प्रभा गणोरकर prganorkar45@gmail.com
मला वर्षभर भेटत गेलेल्या स्त्रियांची ही व्यक्तिमत्त्वे त्या त्या लेखकांनी ज्या बारकाव्याने उभी केलेली आहेत, त्याबद्दल किती तरी लिहिता येईल. पण वेळेच्या आत, आटोपशीर, योजिलेल्या शब्दमर्यादेत लिहिणे हे आव्हानही होते. ‘लोकसत्ता’ या दर्जेदार दैनिकाने लिहिण्यास सांगणे हा माझ्यासाठी गेल्या वर्षीचा आनंददायी क्षण होता.
पाहता पाहता वर्ष संपले. इतर अनेक वर्षांच्या तुलनेत माझे हे गेले वर्ष अपूर्व अशा आनंदात गेले. वयाच्या आठव्या वर्षांपासून माझी वर्षेच्या वर्षे वाचनाच्या आनंदात गेली असली तरी या वर्षांतले माझे वाचन वेगळा आनंद देणारे होते. कारण या वाचनाच्या निमित्ताने मी हा वर्षभराचा काळ अनेक स्त्रियांच्या आणि त्यांच्या निर्मात्यांच्या सहवासात घालवला.
स्त्री नावाच्या मानवप्राण्याविषयीचे आकर्षण, तिच्या गूढ आणि अतक्र्य स्वभावाविषयीचे कुतूहल, मानवी वृत्तींनुसार होणारे तिचे वर्तन, त्याशिवाय पुरुष, समाज, संस्कृती या परिवेषाने निर्माण केलेल्या अनेकानेक संकेतांमुळे होणारी तिची कोंडी, कोणत्याही मानवाला आवरता येत नाहीत असे मोह, लोभ, वासना यांनी आयुष्यात निर्माण होणारे स्खलनाचे, भरकटण्याचे क्षण, तिचा त्याग, सेवाभाव, मातृत्वाची इच्छा, अवचित येणारे आत्मभान आणि जाणवलेली अस्तित्वाची निर्थकता.. जणू स्त्रीत्वाच्या लोलकावर प्रकाश टाकल्यावर निर्माण होणारे अद्भुत आणि अनोखे रंग निरखण्यात गुंतून गेलेले, ती आणि तिच्या भोवतीची माणसे यांच्या संबंधांमधून निर्माण झालेले जीवननाटय़ रंगविण्यात तन्मय झालेले प्रतिभावंत आणि त्यांनी निर्मिलेल्या स्त्रिया यांच्या सहवासामुळे हा वर्षभराचा काळ नुसता समृद्ध करणाराच ठरला नाही, तर जीवनाचे वेगळे भान आणून देणारा, आतून परिपक्व करीत नेणारा ठरला.
पुरुष लेखकांनी स्त्रियांचे चित्रण कसे केले आहे हे जाणून घेत विशिष्ट दृष्टी ठेवून वाचणे, त्यावर विचार करणे, आपल्या कलाकृतीतील स्त्रीपात्राचे चित्रण करण्यात लेखकाचा काय हेतू होता, स्त्रीजीवनाची इतिहासात लिहिली गेलेली संहिता काळानुसार बदलली का, की काही मानवी प्रवृत्ती आदिम काळापासून तशाच राहिल्या हे पाहणे या कक्षेत हे सदर फिरत ठेवायचे असल्याने निवडलेल्या कलाकृतींचे यशापयश जोखणे किंवा समीक्षा करणे बाजूला ठेवले. शिवाय शब्दांची मोठीच मर्यादा होती! ९०० ते १००० शब्द मला नेहमीच कमी पडले. जेवढे जाणवले होते ते आटवूनच मांडावे लागले. कधी कधी लांबलेला लेख पुढच्या पानावर किंवा पुढच्या अंकात टाकावा लागला.
या सदर लेखनासाठी ‘चतुरंग’ला उत्साहाने होकार दिल्यावर प्रथम यादी केली ती लेखकांची. हरिभाऊ, वामन मल्हार, केतकर, पु. भा. भावे, अरिवद गोखले, गंगाधर गाडगीळ, जी. ए. कुलकर्णी हे चटकन आठवणारे लेखक. पण टॉलस्टॉय, शेक्सपियर, डोस्टोएवस्की, इब्सेन, फ्लॉबेर, शरच्चंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ, ओरहान पामुक असे कधीही न विसरता येणारे लेखकही हाका मारू लागले. नंतर उभा झाला यक्षप्रश्न पुस्तके मिळवण्याचा. हे सदर काही जुन्या आठवणींवर विसंबून चालणारे नव्हते. प्रत्येक पुस्तक पुन्हा वाचल्याशिवाय ही स्त्रीपात्रे लेखातून उभी करणे अशक्य होते. त्यासाठी स्वत:चे घर, अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातील वाचनालय पुरेसे नव्हते. म्हणून मग मुंबईला दोन-चार खेपा टाकून नायगावच्या ग्रंथसंग्रहालयात बसून तिथल्या तत्पर कर्मचाऱ्यांनी आनंदाने क्षणार्धात काढून दिलेली पुस्तके दिवसभर वाचून टिपणे काढून घरी परतून लेख लिहिले. संग्रहालयात अकुलीना, देवदास, चांगुणा, मंजुळा ही पुस्तके सापडली. आमचे धुवांधार वाचकस्नेही गणेश कनाटे यांनी भगवतीचरण वर्मा, शरच्चंद्र, जैनेंद्रकुमार यांची सहसा न सापडणारी पुस्तके स्वत:च्या संग्रहातून काढून हाती ठेवली. इस्मत चुगताईंवरचा लेख लिहिण्यासाठी त्यांनी कुठून कुठून मागवून त्यांच्या कादंबऱ्या आणि ‘लिहाफ’ हा कथासंग्रह मला पोस्टाने पाठवला. अमरावतीच्या सुहृद
डॉ. विजया डबीर यांचा ग्रंथसंग्रह मोठा. त्यांनी ‘घरे बाइरे’ हे रत्न आपल्या खजिन्यातून काढून दिले. या सर्वाच्या मदतीशिवाय हे सदर लेखन वर्षभर चालवणे शक्य झाले नसते.
पुढचा यक्षप्रश्न वेळेच्या आत लेख रवाना करण्याचा. हा घरातल्या धर्मराजाने सोडवला. माझे सारे लेखन आखलेल्या कागदावर काळ्या शाईच्या पेनने लिहिलेले. वेळ मिळेल तसे कच्चे, अर्धकच्चे, पूर्ण असे ताव लिहून ठेवायचे. आपल्या व्यस्त जीवनक्रमातून वेळ काढून वसंतराव कम्प्युटरचा कीबोर्ड समोर ओढून लेख टाइप करून ठेवीत. कधी खोडाखोड केलेले कच्चे टिपण हातात घेऊन मी त्यांना सलग मजकूर डिक्टेट करीत असे. पुन्हा त्यावर माझी एक नजर टाकून झाली की पीडीएफ फाइल करून ती ‘चतुरंग’ला रवाना करणे हे मोठेच काम त्यांनी केले. त्यामुळे मी हाताने लिहिलेला मजकूर जुळवून घेण्याचे काम संपादक मंडळींना करावे लागले नाही.
सदर लेखन मी खूपदा केले. पण लेखनाला भरभरून प्रतिसाद मिळण्याचा आनंद मी प्रथमच अनुभवला. सुमारे शंभरेक लोकांनी ईमेलवरून लेख आवडल्याचे मला सांगितले. एकाने मला ‘चित्रलेखा’वर लिहिला तसा ‘गाईड’वरही लिहा अशी सूचना केली, तर एका वाचकाने मला ‘पथेर दाबी’मधला अपूर्व रंगूनला जाताना जो संदेश नावाचा पदार्थ खातो तो कोणता हे विचारले होते. मी त्याला आनंदाने संदेशबद्दल माहिती दिली, आणि माहिमला संदेश कुठे मिळतात ते सांगितले. भेटणाऱ्या अनेक स्नेह्यांनी लेख आवडल्याचे सांगून प्रोत्साहन दिले.
या सदरात जेवढे लिहिले तेवढय़ाने माझे मन भरले नाही. शेक्सपियरचे ‘मॅकबेथ’, टॉलस्टॉयचे ‘अॅना कॅरेनिना’, खालिद हुसेनीचे ‘अ थाऊजंड स्प्लेंडिड सन्स’, जीएंच्या कित्येक कथा अशा पछाडणाऱ्या अनेक कलाकृतींमधल्या स्त्रियांवर लिहिणे राहून गेल्याची हुरहुरही लागली आहे.
मला वर्षभर भेटत गेलेल्या स्त्रियांची ही व्यक्तिमत्त्वे त्या त्या लेखकांनी ज्या बारकाव्याने उभी केलेली आहेत, त्याबद्दल किती तरी लिहिता येईल आणि या लेखकांच्या महत्तेबद्दलही खूप सांगता येईल. पण सदर लेखन म्हणजे कलाकृतींच्या रसग्रहणाचा वर्ग नव्हे हे भान ठेवणे वर्गात शिकवण्याची सवय लागलेल्या मला बरेच कठीण गेले. सदर लेखन ही एक शिस्त असते. वेळेच्या आत, आटोपशीर, योजिलेल्या शब्दमर्यादेत लिहिणे हे आव्हानही असते. मी निवडलेल्या लेखनाच्या कक्षेमुळे ही शिस्तही सांभाळावी लागली. ‘लोकसत्ता’ या दर्जेदार दैनिकाने लिहिण्याची सूचना करणे हा गेल्या वर्षीचा आनंददायी क्षण होता. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते.
(सदर समाप्त)
chaturang@expressindia.com