तुम्हाला तुमची पहिली दुचाकी केव्हा मिळाली? ती प्रत्येकासाठी खास असते. आता आजीआजोबा असलेल्यांना आणि कदाचित आईबाबांनाही त्यासाठी स्वत:च कमवावं, साठवावं लागलं असेल. आताच्या पिढीचं तसं नाही. ठराविक वयात गिअरची सायकल, ठराविक वयात फोन, ठराविक वयात बाईक मिळायलाच हवी, हे मुलं आता गृहीतच धरतात. पण आजूबाजूला अनेक मित्र शाळेच्या वयातच बाईक चालवायला लागलेले (काही तर त्यांच्या वडिलांची चारचाकीही चालवू लागलेले!) पाहताना मुलांना आपल्या ‘हक्काच्या’ दुचाकीसाठी दम धरता येतो का?…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळपासून घरात उत्साही वातावरण होतं. रोहननं डोळे उघडले, तेच रॅम्बोनं त्याच्यावर उडी मारल्यामुळे. रोज सकाळी रॅम्बो त्याला उठवायचा आणि नंतर रोहन त्याला शी-शूसाठी बाहेर घेऊन जायचा. पण रॅम्बोला कॅलेंडर कळत नसल्यामुळे आज रोहनचा सोळावा वाढदिवस आहे हे त्याला माहीत नव्हतं. डोळे उघडताच रोहनला समोरच्या भिंतीवर चिकटवलेले ‘हॅपी बर्थडे ब्रो’ असे बलून दिसले आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. रात्री तो झोपलेला असताना समृद्धीनं, म्हणजे त्याच्या छोट्या बहिणीनं फुगे फुगवून भिंतीवर लावले असणार. रोहन उठून बाहेर येताच आई-बाबा आणि समृद्धी यांनी ‘हॅपी बर्थडे’चा गजर केला. समृद्धीनं स्वत: बनवलेलं ग्रीटिंग कार्ड त्याला दिलं. ‘वा! दिवसाची सुरुवात तर चांगली झाली,’ असा विचार करत रोहन लगेच आईला ‘हॅपी बर्थडे आई’ म्हणाला. त्याचा आणि आईचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे घरातल्यांचा उत्साह द्विगुणित झालेला असायचा. पण दरवर्षीप्रमाणे आजही रोहन मात्र आईसाठी कार्ड बनवायला विसरला होता. दुपारी क्लासला जाताना कार्ड घ्यायला पाहिजे असा विचार करत असतानाच समृद्धीनं त्याच्या हातात आईला द्यायला म्हणून कार्ड दिलं. हेसुद्धा दरवर्षीचं होतं. ती आठवणीनं कार्ड बनवायची आणि त्यावर ‘बाबा, रोहन आणि समृद्धी,’ अशी तिन्ही नावं लिहून आईला द्यायची. ‘चला एक काम वाचलं,’ असं मनात म्हणत तो रॅम्बोला घेऊन बाहेर गेला आणि सर्व काही दरवर्षीप्रमाणे सुरू राहिलं.

हेही वाचा…हवा सन्मान, हवेत अधिकार!

सकाळी आठ वाजता आई कामाला जायच्या आधीच आजी-आजोबा घरी आले. त्यांनी आधी तिला ओवाळलं आणि हातात ५०१ रुपये ठेवले. आजीनं तिची आवडती शेवयांची खीर करून आणलेला डबा आईला दिला. मग त्यांनी रोहनलापण ओवाळलं आणि २०१ रुपये त्याच्या हातावर ठेवले. खरंतर अजून रोहनची अंघोळसुद्धा झाली नव्हती. तो तसाच विस्कटलेल्या केसांनी आणि पारोसा ओवाळायला बसला. पण पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे कुणी काही बोललं नाही.

आजी-आजोबा ओवाळून निघून गेले आणि आई-बाबा कामाला गेले. समृद्धी तर आधीच शाळेत गेली होती. घरात फक्त रोहन आणि रॅम्बो असे दोघेच राहिले. अचानक सगळं घर रिकामं झालं. रोहन हातात फोन घेऊन सोफ्यावर बसणार, एवढ्यात त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनं फोन तसाच ठेवून दिला आणि बाल्कनीत जाऊन उभा राहिला. सवयीनं रॅम्बोही त्याच्या शेजारी गेला. रॅम्बोच्या कानामागे खाजवत खाजवत रोहन जोरदार विचार करायला लागला. आज आई-बाबा काय प्रेझेंट देणार, हा विचार त्याच्या डोक्यात चालू होता. गेल्या वर्षी दहावी पास झाल्यावर त्याला फोन मिळाला होता. बाबांनी नेहमीच्या पद्धतीनं ‘किती मार्कांना काय किमतीचा फोन मिळेल,’ याचा चार्ट त्याला दहावीच्या सुरुवातीलाच दिला होता!

