नवरा-बायको या दोन व्यक्तींमधला ‘जोड’- एकाच कातळातून कोरलेल्या मूर्तीइतका अभंग नसणारच! पण त्यातल्या फटी बुजवण्यासाठी सहृदयता, हक्क-कर्तव्यांचा समतोल, जीत दोघांची हा दृष्टिकोन, वचनबद्धता आणि नवीनतेनं नात्यांची जपणूक ही पंचसूत्री पाळली तर ‘फेव्हिकॉल का अटूट जोड’ होईल यात शंका नाही!
दृश्य १ : १८५०- भारतीय विवाहविधीचा प्रसंग. साग्रसंगीत सोहळा. दहाबारा वर्षांच्या वधूने १४/१५ च्या वराला घातलेली वरमाला. त्या दोघांपेक्षा तो सोहळा इतरांच्याच दृष्टीनं खरा महत्त्वाचा! ‘कन्यादाना’चं पुण्य म्हणून आईवडील आनंदात, तर ‘वंशाचा दिवा’ लावणारी सून घरात येणार म्हणून सासरचे खुशीत! त्यातून ही लग्नगाठ म्हणजे ब्रह्मगाठच यावर ठाम श्रद्धा! साता जन्मांच्या आणाभाका किंवा जोडणीसाठी करायची असंख्य व्रतवैकल्यं!
दृश्य २ : १९५०- विवाह समारंभाच्या सोहळ्यात फार बदल नाही. फक्त वर-वधूंचं वय आणि समज वाढलेली. साता जन्मांच्या आणाभाका घेण्यात मनात अडचण नाही, पण त्याला फार अर्थ नाही, हे शिक्षणामुळे माहिती झालेलं. कुटुंबप्रमुखपद पुरुषाकडे असलं तरी बाईही काहीशी स्वयंपूर्णतेकडे जाणारी. तरीही लग्नगाठ होता होईतो टिकलीच पाहिजे यावर भर देत, प्रसंगी सर्व प्रकारची तडजोड करणारी! लग्नगाठ म्हणजे ‘निरगाठ’! सहज न सुटणारी- यावर विश्वास!
दृश्य ३ : २०००- विवाह कार्यालयात होवो की रजिस्ट्रारसमोर- त्याचं उत्सवी रूप असलं तरी हा एक ‘कायदेशीर करार’ आहे याची पूर्ण जाणीव वधूवरांच्या मनात स्पष्ट! तो टिकला तर आनंदच पण ‘टिकवायला पाहिजे’ असा अट्टहास आता ‘तिच्याही’ मनातून बऱ्यापैकी गेलेला! नोकरी-व्यवसायामुळे वैवाहिक नात्यापलीकडचं प्रत्येकाचं काही वेगळं व्यक्तिगत वर्तुळ तयार झालेलं. ‘वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली’ या खाक्यानं लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जास्त!
दृश्य ४ : २०५० (कदाचित.) ‘शॉर्ट टर्म’ लग्नाचे कायदे झाल्यामुळे वधूवरांचा ‘बॉण्ड’ काहीच काळापुरता सीमित! तो रिन्यू करायचा का नाही याबद्दल एकाच्याही मनात शंका असेल तर तो केव्हाही रद्द करण्याची सेवा! स्त्री किंवा पुरुष- लग्नगाठ ही ‘सुरगाठ’ (सहज सोडवता येणारी) हे सर्वमान्य गृहीत! (या चित्राबद्दल माझी कल्पनाशक्ती इथवरच धावते. कदाचित या पलीकडचीही काही भाकितं होऊ शकतात, पण ती मला झेपणारी नाहीत!)
या बदलत्या चित्रांमध्ये ‘लग्न’ हा ‘फेव्हिकॉलचा जोड’ न राहता हळूहळू एकमेकांमध्ये बसू शकणारं जिग सॉ पझल (जे कधीही सोडवता येतं..) कसं बनत गेलं – त्यात स्त्रियांची भूमिका-विचार पद्धत आणि वागणं कसं बदलत आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकूणच समाजरचनेवर दूरगामी परिणाम करणारी गोष्ट आहे.
ज्या बाईला वैधव्य आलं तर ‘आकाशाची कुऱ्हाड कोसळली’ असं वाटत होतं त्या बाईला वयाच्या पंचविशीत ‘‘अमुक तमुकबरोबर ठरलेलं माझं लग्न मला मोडायचंय कारण आता xxxबद्दल मला जास्त ‘फीलिंग्ज’ आहेत. आधीचा वाईट नाही, पण ‘हा’ जास्त चांगला आहे म्हणून मी हा निर्णय घेतलाय!’’ असं म्हणावंसं वाटत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
पूनम ही दोन मुलांची आई, पण साधारण पस्तिशीत प्रशांतचं दारूचं व्यसन तिच्या लक्षात आलं- खरं तर बोचायला लागलं. दोन-तीन वर्षे तिनं सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो मन:स्ताप दीर्घकाळ सोसत ‘नवरा कधी तरी सुधारेल’ या आशेवर राहण्याची तिची इच्छा नव्हती. भक्कम पगाराची नोकरी होती. त्यामुळे मुलांवर-तिच्यावर प्रशांतचं प्रेम असूनही तिनं स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला.
विश्वास आणि अजिता समव्यावसायिक असल्याने एकमेकांकडे आकृष्ट झाले. आंतरप्रांतीय विवाह केला. पहिली पाच वर्षे अत्यंत धावपळीची- बस्तान बसवण्याची गेली. एकमेकांचा आधारच वाटत होता. नंतर मग बारीक बारीक गोष्टींवरून कुरबुरी सुरू झाल्या. दोघांनाही तडजोडीची सवय नव्हती. पेशन्स संपला. ‘मूल नाही तर आत्ताच विभक्त होऊ’ म्हणून दोघांनी परस्पर संमतीनं घटस्फोट घेतला. त्यात अजितानं प्रॉपर्टीतला हिस्सा मागितल्यामुळे विश्वास खूप दुखावला गेला. घटस्फोटानंतर एकमेकांबद्दल जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोललं गेलं!
निराली ही वैद्यकशास्त्र शिकलेली मुलगी. तिचा विवाह तिनं स्वत:च एका मेकॅनिकबरोबर-भूषणबरोबर ठरवला. त्याच्या शिक्षणापेक्षा त्याची पर्सनॅलिटी तिला जास्त आवडली. भूषणनेही खूप समजून घेऊन निरालीशी संसार थाटला, पण काहीच दिवसांनंतर तिला त्याचं ‘कमी शिक्षण’ खुपायला लागलं. त्यावरून टोमणे मारणं- कमी लेखणं सुरू झालं. ती समारंभांना एकत्र जाणं टाळायला लागली. भूषणनं दोन-तीन वर्षे हा ताप सहन केला. समुपदेशकाची मदत घ्यायला सुचवलं, पण निरालीचा हेका- ‘‘माझ्यात तुझ्यापेक्षा जास्त बुद्धी आहे. तू मला काय करायचं सांगू नकोस!’’ अखेर भूषण वेगळ्या फ्लॅटमध्ये राहू लागला. त्याच्या मनात नसताना त्यानं फार न ताणता घटस्फोटाला मंजुरी दिली. त्यानंतर निरालीनं तिच्याच बरोबरच्या डॉक्टर मित्राशी लग्न केलं, पण तिथेही तिच्या आडमुठय़ा स्वभावाला कंटाळून त्यानं तिच्याशी घटस्फोट घेतला. दोन अपयशी लग्नं अनुभवून निराली नैराश्याच्या गर्तेत सापडली, मानसिक रुग्ण बनली!
या सर्व प्रसंगातील ‘स्त्री’ची भूमिका कशी बदलत गेली आहे ते आपल्या लक्षात येतं. जिथे ‘निरुपाय’ आहे अशा परिस्थितीपासून ‘ज्यावर उपाय करता येईल’ अशा परिस्थितीमध्येही ‘चटकन सुटका’ अशा दृष्टीनं घटस्फोटाकडे मुली पाहत आहेत की काय असं वाटतं आहे.
‘पुरुष प्रधानता’ हा आपल्या समाजाचा स्थायीभाव अजूनही बऱ्यापैकी घट्ट असला तरी हळूहळू काही ठिकाणी लंबक दुसऱ्या टोकाकडेही झुकायला लागला आहे असं दिसतं. शिक्षण, अर्थार्जन, पालकांनी दिलेलं निर्णयाचं स्वातंत्र्य यामुळे मुलींच्या ‘स्व-प्रतिमेत’ पुष्कळ चांगला फरक पडला आहे, हे खरं आहे, पण त्या प्रक्रियेतील काही खाचखळग्यांकडे म्हणावं तेवढं सजगतेनं पाहिलं जात नाही की काय असंही वाटतं.
गेल्या काही वर्षांत स्त्रियांच्या बाजूनं काही कायदे आले, स्त्रियांना मानसिक सुरक्षितता असावी म्हणून त्यांचा वाटा नक्कीच आहे. पण काही वेळा प्रासंगिक दुरभिमानामुळे, भावनिक अपरिपक्वतेमुळे, तात्पुरत्या फायद्याच्या मागे लागल्यामुळे त्या कायद्यांचा गैरफायदाही घेतला जातो आहे, असं दिसतं. जिथं जिथं निकटचं नातं आहे, तिथं तिथं काही प्रमाणात भावनांचं वरखाली होणं, अपेक्षा पूर्ण होणं न होणं, कधी कधी वादावादी होणं हेसुद्धा स्वाभाविक आहे. साता जन्मांचा दाखला जरी बाजूला ठेवला तरी दीर्घकाळ आनंद-सहवास ज्यातून मिळावा असं वाटतं, त्यासाठी काही तरी वेळ पेरणीला द्यायला नको का? सुरुवातीची काही र्वष एकमेकांना समजून घेताना फक्त ‘स्त्री’ (किंवा ‘आधुनिक स्त्री’) या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीची जोडणी न्याय-अन्यायाशी करणं, अटीतटीला येणं खरंच आवश्यक आहे का? याचा विचार आजच्या ‘स्वाभिमानी’ आणि ‘स्वत:ला’ सिद्ध करू इच्छिणाऱ्या पिढीनं (मूल आणि मुली दोघांनी) करणं आवश्यक आहे असं वाटतं.
शहरी-सुशिक्षित आणि बऱ्यापैकी मुक्त अशा सामाजिक वातावरणात वाढलेल्या तरुण पिढीला कुठलेच र्निबध दीर्घकाळ मानवत नाहीत, असं काही वेळा वाटतं. अर्थात, इतकं सरसकट १०० टक्के विधान सत्य नसलं तरी बऱ्याचदा असे प्रसंग घडताना दिसतात. पूर्वी मुलींना शिक्षणासाठीसुद्धा आपल्या गावाबाहेर पाठवायला पालक तयार नसायचे. आता अगदी ग्रामीण-तालुका भागातील मुलीसुद्धा मोठय़ा संख्येनं शिक्षण-नोकरीसाठी, काही वेळा प्रवासासाठी, सहलींसाठी पण दीर्घकाळ शहरात- अन्य भागात येताना दिसतात. खोली घेऊन राहताना दिसतात, पण ही ‘संधी’ आपल्याला कोणत्या उद्दिष्टासाठी मिळालेली आहे, याचं भान जर सुटलं तर तारू भरकटायला वेळ लागत नाही. ‘मौजमजा आणि मौजमजाच’ करा असं ओरडणारी हजारो माध्यमं आणि उद्योग आजूबाजूला आहेतच! सामाजिक संकेत किंवा तथाकथित मध्यमवर्गीय मूल्यं ही आता ‘फेकून देण्याची’ गोष्ट झाली आहे, हे सहजपणे वाटू शकतं! अशा वेळी ‘विवाह’ नावाच्या नात्यातील समर्पण/ बांधीलकी/ पूरकता इत्यादी शब्द नुसतेच बुडबुडे बनतात. ‘दस कहानियाँ’ हा चित्रपटमालेतील ‘मॅट्रिमोनी’ हा लघुपट विवाह नात्याच्या या पोकळ डोलाऱ्यावर सूचकपणे भाष्य करतो. असं फक्त देखाव्याचं- रोजचं सुखासीन जगणं/ मिरवणारी बायको इत्यादी टिकविण्यासाठी आपण स्वत:ची इंटेग्रिटी (जगण्यातील पारदर्शिता) पणाला लावतो याचं भान सुटतं का? ज्या तरुणींना संधीची ‘समानता’ अपेक्षित आहे, त्यांना नात्यातील फसवाफसवीची पण समानता हवी आहे का? असे किती तरी प्रश्न मनात उभे राहतात.
किती तरी वेळा प्रेमविवाह करताना आपल्या पतीची पाश्र्वभूमी, त्याचे बालपणचे-तरुणपणचे सामाजिक कौटुंबिक संस्कार-घडण लक्षात घेतली जात नाही. लग्न झाल्याबरोबर त्यानं ‘आपल्या’ साच्यात बसावं अशी अपेक्षा आजची तरुणी करते आहे, असं वाटतं. त्यातून संघर्ष निर्माण होतात. काही वेळा बदलू इच्छिणारे मुलगे ताठर बनतात किंवा निराशाचक्रात सापडतात. ‘स्त्री’ म्हणून आपले हक्क बजावताना ‘सहचर’ म्हणून आपली कर्तव्ये आपण विसरत नाही आहोत ना? याचाही विचार तरुण मुलींनी करायला हवा असं वाटतं!
दोन व्यक्तींमधला हा ‘जोड’- एकाच कातळातून कोरलेल्या मूर्तीइतका अभंग नसणारच! पण त्यातल्या फटी बुजवण्यासाठी सहृदयता, हक्क-कर्तव्यांचा समतोल, जीत दोघांची हा दृष्टिकोन, वचनबद्धता आणि नवीनतेनं नात्यांची जपणूक ही पंचसूत्री पाळली तर ‘फेव्हिकॉल का अटूट जोड’ होईल (या जन्मापुरता तरी!) यात शंका नाही!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा