बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण स्त्रियांमध्ये आलेली अर्थसाक्षरता शहरी स्त्रियांच्या मनात गंड निर्माण करू शकेल इतकी वाखाणण्याजोगी आहे. शहरात आपल्या घरातील व्यक्ती भाऊ, नवरा दारूच्या व्यसनात बुडालेले असतील तर आपण सतत एका दडपणाखाली असतो, समाजातील बेअब्रूला घाबरत राहतो, पण गावाकडे या स्त्रिया बिनधास्त त्याची चर्चा करतात, प्रसंगी दारूबंदीसाठी मोर्चे काढतात, वेळ आली तर दारूचे अड्डे उद्ध्वस्त करतात. हे रणरागिणीपण आपल्यात, शहरी स्त्रीत आहे का? आणि याला समाज नव्हे तर आपण स्त्रियाच जबाबदार आहोत, हे कधीतरी मान्य करायला हवं..

ग्रामीण महिला म्हणजे फक्त अबला, अशिक्षित, आत्मविश्वास हरवलेली असा सर्वसाधारण समज आहे, यात काही प्रमाणात तथ्य जरूर आहे. म्हणूनच येथील महिलांसाठी देशपातळीवर अनेक कार्यक्रम हाती घेतले जातात. यंदाही संयुक्त राष्ट्रसंघाने Empowar Rural Women – End Hunger and Poverty हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यात त्यांच्या विकासासाठी प्रकल्पांची आखणी होते. महिलांच्या संघटनाही या उपक्रमावर भर देताना दिसतात. त्याचा फायदा या महिला घेताना दिसताहेत, इथल्या महिला मोठय़ा संख्येने बदलताहेत.. पण म्हणजे शहरी महिलांची स्थिती यापेक्षा वेगळी आहे, याचं उत्तर ‘नाही’ असं आहे, किंबहुना काही बाबतीत ती ग्रामीण महिलांपेक्षा भीषण आहे, असं मला वाटतं. आणि याला समाज नव्हे तर आपण स्त्रियाच जबाबदार आहोत, हे कधीतरी मान्य करायला हवं. दुसऱ्याकडे बोट दाखवताना तीन बोटं आपल्याकडेच वळलेली आहेत हे सत्य स्वीकारलं पाहिजे.
मध्यंतरी मी विदर्भात एका महाविद्यालयात एका सेमिनारसाठी गेले होते. त्यात बहुसंख्य मुलीच होत्या. अध्यक्षीय समारोपाची निरीक्षणं त्या मन लावून ऐकत होत्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांसोबत अनौपचारिक गप्पाही मारल्या. त्या सेमिनारमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या विद्यार्थिनींचे मी मन:पूर्वक अभिनंदनही केले. तिने सादरीकरण आपल्या लॅपटॉपच्या सहाय्याने केले होते. त्यातील सर्व तपशील, स्लाइड्स, वेगवेगळे नकाशे, दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करून त्या मुलीने पर्यावरणावरील जैवविविधता या विषयावर अतिशय चांगला संशोधनपूर्ण प्रबंध सादर केला. आपले विचार ती अत्यंत आत्मविश्वासपूर्वक मांडत होती. संगणकावरही तिची हुकमत जाणवत होती. चौकशी केल्यावर समजले की, त्यांच्या कॉलेजमध्ये सर्व मुले-मुली संगणक अत्यंत सफाईदारपणे वापरतात. त्यांचे प्रकल्प हे संगणकावर व्यवस्थित टंकलिखित केलेले असतात.
महाराष्ट्रातील एका तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी कुटुंबातल्या मुला-मुलींचा हा आत्मविश्वास माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.. छोटय़ा गावात भले
६-६ तास भारनियमन आहे, पण तेथील ज्ञानाची आस आणि आधुनिकतेचा ध्यास खरंच उल्लेखनीय आहे. मी कामानिमित्त अनेक गावांमध्ये फिरते तेव्हा मला एक जाणवते की तेथील मुली, स्त्रिया नव्या तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त उपयोग करून घेताहेत. पुढे-मागे मोठय़ा शहरात गेले तर कुठे कमी पडता कामा नये अशी त्यांची भावना आहे. संगणकयुगामुळे माहितीचा स्रोत ही केवळ शहरांची मक्तेदारी नाही या वास्तवाचा त्या जास्तीतजास्त चांगला उपयोग करून घेत आहेत.  याउलट चित्र मला शहरात दिसतं. माझ्या परिचयाच्या अनेक स्त्रिया, प्राध्यापिका, अधिकारी महिला अशा आहेत की, त्या संगणक वापरत असूनही पुरेशा संगणक साक्षर नाहीत. अनेक पूर्णवेळ लेखिका आहेत, पण त्यांना मराठीतून संगणकावर लिहिता येत नाही.. विचारलं तर म्हणतात, नाही जमत, मला वाटतं त्या प्रयत्नात कमी पडतात. शहरातल्याच तथाकथित उच्चविभूषित स्त्रीने असं दुबळं राहणं, सहजशक्य असलेलं कौशल्य आत्मसात न करणं आणि जो आपला पूर्णवेळ व्यवसाय, पेशा आहे त्यावर अन्याय करणं हे मला खूप भयंकर वाटतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. विशेषत: शहरी पर्यावरणात अशा आत्मविश्वास हरवलेल्या स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. बहुसंख्य मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय स्त्रिया, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे ही मुख्यत्वे विनयभंग, अत्याचार, बलात्कार, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, दारुडय़ा नवऱ्याचा जाच, मोलकरणींवरील अन्याय याचीच चर्चा करतात, पण आपल्या स्वत:च्या मूलभूत कमतरतांबद्दल फारशा जागरूक नसतात. माझ्या मते पुणे, मुंबईसारख्या शहरांतल्या आपण स्त्रिया या अधिक मागासलेल्या आहोत.
शिक्षणात, नोकरीत मिळणाऱ्या संधीबाबत सुदैवी असलो तरी अनेक बाबतींत आपल्याला परंपरागत जोखडाच्या बाहेर जाता येत नाही. घरातले आपले मध्यमवर्गीय संस्कार हे आपल्या प्रगतीतील एक महत्त्वाचा अडसर आहे याची आपल्याला जाणीवही नसते. भीती, असुरक्षितता, आत्ममग्नता आणि रूढी, परंपरांचा वृथा अभिमान ही या मानसिकतेची प्रमुख वैशिष्टय़े आहेत.  सातच्या आत घरात यायचे, रिक्षात जपून बसायचे, परक्या माणसाशी बोलायचे नाही, आधी आपला फायदा पाहायचा, मग दुसऱ्याचा विचार करायचा अशा सूचनांचं ओझं सांभाळतच आपण मोठय़ा झालो. आपण गाडी चालवू शकतो, पण टायर बदलायला येत नाही, दुचाकी स्टँडवर घेऊन पायाने सुरू करायची असेल तर आपल्याला संकट वाटतं, आपण इलेक्ट्रिसिटी या विषयात पीएच.डी. मिळवू, पण घरातला साधा दिवा बदलायचा असेल तर आजही कित्येकजणी भाऊ किंवा नवरा येण्याची वाट पाहतात. फ्यूज बदलणे हे तर आपले कामच नाही अशी ठाम धारणा झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामे, बँकेचे व्यवहार म्हटले की, आपण काढता पाय घेतो. घरातील मोठा आर्थिक निर्णय आपण धडाडीने घेत नाही. संगणकावर आपण काम करतो, पण फेसबुक आणि किरकोळ मेलिंग याच्यापुढे आपण जात नाही, कुठे कॉन्फरन्सला पीपीटी सादरीकरण करायचे असले की, आपण नवऱ्याला किंवा पुरुष सहकाऱ्याला गळ घालतो, एक्सेल, फोटो शॉप त्या तर दूरच्याच गोष्टी.
