आई – बाबा तुमच्यासाठी
अभ्यासाचे काळ काम वेगाच्या गणितासारखे गुणोत्तर नसते, की रोज सहा तास अभ्यास केल्यावर सत्तर टक्के मिळाले म्हणजे रोज नऊ तास केल्यावर एकशेपाच टक्के मिळतील किंवा ते असे कामही नाही, की ज्याला मेहनतीच्या प्रमाणात मोबदला मिळेल. जो अभ्यास करायचा, तो समजून करणे महत्त्वाचे असते. बहुसंख्य पालकांना हे समजत नाही आणि ते येताजाता, ‘ए, अभ्यास कर रे’ वा ‘कर गं’ म्हणून मुलांच्या मागे लागतात.
बारावीत शिकणारा गौरव त्याच्या आईचा कसला तरी निरोप देण्यासाठी आला होता. त्याच्या हातात तऱ्हेतऱ्हेच्या अंगठय़ा पाहून मी गमतीत विचारले, ‘‘काय रे, अंगठय़ा घालायला बोटं कमी पडतायत का?’’ ‘‘अहो, हा सगळा आईचा आग्रह. ही अंगठी म्हणे गुरुबळ वाढविण्यासाठी, ही अशीच कुठल्या तरी ग्रहाची पीडा कमी करण्यासाठी, ही माझं अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढविण्यासाठी.’’ काहीशा शरमेने, काहीशा उद्वेगाने गौरवने स्पष्टीकरण दिले.
गौरव हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याची आई पूर्णवेळ गृहिणी आहे. तिचे सर्व लक्ष अर्थात गौरववर केंद्रित आहे. लहानपणी ती गौरवला बाजूला बसवून अभ्यास करवून घेत असे. गौरवला मार्क्‍ससुद्धा चांगले मिळत. मात्र पुढे वरच्या इयत्तांमध्ये गेल्यावर आईला अभ्यास घेणे जमेनासे झाले. अभ्यासाचा आवाकाही वाढत चालला, त्यामुळे नुसती घोकंपट्टी पुरेनाशी झाली. त्यात आईकडून मिळणारे स्पून-फीडिंग बंद झाले, तसतसे गौरवचे मार्क्‍स कमीकमी होऊ लागले. आधी हुशार असलेल्या मुलाची खालावत चाललेली कामगिरी पाहून आईवडील हैराण झाले. मग कधी ग्रहताऱ्यांवर खापर फुटायला लागले; कधी त्याला संगत चांगली नसल्याचा अंदाज केला जाऊ लागला; कधी त्याने पौगंडावस्थेत प्रवेश केल्याने त्याचे लक्ष अभ्यासाऐवजी ‘भलतीकडेच’ असल्याचा तर्क केला जाऊ लागला. परिणामी त्याच्या गळ्यात गंडेदोरे, हातात अंगठय़ा आल्या; त्याला तऱ्हेतऱ्हेचे क्लास लावले गेले. मित्रांशी जेवढय़ास तेवढे संबंध ठेवण्याबद्दल बजावण्यात आले; त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाऊ लागले; सतत अभ्यास एके अभ्यास करण्याची सक्ती होऊ लागली.
 असे कित्येक मुलांच्या बाबतीत घडते की, आईवडील मुलाला हुशार समजत असतात. मात्र त्याला/तिला परीक्षेत (आईवडिलांच्या) अपेक्षेएवढे यश मिळत नाही. त्यामुळे घरात सतत तणावपूर्ण वातावरण राहते. आमच्या परिचयातील चिन्मयची आई तो बारावी पास झाल्याचे पेढे द्यायला आली होती. चिन्मयला सत्तर टक्के मार्क्‍स मिळाले होते. त्याच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल मला फारशी माहिती नसल्याने त्याचे अभिनंदन करायचे की सांत्वन ते समजेना. त्यामुळे मी विचारले, ‘‘मग काय, चिन्मयला अपेक्षेप्रमाणे मार्क्‍स मिळाल्येत की नाही?’’ यावर डोळ्याला पदर लावीत त्याची आई म्हणाली, ‘‘अहो, रोज जेमतेम सहा तास अभ्यास करून एवढे मिळवले, मग जास्त केला असता तर जास्त नसते का मिळाले? पण ऐकेल तर ना!’’ मला काय बोलावे ते कळेना. अभ्यासाचे काळकामवेगाच्या गणितासारखे गुणोत्तर नसते, की रोज सहा तास अभ्यास केल्यावर सत्तर टक्के मिळाले म्हणजे रोज नऊ तास केल्यावर एकशेपाच टक्के मिळतील किंवा ते असे कामही नाही, की ज्याला मेहनतीच्या प्रमाणात मोबदला मिळेल. जो अभ्यास करायचा, तो समजून करणे महत्त्वाचे असते. बहुसंख्य पालकांना हे समजत नाही आणि येता जाता, ‘ए, अभ्यास कर रे’ वा कर गं’ म्हणून मुलांना दटावण्याव्यतिरिक्त त्यांना अभ्यासाकरिता प्रवृत्त करण्यासाठी काय करता येईल, अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचे, ते माहीत नसते.  
