कौतिक ही मूर्तिमंत जिगीषा आहे. विपरीत स्थितीवर मात करण्याची तिची जिद्द वेळोवेळी दिसते. पण ती पुरणार तरी किती आणि कुठवर? परिस्थितीने आणि नियतीने पराभूत करूनही कौतिकचा मात्र पराभव झालेला नाही..

विदर्भातील लेखक उद्धव शेळके (१९३१-१९९२) यांच्या ‘धग’ या ग्रामीण कादंबरीतील कौतिक ही एक अविस्मरणीय स्त्री-व्यक्तिरेखा आहे. विदर्भातील मोलमजुरी करून हातातोंडाची गाठ पडण्यासाठी अविरत अहोरात्र कष्ट करणाऱ्या हजारो माणसांपकी ती एक आहे. या कादंबरीत विदर्भातील, कृषिजीवनाशी निगडित असलेले, ऋतुचक्राशी बांधलेले जीवन लेखकाने बारकाईने रंगविलेले आहे. कौतिक कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. तिच्या दैनंदिन जीवनातल्या असंख्य तपशिलातून शेळके यांनी बाईपणाच्या विविध छटा प्रकट केल्या आहेत. जगण्याच्या रामरगाडय़ाला करकचून बांधलेली ही बाई अशिक्षित आहे, पण एक उपजत शहाणपण तिच्यात आहे.

नवरा महादेव िशपी आहे. बापाशी न पटल्याने तो बायकोच्या माहेरी येऊन बसतो. पण मेव्हण्याशी कुरबुरी होऊन तो तिथून बाहेर पडायचे ठरवतो. ‘काऊन का जी नं का, माह्य़ावालं इथिसा मनच लागत नाही.’ म्हणून तो गाव सोडायचे ठरवतो. त्याच्याबरोबर भीमा, नामा या दोन मुलांसह कौतिकही माहेर सोडते. ‘तुमी तिथं मी- तुमी गवत कापान तं मले पेंडी बांधाची कायची सरम आये?’, असे तिचे म्हणणे आहे. ‘खानेवाल्याईचं नाव दान्यादान्यावर लेहलं अस्तं. फिकर करनेवाला थो वर आये,’ असे म्हणून महादेव निवांत असतो. तो आळशी आहे. तहान लागल्यावर आड खांदणारा महादेव कौतिकने डिवचल्याशिवाय, ‘काई कामाधंद्याचं पाहान का बस,’ असे म्हटल्याशिवाय जागचा उठत नाही. ‘त्याला निंदाले जाची सरम लागते. आन् डवरा हान्ता येत नाई.’ पेरणी, िनदण, कापूस वेचणे, तुरी सोंगून उपटणे, हंगाम ओसरल्यावर सरवा वेचायला जाणे, पावसाळ्याची बेगमी म्हणून लाकूडफाटा वेचून उडवा भरून तो शेणाने लिंपून ठेवणे अशी दिवसामासाची शेकडो कामे कौतिक करत असते. शिवाय घरचे सडासारवण, भाकऱ्या बडवणे, शेजारणीच्या बाळंतपणात रात्र जागून काढणे, दिवाळी, पोळा असे सण जमेल तसे हौसेने साजरे करणे असे तिचे अखंड सुरू असते. ती काही मेणाबेगडाची नाही. कामाला वाघ आहे. तिच्यात हिंमत आहे. परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद आहे. स्वाभिमान आहे. माहेर सोडल्यापासून माहेरच्यांनी कधी विचारपूस केली नाही. हे तिच्या जिव्हारी लागले आहे. पण ती ते क्वचितच बोलून दाखवते. ती व्यवहारी आहे. प्रसंगावधानी आहे. एकदा दिवस भरले असताना कामावरच संध्याकाळी तिला कळा सुरू होतात. दूरवर एक खासर दिसते. धुरीवरच्या सदाशिव कलालाला गोड बोलून घरी सोडायला लावते. सारी व्यवस्था स्वत:च करते.

नवऱ्याच्या अनेक अव्यवहारी निर्णयांत ती त्याच्या पाठीशी उभी राहते. त्याला समजावते, धीर देते. पण महादेव अपेशीच आहे. सगळीकडे तो मार खातो. एकही धंदा त्याला जमत नाही. ना कपडे शिवणे, ना तयार माल आणून विकणे, ना शेतात राबणे. बापाशी त्याचे पटत नव्हते. त्याचे घर तो पुन्हा सोडतो. कौतिकची पुन्हा त्याच्यामागे फरपट सुरू होते. महादेवने शिवणकामासाठी आपले सारे बिऱ्हाड दुसऱ्या गावी आणले खरे, पण ज्याने बोलावले असते तो शेटजी भेटत नाही. रात्र कुठे काढायची, असा प्रश्न पडतो. पण कौतिक सांभाळून घेण्याच्या स्वभावाची आहे आणि करारीही आहे. माघारी परतायची महादेवची तयारी आहे. पण कौतिक म्हणते, ‘तुम्हीच जात बसा हिंडग्यावानी. मी तं पयलेच येत नवती तिथून.. आता राऊ लेकाले. कोनाच्याही वसरीत. नाई तं एखांद्या झाडामाडाखाली भाकर भाजून खाऊ चार दिवस. मेल्या मानसाले जागा भेट्टे अन् आमा जित्या जिवाले नाई भेटन कायलेक?’ बिऱ्हाडाचे सामान आणून टाकणाऱ्या बलगाडीवाल्याला ती म्हणते, ‘बापूजी, गावात कोनापासी सांगू नोका आमचं असं काई झालं मून. तुम्हाले माह्य़ा गयाची आन आये.’ महादेव बिडय़ा फुंकीत बसलेला असतो. त्याला ती म्हणते, ‘असे धुपारनं फुकत नोका बसू. सेटजी येईठावरक कोनाले निजाबसासाठी सावली मांगा चार हात.’ यावर महादेव म्हणतो, ‘मी नाई जातगीत.’ कौतिक पुढे होते. लोहाराचा भाता ओढत बसलेल्या सकीनाकडे जाते. तिची कर्मकथा ऐकून सकीना ओसरीवर जागा देते. तिला कौतिक नाही म्हणत नाही.

