आरती अंकलीकर

‘‘गुरू शोधत गावोगाव फिरणारे आणि नंतर गुरूंच्या घरी राहून, त्यांची मनापासून सेवा करून शिकणारे शिष्य.. गुरूंच्या घरी संगीतवर्गास जाऊन शिकणारे शिष्य.. आणि आता परगावातल्या वा परदेशातल्या गुरूकडून ‘ऑनलाइन’ शास्त्रीय संगीत शिकणारे शिष्य.. शिकण्याचे प्रकार फार वेगळे; पण या सगळय़ांत संगीत शिकण्याच्या प्रेरणेबरोबरच कष्ट करण्याची तयारी, चिकाटी आणि सातत्य हे गुण लागतातच. ’’

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Marathi Singer Arvind Pilgaonkar career information in marathi
व्यक्तिवेध : अरविंद पिळगावकर
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
Kavikulaguru Kalidas Sanskrit University ,
‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…
UPSC Preparation UPSC Preliminary Exam Paper I GS
यूपीएससीची तयारी : यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर I (GS)

‘गुरूबिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट..’ संत कबीर या पदामध्ये शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीबद्दल लिहितात, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर मात करून आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी गुरू हाच महत्त्वाची भूमिका बजावतो. गुरूशिवाय ही प्रगती होणं अशक्य आहे. शास्त्रीय संगीतातसुद्धा गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्या समस्त संगीतप्रेमी श्रोत्यांच्या हृदयस्थ, अढळपद मिळवणारे पं. भीमसेन जोशी (अण्णा) यांचा गुरूच्या शोधाचा खडतर प्रवास आपण सगळे जाणतो. ११ वर्ष वयाचे अण्णा आपलं गाव सोडून गुरूच्या शोधात आधी विजापूरला गेले. तिथून पुणे आणि मग थेट उत्तर भारतात गेले. उत्तर भारतामध्ये दिल्ली, (तेव्हाचं) कलकत्ता, ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर अशा वेगवेगळय़ा ठिकाणी गुरूच्या शोधात दारोदार भटकत होते. वय लहान..पण शिकण्याची अतीव तळमळ! लहानपणी तर गुरूच्या शोधात निघण्याआधी अण्णा आपल्या गावात निघणाऱ्या मिरवणुकीत वाजणाऱ्या बँडमागून फिरत असत आणि अनेक वेळा त्यांच्या वडिलांना त्यांचा शोध घ्यावा लागत असे. काही काळानंतर त्यांचे वडील गुरुराजाचार्य जोशी यांनी अण्णांच्या शर्टवर ‘गुरुराजाचार्याचा मुलगा’ असं लिहिलेलं होतं. त्यामुळे जिथे कुठे, ज्या कुणाला अण्णा सापडत, ते त्यांना गुरुराजाचार्याकडे सुखरूप आणून सोडत असत. संगीतासाठी असलेली तळमळ अण्णांच्या लहानपणापासून अशी दिसत होती. उत्तर भारतामध्ये गुरूचा शोध घेतल्यानंतर त्यांचा जेव्हा जालंधरला मुक्काम होता, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना परत इथे बोलावून घेतलं आणि मग धारवाडला सवाई गंधर्व यांच्याकडे त्यांची तालीम सुरू झाली. गुरुशिष्य परंपरेत किराणा घराणं शिकले अण्णा.

पंडित रविशंकर यांचा बंगाली कुटुंबात बनारसमध्ये जन्म झाला. त्यांचे मोठे बंधू उदयशंकर यांच्या नृत्याच्या संचाबरोबर लहानपणी पंडितजींनी भारतभर तसंच युरोपमध्ये अनेक दौरे केले. एकदा पंडित रविशंकरांनी कोलकात्यामध्ये उस्ताद अल्लाउद्दीन खाँसाहेब यांचा कार्यक्रम ऐकला. सरोद वाजवत असत ते. खाँसाहेब मैहरच्या राजघराण्याचे वादक होते. पंडितजींचे मोठे भाऊ उदयशंकर यांनी उस्तादजींना विनंती केली, की त्यांनी त्यांच्या नृत्यसंचाबरोबर युरोपचा दौरा करावा. त्या दौऱ्यातच पंडितजींना उस्तादजींकडून तालीम मिळाली. त्यानंतर खाँसाहेबांनी पंडितजींनी मैहरमध्ये येऊन संगीताचा सखोल अभ्यास करावा अशी इच्छा प्रकट केली. त्यांची ही आज्ञा शिरसावंद्य मानून आपलं नृत्याचं करिअर १९३८ मध्ये समाप्त करून ते भारतीय संगीत शिकण्यासाठी उस्ताद अल्लाउद्दिन खाँसाहेबांच्या घरी गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेण्यासाठी गेले. तिथे अत्यंत शिस्तीनं विद्या मिळवून खडतर साधना केली पंडितजींनी. त्यानंतर बाबा अल्लाउद्दीन खाँसाहेबांची कन्या, विदुषी अन्नपूर्णादेवी यांच्याशी विवाहबद्ध झाले.

