भारतात १९७५ नंतर स्त्री संघटनांच्या कृतिशील चळवळींना प्रारंभ झाला. मात्र भारताइतकी स्त्री जीवनाची दोन ध्रुवीय चित्रे क्वचितच इतरत्र आढळत असल्याने दोन्ही टोकाच्या स्त्रियांना समतोल मध्यांकडे आणण्याची शक्ती असणाऱ्या चळवळी भारतामध्ये रुजू शकलेल्या नाहीत.
स्त्री संघटनांच्या खऱ्या अर्थाने कृतिशील चळवळीची १९७५ ते २००० ही २५ वर्षे होती. स्त्रियांचे प्रश्न अगणित आणि स्त्री चळवळींची शक्ती मर्यादित आणि आपल्याला भौगोलिक क्षेत्रातल्या प्रश्नांची बांधिलकी जास्त मानणारी. त्यामुळे काही विधायक कार्यक्रम हाती घेऊन स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी पावले उचललेली दिसून येतात. स्त्री मुक्ती संघटनेने ‘स्त्री मुक्तीची ललकारी’ हे चळवळीतल्या प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक सोप्या चालीवरच्या गाण्याचे पुस्तक तयार केले. ते इतके लोकप्रिय झाले की त्याच्या पन्नास हजार प्रती खपल्या.
महिला मंडळे, कारखाने, शेतमजूर स्त्रिया यांच्यासमोर कलापथकाचे कार्यक्रम करताना सुरुवातीला जोशपूर्ण म्हटल्या जाणाऱ्या या गाण्याने एकोप्याची भावना निर्माण होई आणि उत्साहपूर्ण वातावरणात पुढचे कार्यक्रम सादर होत. ‘मुलगी झाली हो’ हे असेच पथनाटय़ आणि प्रभावीपणे त्यातून दिसणारी स्त्री जीवनाची विदारक शोकांतिका यामुळे इतके परिणामकारक ठरले की त्याचे १२०० अधिक प्रयोग झाले. नऊ भाषेत त्याचे रूपांतर होऊन ते इतर राज्यांमध्ये पोचले. आंतरराष्ट्रीय महिला अधिवेशनातही ते सादर करण्यात आले. १९८६ मध्ये याच स्त्री मुक्ती संघटनेने ‘प्रेरक ललकारी’ हे मुखपत्र सुरू केले. स्त्रियांचे आरोग्य, शिक्षण, दारिद्रय़, बेकारी, हिंसा, कुटुंबनियोजन, स्त्रीविषयक कायदे आणि पर्यावरण हे विषय त्यात प्रामुख्याने चर्चिले जात. दृश्य माध्यमे ही लिखित माध्यमांपेक्षा अधिक परिणामकारक असतात. त्यामुळे मासिक पाळी, गरोदरपण, बाळंतपण यांची शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी ‘कहाणी नहाणीची’, ‘कहाणी नऊ महिन्यांची’, ‘कहाणी जन्माची’ असे स्लाइड शो तयार करण्यात येऊन ते स्त्रियांपर्यंत पोचवले गेले. याच काळात पुण्यातून ‘बायजा’ मासिक निघत होते. ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न आणि त्यासाठी चालणारे विविध उपक्रम यावर या मासिकाचा विशेष भर होता. ‘मिळून साऱ्या जणी’ हे मासिकही स्त्री प्रश्नांनाच वाहिलेले असून गेली चौदा वर्षे स्त्री-पुरुष संवादावर विशेष भर देऊन ते अव्याहतपणे चालू आहे. १९८३ मध्ये ‘सहेली’ या दिल्लीतील स्त्री संस्थेने भारतातील स्त्री प्रतिनिधींची एक कार्यशाळा घेतली. स्त्रियांच्या जीवनात सकारात्मकता आणणे, स्त्रियांची एकजूट घनिष्ठ करणे, विविध प्रांतांतील स्त्रियांमध्ये संवाद प्रस्थापित करणे, त्यातून वर्गधर्मजातीभेद नष्ट करणे, मनोरंजनाच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्या पृष्ठस्तरावर आणणे इत्यादी उद्दिष्टय़े ठेवून यात गीत, नाटय़, नृत्य, चित्रकारी अशी विविध सत्रे आखली होती. महिलांच्या शक्तीच्या पारंपरिक स्रोतावर लक्ष केंद्रित करून दुर्गा, चंडी, काली या शक्तिमान देवतांच्या प्रतिमांचे आणि कर्तृत्वाचे पुनरुज्जीवन करून आधुनिक स्त्रीला तिच्या अंगातील छुप्या स्त्री शक्तीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या दशकात (१९९० ते २०००) प्रामुख्याने झाला. यात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शक्तिशील नारीचे प्रतीक म्हणून या राष्ट्रमातेच्या हातातून रक्त ठिबकत आहे अशी पोस्टर्सही होती. तेलंगणा आंदोलन आणि चिपको आंदोलनातील झुंजार स्त्रियांच्या कामाच्या कथा ऐकवून स्त्रियांना स्फूर्ती यावी म्हणून हैदराबादच्या स्त्री शक्ती संघटनेने कथाकथनाचे कार्यक्रमही अनेक ठिकाणी केले. महाराष्ट्रातही जिजाबाई, ताराबाई, अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई इत्यादी पराक्रमी ऐतिहासिक स्त्रियांच्या आयुष्यावर अनेक ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित झाल्या. तसेच स्त्री प्रश्नांवर लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी गणेश उत्सव किंवा तत्सम प्रसंगी तरुण-तरुणींचे मानस समजण्यासाठी प्रश्नावली भरून घेण्यात आल्या आणि मग महाविद्यालयात त्याबद्दल चर्चा घेण्यात आल्या.
अशा प्रयत्नांचे दृश्य परिणाम लगेच वर्तन बदलात दिसून आले नाहीत. तरी निदान याबाबतचे विचार तरी सुरू होतात आणि संवेदनशील मनात कुठे तरी ठिणगी पडतेच.
१९९६ मध्ये बंगळुरूमध्ये मिस् वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. जागतिक स्तरावरची अशी स्पर्धा भारतात प्रथमच भरवण्यात येत होती. स्त्रीच्या सौंदर्याचं असे प्रदर्शन ही भारतीय संस्कृती नाही आणि या स्पर्धाच्या निमित्ताने सौंदर्यप्रसाधने उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या मालाची प्रचंड जाहिरात करतात. या स्पर्धा म्हणजे एक प्रकारे स्त्री शरीराचे व्यापारीकरणच आहे या विचाराने स्पर्धाच्या वेळी स्त्रियांनी बाहेर रस्त्यावर फार मोठी निदर्शने करून आपला निषेध नोंदवला. अन्यत्रही अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. स्पर्धाविरोधात अनेक ठिकाणी लेख छापून आले. ७० ते ८०च्या दरम्यान जाहिरातीतील अश्लीलता, पोस्टर्सवर केले जाणारे स्त्री देहाचे प्रदर्शन, काही नाटकांमधील अश्लील दृश्ये, सिनेमातील अर्धनग्न स्त्रियांची नृत्ये यांच्या विरोधात ठिकठिकाणी स्त्री चळवळींतर्फे जोरदार निदर्शने होत होती. काही ठिकाणी पोलिसांच्या मदतीने अश्लील पोस्टर्स काढून टाकली गेली. काही विशिष्ट नाटकांचे प्रयोग बंद पाडण्यात आले, पण एकूणच अशा प्रकारच्या विरोधांना स्त्रियांना फारसे यश लाभले नाही. गेल्या १५, २० वर्षांत सौंदर्य स्पर्धाना प्रचंड मोठा पाठिंबा मिळतो आहे आणि प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैसा यांचे झगमगीत वलय लाभल्याने मध्यमवर्गीय तरुण स्त्रियाही याकडे आकृष्ट झाल्या आहेत. माध्यमातील स्त्री देहाचे प्रदर्शन ही गोष्ट आता इतकी सार्वत्रिक आणि सरावाची बनली आहे की, प्रेक्षक स्त्रियांमधेही एक सार्वजनिक बधिरता आली आहे. दृश्य माध्यमे, साहित्य, कला, चित्रकारी यातील बलात्काराची दृश्ये, अर्धनग्नता, उपभोगाची वस्तू म्हणून होणारे स्त्रीचे चित्रण यांना एक तथाकथित पुरोगामित्वाची सामाजिक चौकट लाभत आहे, त्यामुळे त्या विरोधात आवाज उठवणारे प्रतीगामी, जुनाट बुरसटलेल्या विचारांचे असे ठरवण्याचीही एक मनोवृत्ती समाजात निर्माण होत आहे. त्यामुळे त्या विरोधात आवाज उठविणाऱ्या स्त्रीवाद्यांचा आवाजही काळाच्या ओघात क्षीण होऊन लुप्त झाला आहे. कदाचित् भारताइतकी स्त्री जीवनाची दोन ध्रुवीय चित्रे क्वचितच इतरत्र आढळतील. एका बाजूला माध्यमातील स्त्रीचे विकृत चित्रण, अर्धनग्नता, फॅशन शोज, पाटर्य़ा, डिस्को क्लब, स्त्रियांमधील वाढती व्यसनाधीनता, ‘सोसायटी गर्ल्स’ची वाढती संख्या आणि दुसऱ्या बाजूला पती परमेश्वर मानून, सर्व सौभाग्य अलंकार घालून वडाला फेऱ्या मारणाऱ्या, करवाचौथचे व्रत करणाऱ्या, हरतालिका पुजणाऱ्या उपासतापास व्रतवैकल्ये, पूजाअर्चाचे सोहळे सजवणाऱ्या, अंधविश्वास, अंधश्रद्धा यांच्या आहारी जाणाऱ्या स्त्रिया! या दोन्ही टोकाच्या स्त्रियांना समतोल मध्यांकडे आणण्याची शक्ती असणाऱ्या चळवळी भारतामध्ये रुजू शकलेल्या नाहीत. तरीही खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांच्या असलेल्या, स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या, सारासारविचारांची कुवत असणाऱ्या, प्रथा-परंपरा- सण- रीतिरिवाज अंधपणे न अनुसरणाऱ्या आणि निदान आपल्या वैयक्तिक आयुष्यात चांगल्या अर्थाने परिवर्तन घडवून आणणाऱ्या अनेक स्त्रियांचा एक जातधर्मनिरपेक्ष ‘आधुनिक’ वर्ग तयार झाला. त्यांच्या वाटचालीचा मागोवा पुढील काही लेखांमधून जरूर घेतला जाईल.
२००० पूर्वीच्या स्त्री चळवळींपुढे अनेक आव्हाने होती आणि आपापल्या मर्यादित कुवतीत त्यांनी त्यातून वाट काढलीही. विशेषत: रात्री, अपरात्री घरातून बाहेर काढल्या गेलेल्या, शोषित, अत्याचारग्रस्त, घटस्फोटित स्त्रियांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे, मोफत वकिली सल्ला, समुपदेशन, आर्थिक-मानसिक आधार, रोजगाराची व्यवस्था यासाठी स्त्री मुक्ती संघटना, नारी समता मंच, भारतीय स्त्री शक्ती जागरण, स्त्री आधार केंद्र इत्यादी अनेक संस्थांनी अशी तात्पुरती निवारा केंद्रे काढली. पुढील काळात चोवीस तास सल्ला देणारी हेल्पलाइन सुरू झाली. महिला दक्षता समितीने मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद इथे शासनमान्य कुटुंब सल्ला केंद्रे सुरू केली. कायदेविषयक सल्ला देणारी केंद्रे उघडली. दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे आपत्कालीन निवारे उभे केले. मुंबईत ३ हजार प्रकरणांत केंद्रामार्फत वैद्यकीय, मानसोपचार, पोलिसांशी संवाद इत्यादी मदत देण्यात आली. स्त्रियांशी संबंधित कायद्यातील त्रुटी दूर होण्यासाठी कायदाविषयक अभ्याससत्रे भरवण्यात आली, तर पुण्याच्या समाजवादी महिला सभेने शासनाच्या सहकार्याने जन-केंद्रे (कम्युनिटी सेंटर्स), आरोग्य केंद्रे, साक्षरता केंद्रे सुरू केली. समाजवाद, कायदे, आरोग्य, शिक्षण या विषयांवर १६ पुस्तिका प्रसिद्ध केल्या. फिलिप्स इंडियाच्या सहकार्याने लाकडी खेळणी करणे, वायर वाइंडिंग, ड्रिलिंग करणे अशी कौशल्ये शिकवून अर्थार्जनाची सोय करण्यात आली. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी पाळणाघराची जरुरी होती, अनेक स्त्री संस्थांनी त्या काळात अशी पाळणाघरे सुरू केली.
