गावातल्या अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार त्यांना सहन झाला नाही; त्यांनी त्याविरोधात नुसता आवाजच उठवला नाही तर त्या नराधमाला शिक्षा करवली आणि त्या मुलीला आर्थिक मदतही मिळवून दिली. गावातल्या गरीब लोकांवर सधन लोकांकडून पाण्यासाठी होणारा अन्याय मोडून काढला. इतकंच नव्हे तर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्टय़ा संपन्न करण्याबरोबरच आत्मविश्वासही मिळवून दिला. त्या वर्धा जिल्ह्य़ातल्या गिरोली येथील यशोधरा जारुंडे या समर्थ स्त्रीविषयी..
यशोधरा जारुंडे नावाची एक निरक्षर, अंगठाबहाद्दर बाई आयुष्याच्या शाळेतून जे शिकली त्यापुढे पाठय़पुस्तकी शिक्षण फिके पडेल. परिस्थितीने त्यांना जे घडवलं त्याबद्दल आयुष्याच्या त्या ऋणी आहेतच, पण आपल्यासह इतरांच्या आयुष्यात आशेचा दीप पेटवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे.
यशोधरा अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे आल्या. आई-वडील लहानपणीच वारले. त्यामुळे मामा-मामींनी त्यांचा सांभाळ केला. त्यांचीही परिस्थिती बेताचीच होती. मात्र त्यांनी यशोधरेची जबाबदारी स्वीकारली. मामा-मामींच्या कष्टाची त्यांना जाण होतीच. म्हणून अगदी १०-१२ वर्षांची असल्यापासून मामीसोबत त्या घरातली व शेतशिवारातली कामे करू लागल्या. अवघ्या अठरा वर्षांच्या असताना त्यांचं लग्न झालं. वर्धा जिल्ह्य़ातल्या गिरोली (इंगळे) गावातील वसंता जारुंडे या आठवी उत्तीर्ण युवकाशी त्यांचा विवाह झाला.
घर बदललं, नाव बदललं पण यशोधराबाईंचं आयुष्य बदललं नाही. त्यांना सासू-सासरे नव्हते. त्यामुळं मामाने आपली तीन एकर जमीन त्यांना कसायला दिली व हे जोडपं शेतात काबाडकष्ट करू लागलं. म्हाताऱ्या मामा-मामींचा सांभाळ दोघांनी केला. वयोमानाने मामीची दृष्टी कमी होऊ लागली. शेतीची कामं वाढलेली. याचा विचार करता चार वर्षांपर्यंत त्यांनी मूल होऊ दिलं नाही. त्यानंतर झालेला एकुलता एक मुलगा म्हणजे सुमेध.
परिस्थिती हलाखीची, शेतात राबूनही हाती येणारं अपुरंच पडायचं. म्हणून यशोधरा यांनी भाजी विकायला सुरुवात केली. गावोगावी भाजी विकण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. या निमित्ताने त्या अनेकांना भेटल्या. त्यांना जग जवळून बघता आलं. सकाळी शेतात कामं करायची आणि नंतर भाजी विकायला बाहेर पडायचं हा त्यांचा दिनक्रम झाला.
असंच दारोदारी भाजी विकण्यासाठी जाताना त्यांना गावातल्या बचत गटाविषयीची माहिती मिळाली आणि १९९४ मध्ये ‘प्रज्ञा बचत गटा’ च्या त्या सदस्य झाल्या. यानंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं. ते कायमचंच.
यशोधरा प्रामाणिक तर होत्याच, पण कष्ट करण्याची त्यांची तयारीही होती. त्यांनी बचत गटाकडून दोन हजार रुपयांचं कर्ज घेतलं. ते त्वरित मंजूरही झालं. भाजीविक्रीसह त्यांनी कापडविक्री व्यवसाय सुरू केला. लिहिता वाचता येत नसल्याने त्या स्वत:ला कमजोर समजत होत्या. मात्र बचत गटाच्या प्रोत्साहनाने त्यांना नवा हुरूप मिळाला. लवकरच त्या व्यवहारात पक्क्य़ा होऊ लागल्या. पुढे जायचं तर लिहिता वाचता येणं फार गरजेचं आहे, हे त्यांच्या मनानं हेरलं. तोपर्यंत मुलगाही मोठा झाला होता. मग मुलाच्या व पतीच्या सहकार्याने यशोधरा यांनी अक्षरओळख सुरू केली.
 यशोधरा बचत गटाच्या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होऊ लागल्या. त्यामुळे जात्याच हुशार असणाऱ्या यशोधराबाईंना धिटाई आली. एकदा बँकेतल्या एका अधिकाऱ्याने अशिक्षित समजून त्यांना चुकीची माहिती दिली. हे लक्षात आल्यावर यशोधराबाईंनी त्याला चांगलंच खडसावलं. त्यांच्या कामाचं स्वरुप इतकं वाढलं की पुढे प्रज्ञा बचत गटाच्या त्या अध्यक्षा झाल्या.
आजही पहाटे पाचपासूनच त्यांचा दिवस सुरू होतो. घरातलं आवरून सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत त्या शेतात राबतात. त्यानंतर दुपारी बचत गटाच्या कामासाठी वेळ देतात. त्यासह चेतना विकासच्या ‘मैत्री केंद्रात’ आलेले कौटुंबिक वाद, घरगुती संघर्ष सोडवण्यासाठी त्या आघाडीवर असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी अंगठेबहाद्दर असणाऱ्या यशोधराबाई  आज चेतना विकासच्या शिबिरांच्या निमित्ताने शाळा-कॉलेजच्या मुलांना जोडीदाराची निवड, स्वच्छतेचे महत्त्व, मूल्यशिक्षण व शारीरिक आरोग्य यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करते. तरुण मुलींना मासिकपाळी, गर्भधारणा, कौटुंबिक समस्या या विषयांवर समुपदेशही करतात. घरातल्या आई-बहिणींकडे तोंड न उघडणाऱ्या मुली यशोधराबाईंकडे त्यांची समस्या हमखास बोलून दाखवतात. म्हणूनच गावातल्या महिलांचाही त्यांच्यावर विश्वास आहे. यशोधरा यांना सामाजिक बांधिलकीचं भान आहे. मात्र त्या कमालीच्या संवेदनशीलही आहेत.
एकदा शेजारच्या गावात एक बलात्काराची घटना घडली. एका चौदा वर्षांच्या मुलीवर एका चाळीस वर्षांच्या नराधमाने अतिप्रसंग केल्याची ओझरती बातमी कळाली, त्या बैचेन झाल्या. दुसऱ्या दिवशी गावात जाऊन घडकल्या. अपेक्षेप्रमाणे त्या माणसाविरोधात तक्रार नोंदवली गेली नव्हती. यशोधरा यांनी गावातल्याच काही मान्यवर व्यक्तींना हाताशी धरून, योग्यप्रकारे हे प्रकरण हाताळलं. त्या मुलीची बेअब्रू होऊ नये म्हणून त्यांनी विशेष काळजी घेतली व आरोपीला अटक करून गुन्हा नोंदवून घेतला. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून त्यांनी कणखर भूमिका घेतली. पीडित मुलीला शासनाच्या समाजकल्याण खात्यातर्फे २५ हजार रुपयेही मिळवून दिले.
‘गाव तिथे भानगडी अनेक’ याप्रमाणे यशोधरा यांच्या गावातही काही समस्या होत्याच. गावातल्या विहिरींना जेमतेम पाणी असायचं. नळांना पाणी आलं की काही सधन लोक पंपाच्या साहाय्याने पाणी खेचून घेत. त्यामुळे गरीब लोकांची पंचाईत व्हायची. सर्वाना सारखं पाणी मिळावं, यासाठी एक ठराव यशोधरा यांनी ग्रामपंचायतीच्या सभेत मांडला. ‘नळाला पाणी आलेलं असताना वीज कनेक्शन बंद ठेवावं. म्हणजे मग पाणी खेचण्याचा प्रश्नच येणार नाही व पाण्याचा प्रश्न सुटेल,’ असा प्रस्ताव त्यांनी मांडला. अर्थातच या प्रस्तावाला कडाडून विरोध झाला. मात्र यशोधरा यांनी आग्रह कायम ठेवला. शेवटी हा ठराव संमत झाला व गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला.
महिलांवरील अन्याय-अत्याचाराचं मूळ कारण दारू आहे, हे हेरून त्यांनी दारुबंदीसाठी आक्रमक भूमिका घेतली. महिलांची विशेष सभा बोलावली व त्यात तरुणांना सहभागी करून घेतलं. त्यांच्याच मदतीने काही रात्री जागून अनेक दारूचे अड्डे त्यांनी बंद पाडले. दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले. त्यांनी पोलिसांत या मुलांच्याविरोधात खोटय़ाच तक्रारी दाखल केल्या.
धरपकड करणाऱ्या ठाणेदाराला यशोधरा यांनी प्रश्न केला, ‘दारूबंदीसाठी प्रयत्न करणे हा गुन्हा असेल तर आम्हालाही पकडा, फक्त निर्दोष कार्यकर्त्यांनाच का ..’ त्यानंतर कुठे या कार्यकर्त्यांची सुटका झाली.
यशोधरा यांच्या पुढाकाराने गावात सध्या १३ बचत गट स्थापन झाले आहेत. याशिवाय पुरुषांचेही तीन बचत गट सुरू झाले आहेत. त्यांच्या मदतीने ग्रामविकासाचे उपक्रम राबवले जात आहेत.
श्रमदानातून गावातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत.
त्याच धर्तीवर गावात गटार बांधण्याचं काम सुरू झालं. काही भागातील बांधकाम अगदीच कामचलाऊ झाल्याचं यशोधरा यांच्या महिला मंडळाच्या लक्षात आलं. त्यांनी जातीने लक्ष घालून हे निकृष्ट बांधकाम पाडून पुन्हा नव्याने करायला लावले. बायका आता हक्क व अधिकारांविषयी जागरूक होऊ लागल्या आहेत, हेच यातून दिसून येतं.
बचत गटांनी कितीही काही केलं तरी ग्रामपंचायतीकडून हिरवा कंदील आल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. म्हणूनच यशोधरा यांच्या बचत गटाने गावात महिलांची स्वतंत्र ग्रामसभा बोलवण्याचा आग्रह धरला. त्यात बायकांच्या समस्यांवर चर्चा करण्याची मागणी केली. आणि आश्चर्य म्हणजे गावातील बायकांनी सभेला नुसतीच हजेरी लावली नाही तर बायकांनी अडचणीही मांडल्या.
गावकऱ्यांना बचत गटांमुळे आर्थिक पाठबळ मिळू लागलंय. काहींनी बचत गटाकडून कर्जे घेऊन खते, बियाणे यांच्या विक्री केंद्राची स्थापना केलीय व त्यातून नफा मिळवला आहे. काही तरुणांनी एकत्र येऊन ‘महाजन दंतमंजन’ बनवलं आहे. अनेक शैक्षणिक योजनांची माहिती काढून त्याचा लाभ गावकरी घेत आहेत. त्यामुळे गावातील जवळपास प्रत्येक घरातील मुले-मुली शाळेची वाट धरू लागलेत.
सुरुवातीचे झोपडीवजा असलेलं यशोधरा यांचं घर आता पक्क्य़ा बांधकामाचं झालं आहे. रेडिओ, टीव्ही, पंखा अशा सोईंनी संपन्न झालं आहे. पण त्यांनी बचतगटाचं काम करणं सोडलेलं नाही. बचतगटाचं काम व चेतनाविकासचं प्रत्यक्ष मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झालंय, असं त्या म्हणतात. ‘आता इतकी कामं आहेत, की दिवस पुरत नाही.’ समृद्धीच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत. यशोधरा म्हणतात, ‘‘माझ्यासाठी बचतगट व बचतगटासाठी मी.’’
यशोधरा यांचा मुलगा सुमेधही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे जात आहे. तो एम.फील झाला असून जवळच्याच एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाला आहे.
सहकार्याची वृत्ती बाळगणाऱ्या यशोधरा आता गावातल्या अडल्या-नडल्यांना, वृद्धांना पेन्शन वा निराधार योजना, सरकारी अनुदान यांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.
सतत नवीन काहीतरी शिकत राहण्याची यशोधरा यांना आवड आहे. म्हणूनच भाजी व्यवसाय, कापड दुकान याव्यतिरिक्त आता त्या गावात होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रम, सभा किंवा कुणाचे घरगुती सण यांच्यासाठी लागणाऱ्या स्वयंपाकाचे कंत्राट घेतात. सेंद्रिय शेती करण्याचीही त्यांनी सुरुवात केली आहे.
      यशोधरा यांचं महिलांना एकच सांगणं असतं, ‘‘शेती करून घरी बसू नका. घरासाठी, संसारासाठी काहीतरी जोडधंदा कराच. घरात बघून टीव्हीवरच्या मालिका बघण्यापेक्षा नवं काही शिका. आपल्या मुलांबाळांना काही देता येईल, असं काही बघा. नव्या पिढीशी संवाद साधायचं तर नवं तंत्रज्ञान शिकलंच पाहिजे. तरच आपलं त्यांच्याशी जमेल..नाहीतर म्हातारपणी कोण पाहील आपल्याला?’’
जे कष्ट केले त्याचं फळ आज मिळतंय याचं समाधान यशोधरा यांच्या चेहऱ्यावर आहे. पण त्यांना इथेच थांबायचं नाही, अजून खूप काही करायचं बाकी आहे, असं म्हणत त्या पदर खोचून उभ्या आहेत, येणाऱ्या प्रत्येक दिवसाकडून भरभरून मिळवण्यासाठी!
(समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा