मला आजही आठवतो तो क्षण.. माझ्यात काही निर्माण करण्याची क्षमता आहे, हा स्वत:वरचा अमोघ विश्वास त्या क्षणाने माझ्यात जागवलाच पण आपल्या व्यक्त होण्यातून आत्मविष्कारातून आपण चार आनंदाच्या क्षणांना इतरांसाठी जन्माला घालू शकतो याची अद्भुत जाणीवही मला करून दिली. स्वत: मधल्या सर्जनशीलतेची ही जाणीव! या क्षणाला मी साक्षात्कारी क्षणच म्हणेन, अर्थात या साक्षात्कारी क्षणाला वेदनेची एक हळवी, करुण नि विषण्ण किनार होती. पण तो क्षण मला फार अपूर्व वाटतो आजही. इतका अपूर्व, की अळवाच्या पानावरचा टपोरा, थिरकता दविबदूचा चकाकता अप्राप्य मोती, हाताच्या तळव्यावर कुणीतरी ठेवावा!
आई-वडिलांना दोन मुलांवर झालेली मी.. एकुलती नि शेंडेफळ म्हणून लाडाकौतुकाच्या समोर पसरलेल्या ढगांतून एखाद्या परीसारखी मुक्तपणे आनंदात बागडणारी.. वडिलांचं नावाजतं लेखकपणाचं वलय, जणू स्वत: भोवतीच्या वलयासारखं मिरवत बहरणारी. सतारवादिका होण्याचं माझ्या डोळ्यांत वडिलांनी पेरलेलं एक स्वप्न..सतारीच्या मंद्र सप्तकापर्यंत हाताची बोटं न पोहोचणाऱ्या माझ्या लहानग्या वयात खेळण्यातल्यासारख्या चिमुकल्या सतारीवर सुरांशी नातं जोडण्याची धडपड करणारी. आणि त्याच वेळी तो क्षण सामोरा आला माझ्या भावाच्या अकल्पित मृत्यूचा. आम्हा कुटुंबीयांच्या सुखी-समाधानी आयुष्याचा शांत जलाशय डचमळून टाकणारा. घरातील प्रत्येकाच्या शोकाचं तयार झालेलं एकेक स्वतंत्र एकाकी बेट..जेमतेम महिना उलटला असेल-नसेल..पुत्रवियोगाच्या दु:खाने व्यक्तित्वाची लक्तरं करून टाकलेल्या आई-वडिलांसमोर मी सतार घेऊन बसले. नुकताच शिकलेला ‘मुलतानी’.. ती वेळ मुलतानीची नव्हती. तरीही वाजवू लागले मुलतानीच..संध्याकाळच्या कातरवेळेसारखा काळ कळकलेला.. त्याला लख्ख प्रकाशाची वाटच दिसत नव्हती.. आणि तरीही वाजवावा वाटला तो संध्याकाळच्या हळव्या रंगाचा मुलतानीच.. आलाप.. मग जोड.. विलंबित गत.. पलटे.. शिकवलेल्या मुलतानीतून बाहेर पडून माझी बोटं मला दिसत असणाऱ्या कुठल्याशा पण माझ्या मुलतानीत शिरलेली.. स्वरांचे शब्दच होत होते जसे. होरपळलेल्या माझ्या आई-वडिलांचं सांत्वन करत इतके दिवस अडकलेला आमच्यातला संवाद चालू करणारे.. आमच्या दु:खावर फुंकर घालत त्याचा भार अदृश्यपणे वाहून नेणारे.. बधिर संवेदनांना स्पर्श करत चतन्य जागवणारे.. मी नव्हतेच जसं काही वाजवत, मुलतानीचे स्वरच माझ्यामार्फत स्वयंभू प्रकटत असावेत. आई-वडिलांची सुरुवातीची डबडबत्या अश्रूंची नजर निवळून त्यात नितळ-निर्भर आनंद भरत गेलेला. स्वत:ला विसरायला भाग पाडलेला. त्या माझ्या स्वरांनी असे काही क्षण उभे केले होते आमच्यासाठी की आम्ही सारे पूर्वीसारखेच, पूर्वीइतकेच प्रसन्न होऊन गेलो होतो. वेदनेतही सुख असू शकतं-परमानंद देणारं.. असा विचित्र पण विलक्षण अनुभूती देणारा तो क्षण होता. ज्या कलेचा स्पर्श मला माझ्या आई-वडिलांनीच करून दिला होता. – त्याच कलेने उभा केलेला हा क्षण.
आज इतक्या वर्षांनी वाटतं, त्या दु:खच दु:ख पसरून राहिलेल्या अनघड काळात माझ्याकडून झालेल्या मुलतानीच्या निर्मितीतून मी माझ्या आई-वडिलांच्या समीप जाऊ शकले. त्यांचं खरं सांत्वन स्वरांतून शब्दांशिवाय करू शकले, निर्भर आनंदाच्या क्षणांची त्यांच्यावर पखरण करून. त्याची जाणीव तेव्हा झालीही
पुढे मला शाश्वत सुरांच्या चिरंतन सहवासातून कदाचित शब्द सापडले असतील. साहित्य, समाजशास्त्र घेऊन एम.ए., एम.फिल. केल्यावर वाटू लागलं, की सतारवादनाची ही कला आत्मानंदासाठी ठेवावी. करियर म्हणून निवडावं ते प्राध्यापकाचं क्षेत्र..पण ते घडलं नाही. दरम्यान, श्री. पु. भागवतांच्या हाताखाली ‘मौज’च्या संपादनाचे धडे गिरवता गिरवता अनेक लेखकांचं बरं-वाईट साहित्य वाचताना, त्याला भिडताना मनात काहीतरी सुरू होत गेलं आपसूक..नकळत..ते सुरू होणं म्हणजे एक प्रकारे निर्मितीचा खेळ मनात मांडला जात होता. गुंतागुंतीचा, कोडय़ात टाकणारा खेळ. मी अनुभवलेलं पण मला त्यातून काहीतरी जाणवलेलं. – ते अर्थातच मला तसंच्या तसं उतरवता येत नव्हतं आणि तसं उतरवायचं नाही, हेही मला कळत होतं. मला ‘दिसलेलं’ मांडता येत असलं तरी मला त्या दिसण्यात जे पाहता आलं होतं ते शब्दांत पकडून साकार करायचं होतं..त्या पाहण्यातून मला खुणावणारी आयुष्याची, माणसांची, माणसांमधल्या व्यक्त-अव्यक्त नात्यांची, माणसांच्या जाणिवांची अगम्य चित्रं उभी करण्याच्या एका अस्वस्थतेने मनाला व्यापून टाकलं होतं. ही अस्वस्थता मला कुणाहीबरोबर वाटून घेता येत नव्हती आणि त्या वेळचं माझं ते एकटं असणं, होणं मला फार हवंहवंसंही वाटत होतं आणि यातूनच एक दिवस स्वत:शी झगडत, जाणिवांना अजमावत, चाचपडत आकारत गेलेली माझी कथा कागदावर उतरली.
नुकतंच लग्न झालेलं, माझ्यातल्या मुलीचा एक स्त्री म्हणून सुरू झालेला प्रवास.. पुण्यासारखं सदाशिवपेठी उबदार शहर सुटून मुंबईसारख्या परक्या नि विलक्षण बेभान शहरात रुजू पाहणारी मी.. एक विचित्र एकाकीपण भोवती.. आपली नक्की ओळख कोणती? हे शोधू पाहणारी.. गोंधळलेली.. गांगरलेली मी.. आणि त्याच मीकडून एक कथा लिहिली गेली..मी निर्माण केलेलं, माझ्या दृष्टीतून मांडलेलं एक जग होतं त्या माझ्या कथेत. त्यात उभी केलेली पात्रं माझी होती. मी रेखलेली- मी त्यांना स्वभाव दिले होते, रंग-रूप, संवेदना दिल्या होत्या. मी त्यांना मला जाणवलेलं एक तुकडय़ातलं आयुष्य जगायला लावलं होतं आणि तरीही मी त्यात असूनही त्यातून वजा होऊन त्रयस्थपणे त्या प्रवासातून अलगही होऊन गेले होते. तो सगळा मी निर्मितीचा, माझ्या आकलनाचा, माझ्याशिवायचा नि माझ्यासकटचा प्रवास अनुभवताना फार विलक्षण वाटलं होतं. पुन्हा एकदा स्वत:वरच्या विश्वासाची जी ठाम जाणीव मला त्यातून मिळत गेली होती ती इतक्या उत्कटपणे, की ही निर्मिती मला माझ्या आत्मसन्मानाची फार मोठी खूणच वाटली.. निर्मितीतले हे आत्मसाक्षात्कारी क्षण आणि खुद्द मी स्वत:च कथेबरोबरीने नव्याने माझीही निर्मिती करत होते.. मग मी लिहीतच गेले, एकेक कथा.. स्वत:शी प्रामाणिक राहत.. जाणवत गेलं, कथालेखन हेच आपल्या असण्याला नेमका अर्थ देणारं सर्वकाही आहे. आपल्याला समृद्ध करणारं, निरपेक्ष आनंद देणारं.. आत्मसन्मान जागवणारं आणि स्वत:चाही अलिप्तपणे विचार करायला लावणारं. या सगळ्यात सर्जनाचा आनंद तर अवर्णनीय असतो. चिमटीत पकडू शकता न येणारा नि मनातही मावू न शकणारा कोटीतला निल्रेप आनंद. एका अर्थाने लेखनाशी बांधीलकी मानत निष्ठेने लिहिणे ही तादात्मता अनुभवताना आध्यात्मिक अर्थाने सर्जनाचा अर्थ समाधी हाच होऊन जातो मग. स्वत:पासून दूर जात शब्दांशी झगडत प्रामाणिकपणे त्याला उतरवण्याची ही तादात्मता असते. त्या तादात्मतेचे सूर लागले की ती सर्जनाची प्रक्रिया, त्यातले टप्पे, त्यातला निर्मळ आनंद स्वत:पुरता न राहता इतरांपर्यंत- म्हणजे थोडक्यात वाचकांपर्यंत पोहोचत जातो. तुमच्या कलाकृतीशी लेखक म्हणून तुम्ही जितके आतडय़ाने गुंतले असता तितकेच वाचकही गुंतत जातात. तुमच्या कथेत वाचक स्वत:ला पाहू-शोधू लागतो. आपल्या पात्रांच्या संवेदना त्याला आंतरिकतेने जाणवू लागतात. ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणेच मग एका ज्योतीने दुसरी ज्योत उजळत जावी तसा हा निर्मितीच्या आनंदाचा प्रकाश सुगंधासारखा पसरत जातो.
तशी प्रत्येक कथा लिहिताना, त्याचं बीज मनात पडल्यापासून ते रुजण्यापर्यंत नि रुजून अंकुरण्यापर्यंतचा प्रवास.. एका अर्थाने तगमगीचा असतो. दमछाक करणारा, नि स्वत:ची सोबतही अपुरी ठरवणारा. कथेच्या या जन्मवेणा म्हणजे स्वत:चं पुन:पुन्हा घडणं, मोडणं, उभं राहणं असतं. कल्पनेतली माणसं जिवंत करायची, त्यांच्या भावना-वेदना, व्यथा, सुखांना मूर्त रूप द्यायचं, म्हणजे परकायाप्रवेशच करायचा. स्वत:ला परजत ठेवायचं..
माझ्या सगळ्या कथांनी मला माझं असणं विसरायला लावलं आहे, पण ‘आधार’सारखी माझी ‘भूप’ कथासंग्रहातली कथा जिने माझ्यातली मी सोलून काढली. दोन पुरुषांमधल्या शारीरिक नात्याचा, त्यातल्या चित्रकाराच्या चित्रांमागच्या प्रेरणास्रोताशी असणारा संबंध पेलताना दोन पुरुषांच्या शरीर-संवेदनांमागचा, वासना-विकारांमागचा माणसाचा एकटेपणा, त्यातलं कारुण्य पकडताना अश्लीलता, बीभत्सता येऊ न देण्याची माझी धडपड होती. दोन पुरुषांतले ऑफबीट नातं लेखिका या नात्याने स्वत:तल्या स्त्रीला ओलांडत मी शेवटाकडे येत होते..समोर कथेतल्या मतिमंद देवेनचं मरण अटळ वाटत होतं. पण ती कारागिरी वाटता कामा नये- माझा प्रयत्न होता देवेनचं हळूहळू जवळ येत चाललेलं मरण आणि आपल्या आयुष्याचाच नव्हे तर चित्रांचा आधार हरवत चालल्याची त्याच्या चित्रकार मामाला मिळत जाणारी हतबल जाणीव.. कशीही पकडताच येत नव्हती. केवळ अस्वस्थता.. पुन:पुन्हा लिहिणं नि ते खोडत जाणं. बाहेर पावसाळी वातावरण आणि मग असहय़ झालेल्या उकाडय़ाला भेदून धो धो सुरू झालेला पाऊस.. फ्रेंच खिडकीजवळच माझं टेबल.. खिडकीतून आत येणारे तुषार.. काळ्या ग्रेनाइटच्या कट्टय़ावर तडा तडा आपटत फुटणारे. शब्दांवर मारलेले फराटय़ांचे कागद समोर.. हातात पेन.. मनात फक्त कथेचा शेवट – अडकलेला. अमूर्त आकार फक्त जाणवणारे.. पण नाही काही दिसत..समोर पाऊस- आणि मग तो बाहेरचा पाऊस अचानक माझ्या कथेत उतरल्यासारखा झाला.. शेवट माझ्यासमोर घेऊन.. कथेतही असाच पाऊस लागला आहे. पाण्याने वाहणारे रस्ते. चाळीतली देवेनची कोंदट अंधारलेली खोली.. त्यात हळूहळू निपचित होत चाललेला तापाने फणफणलेला देवेन.. इतके दिवस त्याच्या जबाबदारीचं ओझं वाटत असतानाच त्याच्या नग्न शरीरातून चित्रांना आव्हान, प्रेरणा मिळत गेलेल्या त्याच्या मामाच्या सर्जनशीलतेचा असा स्तब्ध होत चाललेला आधार.. धुमसून कोसळत्या पावसात देवेन हे जग सोडून जात होता- त्याच्या मामाला एकटं करून..मामाचं एकटेपण नि माझंही माझ्या खोलीतलं तसंच एकटं होऊन लिहिणं..कथा पूर्णत्वाला जात होती. थांबले तेव्हा जाणीव झाली, पावसाचा अंधार आता रात्रीच्या अंधारात मिसळलाय. मीही अंधारातच आहे लिहीत..अक्षरं धूसर दिसतायेत..आणि कथा पूर्ण झालीये..तरीही मला थांबावं वाटत नाहीए – अन् मला थांबायचंही नाहीए- काहीतरी अपूर्ण अपूर्ण वाटतंय.. रितंही, हलकंही.. समाधानही नि अधुरं, मोकळं, अपूर्णही. पाऊस पडतोच आहे, तो नाही थांबलेला..कथेचा शेवट हुलकावणी तर देत नाहीये? साधता आलंय का मला माझ्या कथेतून? काय आलंय पोहोचवता? काय साध्य केलंय माझ्या कथेनं? कथा पूर्ण कशी होऊ शकते अशी? या अस्वस्थेत मी पुन्हा अडकलेलीच.. सर्जनाची चाहूल जितकी उत्कट तितकी त्याच्या पूर्णत्वाची जाणीव अशी अधुरी..पूर्णत्वातल्या अपूर्णत्वाच्या जाणिवेचे प्रत्येक कथेच्या वेळी अनुभवलेले असे क्षण इतरांना ते रोमँटिक वाटतील पण मला कायम साक्षात्कारीच वाटतात!
स्त्रीच्या स्त्रीत्वाची बलात्काराइतकी हीन, घृणास्पद अवहेलना दुसरी नाही. माझ्या ‘व्रण’ कथेतल्या..गायत्रीवर तिच्या प्रियकरानेच बलात्कार केला आहे आणि तो आता या जगात राहिलेला नाही. त्याच्या स्वत:च्या मनावर उमटलेल्या व्रणामुळे स्वत:ला संपवताना त्याने गायत्रीच्या मनाबरोबरीने शरीरावर हा व्रणाचा जळता, चरचरीत चटका ठेवला आहे. गायत्री स्वत:वरच्या अन्यायाचा उच्चार जगापुढे करू शकत नाही. कारण तिच्यावर अन्याय करणाराच आता उरलेला नाही. त्यामुळे तिच्यावरच्या अन्यायाची दाद ती कुणाकडे मागू शकत नाही. त्या जखमेचं सतत सलतं भळभळतेपण. तिला वाहून नेण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. तिच्या या घुसमटीचा उच्चार प्रियकराच्या बहिणीपुढे करताना तिची होणारी तगमग लेखिका म्हणून तटस्थपणे मांडायची, दुसरीकडे माझ्यातल्या स्त्रीला तिच्या जागी ठेवत तिची ती वेदना स्वत: अनुभवल्यासारखी जिवंत करायची. एकाच वेळी माझ्यातल्या या दोन भूमिका..मी एक स्त्री नि माझ्यातली लेखिका म्हणजे एकाच वेळी माणूस म्हणून आपल्याला तपासत जायचं आणि दुसरीकडे आपलं असणं विसरून नाही तर विरघळवूनही टाकायचं.
‘शरीर’, ‘धर्म’, ‘श्रद्धा’ या मुस्लिम वातावरणातल्या माझ्या कथा-त्याची बीजं मला सुचली ती वेगवेगळ्या निमित्ताने- वेगवेगळ्या अनुभवांतून..या कथांतून आलेला मुस्लिम समाज, स्त्रिया, त्यांच्या चालीरीती हे केवळ कल्पनेतून उभं करणं अशक्यच होतं. एक तर तो समाज, तो धर्म आपल्यापेक्षा फार वेगळा आहे. एका मर्यादेपर्यंत कल्पनेतून लेखक काही निर्माण वा उभारू शकतो. परंतु धर्म, समाज यांसारख्या गोष्टी जेव्हा त्या त्या कलाकृतीची पाश्र्वभूमी असतात तेव्हा त्या समाजाला समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यासच करणं अपरिहार्य असतं. त्याशिवाय ती कलाकृती अस्सल, खरी होत नाही. मुस्लिम धर्माबद्दल खूप काही वाचत, त्या समाजाशी संबंधित अशा परिचितांशी चर्चा करत या कथांची निर्मिती झाली. या कथांच्या निर्मितीप्रक्रियेतील क्षणांनी मला समृद्ध केलं त्याहीपेक्षा माझ्यातल्या संवेदनशीलतेला तीव्र केलं.
मला वाटतं, माणसाच्या कोणत्याही श्रद्धेला कुणीही आव्हान देऊ शकत नाही. कारण श्रद्धेसारख्या गोष्टीला खरं वा खोटं ठरवता येत नाही. एखाद्या गोष्टीवर एखाद्याचा विश्वास असतो नि एखाद्याचा का नसतो, हे सांगता येत नाही. ‘श्रद्धा’ कथेतील माझी यशोदा हिंदू आहे, पण तिने लग्न केले आहे ते पुरोगामी मुसलमान माणसाशी. तिच्या दोन मुलांपकी एक ज्याची त्याच्या धर्मावर निस्सीम श्रद्धा आहे. या श्रद्धेमुळे त्या कुटुंबातील माणसांत भक्कम िभती उभ्या होत आहेत. पुरोगामी विचाराचं हे घर, त्यातली माणसं जरी माझ्या कल्पनेतून आकारली होती, तरी त्यांच्या व्यक्तित्वाची जडणघडण, त्यांची धर्माशी असणारी आत्यंतिक बांधीलकी समजून घेण्यासाठी मी माझ्याच घरातील मुस्लिम माणसाशी लग्न केलेल्या एका नातेवाईक स्त्रीला जाऊन भेटले. तिच्या घरातले त्यांचे रीतीरिवाज समजून घेतले. तर ‘शरीर’सारखी माझी कथा जी मला बेहरामपाडय़ातून जाताना, रस्त्यावरून धावत सुटलेल्या बुरख्यातील एका स्त्रीचा हमसून हमसून रडणारा चेहरा पाहून जाणवून गेली. खरं तर तिच्या रडण्यातल्या भेसूरतेने मला अस्वस्थ करत अनेक प्रश्न माझ्यासमोर निर्माण केले. त्या चेहऱ्यामागचं ते भेसूर पण करुण रडण्याचं कारण मला शोधता आलं नाही. पण त्या रडण्याने माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नासह मी बेहरामपाडय़ात गेले. त्या वस्तीतल्या वेगवेगळ्या स्त्रियांशी बोलता बोलता मला माझी नायिका जिवंत केवळ दिसली नाही तर उमगत गेली. त्या स्त्रीचा तो ओझरता रडतानाचा चेहरा ‘शरीर’ कथेतल्या माझ्या नायिकेचा चेहरा ठरला. त्यांच्या एकेकीच्या व्यथा..त्यातली हतबलता, त्यांच्या दारिद्रय़ाने निर्माण केलेले प्रश्न. स्त्री म्हणून त्यांना समजून घेताना तिला मला अजमावता आलं. त्यांच्या शेजारी मला मी उभं करत माझ्यातल्या स्त्रीपणाला त्यांच्याबरोबरीने ओळखू पाहत गेले. वाटत गेलं, त्या स्त्रिया नि आपण यात फरक नक्की आहे. कदाचित आपलं जगणं जास्त आखीव चौकटीतलं, सुरक्षितही त्यामानाने. त्यांच्या तुलनेत आपले प्रश्न पण तरीही कमी महत्त्वाचे नसतीलही, पण ते क्षीणच म्हणायचे. संगीतातील प्रत्येक रागाचे जसे सूर वेगळे असतात पण तरीही प्रत्येक रागाची निर्मिती होते ती सात सुरांतूनच..तसंच आहे हे, मुस्लिम स्त्री नि आपण यांत फरक धर्माचा, पण वेदनांच्या मुळाशी पुरुष नावाच्या व्यवस्थेकडून वाटय़ाला येणाऱ्या शोषणाची जात मात्र तीच..अर्थात त्यातलं चिवट, कणखर, विजिगीषू स्त्रीचं रूप मात्र एकच. त्यांच्या-आपल्या स्त्रीत्वाचे अंशही तेच. धर्म नावाला वेगळेपण केवळ स्त्री म्हणून स्त्रियांभोवती त्याने आखून दिलेल्या मर्यादा, अपेक्षा यांच्या चौकटी त्याच नि तशाच.
तर सर्जनात्मक लेखनात गंमत असते ती अशी आपण दुसऱ्यावर, दुसऱ्याच्या आयुष्यावर लिहायला जातो, पण आपणही त्यात असतोच. दुसऱ्या माणसांचा, व्यक्तिरेखा म्हणून शोध घेता घेता आपण त्यांच्याबरोबरीने आपल्यालाही शोधू लागतो. व्यक्तिरेखांना ओळखू पाहताना स्वत:च स्वत:ला अनोळखी होऊन जातो. एकाच वेळी अस्वस्थ व्हायचं त्याच वेळी अंतर्मुख.. एकाच वेळी थकायचं नि त्याच वेळी थकण्यातून विलक्षण शांतही व्हायचं. आपल्या पात्रांच्या दु:खांना समजून घेताना स्वत:च्या दु:खात अंतर राखायचं, पण आपल्या दु:खद अनुभवातूनच तीव्र संवेदनांनिशी पात्रांच्या त्या व्यथांना भिडता येण्याची आसही पणाला लावायची. आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांचे कोलाज मांडायचे, पण तो आयुष्याचा सलग तुकडा म्हणून पेश करायचा..काहीतरी उभं करण्याचं आव्हान पेलता पेलता निर्मिती पूर्ण झाल्याचं उत्कट रितंपण अनुभवायचं नि पुन्हा एका रितेपणाच्या अस्वस्थ हुरहुरीसाठी नव्या निर्मितीच्या प्रांतात पावलं टाकायची – एकटं होण्यासाठी, नि त्याच अस्वस्थतेतून शांतही होण्यासाठी..
‘माझं मन या रंगांच्या प्रचंडनगरीत
एकटीच नांगरून पडलेली विलक्षण
शांततेची बोट
जिच्या डेकवर एकटाच मी उभा..
अनुभव विराटसुंदर रंगीत भास.’
अशा कवी गुरुनाथ धुरींच्या ‘विलक्षण शांततेच्या बोटीवर’ उभं राहण्यासाठी..नव्या अनुभवांना भिडण्याच्या उत्कटतेतून स्वत:ला समृद्ध करत नेणाऱ्या अशा काही विलक्षण साक्षात्कारी क्षणांकरता..जे क्षण अनुभवणं हे शेवटी प्रत्यक्ष निर्मितीपेक्षाही जास्त सुंदर असतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा