प्रभा गणोरकर
एक दिवस शोभाला दिसले, साबणे परत आला आहे. सिगरेटचा धूर ऐटीत नाकातून सोडत त्याने एका देखण्या मुलीला शुकशुक केले. शोभावर झालेल्या गोष्टीची ती पुनरावृत्ती होती.. साबणे संपत नाहीत. साबणे संपत नसतात.. आज आपल्या आजूबाजूला असंख्य मुली, तरुणींच्या वाटय़ाला असलं प्राक्तन आलेले आहे.. आपण न केलेल्या गुन्ह्य़ाची शिक्षा आयुष्यभर भोगायची.. जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘हिरवे रावे’ या संग्रहातील ‘शिक्षा’ कथेतील शोभा याच मुलींचं प्रतिबिंब आहे..
हा लेख लिहायला घेतला तेव्हा एका वृत्तवाहिनीवर स्त्रियांच्या असुरक्षिततेच्या संदर्भात भारत पहिल्या क्रमांकावर आहे का, या प्रश्नावर काही स्त्रिया चर्चा करीत होत्या. स्वत:ला अथवा मत्रिणीला आलेले अनुभव सांगत असूनही हे विधान पन्नास टक्केच बरोबर आहे, असे त्यांचे मत होते. शिवाय असे पहिल्या क्रमांकावर भारताला आणणे हे कृत्य एक जागतिक संस्था करीत होती आणि त्यामुळे आपला महान संस्कृती असलेला भारत देश जगात बदनाम केला जातो आहे, याचेही दु:ख त्या व्यक्त करीत होत्या.
ती चर्चा ऐकताना मी स्वत:चे मत स्वत:शीच मांडले ते असे की, स्त्रियांच्या असुरक्षिततेच्या बाबतीत भारताला शंभरपैकी एकशेदहा गुण द्यायला हवेत आणि सर्वात वरची ‘ए प्लस’ श्रेणी भारताला मिळाली आहे, हे गौरवाने जाहीर करायला हवे आणि तेही भारतातील स्त्रियांनी. भारतातल्या स्त्रियांची असुरक्षितता ती भ्रूण स्वरूपात अस्तित्व धारण करते त्या क्षणापासून सुरू होते. नंतरच्या काळात कमीत कमी तीन वर्षांची, शेजारी खेळायला जाऊ शकणारी, चॉकलेट आवडणारी, कुणाकडेही पाहून गोड हसणारी अशी ती झाली की असुरक्षिततेचे योग्य वय सुरू होते. जर त्यापूर्वीच तिला जन्मल्यानंतर गटारात, उकिरडय़ावर, नदीनाल्यात घरच्यांकडून फेकले गेले नाही, तर. नंतर शेजारीपाजारी, काका, मामा, सावत्र बाप, कुटुंबाच्या ओळखीचा एखादा पुरुष, घरात काम करणारा नोकर, हॉस्पिटलातला हरकाम्या, जमेल तशी संधी साधून, जमेल त्या ठिकाणी एकटय़ाने किंवा समूहाने तिच्यावर तुटून पडायला ती योग्य वयाची आहे असे गृहीत धरतो व संधी शोधत राहतो. ती स्त्रीिलगी आहे एवढे निमित्त त्यांना पुरते. नवरा दूर नोकरीवर गेला असेल तर दीर, सासरे अशा नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, खेडय़ात कळप सोडून एकटीच कुठे जात असेल तर, बसमध्ये, रेल्वेत, लोकलमध्ये, रस्त्यावर, रात्रीबेरात्री, दिवसाढवळ्या, बाईच्या आकाराचे जरी कुणी आढळले तरी अल्पवयीन या गोंडस विशेषणापासून ते अगदी शरीर लुळे होईपर्यंतच्या वयाच्या कोणत्याही पुरुषमाणसाला ती आयतीच सापडते. याशिवाय देवाला मुली सोडल्या जातात, त्या सार्वजनिक मालमत्ता म्हणून, विधवा म्हणून, मोलकरणी म्हणून, शिक्षिका, विद्यार्थिनी, शिकवणीला आलेल्या मुली, दवाखान्यात सेवा करणाऱ्या, केव्हाही तावडीत सापडू शकतात. ही असुरक्षिततेची कमाल श्रेणी आहे, बाईवर, तिच्या शरीरावर प्रत्यक्ष होणाऱ्या बळजबरीची. त्याशिवाय खेडय़ातले चव्हाटे, शहरातले नाके, चाळीतले गल्लीबोळ, ऑफिसातली टेबले, शाळेतल्या गावगप्पांचे फड, चहाच्या टपऱ्या, पानांचे खोके, हॉटेल, ओल्या पाटर्य़ा अशा ठिकाणी जमणाऱ्या रिकामटेकडय़ा पुरुषांच्या जिभा बाई या विषयावर वळवळत असतात. दुसरे काही जमणे शक्य नसले तर सार्वजनिक ठिकाणी संधी साधून तिला चिमटे काढणे, अवयवांना स्पर्श करणे, टक लावून पाहणे, अश्लील हावभाव करणे, खुणा करणे, लिंगप्रदर्शन करणे, हे प्रकार सरसकट सुरू असतात. स्त्रीच्या मनावर या प्रकारांचे भयानक आघात होतात, स्त्रीचे शरीर घेऊन जन्माला आल्याच्या गुन्ह्य़ावर जणू काही शिक्कामोर्तब करीत तिला आपल्या रंजनाची, वासनेची, विकृतीची शिकार बनवणे हे भारतातल्या लक्षावधी पुरुषांचे महत्त्वाचे उद्योग आहेत. त्यात त्यांना आसुरी आनंद मिळतो. अनेक पुरुष लेखकांनी याप्रकारे स्त्रीच्या शरीरावर आणि मनावर होणाऱ्या आघातांचे, तिच्या उद्ध्वस्ततेचे, तिला होणाऱ्या मानसिक त्रासाचे प्रत्ययकारी वर्णन केले आहे. जी.ए., अरिवद गोखले, अलीकडच्या काळातले रंगनाथ पठारे ही याक्षणी चटकन आठवलेली नावे.
जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘हिरवे रावे’ या संग्रहात ‘शिक्षा’ या शीर्षकाची कथा आहे. या कथेतील तरुण मुलगी आहे शोभा नाईक. कथा सुरू होते तेव्हा शोभा नाईक शाळेच्या ऑफिसमध्ये शाळा सुटण्याची वाट पाहात बसली आहे. कुणीतरी साबणे या नावाचा उच्चार करतं आणि शोभा दचकते. तिचा चेहरा पडतो. अनेक धागे सहजच गुंफत एखाद्या वस्त्रासारखी जीएंची कथा विणली जाते.. अरिवद या तरुणाचे शोभावर प्रेम होते. तो तिला जाई म्हणायचा. किंचित जोराने स्पर्श करताच सुगंधी सूर्यप्रकाश बाहेर यावा अशी तिची कांती होती. अरिवद तिचे ‘जाईपण’ घेऊन तिच्या आयुष्यातून निघून गेला, कारण शोभा कोर्टात गेली होती, तिचे नाव वर्तमानपत्रात आले होते, लोक कुजबुजू लागले. कोर्टात खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच तो तिला टाळू लागला होता. त्याने तिची सारी पत्रे रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून दिली आणि चुटकीसरशी सारे संपवून शोभाच्या मत्रिणीशी लग्न केले. आज आता शोभा या लहानशा कळकट असह्य़ गावातल्या शाळेत शिक्षा भोगत जगते आहे. निव्वळ दिवसाच्या मापाने मोजलेला आंधळ्या तासांचा ढिगारा. नामवाक्ये, नागरिकशास्त्र, पिशवीभर आणलेली निबंधांची धुणावळ.. एवढेच तिचे आयुष्य उरले होते. ती, आई आणि दादा आपापल्या लहान तुरुंगात बसून शिक्षा भोगताहेत.. ते साबणेमुळे..
शोभा शाळेत कामाला लागली त्या वेळी शाळेसमोरच साबणेचे पानपट्टीचे दुकान होते. सुरुवातीला त्याच्याकडे तिचे लक्ष गेले नाही. एकदा ती शाळेकडे येत असताना गेटजवळ येताच त्याने शुकशुक केले. तिने चमकून मागे पाहताच त्याने डोळ्यांची हालचाल केली. सारा दिवस ती शरमेने चिंब होऊन वावरत होती. शाळेला जायचे म्हणजे तिला आता शिक्षाच वाटू लागली. तो एकदा तरी शुकशुक करायचा व मनावर पडलेली ती घाण घेऊन शोभा सारा दिवस मन कुरतडत वर्गावर्गात हिंडत दिवस संपवायची.. मग ती पत्रे यायला सुरुवात झाली. साधी, एक्सप्रेस, रजिस्टर. एक-दोन तिने वाचून पाहिली. त्यातील ओंगळपणाने तिचे मन खचून गेले. एकदा तो तिच्या मागोमाग बसस्टॉपपर्यंत आला, तिच्या अगदी जवळ आला, म्हणाला, ‘वास छान आहे तुझा. पत्रे मिळाली की काय वाटते वाचून?’ त्या रात्री ती जेवली नाही. तिने मोठय़ा प्रयत्नाने वडिलांना विचारले, ‘मी दुसऱ्या एखाद्या गावात नोकरी करू का? मला आता इथं राहणं नको वाटतं.’ पण तिला त्यामागचे कारण सांगवेना. सारे असह्य़ झाले तेव्हा तिने आईला सगळे सांगितले. हा प्रकार वर्षभर सुरू आहे हे कळताच दादांनी पोलिसात जायचे ठरवले. त्यांनी जाऊ नये म्हणून शोभाने त्यांच्या विनवण्या केल्या, पण त्यांनी ऐकले नाही. खटला सुरू झाला. साबणेने आपण सारी पत्रे लिहिल्याचे कबूल केले, पण तिच्याकडूनही आपल्याला पत्रे येत, ती आपल्याला भेटत असे, आपल्या पत्रातील सारी वर्णने खरी आहेत, असेही सांगितले. कोर्टात वकिलांनी साबणेची पत्रे मोठय़ाने वाचून दाखवली. तेव्हा सारे शरीर जळत असल्याप्रमाणे शोभा थरथरू लागली. अंगावरील एकेक कपडा काढला जावा त्याप्रमाणे ती व्याकूळ झाली.. शोभाचे आयुष्य बदलून गेले. तिच्या तासाच्या आधी मुले फळ्यावर काही अचकट-विचकट लिहू लागली. रस्त्यावर बाहेर पडले की असंख्य डोळे तिच्या अदृश्य जखमांवर माशांप्रमाणे उतरत. साबणेच्या नुसत्या उल्लेखाने भूतकाळाच्या धुळीने तिचे दिवस भरून जाऊ लागले.
एक दिवस तिला दिसले, साबणे परत आला आहे. सिगरेटचा धूर ऐटीत नाकातून सोडत त्याने एका देखण्या मुलीला शुकशुक केले. तेच लालसर ओले हसणे, पिचकारीसारखे फेकणे. ती मुलगी शरमेने वितळल्यासारखी झाली व गुन्हेगाराप्रमाणे खालच्या मानेने निघून गेली.
साबणे संपत नाहीत. साबणे संपत नसतात. बलात्कार झाल्यावर बलात्काऱ्याने शरीराचे तुकडे करून फेकले तरच, नाहीतर त्या जखमा घेऊन आयुष्यभर जगायचे. अलीकडे तर मुलींचा पाठलाग करणे, त्यांनी विरोध केला तर त्यांच्यावर अॅसिड फेकणे, सुरे दाखवणे, भोसकणे.. कोणी पुरुष आपल्या मागावर आहे या जाणिवेने मुली पळत सुटतात, वरच्या मजल्यावरून उडी मारून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्नात मरतात. पुरुषाच्या सावलीने भयभीत होऊन किंचाळणारी स्त्री हे काळ्या रेषांतील चित्र हे आपल्या देशाचे प्रतीक आहे की काय!
prganorkar45@gmail.com
chaturang@expressindia.com