चार स्त्रिया एकत्र आल्या की सासू-नणंदेच्या खमंग उखाळ्यापाखाळ्या काढतात किंवा साडय़ा-दागिने-पाककृती अशा न संपणाऱ्या विषयांवर अखंड बोलतात, हा एक ‘लोकप्रिय’ समज आहे आणि तो तपासून बघण्याची गरज आणि इच्छा कोणाला फारशी दिसत नाही. ‘आम्ही साऱ्या’ एकत्र येऊन काय काय करू शकतो याचा शोध घेण्याच्या वाटेवर जे दिसते आहे ते केवळ दिलासा देणारेच नाही तर थक्क करणारेही आहे. अगदी पार कोकणातील एखाद्या नखाएवढय़ा पाडय़ापासून ते सतत धावणाऱ्या मुंबईपर्यंत..
.. तर या सगळ्या रोज भेटत होत्या. बोरिवलीतील गोखले शाळेच्या प्रवेशद्वारापाशी. अर्थातच आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालक म्हणून आधी जुजबी हाय-हॅलो, मग थोडी चौकशी-ओळख असे टप्पे ओलांडत गाडी जेव्हा मुलांच्या वाढीच्या प्रश्नावर आली, तेव्हा जाणवले प्रत्येक आईला आपल्या अपत्याला शालेय शिक्षणापलीकडे असे काही संचित द्यायचे होते. स्वत:च्या देश-संस्कृतीची सजग जाण, त्यातील सुंदरतेबद्दल अभिमान आणि वाईट ते निपटून काढण्याची ऊर्मी, वैयक्तिक उत्कर्षांबरोबर समाजाच्या प्रश्नांमध्ये उतरण्याची तयारी आणि त्यांच्या डोळ्यांसमोर मॉडेल होते ते पुण्यातील ‘ज्ञान प्रबोधिनी’ या संस्थेचे. मुलांसाठी विविध प्रकारची व्यक्तिमत्त्व विकसित करणारी शिबिरे पुण्यात होतात हे त्यांना ‘छात्र प्रबोधन’ या अंकातून सतत वाचायला मिळत होते. त्यासाठी वारंवार मुलांना पुण्याला पाठवण्यापेक्षा आपल्याच गावात शिबिरांना आमंत्रित, आयोजित करू या इच्छेने त्या एकत्र आल्या. अंजली नलावडे, अंजली जोशी, स्मिता साठे, अर्चना साठे, शीतल चितळे, विजू भोळे या सगळ्या पालक मैत्रिणी एकत्र आल्या आणि मग त्यांनी हेही ठरवले, हा प्रयत्न केवळ आपल्या मुलांपुरता करण्याइतकी दृष्टी सीमित ठेवायची नाही. आपल्या दहा मुलांबरोबर आणखी दहा जणांना यात सामील करून घ्यायचे! समाजाचा विचार करणारी मुले घडवताना समाजाला विसरून कसे चालेल?
‘छात्र प्रबोधन’चे संपादक महेंद्र सेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली १९९७ साली बोरिवलीमध्ये छात्र प्रबोधन व्यक्तिमत्त्व विकसन तासिका सुरू झाल्या. मुलांनी ‘छात्र प्रबोधनचे क्लास’ असे त्याचे सुटसुटीत नामकरण करून टाकल्यावर पालकांना एकदम जाग आली आणि मग जाणीवपूर्वक या उपक्रमाचे नाव ठेवले ‘विकासिका’. रोजच्या ‘क्लास’मध्ये आणखी एका ‘क्लासची’ भर या दृष्टीने मुलांनी इथे येऊ नये हा हेतू त्यामागे होता. आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी किंबहुना एक विवेकी सुदृढ नागरिक म्हणून जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याची या विकासिकेत चर्चा होणार होती. संघभावनेने सर्वाबरोबर काम करता येणे, एखाद्या प्रकल्पाचे, कामाचे चोख नियोजन करणे, जबाबदारी स्वीकारून ती पार पाडण्याची मानसिकता, निरीक्षण याबरोबर उत्तम शरीरसंपदा, आरोग्य कमावणे अशी कितीतरी उद्दिष्टे समोर होती आणि त्याच्या पूर्तीसाठी आखलेले होते अनेक उपक्रम.
प्रारंभ झाला तो दर शनिवारी दोन तास आयोजित होणाऱ्या ‘साप्ताहिक विकासिका’ उपक्रमापासून. प्रार्थनेने त्यास प्रारंभ होत असे आणि मग एकत्रित वाचन, लेखनाचे धडे, विविध व्यक्तींच्या मुलाखती घेत सत्राचा शेवट होत असे तो विविध खेळ खेळून. शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी होणाऱ्या या प्रयत्नांना आलेले पहिले फळ म्हणजे मुलांची वाढणारी संख्या आणि या उपक्रमाबद्दल वाढणारी उत्सुकता. केवळ सहा-सात पालकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाभोवती पालक-विद्यार्थ्यांचे उत्सुक कोंडाळे जमू लागले. वाढू लागले. वाहिन्या-माध्यमांच्या आक्रमणाला आणि त्यातून चहूबाजूने दारावर धडका मारणाऱ्या व्यक्तिकेंद्रित, उपभोगी संस्कृतीला थोपवण्यासाठी पालकांना मदतीचा हात हवाच होता. असा आश्वासक हात या विकासिकेच्या निमित्ताने पुढे आल्यावर पालकांनी मोठय़ा विश्वासाने तो धरला. या उत्स्फूर्त आणि उत्साही प्रतिसादामुळे दोनच वर्षांत या गटाने सुट्टीतील शिबिरांचा उपक्रम हाती घेतला.
हिवाळ्याच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत होणारी तीन ते पाच दिवसांची ही शिबिरे विविध वयोगटाच्या शारीरिक-मानसिक गरजा लक्षात घेऊन आखलेली असतात. पौंगडावस्थेतील मुलींमधील शारीरिक-मानसिक बदल त्यांच्या आयुष्यात अनेकदा वादळ घेऊन येतो. या वादळात तारू भरकटू नये म्हणून ‘उमलत्या कळ्या’ शिबिरातून अनेक नाजूक प्रश्न-मुद्दे हाताळले जातात. तर याच वयोगटाच्या मुलांमधील वाढता जोम, आतून धडक देणारी पराक्रमाची ऊर्मी लक्षात घेऊन ‘आम्ही रवी उद्याचे’ या शिबिराद्वारे या ऊर्मीला योग्य वळणावर नेले जाते. मग याखेरीज वर्षां सहल, रात्रीचे मुक्कामी शिबीर असे उपक्रमही होतात. याबरोबरीने होणारा एक लक्षवेधी उपक्रम म्हणजे मुंजीचे आधुनिक रूप म्हणता येईल असे विद्याव्रत शिबीर. पौगंडावस्थेत असलेल्या मुलांपुढे ‘रोल मॉडेल्स’ कोण आहेत ते जाणून तसे मोठेपण अंगी येण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर काय पूर्वतयारी करायला हवी याचा विचार या शिबिरांतून मुलांपर्यंत दमदारपणे पोहोचवला जातो.
हे सगळे प्रयत्न होतात ते फक्त उत्साही आणि क्रियाशील पालकांच्या सहभागामुळेच. गेल्या पंधरा वर्षांत बोरिवलीच्या या ज्ञान प्रबोधिनी विस्तार केंद्राने तब्बल बारा विद्याव्रत शिबिरे घेतली आणि त्यात केवळ मुंबईतील नाही तर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले. अशा सगळ्या उपक्रमांच्या मागे नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत काम करणारे हात असतात ते पालकांचे, पण स्वयंस्फूर्तीने आणि स्वत:च्या खिशाला कात्री लावून काम करताना वाटय़ाला येणारे सगळेच अनुभव फार सुखाचे नसतात. वैफल्याचे असे काटे टोचून कोणी नाउमेद होऊ नये म्हणून अशा पालक स्त्री-पुरुषांसाठीही प्रशिक्षण शिबिरांसारखे कार्यक्रम आवर्जून आयोजित केले जाते. ‘स्वयम् विकासातून समाज परिवर्तनाकडे’ या उद्दिष्टाने पस्तिशीच्या पुढील वयोगटाच्या स्त्रिया महिन्यातून एकदा भेटतात तेव्हा समाजाच्या चिंतेबरोबर वैयक्तिक सुखदु:खाच्या खिडक्या हलकेच उघडतात आणि शंकांची जळमटे मनावरून उतरून मन शांत होते.
अनौपचारिकरीत्या काम करणाऱ्या या गटाची कार्यपद्धती मात्र आखीवरेखीव आहे. आपल्यावरील जबाबदाऱ्यांची सुस्पष्ट जाणीव या व्यवस्थेतील प्रत्येकाला आहे. उत्साहाच्या भरात कामात आल्यावर जेव्हा उत्साहाचा पहिला बहर ओसरतो, तेव्हा मनात अनेक भ्रमाचे भुंगे शिरतात. परस्पर स्पर्धा, इतरांना डावलणे, इतरांविषयी अविश्वास या अडथळ्याच्या शर्यतीत काम मार खाते. ते टाळण्यासाठी या चौकटी प्रत्येकाने स्वत:साठी व कामासाठी नक्की केल्या आहेत. आज, काम सुरू झाल्यावर सोळा वर्षांनंतर ४०-५० स्त्रिया, तेवढेच पुरुष अशी एक घट्ट साखळी गुंफली गेली आहे आणि या साखळीची शेवटची कडी आहे ती अर्थातच नव्या पिढीची. गेल्या सोळा वर्षांत या संस्कारात वाढणाऱ्या-वाढलेल्या मुलांनी आता आपला तरुण हात वडीलधाऱ्यांच्या हातात ठेवला आहे. त्यामुळे पुढील वाटचालीचे आश्वासन आणि बळ सगळ्यांना मिळाले आहे.
आपापल्या मुलाचा आणि त्याच्या कल्याणाचा विचार प्रत्येकच पालक करतात, पण आपल्या घराचा उंबरठा ओलांडून आसपासच्या जगातील व्यवस्थे-अव्यवस्थेकडे बघणे हे आता इतिहासजमा होत वेडे साहस ठरू लागले आहे. या अव्यवस्थेला सावरणारे हात समाजातूनच पुढे आले पाहिजेत असे वाटणाऱ्या या स्त्रियांनी उभे केलेले हे काम. चार स्त्रिया भेटल्यावर गॉसिपपलीकडे काय घडू शकते हे चोखपणे सांगणारे..
संपर्क- पद्मा कासार्ले : ज्ञान प्रबोधिनी विस्तार केंद्र, बोरिवली- ९८६७३८३०३८
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा