माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

टाळेबंदी जाहीर होताच गरजू विद्यार्थ्यांचं पुढे कसं होणार, ही काळजी अधोरेखित झाली. रवींद्र कर्वे आणि सहकाऱ्यांकडून गेली अनेक र्वष चालवल्या जाणाऱ्या ‘विद्यार्थी विकास योजने’त सध्या गुणवान आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वार्षिक दीड कोटी रुपयांचा खर्च केला जातो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होत आहे. हे दानशूर लोक आर्थिक अडचणीत आले तर काय या प्रश्नाबरोबरच बेरोजगारीमुळे गरजू विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे, हे सत्य लक्षात घेता विद्यार्थी आणि दाते यांची सांगड घालण्यासाठी या हेल्पलाइनचं महत्त्व मोठं आहे.

चार दशकांपूर्वीची गोष्ट. ‘विश्व हिंदू परिषदे’चे ज्येष्ठ कार्यकर्ते केशवराव केळकर विद्यार्थी परिषदेच्या तरुण कार्यकर्त्यांना एकदा सहज म्हणाले, ‘‘तुमच्या मनात तेवणारी समाजकार्याची ज्योत कधीही विझू देऊ नका. वेळेला ती मंद करा, म्हणजे पुढे जेव्हा उसंत मिळेल तेव्हा ती नक्कीच मोठी करता येईल.’’ विद्यार्थीदशेतल्या विचारांचं हे स्फुल्लिंग आयुष्याच्या धकाधकीतही ज्वलंत राहिलं आणि निवृत्तीनंतरच्या कालखंडात ‘विद्यार्थी विकास योजने’च्या रूपानं पुन्हा प्रज्वलित झालं. रवींद्र कर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सेवा सहयोग फाउंडेशन’च्या संयुक्त विद्यामानं गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यास सुरुवात केली.

रातवड, पुसर, वडघर अशा दुर्गम भागांत मांडवाखाली भरणाऱ्या शाळांच्या उभारणीपासून कार्याला सुरुवात झाली. लवकरच कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं, की या दुर्गम भागातल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांचं शिक्षण हे शाळेचं शुल्क आणि तालुक्याच्या ठिकाणचा राहण्याचा खर्च न परवडल्यानं थांबतं. मग अशा विद्यार्थ्यांना शालेय साहाय्य देण्याचा मानस पक्का झाला. सुरुवातीला कुशाग्र बुद्धिमत्तेच्या गरजू विद्यार्थ्यांना निवडण्याचं काम शिक्षक आणि स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आलं. कारण त्यांना विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, अभ्यासाची क्षमता, त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाची आत्यंतिक तळमळ याची नेमकी जाण असते. त्यांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारे दाते शोधण्याचं काम खूप आव्हानात्मक होतं. अर्थातच सुरुवातीला असे दाते ओळखीतून मिळत गेले. याची मर्यादा स्पष्ट होऊ लागली तशी ‘हेल्पलाइन’ची निकड भासू लागली. त्यामुळे पुढे ‘हेल्पलाइन’च्या साहाय्यानं गरजू विद्यार्थी आणि देणगीदार यांची अचूक सांगड घालण्यात यश येऊ लागलं.

गरजू विद्यार्थ्यांची माहिती मिळताच रवींद्र कर्वेसह सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातला एक-एक विभाग वाटून घेतला आणि गृहभेट, शाळांची भेट घेऊन पाहणी करायला सुरुवात केली. ही निवड करताना जात, धर्म, पंथ यांचे कोणतेही निकष लावण्यात येत नाहीत. सर्व विद्यार्थी आणि देणगी देणाऱ्यांचे मिळून २३ ‘व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप’ आहेत. मात्र त्यावर मूळ कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही ‘पोस्ट’ न टाकण्याचं बंधन आहे. उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचं छायाचित्र, नाव आणि इतर माहिती या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवरून सर्व विद्यार्थी, देणगीदार आणि हितचिंतकांना देण्यात येते. जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं, आणि देणगीदारांसमोर त्यांच्या प्रगतीचा चढता आलेख ठेवता येतो. अशा पद्धतीनं आजवर ६४४ विद्यार्थ्यांना एकूण ९ कोटी रुपयांची आर्थिक मदत गेल्या दहा वर्षांत केली गेली आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्याचा कार्यालयीन खर्च शून्य आहे. कारण विद्यार्थ्यांची भेट घेणारे सर्व कार्यकर्ते, त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी स्वखर्चानं जागोजागी फिरतात. वर्षांतून एकदा होणाऱ्या स्नेहसंमेलनाचा खर्चही देणगीदार वा कार्यकर्तेच करतात. गेली सहा र्वष आनंद हा कार्यकर्ता ‘झेरॉक्स’ प्रती मोफत काढून देत आहे. तर भिडे या दुसऱ्या कार्यकर्त्यांने इंटरनेटसह त्यांचं कार्यालय वापरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे देणगीस्वरूप मिळणारी सर्व रक्कम पूर्णत: गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येते. त्यातून त्यांचं महाविद्यालयाचं शुल्क भरण्यात येतं. ‘‘या सर्व व्यवहारातली पारदर्शकता लक्षात घेऊन अनेक दानशूर व्यक्ती आपापसात आमचे ‘हेल्पलाइन’ क्रमांक एकमेकांना देऊन सहकार्य करतात, आणि जणू त्यांची एक साखळीच तयार होते,’’ असं कर्वे सांगतात. ‘‘दर वर्षी नेहमीच्या दात्यांखेरीज नवीन २० ते २५ दाते मदतीसाठी पुढे येतात. त्यातून पैसे कमी पडले, तर आमच्या काही ठरावीक देणगीदारांना फोन जाताच ते संबंधित गरजू विद्यार्थ्यांच्या फीची तत्काळ सोय करतात. दर वर्षी सगळ्या देणगीदार आणि हितचिंतकांना सर्व विद्यार्थ्यांच्या नावांची यादी, त्यांना दिलेल्या आर्थिक मदतीचा तपशील, विद्यार्थी नोकरीला लागला असल्यास त्याची माहिती, वर्षभरातील एकूण जमा देणगी आणि विनियोग केलेली रक्कम हा सर्व तपशील पाठवला जातो.

रवींद्र कर्वे सांगतात, ‘‘भारतात टाळेबंदी जाहीर होताच निम्न आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांच्या हातावर पोट असणाऱ्या पालकांची परिस्थिती काय होईल याची काळजी वाटू लागली. या मुलांचं शिक्षण थांबू नये आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी मी अडीचशे विद्यार्थ्यांच्या घरी फोन केले. या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आम्ही या प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपयांची मदत पाठवली. रेशन आणि आमच्या विद्यार्थ्यांचा खर्च असं मिळून गेल्या दीड महिन्यांत त्यांच्यासाठी सात लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्याच वेळी त्यांच्या प्रामाणिकपणाचं झालेलं दर्शन काळीज हेलावून टाकणारं आहे. मिरजला वैद्यकीय शाखेत शिकणारा आमचा एक विद्यार्थी- जयस्वाल. आई धुणी-भांडी करते. वडील पक्षाघातानं आजारी. पण ते स्पष्टपणे म्हणाले, ‘‘तुम्ही आमच्या मुलांचं शिक्षण करता तेच खूप आहे. आम्ही आमचं कसंही भागवू.’’ ठाण्यातले एक रिक्षावाले काका फोनवर म्हणाले, ‘‘आम्हाला रेशनपुरते दोन हजार द्या.’’ पण दहाच मिनिटांत त्यांनी मला पुन्हा फोन केला आणि म्हणाले, ‘‘माझी बायको म्हणते, पंधरा दिवसांचं रेशनपाणी आहे घरात. ते पैसे दुसऱ्या कोणाला द्या.’’ सोलापुरातली लोखंडे ही बांधकाम मजुराची मुलगी. वडील नाहीत. आई एकटी कष्ट करून मुलीला अभियंता करण्यासाठी झटते आहे. टाळेबंदीत रोजगार नाही. तरी म्हणते, ‘‘मुलगी शिकतेय तेच खूप आहे. आम्ही अर्धी भाकरी खाऊन राहू.’’ मला या विद्यार्थ्यांचं भवितव्य भेडसावत आहे. सध्या याच मुलांचा वार्षिक खर्च दीड कोटी रुपये आहे. एरवी ६० ते ७० लाख रुपये काही उद्योजकांकडून मिळतात. आता तेच आर्थिक अडचणीत येऊ शकतात. त्यात बेरोजगारीमुळे गरजू विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे. दाते आणि दानाची रक्कम कमी झाली तर पुढे काय? हा प्रश्न आहेच.’’   ‘विद्यार्थी विकास योजने’च्या कार्यकर्त्यांना सध्या हा प्रश्न भेडसावत असला तरी ते आशावादी आहेत, कारण आपल्याकडची दानशूरता!