 जगातल्या कोणत्याही समाजात बुद्धिमत्तेप्रमाणे माणसांची वर्गवारी केली तर शंकूच्या आकाराचा ग्राफ तयार होतो. सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेली माणसे सर्वात जास्त असतात. सर्वसामान्यांपेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेली माणसे त्यापेक्षा थोडी कमी असतात. अगदी कुशाग्र बुद्धिमत्तेची त्याहून कमी, तर प्रचंड बुद्धिमत्ता असलेली माणसे हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असतात आणि समाजाला त्यांची गरजही तेवढय़ाच प्रमाणात असते. आईनस्टाईन, न्यूटन यांच्यासारखी माणसे तर दोन हजार वर्षांतून एकदा जन्माला आली तरी पुरतात किंवा आपल्या भोवतालचं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉईज, नस्रेस, ऑफिस स्टाफ यांची संख्या सर्वात जास्त असते; पदवीधर डॉक्टर्स, टेक्निशियन्स, थेरपिस्ट त्याहून कमी संख्येने, स्पेशालिस्ट डॉक्टर्स त्याहून कमी संख्येने, तर सुपरस्पेशालिस्ट हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ा संख्येनेच असतात.
 पूर्वी अभ्यासात मिळणाऱ्या गुणांप्रमाणे विद्यार्थ्यांची रचना केल्यावरसुद्धा शंकूच्या आकाराचा ग्राफ तयार होत असे. डििस्टक्शन मिळवणारे विद्यार्थी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे असत; प्रथम वर्ग मिळवणारे त्यापेक्षा थोडे जास्त; द्वितीय वर्ग मिळवणारे सर्वात जास्त असत. हे गुणोत्तर वर सांगितल्याप्रमाणे समाजाला त्या त्या वर्गाच्या व्यक्तींच्या असणाऱ्या गरजेप्रमाणेच होते. हल्लीच्या शिक्षणव्यवस्थेत मात्र मार्काचा महापूर आला आहे व या शंकूचा पार आयत होऊन गेलाय किंवा चक्क उलटा शंकू झालाय. त्यामुळे अनेक पालकांचा गोंधळ होतोय.
  एकदा आमच्याकडे एक ओळखीचे जोडपे आले होते. त्यांचा मुलगा दहावीत शिकत असल्याने संभाषणाची गाडी अर्थातच त्याच्या अभ्यासावर आली. जोडप्यातल्या श्रीमती तक्रार करत म्हणाल्या, ‘‘अभ्यासच करत नाही हो, सगळं लक्ष आपलं खेळ, टीव्ही आणि कॉम्प्युटरकडे!’’ तेव्हा एवढा वेळ शांत असलेले श्रीयुत पुढे सरसावत आपल्या पत्नीला विचारते झाले, ‘‘काय गं, तुला एस.एस.सी.ला किती मार्क्‍स होते?’’ ‘‘बासष्ट टक्के.’’ सौ. लाजतलाजत बोलल्या. तेव्हा ते गृहस्थ बोलले, ‘‘आणि मला अठ्ठावन्न टक्के. मग आपल्या मुलाला कुठून मिळणार ऐंशी आणि नव्वद टक्के?’’ मग माझ्याकडे वळून ते म्हणाले, ‘‘अहो, त्या बिचाऱ्या मुलाला ही अभ्यासावरून सतत छळते; त्याने कितीही मार्क्‍स मिळवले तरी हिचं मुळी समाधानच होत नाही.’’ मी मनातल्या मनात त्या गृहस्थांना दंडवत घातला आणि पालक म्हणून त्यांना शंभर टक्के मार्क्‍स दिले. आपले मूल जसे आहे तसे स्वीकारणारे असे पालक फारच अल्पसंख्य आहेत.
  मुलांनी स्वयंप्रेरणेने अभ्यास करण्यासाठी त्यांना एक समज (ें३४१्र३८) यावी लागते. ती येण्याचे प्रत्येकाचे वय वेगवेगळे असते (हुशार मुलांना ती बऱ्याच लहान वयातच येते). पण एकदा ती आली की, त्या मुलाला ‘अभ्यास कर’ असे सांगावे लागत नाही व ती येईपर्यंत अभ्यास करण्यासाठी मुलांच्या कितीही मानगुटीवर बसले किंवा सत्राशेसाठ क्लास लावले तरी मार्कामध्ये वाढ दिसत नाही; पण एखाद्या गाडीवानाने बलांना शेपटी पिरगाळून धावडवावे तसे पालक यानिमित्ताने तरी अभ्यास करेल म्हणून तऱ्हेतऱ्हेच्या स्पर्धा-परीक्षांना मुलांना बसवत राहतात; त्यासाठी पुन्हा आणखी क्लास लावतात व आधीच शाळा/कॉलेज व क्लास अशा दुहेरी व्यवस्थेमुळे गांजलेल्या मुलांचे आयुष्य दु:सह करून टाकतात. ज्या मुलांना रूटीन शालेय अभ्यास व परीक्षांचा ताण येत नाही, ओझे वाटत नाही अशा मुलांनाच स्पर्धा-परीक्षेला बसवणे योग्य ठरते.
इथे एक उदाहरण सांगितल्याशिवाय राहवत नाही. गौरी जोशी ही माझ्या मत्रिणीची मुलगी. तिची हुशारी लहानपणापासून लक्षात येत होती, पण तिच्या सुजाण पालकांनी तिला कधीच कुठल्याच स्पर्धा-परीक्षेला बसवले नाही. ती क्लासला गेली; पण अभ्यासाच्या नव्हे तर हार्मोनियमच्या, सुगम संगीताच्या! याशिवाय तिने भरपूर अवांतर वाचन केले. जणू तिची सर्व शक्ती तिने बारावीच्या वर्षांसाठी राखून ठेवली होती. बारावीत सर्व शक्ती एकवटून अभ्यास करून तिने मुंबई आय.आय.टी.मध्ये प्रवेश मिळवला, तोही थेट एम.टेक.ला. दोन वर्षांपूर्वी आय.आय.टी.च्या सर्व केंद्रांमधून एम.टेक.ला सर्वप्रथम आल्याबद्दल तिला सुवर्णपदक मिळाले; त्यानिमित्ताने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती शालेय आयुष्यात कधीच कुठल्याच स्पर्धा-परीक्षेला न बसल्याचे तिच्या आईने आवर्जून सांगितले. सुज्ञासी अधिक सांगणे नलगे.
एक मत्रीण बऱ्याच दिवसांनी भेटली. सहज लेकीची चौकशी केल्यावर म्हणाली, ‘‘अगं, लेक एमबीए झाली, पण अजून चांगला जॉब नाही गं. म्हणजे तशा नोकऱ्या मिळतायत, पण तिला चांगलं डिस्टिंक्शन मिळालंय एमबीएला. त्यामानाने पगार देणाऱ्या नाही मिळत. तिचा सीव्ही तुला मेल करायला सांगते. बघशील का कुठे?’’ यथावकाश तिच्या लेकीचा सीव्ही मला मिळाला. बघते तर तिने कुठल्या तरी टुकार युनिव्हर्सटिीतून कॉरस्पॉन्डन्ट कोर्सने एमबीए केले होते. त्या युनिव्हर्सटिीने तिला अगदी हातचे न राखता मार्काची एवढी खैरात केली होती की तिला दहावी, बारावी किंवा पदवी परीक्षेपेक्षाही भरघोस मार्क्‍स दिले होते. आता युनिव्हर्सटिीपण मोठी दर्जेदार नाही आणि नोकरी मिळविण्याच्या कामी त्याचा उपयोग नसतो हे इथे ना पाल्याला माहीत होते ना पालकांना. त्यामुळे नोकरीबाबत अपेक्षा आभाळाला भिडल्या होत्या.
 पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, हल्लीच्या शिक्षणव्यवस्थेत मिळणारे मार्क हे गुणवत्तेचे निर्देशक असतातच असे नाही. मला तर नेहमी वाटत आले आहे की, या वर्षीचे दहावी/बारावीचे अमुक टक्के म्हणजे ७० सालचे, ८० सालचे वगरे किती टक्के हे दर्शविणारे एखादे तयार कोष्टक म्हणजे रेडी रेकनर जर तयार करता आला तर बऱ्याच पालकांना आपल्या पाल्याच्या कामगिरीचा योग्य अंदाज बांधण्यास मदत होईल. पालकांनी आपल्या पाल्याची कुवत ओळखून ती योग्य प्रकारे वापरली जाते आहे ना हे बघितले पाहिजे. जर पाल्याच्या कुवतीला योग्य न्याय दिला जात असेल तर मिळणाऱ्या मार्कावर समाधान मानले पाहिजे. त्यापलीकडे ताणण्यात अर्थ नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा