‘‘करता करता शिकायला, शिकवायला कोणाला वेळ आहे इथं? ट्रेन्ड आर्टिस्टांना मागणी जास्त. एन.एस.डी., एफ.टी.आय.आय. म्हणा, ललित कला केंद्र म्हणा, झालंच तर व्हिसलिंज वूड्स, टी स्कूल, मीडिया मॅग्नेट, थिएटर वालोज आणि गल्लीबोळात कोपऱ्याकोपऱ्यावर थाटलेले सत्राशेसाठ थिएटर वर्कशॉप्स वगैरे. त्यातल्याच कशा व कशाची पिसं खोचून घ्यावी लागतात टोपीत. नसली तर कोणी दारात उभं करत नाही.’’
‘आलास? झालं काम?’ अहिररावांनी खाटेवर पडल्यापडल्या दरवाजाकडे नजर टाकत म्हटलं, तेव्हा एस. पडक्या चेहऱ्याने घरात शिरत होता. काम झालं नसल्याची निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेली होती, पण दुरून ती वाचण्याइतकी अहिररावांची दृष्टी आता तेज राहिलेली नव्हती. खरं म्हणजे काहीच तेज राहिलेलं नव्हतं. जुन्या नाटकीय कारकिर्दीत कमावलेला खणखणीत आवाज वगळता. त्याच आवाजात ते म्हणाले, ‘‘आमच्या चौधरींचा नातूच आहे ना तिथे? प्रॉडक्शन मॅनेजर की कायसा?’’
‘‘आहे.’’
‘‘मी सगळं सांगितलं होतं त्यांना. आमचा पोरगा गुणी आहे. जरा गावाकडचा आहे.. संधी मिळाली तर सोनं करेल.’’
‘‘त्यानंही हे सगळं सांगितलंय मला. फक्त रोल दिला नाही. त्याच्या नव्या मालिकेत माझ्याजोगं काम नाहीये असं म्हणाला. सगळेच असं म्हणतात. मला सवय झालीये. बघीन.. बघीन नाही तर एक दिवस.. परत..’’ सर्वोत्तम निराश होत म्हणाला. छोटय़ा-मोठय़ा पडद्यावर, रंगभूमीवर नशीब काढायला तो गावाकडून इथे आला. त्याला आता वर्ष होत आलं होतं. पण काम मिळत नव्हतं. मूळच्या ‘सर्वोत्तम’ या नावातलं आद्याक्षर ‘एस’ हे आता तो ‘स्ट्रगलर’ या उपाधीच्या आद्याक्षरासारखं वापरायला लागला होता आणि स्ट्रगलच्या नावाखाली स्टुडिओज, प्रॉडक्शन हाउसेसच्या पायऱ्या झिजवत होता. अहिरराव त्याचे आजोबा. जुन्या रंगभूमीवर वर्षांनुवर्षे अनेक प्रकारच्या भूमिका केल्या होत्या त्यांनी. थोडंफार नावही मिळवलं होतं. चार लोक ओळखीचे होते त्यांचे या क्षेत्रात. त्या आधारावर, आशेवर एस. इथे शहरात काम मिळवायला आला होता. पण अजून उजाडत नव्हतं.
‘‘इथे आल्यापासून छान बॉडीबिडी बनविलेस की रे तू. मेकअप केला की उठून दिसशील.’’
‘‘दिसेन कदाचित. पण काम मिळवू शकेन असं नाही.’’
‘‘सारखं सारखं आपला चेहरा दाखवत राहावं रे त्या त्या क्षेत्रातल्या माणसांपुढे. कधी ना कधी लागेल वर्णी.’’
‘‘प्रत्येक निर्मात्याच्या, प्रॉडक्शन हाउसच्या कचेरीत पोर्टफोलिओतल्या फोटोंचा ज्या चळती पडलेल्या असतात ना, त्या जाऊन बघा एकदा. चेहरा दाखवण्याचं कौतुक कुठल्या कुठे जाईल मनातलं. माझेसुद्धा दोन-तीन झालेच की महागडे पोर्टफोलिओ बनवून. काय फायदा झाला?’’
