जिथे एका जोडीदाराला आपण अपमानित होत आहोत, आपला अनादर होत आहे असे वाटत राहते तिथे प्रेम ही भावना कशी टिकणार? जोडीदाराची भाषा शिकली नसल्यामुळे एकमेकांच्या भावना समजून घेणे अवघड होते. त्यातूनच अपमान, अनादर, चिडचीड अशा नकारात्मक भावनांचा जन्म होत असतो. म्हणूनच एकमेकांची भाषा शिकायला हवी..
काही काही वाचनात आलेल्या गोष्टी खूप विचार करायला भाग पाडतात. काही वर्षांपूर्वी जॉन ग्रे याचे ‘Men from Venus…’ या नावाचे पुस्तक वाचले होते आणि ते अनेक भाषांत अनुवादित होऊन विलक्षण लोकप्रिय झाले होते. त्याचा मराठी अनुवादही उपलब्ध आहे. त्यातून स्त्रिया आणि पुरुष मुळातच कसे भिन्न असतात. त्यामुळे त्यांची विचारसरणी आणि अभिव्यक्ती वेगवेगळी असते असे विचार मांडले होते. अगदी सुरुवातीच्या काळात आमच्या कार्यशाळेसाठी त्याच्या विचारांचा आम्ही बराच उपयोग करून घेत असू. त्या नंतर एलन आणि बार्बरा पीज यांनी स्त्री-पुरुष भिन्न असण्याला मेंदूची रचना कशी कारणीभूत आहे हे सोदाहरण स्पष्ट केले. चांगल्या सहजीवनासाठी, हे फरक समजून घेऊन कृती करण्यावर त्यांचा भर होता. त्यांची विधाने जरा अतिरेकीच होती. स्त्रियांना दिशा समजत नाहीत, नकाशे कळत नाहीत हे त्यांचे विधान बऱ्याच पुरुषांना मनापासून पटले. मीसुद्धा कुठे परगावी गेलो कीनकाशातून दिशा शोधणे गौरीला (माझी पत्नी) कसे कळत नाही, या बाबीवरून तिची मनसोक्त टिंगल करीत असे. या उलट पुरुषांना जवळच्या गोष्टी कशा दिसत नाहीत, सापडत नाहीत असे पीज दाम्पत्याने दाखवल्याप्रमाणे मला फ्रीजमधले दही कसे सापडत नाही याची टर गौरी उडवायची. एकमेकांची टिंगल करायला संधी देणारी ही दोन्ही पुस्तके माझ्यावर प्रभाव टाकून गेली होती हे नक्की.
पण जसजसे या क्षेत्रात व्यक्तिगत पातळीवर अधिकाधिक काम करू लागलो तेव्हा लक्षात आले, असे सरधोपट मार्ग उपयोगी नाहीत. याकरिता अधिक अभ्यास केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्त्री आणि पुरुष असा काही पातळ्यांवर निश्चित भेद असला तरी स्त्रीचे व्यक्तिमत्त्व आणि पुरुषाचे व्यक्तिमत्त्व अशा ढोबळ वर्गीकरणाला काहीच अर्थ नाही. प्रत्येक व्यक्तीत काही प्रमाणात स्त्रीचे आणि काही प्रमाणात पुरुषी गुण असतातच. त्यामुळे कोणतेही नाते तपासून बघत असताना त्यांची व्यक्तिमत्त्वे एकमेकांना पूरक कशी होतील, याची तयारी करायला हवी.
मध्यंतरी मला एक एस.एम.एस. आला होता. हॉटेलमध्ये लग्न झालेले आणि लग्न न झालेले जोडपे कसे ओळखावे?
लग्न न झालेले एकमेकांच्या डोळ्यात डोळे भिडवून असतात.
लग्न झालेले डोळे फिरवून असतात.
विनोद ही अनेकदा वस्तुस्थिती असते याचे प्रत्यंतर मला लगेच आले. आम्ही दोघेच डीनरला गेलो होतो. गौरी मला तिच्या कुठल्याशा बहिणीची हकिकत सांगत होती. तिचे लक्ष थेट माझ्याकडे होते. मी मात्र मेनूकार्डमध्ये डोके खुपसून बसलो होतो. ती म्हणाली , ‘‘बघ तुझ्या विनोदातला खरेपणा!’’ मी मुंडी डोलावली. ती पुढे म्हणाली, ‘‘सगळ्याचेच असे का होते? लग्नापूर्वीचे जे प्रेम असते ते आटते का? आणि आत असेल तर बाहेर का दिसत नाही?’’ तिच्या या प्रश्नाने काहूर उठले. स्त्री-पुरुष भिन्नता वगरे गोष्टींमध्ये या प्रश्नाचे उत्तर नव्हते.
विचार करता करता मी नेटवर याबाबत काही मिळते का ते शोधू लागलो. लगेच गॅरी शॅपमन (Gary Chapman) यांचे The five love languages या पुस्तकाचा संदर्भ मिळाला. हे पुस्तक मुळापासून जरूर वाचण्यासारखे आहे. या पुस्तकात त्यांनी एक महत्त्वाची संकल्पना मांडली आहे.
प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याचे अनुवांशिक तत्त्व आणि त्याची जडणघडण यावर मुख्यत: अवलंबून असते. त्याच प्रमाणे आपली भाषा ही लहानपणापासून आपल्या कानावर जशी जशी पडत जाते तसतशी विकसित होते. सामान्यत: आई बाळाशी जास्त संवादी असते म्हणून आपण त्या भाषेला मातृभाषा म्हणतो. जगात जास्तीत जास्त ठिकाणी प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच दिले जाते तेव्हा किमान एक भाषा पक्की होईल अशी आशा असते. आपल्याकडे सर्व व्यवहाराकरिता भाषेला पर्याय नाही. भावनिक व्यवहारसुद्धा भाषेवरून किंवा देहबोलीवरूनच समजतात.
भाषेला इतके महत्त्वाचे स्थान असेल तर नातेसंबंध जोडण्याकरता, टिकवण्याकरता आणि हो तोडण्याकरतासुद्धा भाषेची गरज असते. प्रत्येक माणसाची भावना व्यक्त करायची भाषा त्याची स्वत:ची असते आणि तो ज्या व्यक्तीशी नाते टिकवू पाहतो तेव्हा त्याच्या भावनांची भाषा जोडीदाराने समजणे गरजेचे आहे. जोडीदाराला त्याची भाषा समजली तरच दोघांची देवाणघेवाण होईल आणि त्या नात्यात मजा येऊ शकेल.
गायत्री एकदा माझ्याकडे आली. ‘‘लग्नानंतर मी गौरवसाठी चांगली नोकरी सोडली. म्हणाले, चांगली गृहिणी होऊन दाखवू. दिवसभर मी घरासाठी अक्षरश: जिवाचे रान करते. कामवाल्या बाया फक्त धुण्या-भांडय़ाला. घर-फरशी पुसणे ही सगळी कामे मीच करते. घरातले फíनचर चकाचक पुसणे, बेडशीट, पडदे हेसुद्धा घरीच! सासू-सासऱ्यांचे सगळे मीच बघते. सासुबाईंना दुसऱ्या कुणाच्या हातच्या पोळ्या चालत नाहीत म्हणून पोळ्या मीच करते. मला सांगा हल्लीच्या जमान्यात इतकी कामे करणारी बायको असते का कुठे? इतकेच नाही तर गौरवचे कपडे इस्त्री करणे, त्याचे बूट चकाचक ठेवणे, त्याचे कपाट आवरणे ही कामेही मी मोठय़ा उत्साहाने करते. त्याच्यासाठी चायनिज, मोगलाई, इटलीयन असे वेगवेगळे पदार्थ शिकले आणि दर रविवारी खास मेनू करते. मुलांकडे तर बघावे लागतेच! आणि दोन्ही मुले म्हणजे माझा जीव की प्राण आहेत ..’’
‘‘अरे, तू तर अगदी आदर्श पत्नी आहेस की! मग प्रश्न कुठे आहे?’’ मी म्हणालो.
‘‘मी इतकं सगळं करते पण त्याला त्याचे काही नाहीच. तो हे गृहीतच धरतो की मी म्हणजे घरात ठेवलेली नोकराणी!’’
मी तिला तिथेच अडवले. ‘‘तुला एकदम नोकराणी असे का वाटले?’’
‘‘सांगते नं. याचा प्रत्येक गोष्टीला गिफ्ट देण्याचा जो पवित्रा असतो न तो माझ्या डोक्यात जातो. मध्यंतरी सासुबाई जिन्यावरून पडल्या. पाय प्लॅस्टरमध्ये होता. त्यामुळे त्यांचे सगळेच करावे लागायचे. मला त्याचे काहीच वाटले नाही. माझी आई पडली असती तर मी नसते का केले? त्यांनीही अगदी भरभरून कौतुक केले. येणाऱ्या-जाणाऱ्याला प्रत्येकाला सांगत होत्या, ‘‘गायत्री माझं सगळं उत्तम करते हो!’’ पण या माणसाकडून एक शब्द फुटेल तर शप्पथ. तेही जाऊ दे. निदान घरी आल्यावर माझ्याशी पंधरा मिनिटे तरी बोलेल? माझी तितकीच अपेक्षा असते. पण या शहाण्याने एक दिवस परस्पर माझ्यासाठी पठणी आणली आणि म्हणतो काय, ‘‘आईचे इतके केलेस म्हणून तुला ही भेट.’’
‘‘आता बघा, नोकराणी ठेवली असती तर सात-आठ हजार खर्च झालेच असते किनई? हा माणूस मला अशा भेटी देतो तेव्हा माझ्या कामाचा आणि माझ्या भावनांचा अपमान होतो असे वाटते. बरं ही पहिली वेळ असती तर मी समजू शकले असते, पण मी जेव्हा-जेव्हा वेगळे काहीतरी करते तेव्हा हा अशीच काहीतरी गिफ्ट देतो. कधी महागडे सेंट, कधी हँडबॅग वा कॉसमॅटिक्स. मला या साऱ्याचा वैताग येतो. मला असं वाटतं हा माझ्या कामाचा आदर नाही तर त्याचे मोजमाप आहे.’’
मी विचारलं, ‘‘तुला काय अपेक्षित असतं?’’
ती सांगू लागली. ‘‘माझ्या माहेरी आमचे पाच जणांचे कुटुंब. आम्ही दोघी बहिणी आणि धाकटा भाऊ. बाबा सरकारी खात्यात अधिकारी होते. त्यामुळे आईने नोकरी केली नाही. बाबांच्या बदल्या होत असत, त्यामुळे एकाच गावात आमचं शिक्षण झालं नाही. त्यामुळे आम्हाला खूप कौटुंबिक मित्रमंडळी नव्हतीच. त्यामुळे आम्ही एकमेकांना धरून असायचो. आम्ही झोपेतून जागे होण्यापूर्वी आई-बाबा चहा घेऊन रोज एक तास चालायला जायचे. नाश्ता आम्ही सगळे एकत्र करायचो. संध्याकाळी बाबा घरी आल्यावर आईला स्वयंपाकात मदत करायचे. रात्रीच्या जेवणासाठी सगळे एकत्र. टीव्ही एक तास बंद. मस्त गप्पा मारत सगळे एकमेकांचा सहवास एन्जॉय करायचे. तेव्हापासून माझ्या मनात एक चित्र आहे. प्रेमाच्या माणसांकडून भरपूर सहवास मिळायला हवा. आणि नेमकं हेच गौरवला समजत नाही. त्याच्यासाठी मी जे काही करते, अगदी बूट पॉलिशपासून सगळे काही ते म्हणजे माझे प्रेम व्यक्त करण्याचे साधन आहे. मला भेटी नकोत, कौतुक नको. हवा आहे तो सहवास! पण तो इतका पशाच्या मागे असतो की बस्स! जेवताना टीव्ही, जेवण झाल्यावर वाचन, ते झाले की बसतो लॅपटॉपवर. मी झोपते तरी याची कामे चालूच! कधी फक्त दोघांनी फिरायला जाणे नाही. ट्रिप तर दूरची गोष्ट. सुट्टीत कुठे गेलो तर मुले, त्याचे मित्र, त्यांच्या बायका सगळे बरोबर.. मला आता हे सहन होत नाही.’’
गायत्रीची समस्या अगदी योग्य होती. त्या दोघांमध्ये प्रश्न होता.
वरकरणी सगळे उत्तम होते. पण जिथे एका जोडीदाराला आपण अपमानित होत आहोत, आपला अनादर केला जात आहे असे वाटत राहते तिथे प्रेम ही भावना कशी टिकणार?
जर गौरवला विचारायला गेले तर तो तिच्या प्रत्येक कामाची त्याच्या रीतीने म्हणजेच भेटी देऊन दाद देत होता. त्याची प्रेमाची भाषा भेटीची होती.
तिची प्रेमाची भाषा सेवेची होती आणि त्या सेवेला सहवासाने प्रतिसाद मिळावा असे तिला वाटत होते.
दोघेही आपल्या भाषेत बोलत होते पण एकमेकांची भाषा एकमेकांना समजत नव्हती.
एक कानडीत बोलत होता आणि एक गुजराथीत. दोघांनाही प्रेमच व्यक्त करायचे होते, पण दोघेही जोडीदाराची भाषा शिकले नसल्यामुळे एकमेकांच्या भावना समजून घेऊ शकत नव्हते. त्यातून अपमान, अनादर, चीडचीड अशा नकारात्मक भावनांचा जन्म होत होता!
प्रेमाची भाषा शिकली नाही तर काय होते याचा हा थेट पुरावा होता.
सामान्यत: कोणत्या असतात प्रेमाच्या भाषा? कशी ओळखावी आपली आपल्या जोडीदाराची प्रेमभाषा याबद्दल सविस्तर पुढच्या (२७ ऑक्टोबरच्या अंकात) लेखात. chaturang@expressindia.com
‘भाषा’ प्रेमाची
जिथे एका जोडीदाराला आपण अपमानित होत आहोत, आपला अनादर होत आहे असे वाटत राहते तिथे प्रेम ही भावना कशी टिकणार? जोडीदाराची भाषा शिकली नसल्यामुळे एकमेकांच्या भावना समजून घेणे अवघड होते. त्यातूनच अपमान, अनादर, चिडचीड अशा नकारात्मक भावनांचा जन्म होत असतो.
आणखी वाचा
First published on: 14-10-2012 at 12:21 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stree pu vagaire vagaire mahendra kanitkar love languages languages