रेणू दांडेकर
या शाळेत शिकणारे हेच शिकवणारे आहेत. मोठय़ा वर्गातली मुलेच लहान वर्गातल्या मुलांना आदिवासी जनजातीच्या बारली या मातृभाषेतल्याच पुस्तकांची मदत घेऊन शिकवतात. कला हा ‘आधारशिला’चा स्तंभ आहे. काम करत करत शिकणं, त्यातून मनाला आनंद-समाधान देणाऱ्या गोष्टी निर्माण होणं यात ही अनोखी शाळा मग्न आहे. मध्य प्रदेशातल्या बडवानी जिल्ह्य़ातील सकड गावातील ‘आधारशिला’ या शाळेविषयी..
मध्य प्रदेशमधल्या बडवानी जिल्ह्य़ातील सकड गावातील ‘आधारशिला’ ही एक वेगळी अनोखी शाळा. कसा झाला या शाळेचा जन्म? उत्तर आहे, जनआंदोलनातून. अर्थात लोकजागृती हा मूळ हेतू. आपल्यावर होणारा अन्याय, शोषण, दबाव याविरुद्ध मुलांना जागृत करायचं असेल तर त्यांना वाट दाखवायला हवी. त्यातून ते संघर्ष करू शकतील. न्याय मिळवू शकतील. ही वाट शिक्षणाची, हे लक्षात आल्यावर समाजभान असलेल्या काहींनी येथील आदिवासींसाठी नवी वाट शोधली..
‘रास्ते होते नही चलकर बनाएं जाते है।’ हे ‘आधारशिला’च्या माध्यमातून या काहींनी सप्रमाण दाखवून दिलं. या शाळेबद्दल म्हणता येईल, की लोकांनी, लोकांसाठी चालवलेली लोकांची शाळा! एरवी शाळेत मुलं येतात. तिथल्या शिक्षकांना कोणीतरी वेतन देतं, कोणीतरी पुस्तकं बनवणारं असतं, कोणीतरी इमारत बांधणारं असतं. अभ्यासक्रम कोणीतरी तयार करतं. सगळ्यांना एकत्र करून तिथे शिकवलं जातं. तसं पाहिलं तर सगळंच उपरं असतं. त्या त्या मातीतलं काहीच नसतं. या शाळेचं मात्र तसं नाही. इथलं पहिलं वेगळेपण हे आहे, की तेथील लोकांच्या, आदिवासींच्या सभा झाल्या. त्यातून असे म्हणणे पुढे आले, की शेती, पशुपालन, प्राथमिक आरोग्य, ग्रामव्यवसाय हा अभ्यासक्रमाचा भाग असावा. असंही मत मांडलं गेलं, की या शाळेत तेथील बारली या आदिवासींच्या संस्कृतीतल्याच गोष्टी शिकवल्या जातील, त्यांची मातृभाषाच या शाळेत वापरली जाईल. यातून मुलांना शाळेबद्दल प्रेम वाटेल आणि मग इतर कोणतीही भाषा आपलीशी करायला ते तयार होतील. त्यासाठी पायाभूत पुस्तके वा प्रारंभीचे शिक्षण या लोकभाषेतून होईल. निर्णय झाला आणि जो अभ्यासक्रम तयार झाला तो खास या आदिवासींसाठी, त्यांना प्राधान्य देऊन तयार झाला. यात त्यांचं जगणं, संस्कृती, आदिवासींना प्रश्नांची जाणीव करून देणं या गोष्टींचा समावेश करण्यात आला.
सामाजिक बदलासाठीचा अभ्यासक्रम लोकसहभागातून निर्माण करणारी ही शाळा लोकांना खरा आधार देणारी ठरली आहे. म्हणून ही शाळा लोकांची आहे. सकड या आदिवासींच्याच गावात आदिवासी लोकांनी मागणी केली म्हणून ही शाळा सुरू झाली आहे. शाळेची इमारत आदिवासींनीच बांधून दिलीय. आपला कामधंदा उरकल्यावर सकड गाव आणि परिसरातील आदिवासी या गावात येत आणि बांधकाम करत. ही शाळा सहा एकर जागेवर असून एका लहानशा टेकडीवर आहे. या निवासी शाळेत जवळजवळ १२५-१३५ मुलांपैकी १०० मुलं राहतात. पण ही शासनाची आश्रमशाळा नाही. इथली मुले आठ-नऊ महिने पुरेल एवढा भाजीपाला आणि धनधान्य पिकवतात. शेतात श्रम करतात. उरलेला पैसा मित्रमंडळींच्या इच्छेने देऊ केलेल्या रकमेतून येतो. मुळात इथे शिकणारे हेच शिकवणारे आहेत. मोठय़ा वर्गातली मुलेच लहान वर्गातल्या मुलांना बारली या भाषेतच असणाऱ्या पुस्तकांची मदत घेऊन शिकवतात.
कला हा ‘आधारशिला’चा स्तंभ आहे. काम करत करत शिकणं, त्यातून मनाला आनंद-समाधान देणाऱ्या गोष्टी निर्माण होणं यात ‘आधारशिला’ मग्न आहे. अर्थात हा स्वत: काही करण्यातला आनंद निर्मितीचा असतो नि ते शिकणंही सृजनशील असतं. म्हणूनच ‘आधारशिला’ ही शिकण्याची सुंदर वाट आहे, मुलं चालून चालून ती मळवली जात आहे. त्यातून कधी वेगळी वाटही फुटते आहे. इथली मुलं म्हणतात ‘आम्ही शिकत शिकत शिकवतो’ आणि ‘शिकवत शिकवत शिकतो.’
कशी सुरुवात होते शाळेच्या दिवसाची? ‘समाजाचे भान शिक्षणाला हवे नि ते भान जपण्यासाठी शिक्षणाने स्वत:त बदल करायला हवे.’ हा जणू मंत्रच ‘आधारशिला’ देते. जूनमध्ये शाळा सुरू होते. पाऊस खूप पडत असेल तर नंतर सुरू होते. मुलांच्या घरच्या शेतीच्या कामाचं भान शाळा सुरू होताना ठेवलं जातं, कारण नंतर या मुलांचे पालकही शाळेत शेतीच्या कामांना येतातच. आल्या आल्या १५-२० दिवस शाळेतील सर्व व्यवहार बारली या आदिवासींच्या भाषेत होतात. पुस्तक हातात घेतलं जातच नाही. त्यामुळे नवीन आलेल्या मुलांना आपण एका घरातून दुसऱ्या घरात आल्यासारखं वाटतं. गाणी, गोष्टी, गप्पा सगळं लोकभाषेत चालतं. मोठय़ांकडे पाहून मुलं ‘आधारशिला’ समजून घेऊ लागतात. मोठी मुलं आणि शिक्षक यांना गटागटात विभागलं जातं (शाळेत अडीच वर्षांपासून ते १३-१५ वयाची मुलं येतात. इयत्ता पहिली ते आठवी असे वर्ग आहेत.) मुलं शाळेत रमेपर्यंत त्यांच्यासाठी मजा करणं हाच अभ्यासक्रम असतो. शेतात काम करणं, भटकणं, वेगवेगळ्या गोष्टी पाहणं, गाणी म्हणणं, नाच करणं, नाटकं करणं यात मुलं रमू लागतात. नंतर वर्षभर मग विशेष म्हणजे प्रेमचंद जयंती (मुलं स्वत:च्या अनुभवाच्या गोष्टी लिहितात-सांगतात), चंद्रशेखर आझाद स्मृतिदिन (स्वातंत्र्य लढा), २६ जानेवारी, शिक्षक दिन, हिंदी दिन, खेळ उत्सव, बाल ऊर्जा उत्सव, बालमेळा हे दिवस वेगळ्या पद्धतीने, मुलांच्या कल्पनेनुसार साजरे होतात.
‘आधारशिला’ म्हणजे, ‘‘अॅन अटेम्प्ट टू अंडरस्टॅण्ड द नीटी ग्रीटी ऑफ एज्युकेशन, फ्रॉम द चाइल्ड टू करिक्युलम, द आयडियाज अँड इश्यूज अॅँड सर्च फॉर अल्टरनेटिव्ह वेज ऑफ लर्निग – थिएटर, सिंगिंग, वॉक्स, स्कूल्स विथ क्लास अँड क्लासलेस स्कूल्स.’’ अमित भट्टाचार्य आणि त्यांची सहचारिणी जयश्री यांचं हे सांगणं आहे. हे दोघेही आदिवासी आंदोलनातील कार्यकर्ते आणि नेतृत्वसुद्धा. हे दोघे ठरवून या भागात गेले. १९८० मध्ये नर्मदा खोऱ्यात दोघं भेटले. याआधी अमित दिल्लीतील बारखंबा येथील एका शाळेत शिक्षण घेऊन दिल्लीच्याच ‘द स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर’ येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. प्रचलित शिक्षण अर्थहीन वाटल्यामुळे त्यांनी शिक्षण सोडले नि आदिवासींच्या हक्कांसाठी आंदोलनात सहभागी झाले. मध्य प्रदेशातील विंध्य सातपुडा रांगांतील भिल्ल आणि भिलाला आदिवासींच्यात काम करू लागले. जयश्री यांनी पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयातून रसायनशास्त्राची पदवी घेतली होती. विसाव्या वर्षी नर्मदा प्रवासाला निघाल्या त्या परत पुण्यात परतल्याच नाहीत.
१९८० मध्ये दोघंही भेटले. दरम्यान दोघांचं स्वतंत्र काम सुरूच होतं. जयश्री आदिवासी स्त्रियांसोबत काम करू लागल्या. त्यांचे आरोग्य, सन्मान, वन कायदे, अन्याय निवारण, शिक्षण या क्षेत्रांत कामाला सुरुवात झाली. अमित अलिजापूरला ‘खेडूत मजूर चेतना संघटन’मध्ये आदिवासींचे शोषण आणि विस्थापन या प्रश्नांवर काम करत होते. क्षेत्र एकच. दोघांनाही खऱ्या जगण्याचा शोध घ्यायचा होता. दोघं विवाहबद्ध झाले. १९८९ नंतर आठ वर्षे आदिवासी जीवनाचा प्रवास, संघटनेच्या सभा, लोकांना त्यांचे हक्क मागण्याबाबत जागृती, यात काम सुरू झालं. दोघंही आंदोलक. ‘आदिवासींना समजून घ्यायचं असेल तर मध्यमवर्गीय जगणं सोडून आदिवासींच्यात जाऊन राहिलं पाहिजे.’ या विचाराने ते त्यांच्यात राहू लागले.
आंदोलनाला वैचारिक पाया मिळाला. इथे आदिवासींची संस्कृती, आदिवासींची जीवनमूल्ये काय आहेत हे ते समजून घेऊ लागले. जमीनदार, वन विभाग, शासन यांच्याकडून आदिवासींचं होणारं शोषण त्यांनी पाहिलं. आदिवासींकडे समाजाकडून चेष्टा आणि गमतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. जे लोक थोडेफार शिक्षित होते त्यांना आपल्या बांधवांबद्दल फार काही जाणिवा राहिल्या नव्हत्या. या निरीक्षणाबरोबरच हेही जाणवलं, की शिक्षण फक्त साच्यात घट्ट बांधतं. शिक्षणातच काहीतरी गडबड आहे, जे लोकांना आपल्या समाजापासून दूर करतं आहे.
अमित आणि जयश्री वसतिगृहात रहात होते. तिथे शालेय वर्ग चालवायचे, ते तिथली परिस्थिती पाहात होते. अलिजापूरला माळवा भागातले लोक माळवी आणि बुंदेलखंड भागातले बुंदेली भाषेत बोलतात, पण मुलांची पुस्तके मात्र हिंदी भाषेत. त्यांना आपलं वाटेल असं त्या पुस्तकांत काहीच नाही. पुस्तकात मुलं ‘विंध्यसातपुडा’ हा शब्द वाचतात, पण त्यांना आपण तिथेच राहात आहोत हे माहीत नसतं. याचा अर्थ या शिक्षणाचा काही उपयोग नाही, हे या दोघांच्याही लक्षात आलं. त्यांनी ठरवलं, असं शिक्षण सुरू करूया, जे या आदिवासींना लढा द्यायला, संघर्ष करायला ‘आधारशिला’ होईल. यातूनच लोकांच्या सहभागातून ही शाळा जन्माला आली.