हेही वाचा…‘ती’च्या निर्णायकतेचे कवडसे

रोहनला हवा असलेला आयफोन हा ‘९५ टक्के किंवा जास्त गुण’ या खणात होता. तो काही रोहनला मिळाला नाही. त्याच्या ८७ टक्के गुणांना बाबांनी ठरल्याप्रमाणे १५ हजार रुपये दिले. रोहनचा चांगलाच हिरमोड झाला. पण आईनं वेगळे ५ हजार रुपये त्याला दिले. आजी-आजोबांचे २,५०० आणि त्यानं त्याचे वर्षभर साठवलेले ३ हजार, असे सगळे एकत्र करून रोहननं एक ‘सेकंडहॅन्ड’ आयफोन घेतलाच. त्यानं असा जुना फोन घेतला, म्हणून आई वैतागली होती. पण नेहमीप्रमाणे तिनं ते कोणाला बोलून दाखवलं नाही. आणि ‘‘ते रोहनचे पैसे आहेत आणि त्याचा फोन आहे. त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणार नाही,’’ असं बाबांनी जाहीर करून टाकलं.

आपल्याला खरंतर मोटारसायकल हवीय, पण ती आता मिळायची सुतराम शक्यता नाही, याची त्याला कल्पना होती. व्यवस्थित लायसन्स मिळेपर्यंत मोटारसायकल मिळणार नाही, याची त्याला खात्रीच होती. त्याच्या अनेक मित्रांना दहावी झाल्यावर बाईक्स मिळाल्या. सकाळच्या क्लासच्या बॅचला अनेक जण स्वत:च्या बाईकवर यायचे. रोहन ते बघून खूप रागवायचा. त्याच्याकडे गिअरची सायकल होती आणि ती त्याला एकेकाळी खूप आवडायचीसुद्धा. पण जसे इतर सगळेजण बाईक किंवा स्कूटर आणायला लागले, तसा त्याला सायकलचा राग यायला लागला. वारंवार सांगूनही आई-बाबा ऐकेनात तेव्हा त्यांनं क्लासची बॅच बदलून घेतली. भर दुपारची बॅच घेतली. तेव्हा रस्त्यावर पोलीस असल्यानं आणि खूप रहदारी असल्यानं कुणी मुलं बाईक आणायची नाहीत. मग त्याचं डोकं थोडं शांत झालं. मात्र राग पूर्णपणे गेला नाही.

हेही वाचा…धूम्रपानातही स्त्रीपुरुष भेद!

सोसायटी आणि कॉलेजमधल्या मित्रांच्या मदतीनं त्यानं बाईक शिकून घेतली. खूपच सोपं होतं ते! एकदा अशा प्रकारे बाईक चालवताना त्याला पोलिसांनी पकडलंसुद्धा होतं. पण पोलिसांच्या अक्षरश: हातापाया पडून आणि थोडी ‘समजूत’ घालून त्यानं ते प्रकरण कसंबसं मिटवलं होतं. घरापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं. त्यानंतर थोडे दिवस तो घाबरलेला होता, कारण पोलिसांनी जर घरी फोन केला, तर आपलं काही खरं नाही, याची त्याला भीती होती. पण रोज क्लासला दिसणारे, बाईक चालवणारे वर्गातले मित्र बघितले की तो दु:खी होई. नेमकं काय करावं, हे काही त्याला समजत नव्हतं. बारावी पास झाल्यावर- अठराव्या वाढदिवसानंतर आई-बाबा बाईक देतील याची त्याला खात्री होती. पण पुन्हा एकदा ते गुणांकडे बघतील आणि पुरेसे गुण मिळाले नाहीत, तर साधी बाईक घेतील, याचीही त्याला खात्री होती. ‘एक तर इतका वेळ थांबा आणि त्यानंतरही भंगार बाईक घ्या, म्हणजे कसलं बोअर होणार! मला तर कॉलेजमध्ये तोंड दाखवायलासुद्धा लाज वाटेल…’ त्याच्या डोक्यातला विचार थांबेना. मग मात्र त्यानं फोन उचलला आणि सर्व बर्थडे मेसेजेसना उत्तरं द्यायला सुरुवात केली.