काही दशकांपूर्वी ‘गंडाबंधन’ या समारंभाला विलक्षण महत्त्व होतं. गुरू शिष्याला गंडा बांधत असे म्हणजे एक धागा बांधत असे आणि या धाग्यामुळे गुरू-शिष्य एका बंधनात अडकत असत.  ज्याच्यामध्ये गुरू वचनबद्ध होत असे शिष्याला संपूर्ण तालीम देण्यासाठी आणि शिष्यदेखील संपूर्ण शरणागतीचं वचन गुरूला देत असे. कालांतरानं गंडाबंधन हा समारंभ अभावानेच आढळू लागला. त्याआधीच्या काळामध्ये गुरुकुल पद्धतीनं शिष्य भारतीय संगीताचा अभ्यास करत असत. लहान वयातच गुरुगृही जाऊन राहात. गुरूच्या कुटुंबातील एक सदस्य बनून शिष्य राहत असे. जी कामं अंगावर पडतील ती करणं आणि गुरूकडून तालीम घेणं! मी अनेक थोर गायकांना सांगताना ऐकलंय, की गुरुकुल पद्धतीमध्ये सुरुवातीची काही वर्ष शिष्याला गुरूसमोर गाण्याची परवानगीच नव्हती. त्याचं कारण हे असायचं, की अनेक वेळा शिष्य संगीताबद्दलचे काही विचार घेऊन गुरुगृही जात असे. ते सगळे सांगीतिक विचार पुसले जाणं हे अत्यंत महत्त्वाचं असे. त्यासाठी काही काळ न गाता केवळ गुरुगृही सेवा करणं आणि गुरू इतर शिष्यांना तालीम देत असे ते कानावर पडणं हा संस्कार महत्त्वाचा असे. एकदा श्रवणविद्या मिळाल्यानंतर गुरू शिष्याला समोर बसवत असे आणि मग तालीम सुरू होत असे. आधीची पाटी पुसून गुरूची गायकी आत्मसात करणं हे शिष्याला सुकर होत असे.

माझे गुरुजी पंडित दिनकर कायकेणी हेदेखील आठवीत असताना लखनौला गाणं शिकायला गेले. पंडित रातांजनकर बुवांकडे. मॉरिस कॉलेजमध्ये शिकवत असत रातांजनकर बुवा. कायकेणीजी शाळेत जात आणि शाळेतून आल्यावर ते तालीम घेत. त्या काळच्या अनेक आठवणी ते सांगत असत. बाहेरचे शिष्य गुरूच्या घरी राहून शिकत आणि गुरूची मुलं- घरीच गाणं असल्यामुळे त्यांच्या कानावर सतत गाणं पडत असे आणि ते रक्तात भिनल्यामुळे ती आपसूकच गाऊ लागत. पुढे आपल्या वडिलांकडून तालीम घेत असत. अशा मुलांना ‘खानदानी घराने का बच्चा’ म्हटलं जाई. ज्यांच्या घरात अनेक पिढय़ा संगीत चालत आलेलं आहे, असं ते खानदान आणि त्या खानदानामध्ये वाढलेलं ते अपत्य! आपल्या डोळय़ांसमोर अनेक सुप्रसिद्ध वडील-मुलगा, आई-मुलगी अशा जोडय़ा येतील. उस्ताद अल्लारखा खाँसाहेब आणि उस्ताद झाकीर हुसेन. तसंच गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर आणि गानसरस्वती किशोरीताई. उस्ताद अल्लाउद्दीन खाँसाहेब आणि अली अकबर खाँसाहेब आणि अन्नपूर्णादेवी.. 