‘‘अरे, कलेच्या क्षेत्रात अशी उमेदवारी चालायचीच. आम्ही काय कमी टाचा घासल्या असतील आमच्या काळात? एकदा शिरकाव झाला की बसतं हळूहळू बस्तान.’’
‘‘पण तो एकदा शिरकाव व्हायचा कसा, हाच मोठा प्रश्न आहे ना! त्यात आम्ही अशिक्षित.’’
‘‘भले! चांगला ग्रॅज्युएट आहेस की तू. मी चौथी पास होतो. घरून पळून गेलो होतो. करता करता शिकलो.’’
‘‘तेव्हा एवढी सवड होती अहिरराव. शिकण्याऱ्यांनाही होती, शिकवणाऱ्यांनाही होती. आता सगळ्यांना सगळे रेडीमेड उमेदवार पाहिजेत.’’
‘‘रेडीमेड म्हणजे?’’
‘‘म्हणजे आयते, तयार. करता करता शिकायला- शिकवायला कोणाला वेळ आहे इथं? ट्रेन्ड आर्टिस्टांना मागणी जास्त. एन.एस.डी., एफ.टी.आय.आय. म्हणा, ललित कला केंद्र म्हणा, झालंच तर व्हिसलिंज वूड्स, टी स्कूल, मीडिया मॅग्नेट, थिएटर वालोज आणि गल्लीबोळात कोपऱ्याकोपऱ्यावर थाटलेले सत्राशेसाठ थिएटर वर्कशॉप्स वगैरे. त्यातल्याच कशा व कशाची पिसं खोचून घ्यावी लागतात टोपीत. नसली तर कोणी दारात उभं करत नाही.’’
‘‘अरे बापरे, या मानाने आम्ही म्हणजे अगदी बोडकेच होतो म्हणायचे. ना घरून पाठबळ, ना औपचारिक शिक्षणाचा आधार, तेव्हा नव्हतंच रे काही असं मीडिया-थिएटर वगैरेचं शिक्षण.’’
‘‘तरी अडलं नाही ना त्यासाठी?’’
‘‘कोण जाणे!’’
‘‘कोण जाणे काय? ४०-४० र्वष तोंडाला रंग लावून जगापुढे गेलात, शेवटी जीवनगौरव वगैरेही मिळवलात.’’
‘‘खरंय बाबा. जीवनात गौरवास्पद काही नव्हतं म्हणून शेवटी जीवनगौरव दिलं लोकांनी. आता आठवलं, विचार केला तरी पोटात गोळा येतो. सगळा खटाटोप चुकतमाकतच केला. ना सांगायला कोणी, ना जाणत्याची शिकवणी.. तुमची मजा आहे लेको. मुळाक्षरांपासून सगळं शिकण्याची सोय आहे तुम्हाला.’’
‘‘खरोखरीचं शिकायची आहे की नाही हे विवादास्पद आहे. शिक्के मारून घ्यायची आहे हे नक्की. खूप वेळ घालवून आणि मजबूत नोटा मोजून जास्त जास्त वजनदार शिक्के पाडून घ्यायचे अन् काय?’’
‘‘हे तुझं टोकाचं बोलणं झालं. प्राथमिक ज्ञान तर खूपच मिळत असेल ना. आम्हाला म्हणजे स्टेजवरून लाउडस्पीकरशी बोलायचं की लाउडस्पीकरमधून बोलायचं हेसुद्धा माहीत नव्हतं. तिथपासून एकेक समजून घेण्यात जिंदगानी अध्र्याच्या वर गेली. जरा रंगभूमीत रुळणार तोवर सिनेमाचं तंत्र आलं, आमची पुन्हा अ.. आ.. इ.. ई..पासून सुरुवात. तुमची ही सगळी शक्ती तर वाचते..’’