कौतिक ही मूर्तिमंत जिगीषा आहे. विपरीत स्थितीवर मात करण्याची तिची जिद्द वेळोवेळी दिसते. पण ती पुरणार तरी किती आणि कुठवर? नवरा हा असा बठय़ा होत चालला आहे. तर मोठा पोरगा भीमा आवाक्याबाहेर जातो आहे. शाळा तर त्याने केव्हाच सोडली, तो घरातच बारीकसारीक चोऱ्या करू लागला आहे. कधी सर्कशीत, कधी तमाशात हरकाम्या म्हणून जावे. आता तिवशाला मायबापांनी जिथे बिऱ्हाड केले आहे तिथे सकीना-कासमची तरुण मुलगी बानो हिच्याकडे त्याची नजर जाते आणि तो मायबापांच्या घरी मुक्कामाला येतो. गावातली रिकामटेकडी मुले गोळा करावी, जुवा खेळावा, वासूगिरी करावी या त्याच्या वाह्य़ात वागण्यापायी कौतिक वैतागून गेली आहे. एक दिवस तो बानोच्या अंगचटीला येतो तेव्हा कासमने दिलेला आसरा जाण्याची वेळ येते. कासम-सकीनाच्या चांगुलपणामुळे या प्रसंगातून कौतिक निभावते. महादेव तयार कपडय़ांचा गठ्ठा घेऊन घरातून जो गेलेला असतो, तो दोन महिने उलटून गेले तरी परतत नाही. त्याचा एक घोर कौतिकच्या जीवाला लागलेला आहे. तिचे कामात लक्ष लागत नाही. ‘महा कानाई सगया जीव या बुवात आये..’ तिच्या मनात भलभलत्या शंकाकुशंका थमान घालू लागतात. याच काळात तिचे एक बाळंतपण होऊन मूल मरते. भीमा घरातले होते नव्हते पसे घेऊन गायब होतो. संकटांतून ती निघते ते केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर. फक्त महादेव परतला पाहिजे. गावातल्या प्रत्येकाला ती महादेव कुठे दिसला का हे विचारत असते. एक जण तिला तो अमरावतीला दिसल्याचे सांगतो. तेव्हा नाम्याला सोबत घेऊन ती त्याला शोधून काढते आणि मोठय़ा मिनतवारीने त्याला आपल्याबरोबर घेऊन जाते. पुष्कळ दिवस ती त्याच्या कलाने घेते. पण तो शेतीची कामे करायला साफ नकार देतो. त्याने चारचौघांसारखे राहावे, जगावे अशी तिची इच्छा असते. पण परत येऊनही तो काहीच कामाचा राहत नाही.

भरतीच्या गाडय़ाच्या एका वाढाळ बलाने मान टाकताच जसा गाडय़ाचा भार दुसऱ्या बलावर पडतो तसा संसाराचा सारा भार कौतिकवर पडतो. महादेवचा बाप मरतो. त्याच्या मíतकालाही तो जात नाही. म्हाताऱ्याचा तेरावा दिवसही कर्ज काढून कौतिकला निभवावा लागतो. ती तिकडून परतण्याच्या आतच महादेव कासमच्या सोबतीने जातो. महिन्या-दीड महिन्याने कासम परततो, पण महादेव परतत नाही. त्याच्याविषयी काही बोलण्याचेही कासम टाळत असतो. कौतिकने खूपच गळ घातल्यावर तो महादेवला रगतपिती-कुष्ठरोग झाल्याचे सांगतो. काही मिशनरी त्याला भेटतात आणि तो त्यांच्याबरोबर निघून जातो. आपल्यावाचून कौतिकचे काही अडणार नाही याची महादेवला खात्री असते. या आघाताने कौतिकचे खाण्यापिण्यातून लक्ष उडते. तिला काहीही करावेसे वाटत नाही. पण लेकरांसाठी  ती स्वत:ला उभे करते. पण तिचे कशातही चित्त नसते. नामाला शिकायचे असते. पण ती त्याला म्हणते, ‘लेका, तुह्य़ा तगदिराले तं चारी खून भोकं आये, त्याले तू तरी काय करसीन आन् मी तरी काय करू?’ निदान नामाला शिवण तरी शिकवावे म्हणून ती शेषराव िशप्याला गळ घालते. सासऱ्याची गहाण टाकलेली मशीन देण्याचे आमिष दाखवते. मशीन मिळते खरी पण ती पाठीवरून वाहून आणताना तिचे पायदान खाली पडून फुटते आणि कौतिकची पाठ रक्तबंबाळ होते. यानंतर आलेल्या आजारात कौतिकचे भान जवळजवळ नाहीसे होत जाते. ती भ्रमिष्ट होते. गावभर हिंडू लागते. पण अजूनही तिला वावरात काम करायचे आहे.. ‘अन्खीन बाराक महिने तं काम करतोच लेकाले.. एक डाव का नामा धंद्यापान्याले लागला का गंगेत घोडे न्हाले.’ ती सांगत रहाते.

परिस्थितीने आणि नियतीने पराभूत करूनही कौतिकचा पराभव झालेला नाही.

prganorkar45@gmail.com 

chaturang@expressindia.com