हातात फोन आल्यावर दुपारपर्यंतचा वेळ कसा गेला ते त्याला कळलंच नाही. आज क्लासला पण फार मजा नाही आली. सर काही तरी ‘एफर्ट इज एव्हरीथिंग! कीप वर्किंग हार्ड. डोन्ट थिंक ऑफ आउटकम,’ असली फिलॉसॉफी झाडत होते.

हेही वाचा…सांधा बदलताना : सिसिफस

‘साले खचून फी घेतात आणि मॅथ्स शिकवायचं सोडून तासभर फिलॉसॉफी बोलत बसतात. आता युनिट टेस्ट जवळ आली आहे. अजून निम्मा पोर्शन शिकवायचा बाकी आहे आणि हा बोलबच्चन फिलॉसॉफीमध्ये घुसून पडलाय! याच्या पायी माझे मार्क जातील आणि चांगली बाईक पण… क्लासच्या वर्षभराच्या फीमध्ये मला जोरदार बाईक घेता आली असती,’ असा विचार करत असतानाच शेजारच्या आर्यननं टेबलाखालून त्याला लाथ मारली आणि रोहन एकदम भानावर आला.

सगळेजण त्याच्याकडे बघत होते आणि त्याची आवडती नेहासुद्धा त्याच्याकडे बघून मॅडसारखी हसत होती. ‘‘क्या रोहन, क्लास मे सोने के लिए आता हैं क्या?’’ असं म्हणत सरांनी उरलीसुरली इज्जतपण पब्लिकमध्ये लुटून टाकली. पण तेवढ्यात आर्यन मदतीला आला. ‘‘सर उसका बर्थडे हैं आज। आज तो छोड दो उसको!’’ मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि ‘हॅपी बर्थडे टू यू’चा ओरडा केला. सरपण हसले आणि नेहानं ओठाचा चंबू करून दाखवला. ‘चला! दिवस सडता सडता वाचला! नेहाला नंतर भेटायला पाहिजे,’ क्लास आवरून, नेहाबरोबर गप्पा मारून, मित्रांबरोबर टाइमपास करून रोहन घरी आला तेव्हा खूप उशीर झाला होता. पण निदान आज तरी आपल्याला कोणी ओरडणार नाही याची त्याला खात्री होती. घरी सगळेच जमा झाले होते, हे निश्चितच सरप्राइज होतं. आई, बाबा, समृद्धी, आजी-आजोबा, मावशी आणि जय काकासुद्धा. जय काका त्याचा एकदम फेव्हरेट होता. पुन्हा एकदा सगळ्यांचं ओवळणं झालं आणि आई म्हणाली, ‘‘चल, खाली जाऊ या.’’

‘‘आता काय नवीन?’’ हा विचार करतच रोहन सगळ्यांबरोबर खाली गेला. समृद्धी खूपच उड्या मारत होती. म्हणजे काही तरी बरं सरप्राईज असणार. पण ‘अपेक्षा खूप वाढवायची नाही. नाहीतर नंतर पोपट होतो आणि उगाच मूड खराब होतो,’ असं स्वत:ला सांगत तो पार्किंगमध्ये गेला. तिथे कव्हर घातलेलं काहीतरी स्कूटरसारखं होतं. समृद्धी अजून जोरात उड्या मारत होती ‘‘बघ ना, बघ ना!’’ असं म्हणत.

हेही वाचा…एका मनात होती: शोकाकुल एकटेपणा

‘‘ही घे, तुझी बर्थडे गिफ्ट!’’ बाबांनी दोन्ही हातांनी कव्हर उचललं. रोहननं हळूच डोळे उघडले, तर समोर स्कूटर! आणि त्याचा चेहरा एकदम पडला.

