योगी अरविंदांच्या योगसाधनेत सहभागी झालेली एक व्यक्ती फ्रान्समधून भारतात आली. ती अरविंद आश्रमाची आदिशक्ती ठरली. त्या मदर किंवा माताजी अर्थात योगिनी मीरा रिचर्ड. विनोबा भावे, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, महात्मा गांधीजी सर्वानाच आदरणीय असणाऱ्या या योगिनीची, माता मीरा रिचर्ड यांची  २१ फेब्रुवारी रोजी १३५ वी जयंती आहे. त्या निमित्ताने हा खास लेख.
“Be yourself, transform yourself and transcend yourself ” या तत्त्वज्ञानामुळे जगद्विख्यात झालेले महायोगी अरविंद सर्वाना ज्ञात आहेत. त्यांचे नाव अरविंद कृष्णधन घोष. त्या योगी अरविंदाचे चरित्र शब्दातीत आहे. अरविंद घोष त्यांच्या नंतरच्या काळात स्वातंत्र्यलढय़ात उतरले. सूरत क्राँग्रेस फुटल्यानंतर अरविंदांनी आणि लोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाला आणि स्वातंत्र्यलढय़ाला क्रांतिकारी वळण दिले. बंगालच्या फाळणीनंतर तर ते सशस्त्र क्रांतीच्या लढय़ात उतरले. माणिकतोळा उद्यान प्रकरणात त्यांना अलिपूर जेलमध्ये ठेवण्यात आले. इथूनच त्याचा अध्यात्माचा प्रवास वेगाने सुरू झाला. तिथे त्यांना प्रभूच्या अस्तित्वाच्या काही खाणाखुणा दिसू लागल्या. त्यांनी राजकारणातून बाजूला होऊन साधनेला प्रारंभ केला आणि ते महायोगी अरविंद या पदापर्यंत जाऊन पोहोचले. या त्यांच्या योगसाधनेत सहभागी होण्यासाठी एक व्यक्ती फ्रान्समधून भारतात आली. ती अरविंद आश्रमाची आदिशक्ती ठरली. मदर किंवा माताजी या नावाने प्रसिद्धीस आलेली ही योगिनी म्हणजे मीरा रिचर्ड.
मीरा यांचा जन्म २१ फेब्रुवारी १८७८ रोजी पॅरिस शहरात झाला. लहानपणापासून ही मुलगी ‘चिंता करितो विश्वाची’ या भावनेने जगत होती. वयाच्या बाराव्या वर्षांनंतर तिची अंतर्मुखता अधिकच वाढत गेली. त्या ध्यानाला बसू लागल्या. अल्जेरियात राहणारे थिऑन नावाचे एक पोलीस गृहस्थ गूढविद्याविशारद होते. त्यांच्याकडे मीरा यांनी अतींद्रिय मानसशास्त्राचा पायाभूत अभ्यास केला. सिद्धी आणि चमत्कार यापेक्षाही त्यांना दिव्यत्वाची ओढ होती. त्यांचे पती रिचर्ड पॉल यांना आपल्या पत्नीची योग्यता माहीत होती. १९१०साली रिचर्ड पॉल भारतात आले. श्री अरविंदांना भेटले. परमेश्वराच्या शोधार्थ निघालेल्या आपल्या पत्नीसाठी हाच गुरू योग्य आहे, असे त्यांना वाटले. १९१४ साली मीरा रिचर्ड भारतात आल्या आणि अरविंदाना भेटल्या. अरविंदाच्या भेटीनंतर एक वर्ष पाँडेचेरीला राहिल्या. या काळात योगी अरविंदाच्या साधनापद्धतीची त्यांना कल्पना आली. एक प्रकारचे आंतरिक सामरस्य आणि तादाम्य अनुभवल्यामुळे ज्या मार्गाच्या, गुरूच्या, प्राप्तव्याच्या आणि तत्त्वज्ञानाच्या शोधार्थ आपण आहोत ते आपल्याला इथेच भेटेल असे त्यांना वाटले. १९१५ साली त्या पुन्हा फ्रान्सला गेल्या २४ एप्रिल १९२० रोजी त्या पुन्हा पाँडेचेरीस आल्या. तेव्हापासून त्यांच्या निर्वाण क्षणापर्यंत त्या भारतात राहिल्या. त्या आल्या तेव्हा ४२ वर्षांच्या होत्या. निर्वाणसमयी त्यांचे वय ९५ वर्षांचे होते.
साधनेच्या क्षेत्रातील त्यांचा अधिकार मोठा होता. श्री अरविंद त्यांना ‘मदर’ म्हणत. सारी जीवसृष्टी ही त्यांना सलग परंपरा वाटायची. उत्क्रांतीचा पट जो जो उलगडत जाईल तो तो जाणिवेचा स्तर उंचावत जाईल हे त्यांचे गृहीततत्त्व होते. प्राणिसृष्टीतील संभाव्य परिवर्तन या विषयावर त्यांचे संशोधन सुरू होते. वनस्पतीविश्वाची त्यांना विलक्षण ओढ होती. फुलांचे वनस्पतीशास्त्रीय आणि आध्यात्मिक संबंध त्यांनी स्पष्ट केले. त्या कुशल चित्रकार होत्या. संगीतज्ञ होत्या. त्या उत्तम टेनिस खेळत. सत्तरी ओलांडल्यानंतरही त्या चांगल्या खेळाडूंना नामोहरम करीत. त्या स्कॉलर होत्या. अनेक विषयांचा त्यांनी व्यासंग केला होता. पण त्यांची परमार्थाविषयीची कल्पना अतिशय वेगळी होती. परमार्थ म्हणजे आयुष्यातून उठलेल्या आणि मनातून विटलेल्या जिवांचा खटाटोप नव्हे असे त्या सांगत. रसपूर्ण जीवन जगणाऱ्या उत्साही व्यक्तींनी घेतलेला जीवन-रहस्याचा वेध म्हणजे परमार्थ ही त्यांची कल्पना.
श्री अरविंद आपल्या साधनेत पूर्णार्थाने गढून गेल्यानंतर त्या क्षणापासून माताजींनी त्यांची जागा घेतली. साधकांच्या दैनंदिन जीवनाचे सूत्रसंचालन माताजी करू लागल्या. १९२० ते १९२६ या काळातील साधनेने प्राप्त झालेल्या सर्व सामर्थ्यांनिशी त्या साधकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. पाँडेचेरीच्या अरविंद आश्रमाची आचारसंहिता माताजींनी ठरवली. श्रमाशिवाय कोणालाही आश्रमात राहता येत नाही. कर्म ही उपासना मानली जाते.  To work for divine is to pray with body, असं माताजी म्हणत. साधकाला जे जे लागते ते आश्रमातच निर्माण झाले पाहिजे, असे माताजींचे सांगणे होते. विद्यार्थी हा विश्वाचा नागरिक व्हावा, मानवतेचा प्रतिनिधी राहावा आणि उद्याच्या जगाचा दूत व्हावा असे शिक्षण विद्यार्थ्यांना अरविंद आश्रमाशी निगडित शाळांमधून महाविद्यालयांमधून दिले गेले पाहिजे, यासाठी त्या आग्रही होत्या. माताजी म्हणत, we are here to open the ways of the future to children who belong to the future.
‘सर्व भूमी गोपाळांची’ या घोषणेची गर्जना करीत विनोबा भावे थेट पाँडेचेरीला माताजींपर्यंत जाऊन पोहोचले. निरोप घेताना माताजींना म्हणाले, ‘‘मला आशीर्वाद द्या.’’ माताजींनी आशीर्वाद दिला. ‘‘Aspire for the Divine, Wor for the Divine.’’ १९६५ साली भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद माताजींच्या भेटीसाठी आश्रमात गेले. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. वरच्या मजल्यावर जाणे शक्य नव्हते. हे जाणून माताजी खाली उतरल्या. राजेंद्र प्रसादांनी त्यांना अभिवादन केल्यानंतर म्हणाल्या, ‘‘India must rise to the height of her mission.’’ पंडित नेहरू स्वत:ला कधी पारमाíथक मानीत नसत. पण अरविंद आश्रमाची माताजींनी निर्माण केलेली आचारसंहिता पाहून भारावलेले पंडितजी तीन वेळा माताजींना भेटण्यासाठी गेले. ‘इथे सत्य, शिव आणि सुंदरचा प्रत्यय येतो’ असा पंडितजींचा अभिप्राय होता. महात्मा गांधीजींनादेखील मानव्याला उन्नत करणाऱ्या माताजींविषयी अपार आदर वाटत होता. ते म्हणत, ‘‘भावनिक एकात्मतेच्या सहस्र व्याख्यानांनी जे शक्य होणार नाही ते या आश्रमातील वास्तव्याने होईल. जात-पात, प्रांत, भाषा या भेदापलीकडे असणाऱ्या अभेदाची क्षितिजे इथूनच दिसतील.’’ चिंतामणराव देशमुख म्हणत, ‘‘The Yoga Ashram at Pondichery is, in fact, a Unique spiritual laboratory.’’ त्या काळातली भारतीय राजकारण आणि समाजकारणातील सर्व मोठी माणसे माताजींना मानत होती. त्यांचे मार्गदर्शन घेत होती.
५ डिसेंबर १९५० रोजी योगी अरविंद समाधिस्थ झाले. त्यानंतर साधकांना माताजी मार्गदर्शन करीत राहिल्या पाँडेचेरीचा अरविंद आश्रम आणि ऑरोव्हिला हे माताजींचे कर्तृत्व आहे. आश्रम हा एक िबदू मानला, केंद्र मानले तर त्याच्याभोवती नव्या जगाच्या उभारणीस जाणीवपूर्वक प्रारंभ व्हावा, असे माताजींना वाटले आणि त्यांनी ऑरोव्हिला हा प्रकल्प हाती घेतला. एका आदर्श नगराच्या रूपाने आदर्श जगाची पायाभरणी करायची हा माताजींचा हेतू होता. त्या म्हणत, ”Auroville wants to be Universal town where men and women of all countries are able to live in peace and progressive hormony above all creeds, all politics and all nationalities.” जागतिक ऐक्याच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल होते. विविध राष्ट्रांना आपल्या सांस्कृतिक वैशिष्टय़ांसह आपल्या अस्मितेचे प्रकटीकरण येथे करता येईल, या भावनेने हे नगर माताजींच्या कल्पनेतून साकार झाले आहे. २८ फेब्रुवारी १९६८ साली या नगराची पायाभरणी पाँडेचेरीला झाली. तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकल्पासाठी साहाय्य करण्याचे आवाहन सर्व राष्ट्रांना केले होते. एवढा जगभर माताजींच्या शब्दांना मान होता. १७ नोव्हेंबर १९७३ रोजी माताजी अनंतात विलीन झाल्या.
परदेशात जन्मलेली, परमेश्वराच्या शोधात निघालेली आणि साधनेसाठी भारतात आलेली एक योगिनी ‘मदर’ म्हणून जगाच्या आदराचा, कौतुकाचा आणि श्रद्धेचा विषय झाली. हे सारेच विलक्षण आहे. साधकांच्या भूमीत या योगिनीचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Increase in the number of people obtaining international driving licenses pune news
पुणे: आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
Story img Loader