गायत्री लेले
‘स्त्रीची जागा घरात आणि तीही ‘पत्नी’ आणि ‘आई’ म्हणूनच आहे… स्त्रीवादाच्या नादानं स्त्रिया कमावण्याच्या मागे लागल्या आणि पुरुषांबरोबरच्या त्यांच्या स्पर्धेत कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होत गेली…’ ही मतं अनेक देशांमध्ये स्त्रियांचा एक वर्ग मांडतो आहे. त्यांचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे समाजमाध्यमांवरचे व्हिडीओ आणि रील्स. ‘ट्रॅडिशनल वाइव्हज्’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्त्रियांची मतं खरी आहेत की ती ‘इन्फ्लुएन्सर’ म्हणून असलेल्या आर्थिक समीकरणातून आलेली आहेत? स्त्रीवादी चळवळीसारखी या प्रवाहाची विरोधी चळवळ होईल का?… ‘ट्रॅड वाइफ’च्या या ‘ट्रेंड’विषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच एका लोकप्रिय पॉडकास्ट चॅनलवर नोरा फतेही या प्रसिद्ध मॉडेलची मुलाखत झाली. त्यात तिनं स्त्रीवादावर झडझडून टीका केली आहे. ती म्हणते, ‘‘स्त्रीवादामुळेच आता स्त्रिया पुरुषांचा द्वेष करतात, त्यांना कमी लेखतात. लग्न, मूलबाळ वगैरे त्यांना नको वाटतं. पुरुष हे ‘प्रोव्हायडर’ (संसाधनं पुरवणारे) आणि स्त्रिया या ‘नर्चरर’ (काळजी घेणाऱ्या) अशी जी निसर्गानं विभागणी केली आहे, ती आपण का अमान्य करतो? समाज बिघडला आहे तो स्त्रीवादामुळेच!’’

तिच्या या विधानांमुळे अर्थातच इंटरनेटवर बरीच खळबळ माजली आहे. ‘तू हे सगळं बोलू शकत आहेस, ते इतिहासात स्त्रीवादी चळवळी झाल्या म्हणून! स्त्रियांना बोलण्याचा अधिकार, निवडीचा अधिकार, संचाराचा अधिकार हा स्त्रीवादानं दिला,’ असं अनेक जणांनी तिला ठणकावून सांगितलं. त्याच वेळेस तिच्या विधानांना अनुमोदन देणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. नोरा फतेहीला भारतीय संस्कृती कशी उत्तमपणे कळलेली आहे, असंही प्रतिपादन लोक करताना दिसले. थोडक्यात, या मुलाखतीमुळे स्त्रीवादावरची चर्चा समाजमाध्यमांवर तरी पुन्हा एकदा ऐरणीवर आली. ‘आधुनिक काळातल्या स्त्रीवादामुळे स्त्रिया बिघडलेल्या आहेत,’ असं म्हणणं फक्त भारतातल्या पुराणमतवादी मंडळींचं नाही! ही तक्रार जगभरातले लोक करत असतात आणि यात स्त्री-पुरुष सगळे आहेत. या विरोधातून काही नवे ‘ट्रेंड्स’ सद्या:स्थितीत निर्माण झालेले दिसतात. त्यातलाच एक प्रवाह म्हणजे ‘ट्रॅड-वाइफ’.

आणखी वाचा-‘एका’ मनात होती : ‘फोमो’चं उत्तर ‘जोमो’?

‘ट्रॅड वाइफ’ म्हणजे ‘ट्रॅडिशनल वाइफ’, अर्थात पारंपरिक पत्नी. करोना टाळेबंदीच्या दरम्यान या ‘ट्रॅड वाइफ’ इंटरनेटवर लोकप्रिय होऊ लागल्या. याची सुरुवात अमेरिकेत झाली, पण आता इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही ही संकल्पना लोकप्रिय होताना दिसते आहे. हा ट्रेंड म्हणजे जुन्या काळात ‘खास स्त्रियांचे’ म्हणून जे गुण आणि जी कामं अत्यावश्यक समजली जात होती, त्यांचं पुनरुज्जीवन करणं. करोनाच्या काळात अशा पारंपरिक मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रिया अधिकाधिक संख्येनं व्हिडीओ आणि रील्स समाजमाध्यमांवर टाकू लागल्या. यात त्या १९५० किंवा ६० च्या दशकातल्या स्त्रिया जसे कपडे परिधान करत, तशीच वेशभूषा करतात. म्हणजे पायघोळ किंवा फुलांचे प्रिंट असलेले फ्रॉक्स घालणं, हॅट-हातमोजे घालणं, विशिष्ट प्रकारच्या परड्या किंवा पिशव्या घेऊन बाजारहाट करायला जाणं, आदी प्रकार स्त्रिया करतात. घर व्यवस्थित कसं ठेवावं, नवरा कामावरून घरी आला की कसं नटूनसजून त्याचं स्वागत करावं, आदी विषयांवरच्या ‘टिप्स’ त्या देतात. मुलांची काळजी कशी घ्यावी, त्यांच्यासाठी घरातल्या घरात कपडे कसे शिवावेत, पारंपरिक ‘Sourdough ब्रेड’ कसा बनवावा, अशा दैनंदिन आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी त्या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतात. या स्त्रियांना ‘स्टे-अॅट-होम-मॉम’ किंवा ‘होमस्टेडिंग मॉम’ (Homesteading) असंही म्हणतात. थोडक्यात, अशा स्त्रिया, ज्या घराला आणि मुलांना सर्वप्रथम प्राधान्य देतात.

‘स्त्रीचं स्थान हे मुख्यत: घरात आणि स्वयंपाकघरात असतं,’ या मूल्यावर ठाम विश्वास असणाऱ्या या सगळ्या जणी आहेत. त्यांच्या मते मुलाबाळांची आणि नवऱ्याची काळजी घेणं हेच स्त्रीचं सगळ्यात महत्त्वाचं आणि प्राथमिक काम आहे; नव्हे तर ते निसर्गानं योजलेलं आहे. पुरुषानं कमावून आणणं आणि स्त्रीनं घर सांभाळणं हीच कामाची विभागणी योग्य आहे, त्यामुळे स्त्रीवाद हा त्यांच्या मते ‘कृत्रिम, बाहेरून लादलेला, अनावश्यक आणि निसर्गविरोधी’ आहे.

आणखी वाचा- ‘भय’भूती : भय अशाश्वतीचे

हल्लीच्या काळात ‘फेमिनिझम’ची (स्त्रीवादाची) नव्हे, तर ‘फेमिनिनिटी’ची (स्त्रीत्वाची) सर्वाधिक गरज आहे, असं त्यांचं म्हणणं. त्यामुळे या ‘मूळ स्त्रीत्वा’कडे परत जाण्याचं आवाहन त्या समाजमाध्यमांवर करत असतात. त्यालाही एका ‘चळवळी’चं रूप आल्याची चर्चा होताना दिसते. परंतु त्यात मतमतांतरं आहेत. कारण या सगळ्या ‘ट्रॅड वाइफ’ एकच धोरण जरी राबवत असल्या, तरी त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. त्यामुळे याचं चळवळीत रूपांतर होऊ शकत नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. समाजमाध्यमांवर त्यांची संख्या किती वाढते आणि त्यांना ‘फॉलो’ करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होते की नाही, यावर त्याचं यशापयश अवलंबून असेल. परंतु समाजमाध्यमांवर अशा ‘पारंपरिक पत्नीं’ची संख्या मात्र झपाट्यानं वाढते आहे, हे नक्की.

या सगळ्या स्त्रियांची विचारधारा नेमकी काय आहे, यावरही चर्चा होते. बहुतेक अभ्यासकांच्या मते त्या उजव्या- पुराणमतवादी विचारांच्या आहेत. ‘ट्रॅड वाइफ’ मात्र हा आरोप फेटाळून लावतात. त्यांच्या म्हणण्यानुसार घरगुतीपणाची, गृहजीवनाची आस असणं, कुटुंबव्यवस्थेवर विश्वास असणं, यात उजवं-डावं करण्यासारखं काय आहे?… त्यांच्या मते, या समस्त स्त्रियांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक भावना आहेत. एखादीला बाहेर जाऊन काम करायचं नसेल, पैसे कमवायचे नसतील, घरच्यांची सेवा करण्यातच धन्यता वाटत असेल, तर त्यात चुकीचं काहीही नाही. उलट त्या आपल्या मनाप्रमाणे जगत आहेत, आपलं आयुष्य कसं असावं याची निवड करत आहेत. त्यामुळे आधुनिक स्त्रीवाद स्त्रियांना घराबाहेर पडण्यास भाग पाडतो ते अन्यायकारक आहे, असं त्यांचं प्रतिपादन आहे. बाहेर काम करण्यामुळे आणि त्यामुळे पुरुषांशी बरोबरी केल्यामुळे कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत, तसंच घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे… आणि या सगळ्याला विरोध म्हणून स्त्रियांमधलं निसर्गदत्त स्त्रीत्व पुन्हा जागृत करायची गरज आहे, असं त्यांना वाटतं.

यातल्या अनेक जणी असं म्हणतात, की त्यांना राजकारणाशी देणंघेणं नाही. पण जेव्हा त्या गर्भपाताविरोधात किंवा स्त्रियांच्या हक्कांच्या विरोधात बोलतात तेव्हा ते राजकीयच असतं, हे विसरून चालत नाही. एकंदरीत ‘ट्रॅड वाइफ’ इतर कुठल्याही ऑनलाइन ‘इन्फ्लुएन्सर’प्रमाणे आपल्या सोयीनं राजकारणाचा आणि विचारसरणीचा अर्थ लावतात, असं दिसतं. त्यांच्या समाजमाध्यमांवरील ‘कंटेन्ट’साठी त्यांना तसं करत राहणं फायद्याचं ठरतं.

‘ट्रॅड वाइफ’ची काही वैशिष्ट्यंही नमूद करायला हवीत. पहिलं म्हणजे, या सगळ्यांसाठी लग्न ही बाब अत्यावश्यक आहे. तेच आयुष्याचं प्रमुख ध्येय आहे. स्त्रीसाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला मुलं होणं. इथे ‘एकापेक्षा अधिक मुलं’असं म्हणायला हवं, कारण बहुतेक ‘ट्रॅड वाइफ’ना दोन ते आठ इतकी मुलं आहेत असं दिसतं. तिसरं म्हणजे मुलांना वाढवणं आणि साफसफाई- स्वयंपाक करणं ही त्यांना प्रामुख्यानं स्त्रीची कामं वाटतात. चौथं म्हणजे त्यांना आपल्या नवऱ्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्यात वावगं वाटत नाही. संसारात बायकोचं दुय्यम स्थान त्यांनी मान्य केलं आहे.

आणखी वाचा-स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

यातल्या बहुतेक जणी गर्भपाताच्या विरोधात आहेत, घटस्फोटाच्या विरोधात आहेत. अनेक जणींवर वंशवादाचाही आरोप केला जातो, कारण त्या श्वेतवर्णीय स्त्रियांना अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचं उघड आवाहन करतात. बहुतेक जणींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अर्थातच तशी असल्याशिवाय त्या पूर्णत: घरात थांबू शकल्या नसत्या, असं सुयोग्य निरीक्षण नोंदवलं जातं. त्यामुळे त्यांचे हे सल्ले केवळ ठरावीक आर्थिक वर्गासाठीच आहेत आणि त्यांनाच ते अमलात आणणं शक्य आहे, असं म्हटलं जातं.

या सगळ्या जणींना स्त्रीवाद वेगवेगळ्या कारणांसाठी पटत नाही. काही जणी म्हणतात, की त्यांना स्त्रियांसाठीचे समान अधिकार तर मान्य आहेत, पण त्यांचा ‘गैरवापर’ करून स्त्रियांनी पुरुषांचं दमन करणं मान्य नाही. काही जणी म्हणतात, की समानता ही मतदानाच्या अधिकारापुरती सीमित असावी. काही ‘ट्रॅड वाइफ’ पैसे कमावण्याच्या विरोधात आहेत, पण काही जणी थोडेफार पैसे कमवायला हरकत नाही, असं म्हणताना दिसतात. त्यांचे टीकाकार मात्र हे सतत अधोरेखित करतात, की ‘ट्रॅड वाइफ’ना समाजमाध्यमांमधूनच चांगला आर्थिक मोबदला मिळतो. आणि तसा तो मिळावा, यासाठीच त्या विशिष्ट प्रकारचे व्हिडीओ सातत्यानं तयार करत असतात. त्यामुळे त्यांचे हे विचार खरोखरचे आहेत, की केवळ समाजमाध्यमांवरच्या प्रेक्षकांना आकृष्ट करून घेण्यासाठी घडवलेला ‘कंटेन्ट’ आहे, अशी शंका उपस्थित केली जाते. विचार केला तर यात नक्कीच तथ्य आहे, असं लक्षात येतं.

एलेना केट पेटिट ही अमेरिकी गृहिणी या चळवळीची अध्वर्यू मानली जाते. तीही अशीच एक आधुनिक स्त्रीवादाला कंटाळलेली, आपल्यातल्या स्त्रीत्वाला जागृत करायला आसुसलेली ‘ट्रॅड वाइफ’. समाजमाध्यमांवर व्हिडीओ बनवण्याबरोबरच ती ब्लॉग लिहिते. शिवाय तिची या विषयावरची दोन पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. हल्ली मात्र तिनं तिची मतं थोडीशी बदललेली आहेत. ती नव्या ‘ट्रॅड वाइफ’ ट्रेंडकडे संशयानं पाहते. कारण तिला असं वाटू लागलं आहे, की या तरुण मुली केवळ प्रेक्षकांना दाखवण्यासाठी काही एक विशिष्ट मूल्यव्यवस्था उचलून धरत आहेत. पण प्रत्यक्षात त्या मूल्यांचं महत्त्व त्यांना समजलेलं नाही. त्यामुळे लोकांपर्यंत फक्त त्यांचं सौंदर्य पोहोचत आहे, पण सार पोहोचत नाही. या गोष्टीचा एलेना केट पेटिटला त्रास होऊ लागला आणि तिनं तिचा समाजमाध्यमांवरचा वावर पूर्णत: थांबवून टाकला. आता ती केवळ ब्लॉग्ज लिहिते. हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते, की तिनं पैशांचा थोडाफार संचय करून ठेवलेला आहे. जर घटस्फोट किंवा नवऱ्याचा अकाली मृत्यू झाला, तर पैसे जवळ असावेत असं तिला आता वाटतं. कदाचित हे वागणं ‘ट्रॅड वाइफ’च्या तत्त्वाला अनुसरून नाही, असंही ती म्हणते. त्यामुळे या ‘चळवळी’ची एकूणच दिशा आणि भवितव्य काय, याबाबत सध्या वादविवाद आहेत.

इथे हेही सांगायला हवं, की पूर्णवेळ गृहिणी किंवा आई व्हावंसं वाटणं म्हणजे लगेच ‘ट्रॅड वाइफ’ होणं नव्हे. परंतु पत्नी किंवा आई होणं हेच आपलं आद्याकर्तव्य आहे असं मानणं आणि त्यापायी आधुनिकतेला विरोध करणं, हे ‘ट्रॅड वाइफ’ असण्याचं लक्षण आहे.

शिवाय अशा विचारांमुळे आपण एकल, अविवाहित किंवा समलिंगी स्त्रियांकडे करुणेनं अथवा तुच्छतेनं बघत असू, तर ती समस्या आहे. या सगळ्या बाबी ध्यानात घेऊन सतत आत्मपरीक्षण करत राहणं महत्त्वाचं आहे!

gayatrilele0501@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stree vishwa virtual trend of trad wife mrj
Show comments