काही व्यक्ती अविश्रांत श्रम करतात; पण तरीही आपल्या गुणवैशिष्टय़ांचा पुरेपूर वापर ते करू शकत नाहीत. कारण अशा गुणांच्या विकासासाठी, सर्जनशीलतेसाठीची, भावनिक प्रशांत अवस्था आपलीशी करणं हे अशा प्रकारच्या व्यक्तींत अवघड असतं.
अपल्या व्यक्तिमत्त्वावरून आपल्या तणावाची पातळी निश्चित होत असते. बुद्धीच्या व गुणांच्या विकासासाठी, सर्जनशीलतेसाठी व तिच्या आविष्कारासाठी व्यक्तीजवळ भावनिक शांतता व मानसिक स्वस्थता असावी लागते. तणावाला पोषक ठरणारी व्यक्तिमत्त्वं कोणती, याचा आपण आढावा घेऊ. यातील एक किंवा अधिक वैशिष्टय़े एखाद्या व्यक्तीमध्ये आढळू शकतात. अशा व्यक्तींमध्ये तणावनिर्मिती अधिक होत असते किंवा या व्यक्ती ताणतणावांना आधीच शिकार झाल्यामुळे दृश्य स्वरूपात अशा वागतात, असंही म्हणता येईल. या व्यक्तींनी काही अविवेकी दृष्टिकोन मनात पक्के बाळगलेले असतात. उदा. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करून दाखवलेच पाहिजे वगैरे वगैरे.
पहिल्या प्रकारचे लोक म्हणजे कोणतंही काम घाई-गडबडीनं करणाऱ्या व्यक्ती. अशा व्यक्तींची नेहमीच धावपळ चाललेली असते. इतरांनी एखादी गोष्ट मंदगतीने केली तरी ते अस्वस्थ होतात किंवा चिडतात. उदा. ही माणसं वेगानं जेवतात. जेवताना बरेचदा ही माणसं भराभर, घास नीट न चावताच गिळतात. चवीनं जेवत नाहीत. ही माणसं पाणी प्यायचं झालं तरी भराभर, वेगानं पितात. अगदी कोल्ड्रिंक, ताक, दूध इत्यादी चवीने प्यावयाची पेयेसुद्धा याच प्रकारे पितात. ही माणसं भराभर बोलतात. बोलण्यासाठी अधीर असतात. हा अधीरपणा एवढा प्रचंड असतो, की त्यामुळे ही माणसं आक्रमक वाटतात. (आक्रमक असतीलच असं नाही.) वाक्याचा शेवट घाईनं करतात, तर काही वेळा वाक्य अर्धवट सोडतात. ही माणसं वेगानं चालतात. लोकल ट्रेन वेळेवर आली नाही किंवा थोडक्यासाठी हुकली, निसटली की ते स्वत:वर आणि त्या वाहनांवरही चडफडतात. घाई-गडबडीनं काम करणं, प्रचंड वेगानं काम करणं हेच यशस्वी होण्याचं लक्षण, गमक असं या व्यक्तींना प्रामाणिकपणे वाटतं.
दुसऱ्या प्रकारची माणसं म्हणजे मंदगतीमुळे अस्वस्थ होणारी माणसं. ही माणसं स्वत: सर्व कामं घाई-गडबडीनं करण्याचा प्रयत्न करतात. स्वत: सर्व गोष्टी वेगाने करू इच्छितात, करू पाहतात आणि करतातही. जराही स्वस्थ, शांत राहत नाहीत. थोडा वेळ जरी फुकट गेला, एखाद्या गोष्टीला वेळ जास्त लागला किंवा एखादी गोष्ट इतरांनी मंदगतीने केली, की हे लोक अस्वस्थ झालेच म्हणून समजा. ही त्यांची वृत्ती साध्या साध्या गोष्टीतून दिसते. पाहा, सिग्नलवर वाहनं निष्कारण सावकाश पुढे सरकतात असं त्यांना वाटतं. मग त्यांना संताप अनावर होतो. हॉटेलमध्ये शिरल्यावर लगेच टेबलापाशी वेटर आला नाही, की हे अस्वस्थ. पुन्हा ऑर्डर दिल्यानंतर पदार्थ येण्यासाठी वेळ लागतो तेव्हाही हे अस्वस्थ. आपल्यानंतर ऑर्डर देऊन आपल्याआधी कुणासाठी पदार्थ दिले जातात का यावर त्यांची बारकाईने नजर असते. आपण ऑर्डर केलेल्या एखाद्या पदार्थासाठी अधिक वेळ लागू शकतो, इत्यादी शक्यता हे ध्यानात घेत नाहीत. प्लेट्सची मांडणी वगैरे मंदगतीने चालली आहे असं त्यांना वाटतं. एकंदरीत असा कुठे वेळ फुकट गेला, की ते सरळ उठतात व हॉटेल मॅनेजरकडे जाऊन नापसंती, तक्रार नोंदवितात. चवीनं, आनंद घेत, गप्पागोष्टी करत हे जेवण करत नाहीत. यांची कुठेही गेलं तरी हीच तऱ्हा.