पुस्तकातली बाराखडी बदलली, गोष्टी बदलल्या, मुख्य म्हणजे भाषाच बदलली. सुरुवातीचे सर्व पाठ आजूबाजूच्या जीवनावर आधारित बनले. आधी जे दिसतंय ते अभ्यासात आलं. मग जे दिसत नाही (अॅब्स्ट्रॅक्ट) ते अभ्यासात आलं. मुलांच्या ज्ञानाचा उपयोग शिक्षणात केला गेला. ही शाळा बनली तीच लोकसंघटनांतून. केवळ एकाच पाडय़ावरची नाही तर आजूबाजूच्या ४०-५० पाडय़ांवरून मुलं या शाळेत येऊन राहू लागली.
एरवी शाळेला सतत ‘मिडल क्लास सपोर्ट’ लागतो. कुठून तरी पैसे उभे करण्यासाठी प्रकल्प तयार करून द्यावा लागतो. पण इथे ही शाळा खऱ्या अर्थाने जनआंदोलनातून उभी राहिली. जयश्री – अमित आणि त्यांच्याबरोबर असलेला लोकसमुदाय ‘फंडिंगच्या मॉडेल’मध्ये अडकला नाही. अशी शाळा चिरस्थायी होईल का? कदाचित नाहीही. जोपर्यंत लोकांना ही लोकांची रचना वाटते आहे तोपर्यंत ‘आधारशिला’ तशी असेल. कदाचित बदलेलही.
‘आधारशिला’ नियोजित नाही. वर्ग, घंटा, तास, अभ्यास, परीक्षा, निकाल यात मुलं अडकली नाहीत. १९९८ ला सुरू झालेली ही शाळा आज २० वर्षांची झालीय. या शाळेनं मुलांना शिकायला त्यांचा स्वतंत्र अवकाश दिलाय. अमित – जयश्री यांची मुलंही आठवीपर्यंत इथेच या आदिवासी मुलांबरोबर शिकली आहेत. शेती, शाळा, ग्रंथालय, भोजनकक्ष इथे मुलं मनापासून सहभाग देतात. ‘आज काय करायचं?’ हे मुलं ठरवतात. मुलांना मिळणारं स्वातंत्र्य, त्याचा समजलेला अर्थ आणि त्यातला आनंद यामुळे विद्यार्थीसंख्या वाढतच गेलीय.
शासनाने सुरू केलेली प्रकल्प पद्धत इथे सुरुवातीपासूनच आहे. त्यामुळे त्या प्रकल्पानुसार ज्या मुलांना आपण जे करतोय ते जोपर्यंत करावंसं वाटतं तोपर्यंत ती करतात. शिक्षकांना वेगळं प्रशिक्षण द्यावं लागतं. कारण शिक्षक चाकोरीतून शिकून आलेला असतो. आंदोलनातल्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण केलं नि या शाळेतले शिक्षक तयार झाले. अर्थात प्रशिक्षण झालेली ही शिक्षक मंडळी बाहेर शिक्षक भरतीत समाविष्ट होतात. पण ते ‘आधारशिला’ला स्वाभाविक वाटतं. शिवाय या प्रशिक्षणाचा उपयोग ही शिक्षक माणसं ती जिथं जातील तिथं करणारच, याची त्यांना खात्री आहे.
(‘आधारशिला’तील विविध प्रयोगांवर आधारित लेखाचा उर्वरित भाग २६ ऑक्टोबरच्या अंकात)
‘आधारशिला’चा पत्ता – सकड, एच. एस. चटली, ता. निवाली. जि. बडवानी. राज्य- मध्य प्रदेश (४५१६६६).
संकेतस्थळ – http://www.adharshilalearningcentre.org संपर्क : ८८८९२८९१९६.
renudandekar@gmail.com
chaturang@expressindia.com