त्यानंतरच्या काळात काही गुरूदेखील शिष्याच्या घरी जाऊन शिकवत असत. असे अनेक गायक-गायिका आहेत, ज्यांच्या घरी जाऊन गुरू तालीम देत असे. मला आठवतंय, पंडित गजाननबुवा जोशीदेखील अगदी पहाटे ५ वाजताची लोकल ट्रेन पकडून आपल्या शिष्यांकडे जाऊन त्यांना तळमळीनं तालीम देत असत. मी मात्र शिकले आमच्या सरांच्या क्लासवर जाऊन. ‘गुरुसमर्थ गायन-वादन विद्यालय’ या नावानं माझे गुरुजी पंडित वसंतराव कुलकर्णी क्लास चालवत असत. दीडशे-दोनशे विद्यार्थी येत असावेत. सात-आठ शिक्षकही होते. तबलाही शिकवला जात असे. चार वेगवेगळय़ा खोल्यांमध्ये सतत क्लास सुरू असे. गुरुकुलानंतरची ही ‘क्लासिकल’ पद्धत; क्लासमध्ये जाऊन शिकण्याची!

पंडित सुरेश तळवलकर हेदेखील गोरेगावमध्ये आपल्या घरी अनेक शिष्यांना ठेवून घेत आणि त्यांना उत्तम तालीम देत. मला आठवतंय, ४ वाजता शिष्यांना उठवून त्यांना रियाजाला बसवत. वेळेचं बंधन नसे त्यांच्या तालमीला! शिष्यानं उत्तम तालीम घेऊन, स्वत:ला झोकून देऊन रियाज करण्याव्यतिरिक्त कोणतीही अपेक्षा सुरेशदादा ठेवत नसत. सर्वस्व देत आणि अजूनही देताहेत. हजारो विद्यार्थी सुरेशदादांनी तयार केले आहेत. अजूनही तितक्याच तळमळीनं, निरपेक्षपणे विद्यादानाचं काम करणारे सुरेशदादा.

मला आठवतोय तो अभिषेकीबुवांचा लोणावळय़ाचा बंगला. तिथे अनेक शिष्य अभिषेकी बुवांच्या घरी राहून गाणं शिकत असत- पं. राजाभाऊ काळे, पं. अजित कडकडे तसंच पंडित जसराजजीदेखील. मुंबईच्या त्यांच्या घरी काही शिष्य त्यांच्या घरी राहून शिकत असत. त्यांचा भाचा रतनमोहन शर्मा, अंकिता जोशी आणि इतर अनेक. मी एकदा बनारसला गेले होते. पंडित रविशंकर यांनी त्यांच्या घरी होणाऱ्या महोत्सवात गाण्याचं निमंत्रण दिलं होतं. मी त्यांच्याच घरी उतरले होते आणि अत्यंत जवळून त्यांची दिनचर्या पाहात होते. पार्थो सरोदी हा त्यांचा शिष्य तालीम घेण्यासाठी त्यांच्या घरी राहायला आला होता. गुरुजींची अत्यंत आदरानं सेवा करताना मी त्याला पाहिलं. गुरू कळकळीनं शिकवतो आणि शिष्यसुद्धा त्याच्याजोगती गुरूची सेवा करतोच.  

पंडित रघुनंदन पणशीकर गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्याकडे सतरा वर्ष शिकले. बारा वर्षांची तपश्चर्या आणि अधिक पाच वर्ष. ताईंची आज्ञा शिरसावंद्य असे. त्या म्हणतील तसंच रघुनंदन वागला सतरा वर्ष. त्या सांगतील तसा रियाज, त्या सांगतील त्या वेळेला येणं, कार्यक्रमाला त्यांनी गाण्याची परवानगी न दिल्यास न गाणं.  त्यांनी परवानगी दिल्यानंतरच त्यानं जाहीर कार्यक्रमात गायला सुरुवात केली. संपूर्ण शरण जाऊन मिळवली त्यानं विद्या. आता चित्र थोडं थोडं बदलू लागलंय. पूर्वीच्या काळी एकदा संगीतविद्या शिकण्याचं ठरवल्यावर शाळा-कॉलेजला तितकं महत्त्व दिलं जात नसे. संगीतातच झोकून देत असत जीवन! पण आता शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण, पदव्या मिळवणं, त्यानंतर पदव्युत्तर पदवीचं शिक्षण हे महत्त्वाचं होऊ लागलं. मग शाळा-कॉलेज सांभाळून गुरूकडे जाणं, तालीम घेणं, घरी रियाज करणं, अनुषंगानं बाहेर कार्यक्रम करणं आणि नाव मिळवणं असा  प्रवास सुरू झाला.