याउलट स्थिती मला निमशहरी आणि ग्रामीण भागात दिसते, विहिरीवरून पाणी शेंदून आणणे, विहिरीचा पंप चालू करणे, शेतीची कामे यात तर त्या वाकबगार असतातच, शिवाय त्यांच्यात एक उपजत असे जगण्याचे प्रभावी आणि सोपे ठोकताळे असतात. तो धीटपणा असेल, समयसूचकता असेल, वेळप्रसंगी माघार घेण्याचे धोरण असेल, आयुष्यातील शाळेत त्या मला आपल्यापेक्षा दोन पावले नेहमी पुढे वाटतात.  माझी एक विदर्भातील मैत्रीण आहे ती सध्या पुण्यात एका मोठय़ा संस्थेची संचालक आहे, तिने डॉक्टरेट केले आहे, ती ट्रक आणि ट्रॅक्टर लीलयाचालवते. विहिरीत उत्तम पोहते. तिच्या म्हणण्यानुसार अशा अनेक तरुणी गावाकडे आढळतात. बाहेरील समाजात मिसळताना त्यांना कानकोंडे होत नाही. एक वेगळे निरोगी वातावरण त्यांच्याकडे मला दिसलं.
बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण स्त्रियांमध्ये आलेली अर्थसाक्षरता शहरी महिलांच्या मनात गंड निर्माण करू शकेल इतकी वाखाणण्याजोगी आहे. शहरात आपल्या घरातील व्यक्ती भाऊ, नवरा दारूच्या व्यसनात बुडालेले असतील तर आपण सतत एका दडपणाखाली असतो, समाजातील बेअब्रूला घाबरत राहतो, पण गावाकडे या स्त्रिया बिनधास्त त्याची चर्चा करतात, प्रसंगी दारूबंदीसाठी मोर्चे काढतात, वेळ आली तर दारूचे अड्डे उद्ध्वस्त करतात. हे रणरागिणीपण आपल्यात आहे का? मध्यमवर्गाचे शारीरिक आणि मानसिक चोचले खूप असतात असा अनुभव आहे.
आपण अत्यंत क्षुल्लक गोष्टींवरून अस्वस्थ होतो, अनुत्पादक आणि ज्याला गॉसिपिंग म्हणता येईल अशा चर्चामध्ये आपला अधिक वेळ जातो. घरातील नातेसंबंधात किरकोळ कारणावरून आपण अबोला धरतो, मनस्ताप करून घेतो. यातून मानसिक शीण येतो आणि आपल्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ग्रामीण भागातल्या अनेक कुटुंबांमध्ये मला कमी ताण दिसतो. अगदी सासू-सून यांच्यातही शहरातल्याप्रमाणे अतितणावग्रस्त नातेसंबंध नसतात. आपल्याकडची सासू ही भूतपूर्व सून याच भूमिकेत वावरत असते तर खेडय़ातील सासू मी आता सासू आहे, ज्येष्ठ आहे ही धारणा पक्की ठेवून क्षमाशीलतेची भूमिका घेताना दिसतात.  आणि सूनही ते स्वीकारते. आपण शहरातल्या मुली लग्न ठरवताना घरात सासू नाही ही भाग्याची मानतो, तर गावाकडच्या मुलींना सासू, नणंदा, जावा हव्या असतात. शहरात जागांचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती परवडणारी नाही हे मी समजू शकते, पण मुळातच एक तुटकपणा, एक कोष घेऊन आपण जगत असतो. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता जास्त असते.
कागदोपत्री आपण सबला दिसत असलो तरी काही बाबतीत आपण अबलाच आहोत. एक माणूस म्हणून आपल्याला उपलब्ध असलेल्या संधी, कौशल्यप्राप्तीच्या शक्यता पडताळून त्यात आपण किमान साक्षर झाले पाहिजे. आपले शारीरिक, मानसिक, बौद्धिक सबलीकरण झाले तरच आपल्या जगण्याला अर्थ येईल.

women empowerment challenges women experience in society
स्त्रियांचं नागरिक असणं!
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Shani Gocha 2024 saturn transit in kumbha Shani zodiac sign
शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख
Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
society s attitude towards woman marathi news
बायांचं दिसणं, जगणं आणि ‘नागरिक’ असणं!
Education problem of Dalits is forever before due to caste system now due to economy
दलितांचा शिक्षणप्रश्न कायमच, आधी जातीव्यवस्थेमुळे, आता अर्थव्यवस्थेमुळे!
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!