‘‘वाचते ना. म्हणून पुढे टोळीबाजीत ती खर्च होते. शेवटी ज्ञानबिन बरंचसं पुस्तकात राहतं आणि एकेका संस्थेच्या- संस्थानांच्या टोळ्या तयार होतात. आम्ही बघतोय की रोज उठून. अमक्या अ‍ॅकॅडमीने तमक्या वर्कशॉपवाल्यांना तुच्छ लेखायचं आणि आपापल्या टोळीच्या सरदाराशी निष्ठावंत राहायचं. का तर त्याच्या नावाखाली, छत्राखाली काम नक्की मिळेल वगैरे. यात शिक्षणाचा काय संबंध येतो अहिरराव?’’
‘‘तू जरा जास्तच कडवट झाला आहेस का रे?’’
‘‘कडवट नाही. वास्तववादी.’’
‘‘असेल बुवा ते तुझ्या चष्म्यातून दिसणारं वास्तव. मला आपलं आयुष्यभर वाटत आलं, जन्मभर ज्या क्षेत्रात कडमडलो त्याचं काहीतरी शिक्षण, पूर्वपीठिका असती तर बरं झालं असतं.’’
‘‘ठरावीक शब्द फेकता आले असते सराईतपणे. या कॅरेक्टरला वेगळं डायमेन्शन कसं द्यायचं.. आणि तिचा ग्राफ कसा जातो वगैरे वगैरे.. मला आतून असं वाटतंय.. मी अंत:प्रेरणेने अमुक करतोय असं म्हणायला जागा आहे का कुठे? सांगा अहिरराव सांगा. पोपटपंचीने मोठा कलाकार बनतो का?’’
‘‘नसेल. पण तो शंभर छोटय़ा चुका तर टाळू शकतो. डोळे मिटून नामवंतांच्या नकला करणं तरी टाळू शकतो. आमच्या वेळचे एक नाटय़भैरव गायल्यासारखे लयीत गद्य संवाद म्हणायचे. आम्ही सगळे तसेच गद्यात गायला लागलो. काय झालं? फक्त हसं झालं ना पुढे? कान धरून कोणी सांगितलंच नाही ना, की बाबांनो, आधी नाटकाचा प्रकार-प्रकृती बघा. मग संवाद गायला घ्या. अडाण्यांचा गाडा सगळा. कुठून तरी सुरू झाला.. कुठे तरी पोचला..’’
‘‘इथे अजून सुरू होण्याचीच वानवा आहे ना.. पुढे कोणते कोणते प्रांत सर करता येतील हा पुढचाच प्रश्न आहे ना..’’
दोघंही आपापल्या मुद्दय़ावर ठाम होते. दुसऱ्याचा हेवा करत होते. ज्यांना कलाशिक्षण मिळालं नाही त्यांना ते रीतसर होणाऱ्यांबद्दल असूया वाटत होती. ते घेणाऱ्यांची त्या चक्रात घुसमट होत होती.
अहिररावांच्या खाटेमागच्या उंच स्टुलावर वर्षांनुवर्षे ठेवलेला पितळी नटराज मात्र या सगळ्या कला तटस्थपणे पाहत होता. अहिररावांच्या जुनाट खोलीतला तो एकमेव शो-पीस होता आणि सगळा ‘शो’भिवंतपणा गेल्यावरही नाइलाजाने टिकून होता. आधीच ती सदैव अवघडलेली नृत्यचर्या आणि त्यावर त्याच त्या चर्चाचा ओव्हरडोस!
‘कलेत घवघवीत यश कशामुळे मिळतं? थिअरीमुळे? तंत्रज्ञानामुळे? अंत:स्फूर्तीतून? की प्रतिभेच्या क्षणिक अलौकिक स्पर्शामधून? कारण काहीही असो, ते गुलबकावलीचं फूल क्वचितच कोणाच्या तरी हाती लागणार. त्याचा काही फॉम्र्युला नाही आणि असलाच तरी मी तो सांगणार नाही. मला असा कायमचा जखडून ठेवलात ना बच्चमजी? मग भोगा आपल्या कर्माची फळं आणि चालू ठेवा शोध पिढय़ांपिढय़ांमधून.’ नटराज तळतळून स्वत:शीच म्हणाला.
 आपल्यापैकी कोणाची स्थिती जास्त बरी या वादात अडकलेल्या आजोबांना आणि नातवाला अर्थातच ते ऐकू गेलं नाही.        
mangalagodbole@gmail.com