‘‘तीन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ उपक्रमात या ‘विद्यार्थी विकास योजने’ची माहिती प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आमच्या ‘हेल्पलाइन’वर येणाऱ्या कॉल्सची संख्या तर वाढलीच, शिवाय त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर पसरली. आज आय.आय.टी. मुंबई, धनबाद, खरगपूर, बिट्स पिलानी गोवा, व्हीटीआय वेल्लोर अशा नामांकित शिक्षणसंस्थांमध्ये आमचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आमचे पालक कार्यकर्ते त्यांना सतत मार्गदर्शन करतात.  महाराष्ट्रातल्या २६ जिल्ह्य़ांतील ४० कार्यकर्ते हे काम करतात. त्यामुळेच आमचे विद्यार्थी ७० टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत प्रगती करत आहेत. भावी काळातली आमची मदत ही सर्वस्वी त्यांच्या गुणांवर अवलंबून असते, याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे ही मुलं लक्ष केंद्रित करून अभ्यास करतात. एका झोपडपट्टीतली तीन मुलं त्यांच्या गुणवत्तेवर ‘एमबीबीएस’अभ्यासक्रमात, दोन मुलं ‘डेंटल’ अभ्यासक्रमात दाखल झाली, तर एक सायन रुग्णालयात ‘फिजिओथेरपी’ला आहे.’’ असंही कर्वे यांनी सांगितलं.

सोलापूरमधील वेगवेगळ्या वस्त्यांमधील बावीस मुलं या योजनेचा लाभ घेत आहेत. एका मुलाचे वडील शिंपीकाम करतात. त्या मुलाची निवड आय.आय.टी. जोधपूरसाठी झाली आहे. तर माठे इथला एक मुलगा आय.आय.टी. खरगपूर इथे ‘एमबीए’ करतोय. पंढरपूरच्या एका विद्यार्थ्यांला दहावीला ९० टक्के गुण मिळाले. त्याच्या आजोबांनी त्याच्या शिक्षणासाठी काही रक्कम राखून ठेवली होती. त्यानं आई-वडिलांना सांगितलं, हे पैसे मला आय.आय.टी.च्या शिकवणीसाठी द्या. त्यानं त्या पैशांतून शिकवणी लावली आणि तो गुणवत्ता यादीत झळकला. या मुलानं या अभ्यासासाठी पाच-सहा हजारांची पुस्तकं विकत घेतली होती. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावरही, ‘ज्या पुस्तकांनी ज्ञान दिलं, ती पुस्तकं विकायची नाहीत,’ असं म्हणून त्याच्या आईनं एका गरजू विद्यार्थ्यांला ती सर्व पुस्तकं मोफत दिली.  सलोनी या विद्यार्थिनीनं दहावीत ९० टक्के गुण मिळवले. त्याच वेळी तिनं घरातल्या फळ्यावर लिहून ठेवलं, ‘मी अभियांत्रिकी शिकणार आणि नंतर सैन्यात जाणार’. तिनं तिला हवं तेच महाविद्यालय गुणवत्तेवर मिळवलं. आज ती ‘विद्यार्थी विकास योजने’च्या मदतीनं अभियांत्रिकी अभ्यासक्रम शिकते आहे. अर्थात यासाठी त्यांच्या कुटुंबाचे संस्कार खूप मोलाचे असतात. एका मुलीला जर्मनीच्या एका विद्यापीठात प्रवेश मिळाला. तिचे वडील कळव्याहून तारापूरला नोकरीसाठी जातात. सकाळी ४ वाजता उठून आई डबा करते. दोघे अफाट कष्ट करतात. उद्देश एकच. दोन्ही मुलांना उच्च शिक्षण द्यायचंय. बुलढाण्याच्या एका विद्यार्थ्यांच्या घरी कार्यकर्त्यांना दोन जाडजूड ग्रंथ दिसले. एक ज्ञानेश्वरी, दुसरा दासबोध. वडील शेतमजूर, अशिक्षित. ते म्हणाले, मी हे एवढंच वाचू शकतो.

अशा मुलांच्या मदतीसाठी दाते स्वखुशीनं मदत करतात. त्यात लाखो रुपयांची देणगी देणारे श्रीमंत उद्योजक आहेतच, पण एखाद्या ऐंशी वर्षांच्या आजी आपलं निवृत्ती वेतन देऊन मदतीचा हात पुढे करतात. चिपळूणला नागालँडमधल्या मुलींच्या वसतिगृहातल्या दोन मुलींचा साठ हजार रुपयांचा खर्च उचलणारे मध्यमवर्गीय दाते आहेत, तर मुस्लीम मोहल्ल्यातील हुशार मुलीचं पालकत्व घेणारा हिंदू कार्यकर्ता देणगीदारही आहे.

या संस्थेनं ज्या विद्यार्थ्यांना हात देऊन आयुष्यात उभं केलं आहे ती मुलंही अबोलपणे कृतज्ञतेची पावती देतातच. चिपळूणच्या पोवार या मुलानं ‘नॉटिकल इंजिनीअरिंग’ केलं आणि नोकरी लागताच संस्थेला १ लाख २५ हजारांची देणगी दिली. ‘‘हे पैसे तू तुझ्या आई-वडिलांना दे,’’ असं परोपरीनं सांगूनही त्यानं ऐकलं नाही. कल्याणची एक विद्यार्थिनी ‘जेएसबी’ बँकेत नोकरीला लागली. भेटायला येताना चोवीस हजार रुपये घेऊन आली. ‘‘हे पैसे आम्हाला आत्ता नको, तुझ्या बहिणीच्या लग्नाला ठेव,’ असं म्हणताच डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, ‘‘सर, या पैशांना नाही म्हणू नका. मी वर्षभर पै-पैसा साठवून हे जमवलेत.’’ स्वाती घाटकोपरच्या झोपडपट्टीत  राहते. तिचं घर खूप छोटं, तिथेच  राहून ती ‘एमएस्सी’ झाली. पावसात घरात एवढं पाणी साठतं, की बाजेवर बसून अभ्यास करायची. आता ती ‘सिटी’ बँकेत बारा लाख रुपयांचं ‘पॅकेज’ घेते. आपल्या भावंडांचं आणि इतर गरजू मुलांचं शिक्षण करते.

रवींद्र कर्वे मुलांना साग्ांतात, ‘‘आम्ही तुम्हाला मदत केली हे गौण आहे. आम्ही तुम्हाला विचार दिला. आता जे सक्षम आहेत त्यांनी दुर्बलांना मदतीचा हात द्यावा. दिव्यानं दिवा उजळावा. तो विझू देऊ नका. तुम्ही किती पैसे द्यायचे ते परिस्थिती ठरवेल. आकडा महत्त्वाचा नाही, तर विचार महत्त्वाचा आहे. यापुढच्या काळात आम्ही नव्हे, तुम्हीच गरजू मुलांसाठी व्यासपीठ तयार करायचं आहे.’’

विद्यार्थी विकास योजना

हेल्पलाइन क्रमांक-

रवींद्र कर्वे – ९३२३२३४५८५

अरुण करमरकर – ९३२१२५९९४९

राजू हंबर्डे — ९८६९२७५०२९