 भारतीय रागसंगीत हे अत्यंत सखोल. त्याचा अभ्यास करण्यासाठी गुरुकुलपद्धती सर्वोत्तम. पण काळाच्या महिम्यामुळे प्रत्येक गुरूला हे शक्य होत नाही. मी वसंतराव कुलकर्णीच्या क्लासनंतर किशोरीताईंकडे दररोज त्यांच्या घरी जाऊन सकाळी चार तास आणि दुपारी चार तास अशी तालीम घेत असे. त्यानंतर पंडित दिनकर कायकेणी यांच्या घरी जाऊन शिकत असे. तसंच उल्हासदादांच्यादेखील (कशाळकर) घरीच जाऊन मी तालीम घेतली.

जेव्हा मी मुंबईत शिकवायला सुरुवात केली, तेव्हा काही शिष्य माझ्या घरी येऊन शिकत असत. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या काही शिष्य माझ्याकडे शिकू लागल्या. काही शिष्या बाहेरगावहून माझ्याकडे येऊन शिकत असत. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या मुलींना ‘पेइंग गेस्ट’ म्हणून ठेवून घेण्यास सदनिकाधारक तयार नसत. याचं कारण मुलं वेळीअवेळी करत असलेला रियाज आणि त्याचा इतर पेइंग गेस्ट मुलींना त्रास होत असे. त्या वेळी मी ठरवलं, की माझ्याकडे बाहेरगावहून येऊन शिकणाऱ्या मुलींची व्यवस्था मीच करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी माझ्या बाजूची एक सदनिका घेऊन त्यात बाहेरगावहून येणाऱ्या मुलींची राहाण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. कोलकाता, दिल्ली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, तसंच परदेशातूनही अनेक मुलींना येऊन इथे राहून माझ्याकडे शिकण्याची संधी उपलब्ध होऊ लागली. उत्तम विद्याग्रहण, उत्तम रियाज होऊ लागला त्यांचा. गुरुकुलापासून ‘कूल’ गुरूपर्यंतचा प्रवास झालेला आहे म्हणा नं!

आज वेगवेगळय़ा इच्छा घेऊन येणारे अनेक शिष्य पाहिले आहेत मी. ‘पटकन गाणं शिकता येईल का?..काही शॉर्टकट असेल का?..’ असा विचार मनात घेऊन आलेले! काही ‘रीअ‍ॅलिटी शोज्’ पाहून, त्यातलं ग्लॅमर पाहून किंवा इतर मोठय़ा गवय्यांचं, गायिकांचं गाणं ऐकून, त्यानं प्रेरित होऊन येणारे शिष्य पाहिले. अशांचा खूप काळ टिकाव मात्र लागत नाही. प्रेरित होण्याबरोबरच कष्ट करण्याची तयारी, चिकाटी आणि सातत्य हे गुण अत्यंत महत्त्वाचे! आता तर इंटरनेट सुविधेमुळे जगातील अनेक देशांमधून, शहरांमधून दूर परदेशी असलेल्या गुरूकडे ‘ऑनलाइन’ विद्याग्रहण करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. असं शिकण्यात काही तांत्रिक त्रुटी राहतात; पण तरी एका चांगल्या स्तराला पोहोचलेल्या शिष्याला दूर राहून ऑनलाइन शिकल्यानंदेखील फायद्याचं ठरू शकतं. ताल ही संकल्पना आणि त्यातले बारकावे शिकवणं हे ऑनलाइन शिक्षण पद्धतीमध्ये थोडं कठीण होतं; पण त्यातूनही मार्ग काढून विद्यादानाचं काम सुरूच आहे. काळ बदलला, वेळ बदलली; पण संगीत विद्यादानाचं काम काही थांबलेलं नाही. मग गुरुकुल पद्धती असो की ऑनलाइन शिक्षणपद्धती. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे संगीत विद्या सुपूर्द करण्याचं काम हे असंच निरंतर चालू राहील. नवनवीन शिष्य गुरूकडे शिकतील, तालमीत तयार होतील, मोठे गायक-गायिका होतील. विद्याग्रहणानं पचवलेल्या विद्येचं कलेत रूपांतर करून मोठे कलावंत होतील आणि नंतर नवीन शिष्यांना तीच विद्या देण्याचं कामही गुरू करतील. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’..!

Story img Loader