स्त्री-पुरुष समानता, विवाह संस्था, जोडीदाराची निवड, लैंगिक शिक्षण इत्यादी स्त्रीविषयक मुद्दे घेऊन महाविद्यालयीन मुलामुलींची शिबिरे आयोजित केली. कुमारवयीन मुलामुलींची जिज्ञासा, मूल्यशिक्षण, किशोरवयीन मुलींना वयात येताना मार्गदर्शन यासाठी स्त्री मुक्ती संघटनेने जिज्ञासा प्रकल्प हाती घेतला. पालिके च्या शाळेतील २००० मुलींना मार्गदर्शन केले. शाळांमधून पालकांसाठी समुपदेशन केंद्रे काढण्यात आली. मुलींच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी, सोयींचा अभाव, आर्थिक दुर्बलता, गैरसोयी, असुरक्षितता याकडे महिला आघाडीने विशेष लक्ष दिले. जीवनाश्यक वस्तू विजेचे वाढते दर यावर नियंत्रण असावे, स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्टाचाराला आळा घालावा, पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, प्रसारमाध्यमातील अंधश्रद्धा व धार्मिक कट्टरतावाद थांबवावा, लिंगभेदावर आधारित श्रमविभागणी तोडली जावी, असंघटित क्षेत्रातील स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या मांडाव्यात. त्यांनाही बोनस व बाळंतपणाची हक्काची रजा मिळावी इत्यादी मागण्या स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीने वारंवार करून त्यांचा पाठपुरावा केला.
घरकाम करणाऱ्या कामकरी स्त्रियांनी पुण्यात उत्स्फूर्त संप केला व त्यातून मोलकरीण संघटना तयार झाली. लाल निशाण पक्षातील स्त्री कार्यकर्त्यांनी त्यांना सतत पाठिंबा दिला. अंगणवाडी योजनेमुळे एक लाखांवर स्त्रियांना रोजगार मिळाला. अंगणवाडी स्त्रियांची एकजूट चांगली असून आपल्या मागण्यांसाठी त्या वारंवार मोर्चे काढतात. धरणे धरतात. परिचारिका संघटनाही वेळोवेळी आपल्या मागण्यांसाठी जागरूक राहून एकजुटीने काम करत आहेत. कचरा वेचक स्त्रियांची संघटना बांधणे, त्यांना परवाना मिळवून देणे, भंगारमालाला योग्य भाव मिळवून देणे, ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे शिक्षण, ओल्या कचऱ्याचे खत बनवणे, त्यांच्या मुलांसाठी खेळवाडी चालवणे, मुलींना शिकायला प्रवृत्त करणे इत्यादी कामे जशी स्त्री मुक्ती संघटनेतर्फे चालतात तशीच निरंतर शिक्षण योजनेमार्फत एस्.एन्.डी. विद्यापीठातही चालतात. याशिवाय नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण रक्षण, लोकविज्ञान चळवळ, अण्वस्त्र विरोधी मोहीम यातही स्त्री चळवळींचा सहभाग राहिला. पण तरीही स्त्री चळवळींचा परिणाम कमी का होत गेला, याचा पुढील लेखात विचार करता येईल. ल्ल
डॉ. अश्विनी धोंगडे – ashwinid2012@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा