प्रभा गणोरकर – prganorkar45@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या वयाच्या, स्थितीतल्या, वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक स्तरांतून आलेल्या स्त्रियांच्या मनोविश्वाशी एकरूप झाल्याप्रमाणे गंगाधर गाडगीळ स्त्रीचित्रण करतात. सुमारे साठेक वर्षे त्यांनी सातत्याने कथालेखन केले. त्यातलीच ‘उंट आणि लंबक’ ही एक कथा.  कृष्णाबाईची. गाडगीळांनी या कथेत तारुण्य उलटून जात असलेल्या व ते पकडू पाहणाऱ्या स्त्रीच्या मनातली खळबळ प्रभावीपणे व्यक्त केली आहे. प्रौढ स्त्रीच्या मनाचा हिंदोळ व्यक्त करणारे गाडगीळ हे पहिले कथाकार  होत.

गंगाधर गाडगीळांनी सुमारे साठेक वर्षे सातत्याने कथालेखन केले. त्यांच्या कथांमध्ये विविध प्रकारची स्त्री-पुरुष-मुले वावरताना आढळतात. मानवी वृत्तिप्रवृत्ती,  समाजनिर्मित नियम, संकेत, मूल्यव्यवस्था यांच्यासह विविध स्थितीत जगणाऱ्या माणसांच्या क्रियाप्रतिक्रियांचे असंख्य रंग त्यांच्या कथांमध्ये दिसतात. माणसाच्या असंज्ञ मनाच्या गूढ छटा त्यात मिसळलेल्या असतात. त्यांच्या या कथासृष्टीत विविध स्थितीतल्या, विविध वयोगटातल्या स्त्रिया आहेत. अगदी थोडक्या रेषांनी गाडगीळांनी त्यांची चित्रे रेखाटलेली आहेत.

त्यांच्या ‘सरळ रेषा’ या कथेतल्या अनुताईने म्हसकर मास्तरांबरोबर संसार केला खरा, पण त्या कधीच सुखी झाल्या नाहीत. नवऱ्यानं अंगावर एक फुटका मणी घातला नाही की नेसायला झुळझुळीत पातळ दिलं नाही. अहेवपणीदेखील डोईत फूल घालायची चोरी होती.. त्यांना आपला नातू पाहायचा असतो, त्याला न्हाऊमाखू घालायचे असते. तेवढादेखील ओलावा त्यांना मिळत नाही. गाडगीळांच्या कथांमधून अशा स्त्रीची बहुविध रूपे दिसतात. आक्रमक, छळणाऱ्या, भरकटलेल्या, स्वत:ला काय हवे आहे ते न कळलेल्या, विचित्र, पुरुषाला बुळा बनवून टाकणाऱ्या, त्याची फसवणूक करणाऱ्या, लबाडी, चोरी, उचलेगिरी करणाऱ्या, मूर्ख, मनस्वी, भांडकुदळ, पोरकट-थिल्लर, मद्दड अशाही स्त्रिया गाडगीळांनी रंगवलेल्या आहेत. पण त्यांचे चित्रण एकरंगी वा सपाट नाही. मानवी वृत्तिप्रवृत्तींची वळणे, मनाचे सूक्ष्म कंगोरे, आणि स्वभावातली अतक्र्यता या सर्वाच्या चित्रणात आहे. हिडीसफिडीस करणाऱ्या, वसकन ओरडणाऱ्या सुना, कुत्सित बोलणाऱ्या शेजारणी, लहरी, उद्वेगलेल्या, कर्कश, मतलबी, आक्रस्ताळ्या, मत्सरी, लुच्च्या, बालिश, स्वार्थी, हावरट, तोंडाळ, बडबडय़ा, चावट अशाही बायका गाडगीळांच्या कथांमध्ये दिसतात. पण त्यांच्याप्रमाणेच हळव्या, सोशीक, प्रेमळ, निमूट, सरळ मनाच्या, भाबडय़ा अशा स्त्रियाही त्यांनी रंगवलेल्या आहेत. ‘दोघी’, ‘तलावातले चांदणे’, ‘कडू आणि गोड’, ‘खाली उतरलेलं आकाश’, ‘बाकी उरलेलं शून्य’ अशा कथांमधून स्त्रीचे प्रसन्न, आकर्षक, मोहविणारे, तृप्त आणि तृप्ती देणारे व्यक्तित्वही गाडगीळांनी साकार केले आहे.

गाडगीळांच्या कथांमधून येणाऱ्या या बहुविध, असंख्य प्रकारच्या स्त्रियांच्या चित्रणावरून गाडगीळांचे कथाकार या नात्याने सामर्थ्य ध्यानात येते. विविध वयोगटातल्या, स्थितीतल्या स्त्रियांचे चित्रण त्यांनी श्रेष्ठ कलावंताच्या संवेदनक्षमतेने केलेले आहे. गाडगीळांनी स्त्रियांचे जग फार बारकाईने न्याहाळले आहे. स्त्रियांच्या संस्कृतीला ते दुय्यम मानीत नाहीत वा कमीही लेखत नाहीत. स्त्रिया संसारासाठी करीत असलेली अनेक बारीकसारीक कामे गाडगीळांच्या नजरेतून निसटलेली नाहीत. त्यांच्या भावविश्वाचे सूक्ष्म कंगोरे ते लहानसहान तपशिलातून रेखाटतात. मानवी मनाची गुंतागुंत, अतक्र्य वळणे ते अनपेक्षितपणे समोर उभी करतात. ‘सरळ रेषा’ या कथेतल्या, सून बाळंत होणार याची उत्सुकता असणाऱ्या अनुताई, त्यासंबंधीची बातमी देणारे पत्र आल्याचे कळताच, जागच्या जागी देवीला नमस्कार करतात. ‘सुधा’ कथेत घरी हळदीकुंकू असे तेव्हा आंब्याची डाळ पुरते की नाही अशी चिंता करणारी सुधा, ‘भागलेला चांदोबा’तली गृहिणी, घरी गेल्यावर चटकन पिठलेभात करायचा, पण मुलाचे वडील लोणच्याच्या फोडीकरिता अडून बसतील, असा विचार करते. ‘आय अ‍ॅम सॉरी’ या कथेतल्या रेखाला वाटते, ‘एखाद्या तरण्याताठय़ा बाईला भरलेल्या संसारातून घेऊन जायचं म्हणजे काय? मग कोण करणार होतं तिच्या मुलाबाळांचं? देव येऊन शिवणार होता का त्यांची तुटलेली बटणं?’

वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या वयाच्या, स्थितीतल्या, वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक स्तरांतून आलेल्या स्त्रियांच्या मनोविश्वाशी एकरूप झाल्याप्रमाणे गाडगीळ स्त्रीचित्रण करतात. ‘उंट आणि लंबक’ ही त्यांची अशीच एक कथा आहे. कृष्णाबाई ही या कथेतली व्यक्तिरेखा. तीन मुलांची आई असलेली, संसारात चांगली रमलेली, सारे जीवन संसारासाठी वेचणारी ही स्त्री. एके दिवशी रघुनाथरावांचा दूरचा नातेवाईक, अविनाश, त्यांच्या घरी येतो. पोरवयातला. उत्कट, बुजरे भाव चेहऱ्यावर असलेला. तो त्यांच्या समोर बसलेला असताना कृष्णाबाईंच्या उन्मादक सौंदर्याने तो काहीसा चाळवला गेल्याचे त्यांच्या ध्यानात येते. धीटपणे त्यांनी सरळ त्याच्या डोळ्यांत पाहिले आणि पाहता पाहता त्या नव्या उसळत्या कामवासनेचे आव्हान त्यांच्या शरीराने स्वीकारले.. वास्तविक इतकी वर्षे खपून त्यांनी आपला संसार उभा केला होता. नवरा, मुले यांना सूक्ष्म बंधनांनी स्वत:भोवती घट्ट बांधून घेतले होते. संसाराला स्थिरता आणि बळकटी आणली होती, त्यातच जीवनाचे सार्थक मानले होते. आणि तरीही त्यांच्या मनाने आज असा उठवळपणा केला होता. क्षणभर का होईना हे सारे सोडून एका भगभगत्या भडकत्या ज्वालेसमोर झेप घ्यायला त्या तयार झाल्या होत्या. पण काही वेळातच रघुनाथराव, मुले येण्याची वेळ झाली आणि त्या आपल्या कामात गढून गेल्या. परंतु त्यांचे मन बदलले होते. कठोर झाले होते. एक प्रकारच्या तिऱ्हाईतपणाने त्या आपल्या कौटुंबिक जीवनाकडे पाहत होत्या. त्या परकेपणाच्या जाणिवेने त्यांना भीती वाटू लागली.

कृष्णाबाईंच्या नकळत त्यांच्या मनातल्या कुठल्या तरी प्रवृत्तींना पूर आला होता. आणि बेफामपणे त्या आपल्याबरोबर कृष्णाबाईंना घेऊन चालल्या होत्या. कृष्णाबाईंना वाटले की दुसरी कोणी तरी कृष्णाबाई आपल्या हृदयात झोपली होती. आता ती एकदम जागी झाली आहे. आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ताबा घेते आहे.  त्या दोन दिवसांत कृष्णाबाई पूर्णपणे बदलून गेल्या.

त्यांना पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटू लागले. त्यांच्या हालचाली चपळ आणि धांदरटपणाच्या झाल्या. त्यांची वेशभूषा, केशरचना अल्लड तरुणीला साजेशी झाली. त्यांना अविनाशबरोबर पळून जावेसे वाटू लागले. त्यांनी आपला बेत अविनाशला सांगितला. कृष्णाबाई जणू बेहोश झाल्या होत्या. त्या अविनाशपुढे लाचार झाल्या. त्यांनी त्याला स्वत:ला समर्पित केले. त्याने केलेला छळ सहन केला. पण अविनाशला हे धाडस पेलवणारे नव्हतेच. तो अचानक निघून गेला. कृष्णाबाईंना धक्का बसला. त्यांची निराशा झाली. पण त्यांनी त्याला दोष दिला नाही. त्यांना स्वत:चीच चीड आली. तो असा कमकुवतपणा करेल हे आपल्याला आधी समजले नाही. हा स्वत:चा मूर्खपणा त्यांना असह्य़ झाला..

गाडगीळांना या कथेत तारुण्य उलटून जात असलेल्या व ते पकडू पाहणाऱ्या स्त्रीच्या मनातली खळबळ व्यक्त करायची आहे. आपल्याला काय होते आहे हे न कळणाऱ्या, प्रेमाचे खूळ लागलेल्या, वेडय़ा धाडसाच्या नादात गुंगणाऱ्या, अल्लड वयाकडे पुन्हा परतावे असे वाटण्याचे हे चाळीस-पंचेचाळिशीतल्या स्त्रीमनाचे हेलकावणे, अस्थिर होणे गाडगीळांनी या कथेत साकार केले आहे.

सुखी संसारात रमलेल्या, जाणत्या वयाची मुले असणाऱ्या प्रौढ स्त्रीच्या मनाचा हिंदोळ व्यक्त करणारे गाडगीळ हे पहिले कथाकार होत.

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व स्त्रीत्वाचे रूपबंध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krishnabai character from book unt ani lambak by gangadhar gadgil