ती छोटी इलेक्ट्रिक स्कूटर होती; १२५ सीसीची पेट्रोल स्कूटर नाही! ही कमी पॉवरची. जास्तीत जास्त ३५ च्या स्पीडनं चालणारी. लायसन्स न लागणारी इलेक्ट्रिक स्कूटर. त्याच्या सीटवर एक हेल्मेटपण ठेवलेलं होतं. ‘म्हणजे मी हेल्मेट घालून या टॉय स्कूटरवर ३५ च्या स्पीडनं जाणार. सायकलवालेसुद्धा मला ओव्हरटेक करतील! अरे यार, हे काय केलं बाबांनी!’ तो मनात म्हणाला.

रोहन हसून ‘थँक्यू’ म्हणायचा प्रयत्न करत होता, पण त्याचा मूड गेलाय हे सर्वांच्याच लक्षात आलं. नंतर आजोबा पुढे आले, जय काकापण आला. ‘‘रोहन, आय नो, की तुला ही स्कूटर बहुतेक आवडली नाहीये. पण मी आणि बाबांनी बोलून, ठरवून घेतली आहे. याला लायसन्स लागत नाही, म्हणजे हे पूर्ण लीगल आहे. तुला पोलीस पकडून त्रास देणार नाहीत आणि तुझा पॉकेट मनी भलत्या खिशात जाणार नाही.’’ आजोबा म्हणाले.

हेही वाचा…स्त्री विश्व: ‘सफ्राजेट्स’चं योगदान

जय काका सांगू लागला, ‘‘रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये चालवायची सवय होईल दोन वर्षांत. बारावीनंतर लगेच लायसन्स काढ आणि आपण मस्त मोटरसायकल घेऊ!’’

रोहन हळूच बाजूला गेला. समृद्धी आता स्कूटरवर चढून बसली होती आणि जोरजोरात आनंदानं किंचाळत होती- ‘‘रोहन मला ट्युशनला सोडणार आता. किती मज्जा!’’ मग शहाण्या मुलासारखा चेहरा करून रोहन परत आला. तिला म्हणाला, ‘‘चल समू, आपण एक राउंड मारून येऊ या. हेल्मेट घालून समृद्धीला मागे बसवून दोघं सोसायटीच्या बाहेर पडले आणि थोडे पुढे जाऊन थांबले.

‘‘अरे यार, तू इतकी काय एक्साइट झाली आहेस? मला या टॉय स्कूटरवर बघून हसतील ना सगळे. सगळी इज्जत जाईल माझी आता…’’
‘‘मग तू काय करणार रोहन?’’ समृद्धी अजून उत्साहातच होती.
‘‘मी उद्या क्लासवरून परत येतानाच ही फोडून टाकणारे. अॅक्सिडेंट झाला म्हणून सांगीन… म्हणजे एकदाची कटकट जाईल माझ्यामागची!’’
हे ऐकून मात्र समृद्धी एकदम दचकली. म्हणाली, ‘‘रोहन, प्लीज असं करू नको… तुलापण लागेल आणि आई-बाबापण खूप सॅड होतील!’’
‘‘मग मी काय करू? मला हे माकड नकोय अजिबात.’’
‘‘रोहन, नेहाकडेसुद्धा हीच स्कूटर आहे. तिला तर कोणी हसत नाही!’’
‘‘अगं ती मुलगी आहे!’’ असं रोहन म्हणाला आणि त्यानं जीभ चावली. ‘आता मेलो! ही समू आता ‘जेंडर स्टिरीओटाईप’वर भाषण देणार!’

हेही वाचा…इतिश्री : जोडीदाराची निवड…

पण समृद्धीच्या मनात काही तरी वेगळंच होतं. ‘‘हे बघ, तू नेहाला सांग, की तिला एकटं वाटायला नको म्हणून तू मुद्दाम ही स्कूटर मागून घेतलीस. तुझ्या वाढदिवसाची गिफ्ट म्हणून. म्हणजे ती एकदम खूश होईल! आणि तुम्ही एकत्र क्लास आणि कॉलेजला जाल. हू नोज, डबल सीटसुद्धा जाल!’’

रोहनचे डोळे एकदम चमकले. ‘‘अरे समू, तू काय स्मार्ट चीज आहेस! मी तर असा विचारच केला नाही. गुड! थँक्स! उद्या मी तुला पिझ्झा खाऊ घालतो. आज मला भरपूर पैसे मिळाले आहेत आणि आता पेट्रोलला तर पैसे लागणारच नाहीयेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे. मज्जाच मज्जा!’’

chaturang@expressindia.com