अठराविश्वे दारिद्रय़ अनुभवत असताना समाजासाठी काम करणाऱ्या काशीबाई जवादे. आजच्या काळातही अस्पृश्यता मानणाऱ्या समाजाला रोखठोक बोल सुनावून गावची विहीर सर्वासाठी खुली करणाऱ्या आणि समाजासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या समर्थ स्त्रीविषयी.
काशीबाई जवादे यांच्या सासरी-माहेरी दोन्हींकडे अगदी अठराविश्वे दारिद्रय़! आयुष्यभर कष्ट आणि दारिद्रय़ाशी झुंज देताना त्यांनी हिरिरीने समाजकार्यात उडी घेतली आणि भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध वेळोवेळी लढा दिला.
मांडवा गाव हेच काशीबाईंचं सासर-माहेर; पण मजुरीसाठी अनेक गावी करावी लागणारी भटकंती आणि रोजगार हमी योजनेत, धरणाच्या माती-गोटय़ाच्या खडतर कामानंही, बऱ्याच वेळा हातातोंडाशी गाठ पडेना. अशा स्थितीत आयुष्याची उमेदीची र्वष खर्च झाली. काशीबाईंचं जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झालं, तेदेखील चार दिवस शाळा आणि चार दिवस मजुरी या क्रमानं. शाळेत जातानाही जुनेच विटके कपडे अंगावर असत. शेत-शिवारातली कामं करता करता बालपण सरलं आणि अठराव्या वर्षी जवादे कुटुंबात त्याचं लग्न ठरलं.
सासरीही अत्यंत गरिबी. माती-गोटय़ांची अधिक कष्टांची कामं सुरू झाली. एके ठिकाणचं काम संपलं की, दुसऱ्या गावी स्थलांतर करावं लागे; तरीही कधी कुरमुरे खाऊन तर कधी नुसती अंबाडीची भाजी कण्या घालून खावी लागे, बरोबर भाकरीही  नसे. उपाशीपोटी कराव्या लागणाऱ्या काबाडकष्टामुळे जगणं कठीण झालं होतं. एकदा मांडव्यावरून महाकालीला मजुरीच्या शोधात बिऱ्हाड हलविलं होतं, पुन्हा महाकालीवरून मांडव्याला दोन वर्षांनी स्थलांतर करावं लागलं, जणू ‘विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर’!
मांडव्याला आल्यावर काशीबाईंचे आयुष्य थोडे स्थिर-स्थावर होऊ लागले. घरकुल योजनेत त्यांना घर मिळाले. कुडाचं घर त्यातच खाली जमिनीला ओल. कसं का असेना हक्काचा निवारा होता तो! पण घराचा ताबा घेण्यासाठी या ठिकाणी ठराविक काळ राहणं आवश्यक होतं आणि काशीबाई नुकत्याच बाळंत झालेल्या होती. बेघर वस्तीतल्या विहिरीचं काम सुरू होतं म्हणून पिण्याचं पाणी आदिवासी पाडय़ातून आणावं लागत असे. बाळ अवघं १५ दिवसांचं म्हणून नवरा पाणी आणायला गेला तर बौद्ध-मातंगांना पाणी भरू देत नाही म्हणून परत पाठवलं. काशीबाईंनी थेट विहिरीचा परिसर गाठला आणि विहिरीत सरळ बादलीच सोडली. विटाळानं पाणी बाटलं म्हणून खूप कालवा, आरडा-ओरडा झाला, तसं काशीबाईंनी सर्वाना ठणकावून सांगितलं, ‘‘विटाळ मानणारे आपापल्या घरी विहिरी खोदा. ही विहीर सर्वासाठी आहे. आमच्या हातानं पाणी बाटतं मग आमच्या घरचा चहा प्यायल्यावर काय आतडी धुवून घेता? तुमचं आमचं रक्त वेगवेगळं आहे का?’’ लोकांमधल्या दांभिकपणावर काशी यांनी तिथल्या तिथेच सरळ प्रहार केला होता. लोकांपर्यंत ते पोहोचलं होतं आणि विहीर साऱ्यांसाठी खुली झाली..
काही वर्षांनी कुडाच्या घरांऐवजी पक्की सीमेंट-विटांची घरं बांधण्याचा काम सुरू झालं, तेव्हाची गोष्ट. ढिसाळ कारभाराचा नमुनाच होता तो. काशीबाईंनी त्यांच्या घराचं बांधकाम थांबवलं. वाकडी-बेढब कुचकामी भिंत बांधून गाडता का माझ्या पोराबाळांना, हा तिचा प्रश्न होता. त्यानंतर त्यांनी बांधकामातल्या एकंदरीत भ्रष्टाचार आणि पैशांच्या अफरातफरीबाबत तहसीलदाराची तक्रार केली. ग्राहक मंचाकडे तक्रारही केली. त्यासाठी त्यांना मार्गदर्शन होतं चेतना विकास संस्थेचं.
१९८२ साली काशी यांनी गडचिरोली येथील अभय बंग आणि राणी बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेत आरोग्यविषयक प्रशिक्षण घेतलं, शिवाय नॅचरोपथीचं नेटके सरांकडे प्रशिक्षण घेतलं. एवढंच नाही तर अंगणवाडीचं प्रशिक्षण घेऊन आदिवासी कोलाम वस्तीत सुमारे दहा र्वष बालवाडी शिक्षिका म्हणूनही काम केलं.
आदिवासी मुलांना स्वच्छतेचे धडे देताना मुलांची नखं कापणं, केस कापणं, आंघोळ घालणं, जखम असल्यास ती धुवून औषध लावणं आदी कामं त्या आवडीने करायच्या. साहजिकच कोलाम लोकांच्या माणुसकी आणि जिव्हाळ्याचा अनुभवही त्यांनी खूप घेतला.
दगड-गोटय़ाची कामं करण्यापेक्षा या कामाची त्यांना आवड वाटू लागली. शारीरिक कष्ट इथे कमी होतेच पण तळमळीनं करण्यासारखं खूप काही आहे, याची जाणीव झाली. आदिवासी मुलांना अंगणवाडीत धडे देताना त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला.
मग त्यांनी ‘चेतना विकास’च्या कामात पुढाकार घ्यायला सुरुवात केली. बचतगटाची माहिती मिळताच त्यातही सहभागी झाल्या. त्यातून मिळालेला आत्मोन्नतीसह समाजविकासाचा धडा तिच्यावर विशेष प्रभाव टाकून गेला.
दारिद्रय़ाशी दिलेल्या झुंजीत वयाची ५६ र्वष सरलीत; पण पतीचं प्रेम आणि पूर्ण सहकार्य या काळ्या-सावळ्या पण करारी-कणखर काशीबाईंना समाधान देतंय. त्यांचा मुलगा व सूनबाई एकोप्याने अन् समाधानाने नांदत आहेत. मुलगा एम. ए. (मराठी) झालाय आता मांडवा गावी पोस्टमास्तर आहे. तर दोन मुलींना बारावीपर्यंत शिकवलंय. मुलांचं शिक्षण आटोपल्यावर काशीबाईंला सीलिंगची नापिकी अडीच एकर जमीन मिळाली. त्या जमिनीतून खूप मेहनतीने त्यांनी वीस मिश्र पिकं घेतली. सेंद्रिय खतं वापरली. शेतात वनौषधी लावल्या. वनौषधी शिबिरातील प्रशिक्षणाचा उपयोग करून अडुळसा कल्प, शतावरी कल्प, कैलासजीवन, रिंगझोनसारखी औषधी तयार करू लागल्या. शिबिराच्या माध्यमातून औषधी मार्गदर्शन व औषधी वाटप करतेय. शेतात बांध घालून पाणलोट व्यवस्था केलीय. त्या जमिनीच्या तुकडय़ाने आत्मसन्मान दिला आणि आर्थिक घडीही बसवलीय.
प्राप्त परिस्थिती बदलण्याच्या तळमळीमुळे आरोग्य प्रशिक्षण, अंगणवाडी प्रशिक्षणाशिवाय कृषी मार्गदर्शन शिबिरात त्या वेळोवेळी सहभागी झाल्या. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग व्यक्तिविकासाबरोबर कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तर केलाच पण बचतगटामार्फत इतर स्त्रियांना मार्गदर्शन आणि सहकार्यही करीत असतात.
काशीबाईंना बचतगटातून समूहाने काम करताना, परस्परांची सुख-दु:खं वाटून घेतांना खूप काही शिकायला मिळतंय. परस्परांचा आधार मिळतो. बचतगटाची कामं करताना रजिस्टर लिहिणं, पासबुक भरणं, हिशेब लिहिणं आदी कामं जमू लागलीत.
काशीबाई म्हणतात, ‘माझ्या विचारांत, राहणीमानात बराच बदल झालाय कारण या ओबडधोबड दगडातून मूर्ती घडविण्याची चिकाटी अन् कौशल्याचं काम करणाऱ्या आम्हाला माणूस म्हणून समर्थपणे उभ्या करणाऱ्या सुमनताई बंग आमच्या पाठीशी सदैव उभ्या आहेत. त्याच आम्हाला लढायचं बळ देतात आणि पाठीवर शाबासकीची थापही.
परिस्थितीने एका सामान्य स्त्रीला बळं दिलं लढण्याचं. म्हणून तर मजुरीवर काम करणाऱ्या काशीबाई स्वतच्या शेतातून पिकं घेत आता स्वावलंबी झाल्या. बचतगटाचे कार्य, नॅचरोपथीची शिबिरं यातून जागृतीही करतायत. संधीचे सोनं करण्याची त्यांची जिद्द म्हणूनच वाखाणण्याजोगी आहे.    
chaturang@expressindia.com

Story img Loader