुलच्या आकाराची फुलं दिसू लागली. ‘मोहाची फुलं बहरली’ याचा सगळ्यात जास्त आनंद आमच्या घरी घरकाम करणाऱ्या गोंड आदिवासी भिरूला झाला. तिने तर आम्हाला रोज सकाळी फुलं वेचण्याची ताकीदच दिली. बदल्यात आम्हाला याच फुलांचे अनेक गोडधोड पक्वान्न खाऊ घातले. भाकरी, धिरडी, लाडू आणि गोड भातही! सकाळी या फुलांचा वास अत्यंत मधुर आणि चव साखरेसारखी गोड. जसजसा सूर्य वर चढायला लागला की ही शर्करा आंबून जो काही दर्प पसरायचा, अगदी नको नको व्हायचं. मात्र दिवसभर असंख्य प्रकारचे पशू-पक्षी. झाडाखालच्या सडय़ावर चरून जात. फुलं टिपून जात. लंगूरांच्या टोळ्या आल्या की सगळे सैरभैर पळायचे.. आम्हीसुद्धा.
प्रत्येक फुलाची खाली पडण्याची एक वेगळी तऱ्हा असते. ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’ तर धबकन पडती जमिनीवरती सावरीची फुले. पण, सोनमोहोराची फुलं ही खाली पडत नाहीत. ती कशी हवेत हळूवार तरंगत अलगद येऊन जमिनीवर टेकतात. कधी त्यांच्या वाटेत आपण आलो तर आपल्यालाही सुवर्णफुलं वाहून घेण्याचं भाग्य लाभतं. हल्ली सोनमोहोर किंवा कॉपर पॉडचे वृक्ष मोठय़ा प्रमाणात दिसतात, पण ८० च्या दशकात क्वचितच आढळायचे. पुण्याला आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानाच्या कडेला तीन वृक्ष होते. त्यांच्या पिवळ्या धम्मक सोनेरी सडय़ाचं आम्हाला भारी अप्रूप. त्या काळी कॅमेरा जरी दुर्मिळ नसला तरी त्याचा खर्च परवडण्यासारखा नसायचा. मग चक्क वर्गणी काढून आम्ही प्रिंट काढायचे पैसे भरायचो आणि त्या वेळी जमिनीवर बसून फोटो काढले जात. त्या काळात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक तरी असा फोटो असेलच. काहींचे एकटे तरी काहींचे दुकटे; सिलसिला पोझमधले! माझा ‘दाखवायचा’ फोटो इथलाच होता!
तसाच एक वृक्ष होता करंजाचा. त्याच्या पांढरट-जांभळ्या बारीक फुलांचे तर जाड थर जमायचे. आमचे प्राध्यापक देसले सर ती फुलं गोळा करून कुंडय़ांमध्ये घालायला सांगत. त्या फुलांच्या कडूजार वासाने म्हणे कीटक नाहीसे होतात. (यात काहीच दुमत नाही) आणि झटपट कुजून खतही होतं. त्यावेळी आम्ही नाठाळपणे ऐकलं न ऐकलं असं करू. आता मात्र सेंद्रिय शेतीसाठी गावभर हीच फुलं शोधत फिरतो! गेल्या फेब्रुवारीत दापोली येथील जालगाँवला गेलो होतो. रस्त्याच्या कडेला तीन महाकाय बकुळ वृक्ष होते. त्यांच्या खाली अशी टप्पोरी फुलं पडली होती, फुलांचा पाऊस नव्हे अतिवृष्टीच झाली होती जणू. ठाण्यात एखादं फूल सापडलं तरी आनंद होतो, इथे तर ओंजळीत फुलांचा पूरच आला होता. आम्ही सकळांनी त्या सुवासिक वातावरणात खूप फुले वेचली आणि तोकडे गजरे नव्हे तर लांबलचक हार गुंफले.
खरंतर झाड तिथे फुलांचा सडा पडत राहणारच. पण.. बोगनवेलीच्या कागदी फुलांचाही असाच विविध रंगी सडा पडतो, पण बिच्चारी, अतिपरिचयात.. कचरा म्हणून लोटली जातात.
बहाव्याची राजस्वी फुलं त्यांच्या झुंबररूपी गुच्छांमध्ये काय तोऱ्यात डुलतात, पण सडा दयनीय दिसतो. फुलाचा प्रत्येक भाग विस्कळीत होऊन गळतो, त्यामुळे कुठे पाकळ्या, कुठे बाह्य़कोष, कुठे पुंकेसर-स्त्रीकेसर.. मेरे दिल के तुकडे हजार हुए.. हीच व्यथा गुलमोहोरच्या फुलांची, गुलाबी कॅशियाची आणि कांचनचीही.
दरवर्षी वसंत येतो वृक्ष असेच बहरतात, असेच सडे पडतात पण त्यांच्यामुळे मिळणारा आनंद कधी कमी होत नाही. उलट सडे पडून गेल्यावर आपण प्रतिसडे पाडत असतो. कधी पायघडय़ांच्या स्वरूपात तर कधी रांगोळ्यांच्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा