कर्करोगासारख्या आजारातून बरे झाल्यावरही पुनर्वसनाच्या वाटेवर स्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या वेळी केवळ डॉक्टरांचे उपचार, सल्ले पुरेसे नाहीत हे डॉक्टर असणाऱ्या ‘त्या’ दोघींना जाणवत गेले आणि आकाराला येत गेला एक आधारगट, ‘ब्रेस्ट फ्रेंड’. हा गट स्तनाच्या कर्करोगाचा सामना करणाऱ्या स्त्रियांसाठी प्राधान्याने काम करतो आहे. एकमेकींच्या हातात हात गुंफत या जाळ्याची सुरुवात केली ती डॉ. शोना नाग आणि डॉ. अनुपमा माने या दोघींनी. त्याविषयी ४ फेब्रुवारीच्या कर्करोग दिनाच्या निमित्ताने.
वे दनेच्या कल्लोळातून आयुष्याचा प्रवास सुरू असताना एखादा आश्वासक हात हातात असणे फार गरजेचे असते. त्यातही ती वेदना कर्करोगासारख्या आजाराची असेल तर नक्कीच. शरीरावर तीव्र औषधांचा मारा सुरू असतो, त्याच्या दुष्परिणामाच्या नकोशा खुणा शरीरभर उमटलेल्या असतात आणि मृत्यूच्या शंकेने मनही पार हलून- खचून गेलेले असते. या सगळ्या घुसमटीतून रुग्णाला बाहेर काढून जगण्याची उमेद देण्यासाठी काहीतरी वेगळा प्रयोग करून बघू या ऊर्मीतून जन्म झाला ‘ब्रेस्ट फ्रेंड’चा.
 ही संकल्पना दोन डॉक्टर स्त्रियांची. कारण त्या दोघीजणी कर्करोगावर उपचार करणाऱ्या. स्तनांच्या कर्करोगावर उपचार घेणाऱ्या आणि उपचारानंतरही पुनर्वसनाच्या वाटेवर अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या स्त्रियांना केवळ डॉक्टरांचा आधार पुरेसा नाही हे जाणवत गेले आणि आकाराला येत गेला एक आधार गट. या आधार गटात डॉक्टर आहेत. सायकॉलॉजिस्ट आहेत आणि अर्थातच बरे झालेले रुग्णही. एकमेकींच्या हातात हात गुंफत विणल्या जात असलेल्या या जाळ्याची सुरुवात केली ती डॉ. शोना नाग आणि डॉ. अनुपमा माने या दोघींनी. स्तनाच्या कर्करोगाचा सामना करणाऱ्या स्त्रियांसाठी प्राधान्याने पुण्यात ‘ब्रेस्ट फ्रेंड’ हा आधारगट काम करतो आहे.
इतर अनेक गंभीर आजार आणि कर्करोग याच्यामध्ये फरक आहे तो उपचाराच्या कालावधीचा आणि त्यानंतर जाणवणाऱ्या काही अपेक्षित आणि काही अनपेक्षित दुष्परिणामांचा. स्तनाच्या कर्करोगानंतर शरीराच्या ज्या बाजूवर उपचार केले जातात त्या बाजूच्या  हातासाठी सतत व्यायाम घेत राहणे हा आयुष्यभर दैनंदिन जीवनाचा एक अपरिहार्य भाग होऊन बसतो. शिवाय एकदा डंख मारून गेलेला हा आजार पुन्हा कधीही आणि शरीरात कोठेही उद्भवण्याची शक्यता अधिक. त्यामुळे जीवनशैलीत काही बदलही आवश्यक. शिवाय एकदा कर्करोगाचा यातनामय प्रवास केल्यानंतर धास्तावलेले मन सतत भीतीच्या छायेत जगू नये म्हणूनही कितीतरी प्रयत्न करावे लागतात. एकएकटीने हा प्रवास करण्यापेक्षा अशा स्त्रियांना एकत्र आणले तर त्याच परस्परांचा आधार, एकमेकींची प्रेरणा बनतील हा विचार डॉ. नाग आणि डॉ. माने यांनी केला. सुरुवातीचे एक पाऊल या दोघींनी टाकले, आज त्यांच्याबरोबर डॉ. रिबेका या सायकोथेरपिस्ट आणि डॉ. रमा शिवरामन ही एकेकाळची ब्रेस्ट कॅन्सर रुग्ण आणि आता त्याच आजारासाठी जगभर अ‍ॅडव्होकसीचे काम करणारी विलक्षण धडाडीची स्त्री काम करते आहे. सह्य़ाद्री हॉस्पिटलच्या सहकार्याने आणि त्यांच्याच परिसरात हा गट भेटतो. काम करतो. ‘ब्रेस्ट फ्रेंड’ची सुरुवात झाली ती २०१० साली आणि पहिला उपक्रम म्हणून या गटाने एका वेगळ्या कॅलेंडरचा प्रयोग केला. या कॅलेंडरवरील सर्व ‘मॉडेल्स’ होत्या कर्करोगाला परतवण्यात यशस्वी ठरलेल्या स्त्रिया. कारण त्याच देऊ शकत होत्या ‘आशेचा संदेश’. या प्रत्येक स्त्रीने दिलेला आशेचा संदेश या कॅलेंडरच्या पानावर छापलेला होता. या कॅलेंडरचे खूप मोठय़ा प्रमाणात वितरण / विक्री करण्यात आली. कारण त्यातून जनजागृतीचे काम घडावे अशीच या दोघींची इच्छा होती. वेळोवेळी तपासणी आणि रोजच्या जगण्याला योग्य आहार- विहाराची जोड दिली तर कर्करोगाला रोखता येते हा संदेश देणाऱ्या या कॅलेंडरमुळे या गटाला चांगलाच वेग आणि आकार येत गेला. कारण आज हा गट चालवण्याची जबाबदारी या आजारातून बऱ्या झालेल्या स्त्रियांनी घेतली आहे. गटातर्फे कोणते उपक्रम राबवण्याची गरज आहे याची आखणी त्याच करतात. कारण आपल्या गरजा त्यांना नेमक्या ठाऊक असतात. त्यामुळे एखाद्या महिन्याला सायकीअ‍ॅट्रिस्टला आमंत्रित करून भविष्याच्या भीतीचा सामना कसा करायचा याची चर्चा होते तर कधी कमी उष्मांक असलेल्या रेसिपीजचे शिक्षण या बैठकीत दिले जाते. स्तनांवरील उपचारानंतर हाताला येणारी सूज, ती टाळण्यासाठी ऋतुमानानुसार घ्यावयाची काळजी आणि व्यायाम हा तर या स्त्रियांसाठी सर्वात जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न. त्यामुळे आधार गटाच्या या बैठकीत त्याविषयी सतत चर्चा होत असते. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सह्य़ाद्री हॉस्पिटलच्या मानसशास्त्र विभागात हा गट भेटतो आणि कमीतकमी ३० स्त्रिया या बैठकीला हजर असतात.
२०११ साली ‘ब्रेस्ट फ्रेंड’ने केलेला उपक्रम फार कल्पक आणि वैशिष्टय़पूर्ण होता. या आजारातील उपचारामध्ये जवळजवळ सर्वच स्त्रियांना आपल्या डोक्यावरील केसांचा निरोप घ्यावा लागतो. एकेकाळी तिच्या सौंदर्याचे आणि म्हणून तऱ्हेतऱ्हेने त्याला सजवण्याचे मानचिन्ह असलेल्या केसांचे पुंजके जेव्हा उशीवर गळून पडलले दिसतात, हातात येतात तेव्हा बसणारा मानसिक धक्का जीवघेणा असतो. कित्येक स्त्रियांना एखादा स्तन गमवावा लागतो आणि उपचारादरम्यान स्नायूंचे सौष्ठव जाते. त्वचा निस्तेज होते. बाह्य़रूपाला येत चाललेली ही अवकळा तिला मनाने अधिकाधिक दुबळी, निराश करीत असते. अशा वेळी मनात असते एक अनाम भीती, कुटुंबाकडून, विशेषत: नवऱ्याकडून अव्हेरले जाण्याची. त्यावर मात करण्याचा जणू मंत्र म्हणून ‘ब्रेस्ट फ्रेंड’ने आपल्या सर्व मैत्रिणींसाठी झक्कपैकी एक ‘मेकअप कार्यशाळा’ आयोजित केली. एकदा आजार मागे सरले, उपचार संपले की पुन्हा तशाच थाटात, डौलदारपणे कसे जगायचे हे सुचवणाऱ्या या कार्यशाळेत मैत्रिणींनी खूप धमाल केली आणि पावडर लिपस्टिकच्या रंगापेक्षा मनातील तजेला, उत्साहाचे रंग कसे राखायचे, सांभाळायचे हे जाणून घेतले.
कर्करोग रुग्णांच्या बाबतीत एक संशोधन सध्या चर्चेमध्ये आहे आणि ते आहे केमोथेरपीच्या मेंदूवर होणाऱ्या काही दुष्परिणामांचे. ‘केमो ब्रेन’ किंवा ‘किमो फॉग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दुष्परिणामांमुळे कर्करोगाच्या रुग्णांना एखाद्या गोष्टीवर लक्ष एकाग्र करणे, एका वेळी अनेक कामे करता येणे (मल्टिटास्किंग), खोलवर विचार करणे हे अवघड जाते, असे या रुग्णांनी परस्परांशी केलेल्या शेअरिंगमधून पुढे आले आहे. अर्थात हा दुष्परिणाम खरेच औषधांचा की कर्करोगाच्या निदानामुळे बसलेल्या मानसिक धक्क्य़ाचा या सीमारेषा पुरेशा स्पष्ट झालेल्या नाहीत, पण म्हणूनच ‘ब्रेस्ट फ्रेंड’ने आपला भर या स्त्रियांना सतत मानसिक बळ मिळत राहावे आणि जगताना रोज जाणवणाऱ्या छोटय़ा छोटय़ा प्रश्नांवर सतत चर्चा होत राहावी यावर अधिक ठेवला आहे. स्तनाच्या कर्करोगामधून पूर्णपणे बरी झालेली स्त्री ही उपचारामध्ये असणाऱ्या दुसऱ्या स्त्रीला मदतीचा आणि माहितीचा एक दमदार स्रोत असते. तिने काय खावे, किती वेळा खावे, व्यायाम कोणता करावा, दैनंदिन जगण्यातील तणाव कसा करावा अशा छोटय़ा- छोटय़ा गोष्टी / तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा या मैत्रिणीवर विसंबून राहणे तिला अधिक सोपे, जवळचे वाटते. परस्पर संवादाची ही अशी साखळी आता ‘ब्रेस्ट फ्रेंड’ने गुंफली आहे.
२०१२ साली पुण्यात आयोजित ‘सव्‍‌र्हायव्हर्स कॉन्फरन्स’चे जोरदार यश, त्याला मिळालेला प्रतिसाद बघून आता यंदा या गटाने कॅन्सर रुग्णाचे सव्‍‌र्हेक्षण करण्याची योजना आखली आहे. स्तनकॅन्सरचे रुग्ण आणि त्यांचे पुनर्वसन यावर जे काही साहित्य उपलब्ध आहे ते सगळे पाश्चिमात्य अनुभवांवर आधारित आहे. पण भारतीय कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्था ही त्यापेक्षा खूप वेगळी आहे. अधिक सशक्त पण तेवढीच गुंतागुंतीची आहे. तिच्या पाश्र्वभूमीवर या स्त्रियांच्या पुनर्वसनादरम्यान येणारे प्रश्न जाणणे गरजेचे आहे आणि त्याची तयारी आता ‘ब्रेस्ट फ्रेंड’ करते आहे.
या कामाचा नेमका कोणता परिणाम झाल्याचे जाणवते आहे? डॉ. अनुपमा माने आणि डॉ. नाग दोघीही म्हणतात, की नव्याने उपचारांसाठी येणारी स्त्री आता अधिक सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण झालेली आहे. किमान शहरी मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये तर हा फरक जाणवण्याइतका लक्षणीय आहे. उपचारांसाठी येतानाच त्या आधार गटाची चौकशी करतात आणि स्वत:ला त्या प्रवाहाशी जोडून घेतात. उपचारादरम्यान येणाऱ्या शारीरिक- मानसिक वेदनांबाबत मन मोकळे करण्यासाठी त्यांना अशा मैत्रिणी इथे मिळतात, ज्या स्वत: याच अनुभवातून गेल्या आहेत. या गटाविषयी लिहिताना आवर्जून उल्लेख व्हायलाच हवा तो डॉ. रमा शिवराम या स्त्रीचा. स्वत: काही वर्षांपूर्वी रुग्ण असलेल्या डॉ. रमा सध्या भारताच्या पहिल्या ‘कॅन्सर  ग्लोबल अ‍ॅडव्होकेट’ म्हणून काम करीत असून उपचाराच्या बाबतीत जागतिक पातळीवर धोरणात्मक एकवाक्यता यावी यासाठी जनजागृतीचे काम करत आहेत. विशेषत: या उपचारांसाठी येणारा खर्च लक्षात घेता त्या सेवेत समानता, गरीब- श्रीमंत असा भेद त्यात केला जाऊ नये यासाठी हे प्रयत्न आहेत.
कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्यादृष्टीने योग्य ती पावले लवकर उचलायला हवीत, असे केवळ डॉ. शोना नागच नाही तर या क्षेत्रातील सर्वच तज्ज्ञ म्हणत आहेत. परदेशात अशा रुग्णांचे आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांचे (care givers) मोठाले मेळावे भरतात. किंबहुना एक सशक्त लॉबी म्हणून हे गट धोरणात्मक बाबींविषयी शासनाशी वाटाघाटी करू शकतात. त्या दिशेने जाण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल म्हणून ‘ब्रेस्ट फ्रेंड’सारख्या गटांचा उल्लेख करावा लागेल. डॉक्टर असलेल्या स्त्रियांनी स्त्री रुग्णांसाठी घेतलेला पुढाकार म्हणून ‘ब्रेस्ट फ्रेंड’विषयी लिहिले ते ४ फेब्रुवारीला येणाऱ्या जागतिक कॅन्सरदिनाच्या औचित्याने. त्यामुळे दोन आणखी गटांचा उल्लेख करायलाच हवा. एक पुण्यातच, डॉ. शेखर कुलकर्णी, अनिल अवचट, मुग्धा यार्दी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘आस्था’ आधार गटाचा. स्तानाचा कर्करोग होऊन गेलेल्या स्त्रियांचा हा आधार गटही अनेक उपक्रम राबवतो आहे आणि दुसरा गट मुंबईतील देविका भोजवानी या एकेकाळी रुग्ण असलेल्या सेलिब्रिटी महिलेने टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘वुमन्स कॅन्सर’ इनिशिएटिव्हचा.
एकाच बोटीतून प्रवास करणारे परस्परांसाठी किती किती तऱ्हेने आधार देऊ शकतात, वादळातून सुखरूप बाहेर काढू शकतात, हेच यातून दिसते.

national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget
Makar Sankranti Gift Idea: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी ‘वाण’ काय द्यायचं? पाहा ‘या’ भन्नाट आयडिया; खर्च कमी आणि वस्तूही उपयोगी
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
Does the government want to resolve the Pathi dispute or not
सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाही?
homeopathic doctors allows to prescribe allopathic medicines
सरकारला पॅथींचा वाद सोडवायचा आहे की नाहीच?
Gadchiroli, Surrender women Naxalites, Naxalites,
गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तब्बल ५३ गुन्ह्यांची…
Sunayana won gold medal in womens bodybuilding competition
खेडेगावातून थेट जागतिक भरारी, महिला काँस्टेबलची वृत्ती करारी
Story img Loader