तिसऱ्या प्रकारात मोडणारी माणसं म्हणजे अनेक गोष्टी एकाच वेळी करू पाहणाऱ्या व्यक्ती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करून दाखवून मी कुणीतरी विशेष आहे, हे इतरांना आणि स्वत:ला पटवून देऊनच जणू या व्यक्तीचा आत्मगौरव जपला जाणार असतो. अशा प्रकारच्या ईर्षेने कळत-नकळत (अनेकदा स्वत:च्याही नकळत) झपाटलेल्या या व्यक्ती नेहमी अस्वस्थ असतात. वेळ फुकट जाता कामा नये, याचं एक आंतरिक दडपणच जणू त्यांच्यावर असतं आणि म्हणूनच सतत घाई-गडबड, मंदगतीमुळे अस्वस्थ होणं इत्यादी लक्षणं त्यांच्यात आढळतात. तसंच अनेक गोष्टी त्यांना आत्मप्रतिष्ठा मिळवून देतात. आपण वेळ कसा फुकट घालवत नाही यानं ते फुशारून जातात; पण अशा व्यक्तींवर तणाव लवकर आणि अधिक प्रमाणात येतात. कधी कधी असं का वागतो, हे त्यांचं त्यांनाही कळत नाही; पण त्यांना मानसिकदृष्टय़ा वेळेची कायम कमतरता भासत असते आणि त्या आंतरिक दबावामुळे ते असं वागतात. याचं कारण-मूळ हे खूप खोलवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजलेलं असतं. सकृद्दर्शनी ही माणसं इतरांना आणि त्यांना स्वत:ला याचा त्रासच होतो आणि हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे विशेष!
काम करण्याच्या पद्धतीनुसार आपण माणसांची दोन गटांत वर्गवारी करू.
* कामं ‘एकापाठोपाठ एक’ या पद्धतीनं करणाऱ्या व्यक्ती.
* एकाच वेळी अनेक गोष्टी करणाऱ्या व्यक्ती.
एकापाठोपाठ एक या पद्धतीनं काम – उदा. चहा, नाश्ता झाल्यानंतर टीव्ही पाहणं आणि त्यानंतर वर्तमानपत्र वाचणं, त्यानंतर पत्नीला सूचना देणं. याप्रमाणे एक काम संपलं की दुसरं. ते संपलं की मग तिसरं.. मग चौथं याप्रमाणे कामाचा फडशा पाडणारे काही लोक असतात. अशी माणसं हाती घेतलेली छोटी किंवा मोठी कामं एकाग्रतेनं करू शकतात.
एकाच वेळी अनेक गोष्टी करणाऱ्या व्यक्ती- उदा. चहा-नाश्ता घेतानाच वर्तमानपत्र वाचणं, दुसरीकडे टीव्ही चालू आणि हे चालू असतानाच पत्नीला सूचना देणं. स्वयंपाक करताना रेडिओ ऐकणं आणि त्याच वेळी मुलाचा अभ्यास घेणं इत्यादी. ही माणसं केवळ जास्तीत जास्त कामं एकाच वेळी करतात असं नव्हे, तर ही सगळी कामं कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मानसिकदृष्टय़ा त्यांना वेळेची सतत कमतरता भासते.
काही व्यक्ती आराम करताना, विश्रांतीच्या वेळीही अस्वस्थ होतात. अशा प्रकारच्या व्यक्तींना कामाचं प्रचंड व्यसन असतं. आपण कुणीतरी आहोत हे सिद्ध करून दाखवण्याचं आंतरिक दडपण यांच्याही नकळत त्यांच्यावर असतं. त्यामुळे ते या इच्छेचे जणू गुलाम बनलेले असतात. जराही वेळ फुकट घालवता कामा नये, असं त्यांना वाटतं. आराम करणं, विश्रांती घेणं हा त्यांना वेळेचा अपव्यय वाटतो. कामाशिवाय ही माणसं बेचैन होतात. सुट्टीचा दिवस रविवार ते पूर्ण सुखात, शांती-समाधानानं घालवू शकत नाहीत. ऑफिसमध्ये हे वेळेअगोदर पोहोचतील आणि बरेचदा ऑफिस संपल्यानंतरही ऑफिसमध्ये काम करत बसतील. संध्याकाळी घरी आल्यावर घरातील माणसांशी गप्पा, मुलाबाळांशी खेळणं हा वेळेचा अपव्यय आहे असं यांना प्रामाणिकपणे वाटतं. एवढंच नव्हे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं, त्यासाठी काही करणं, व्यायाम करणं ही माणसं वेळ देतं नाहीत. अशा माणसांशी गप्पा मारतानादेखील सहज लक्षात येतं की, त्यांना काम करणाऱ्यांविषयी आदर व काम टाळणाऱ्यांविषयी अनादर, अनास्था आहे.
वरकरणी पाहता अशा व्यक्ती खूप काम करणाऱ्या यशस्वी वाटतात. सर्वसामान्यांपेक्षा त्यांनी मिळविलेलं यश जास्त असतंच; पण तरीही त्यांची एकंदर क्षमता पाहता लक्षात येईल, की या व्यक्ती शांतपणे वागल्या ‘बी टाइप’ प्रमाणे वागल्या तर अधिक एकाग्रतेनं काम करू शकतील व अधिक यश मिळवतील.
अशा व्यक्तिमत्त्वामुळे सतत तणावग्रस्त राहून, तणावजन्य आजारांना ते बळी पडतात. त्यांचं आयुष्य कमी होतं. औदासीन्यामुळे मिळालेल्या यशाचा आनंद नाही, कधी कधी तर अकाली मृत्यू. क्षमतेच्या मानानं कर्तृत्व कमी असतं. कारण घायकुत्या, अस्वस्थ स्वभावामुळे एखाद्या कामाची आखणी करणं, ते काम स्वत:साठी सोपं कसं करता येईल, याचा विचार करणं, नियोजन, योजनाबद्धता, कमी वेळात करता येण्यासाठी विचार व आखणी, इतरांची मदत घेणं, व्यवस्थापन, असं काही न करता ही माणसं स्वत:च ते करायला जातात. आखणी न करता सुरुवात करतात. इतरांची मदत फारशी घेत नाहीत.
‘अ’ प्रकारच्या व्यक्ती अविश्रांत श्रमही करतात; पण तरीही आपल्या गुणवैशिष्टय़ांचा पुरेपूर वापर ते करू शकत नाहीत. कारण अशा गुणांच्या विकासासाठी, सर्जनशीलतेसाठी, बुद्धीच्या उत्कृष्ट आविष्कारासाठी माणसाजवळ भावनिक शांतता, मानसिक स्वस्थता व सहजता असावी लागते आणि अशी भावनिक प्रशांत अवस्था आपलीशी करणं हे वर वर्णन केलेल्या व्यक्तींत कि ती अवघड असतं, हे तुमच्या सहज लक्षात येईल.
अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाला ‘अ’ प्रकारचं व्यक्तिमत्त्व म्हणतात. तुम्ही असे आहात का? विचार करा. असलात तरी बिघडत नाही. तुम्ही स्वत:ला बदलू शकता. कारण आपण असे आहोत हे तरी तुम्हाला समजलं व नि:संकोचपणे तुम्ही मान्य केलंत. अहो, काहींच्या ते शेवटपर्यंत लक्षात येत नाही. शेवटी शेवटी समजलं-उमजलं तरी तोपर्यंत त्यांची ‘टायटॅनिक’ झालेली असते.
(डॉ. रमा मराठे यांनी लिहिलेल्या ‘मनगंगेच्या काठावरती’ या साकेत प्रकाशनाच्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)
तणावाचे व्यवस्थापन
काही व्यक्ती अविश्रांत श्रम करतात; पण तरीही आपल्या गुणवैशिष्टय़ांचा पुरेपूर वापर ते करू शकत नाहीत.
आणखी वाचा
First published on: 26-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stress management