‘‘अम्मा… तुला माहीत नाहीए की आयुष्यभरात तू मला काय काय दिलंस… मी लहान असताना तू मला पुस्तकांच्या दुनियेत अलगद सोडून दिलंस… पुस्तकांच्या जगात एकटीनं रमायला शिकवलंस… आपण पुस्तकांविषयी बोलायचो, त्यावर हिरिरीने चर्चा करायचो. ‘गोष्ट’ तर आपल्या दोघींच्या आवडीची… आपल्यातील संवाद अधिक दृढ करण्याचं हे एक उत्तम माध्यम. आणि तू तर उत्तम ‘स्टोरी टेलर… तुझ्यातल्या ‘स्टोरी टेलर’नेच मला पुस्तकांची ओढ लावली. या पुस्तकांनी मला काय शिकवलं? जीवनातील मूल्यं शिकवली. पुस्तकांतून काय घ्यावं याची अचूक शिकवण मला या पुस्तकांनीच दिली… जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असते तेव्हा तू माझ्यासाठी, संवादासाठी उपलब्ध असतेस. तुझ्यासोबतचा प्रत्येक संवाद हा माझ्यासाठी एक मौलिक खजिनाच असल्यासारखं आहे’’
नुकत्याच झालेल्या ‘जयपूर साहित्य महोत्सवा’त ‘माय मदर, मायसेल्फ’ या चर्चासत्रात उद्याोजक अक्षता मूर्ती, नामवंत लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या आपल्या आईला सांगत होत्या. अशा प्रकारचा संवाद त्यांच्यासाठी नित्याचाच असेल, परंतु अक्षता यांची एका जागतिक पातळीवरील व्यासपीठावर आपल्या आईच्या संस्कारांबाबत खुलेपणानं बोलण्याची ही पहिलीच वेळ असेल कदाचित. सुधा मूर्तीही आपल्या लेकीचं बोलणं कौतुकानं ऐकत असतात, पण मध्येच तिला म्हणतात, ‘‘अक्षता, प्रत्येक वडिलांना आपला मुलगा प्रिय असतो, आणि प्रत्येक आईला आपली मुलगी… त्यामुळे आपल्या दोघींचा कौतुक सोहळा आता पुरे! जरा थेट विषयावर येऊ…’’ इथे समोर असलेली मुलगी स्वत: उद्योजक आहे, ती इंग्लंडच्या माजी पंतप्रधानाची बायको आहे, उद्याोजक नारायण मूर्ती यांची कन्या आहे. हे तिच्या नावामागे असलेल्या मोठेपणाच्या बिरुदांना झुगारून आई आपल्या लेकीला प्रेमानं दटावतेय… श्रोत्यांमध्येही हशा पिकतो… जागतिक व्यासपीठावरून आईला ‘अम्मा’ असं संबोधणंही जमिनीशी नाळ जोडून ठेवायला शिकवणारं… जगाच्या पाठीवर कुठेही स्थिरावताना आपल्या मुळांशी जोडून राहणं हाही उत्तम पालकत्वाचाच संस्कार!
‘‘अम्मा, तुझा पालकत्वाचा पहिला संस्कार हा पुस्तकांचा. गोष्ट सांगणारी आई हीच मला तुझ्याविषयीची पहिली आठवण कायम स्मरते. तू मला प्राचीन भारत, विविध देशांमधली संस्कृती, त्यांच्या गोष्टी सांगितल्यासच, पण त्याचबरोबर तू मला विज्ञान, तत्त्वज्ञान, राजकारण, इतिहासही गोष्टीरूपात कथन केलास. रोहन आणि मला तू हेही सांगितलंस, आयुष्याकडून सतत काहीतरी शिकत राहा. जेव्हा तुम्ही शिकणं थांबवाल तेव्हा तुमचं जगणंही थांबेल. मी माझ्या मुली कृष्णा आणि अनुष्का या दोघींमध्येही हाच संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करतेय. त्यांनाही मी हेच सांगत असते. पण हा संस्कार तुझ्यात कसा रुजला हे सांगशील का?’’
अक्षता, मी शिक्षकी पेशा असलेल्या कुटुंबातून आलेय. वडील डॉक्टर, पण ते शिकवायचेही. त्यामुळे पैशांपेक्षा ज्ञान आणि पुस्तके हीच आयुष्याचा मूलाधार आहेत हा संस्कार कळत-नकळत माझ्यावर होत गेला. एखादी भेट म्हणजे पुस्तकं भेट देणं हेच आम्हाला ठाऊक होतं. मी पुस्तकांमध्येच वाढले. ज्ञान हे प्रथम ध्येय, हाच संस्कार माझ्यावर झाला आणि तोच तुझ्यात आणि रोहनमध्ये रुजवला. मी पुस्तकांमधूनच तुमच्यासाठी ज्ञानाची बाग खुली केली.’’
‘‘हो अम्मा, म्हणजे मी श्रोत्यांना सांगू इच्छिते की, घरात तुझी, इतिहास आणि साहित्याची, वडिलांची विज्ञान आणि तंत्रज्ञानाची तर मी आणि ऋषीची (ऋषी सुनक) अर्थशास्त्राच्या पुस्तकांची स्वतंत्र ग्रंथालयं आहेत. मला आठवतंय, तू माझ्या वाढदिवसाला पार्टी करायला द्यायची नाहीस. तू ते पैसे गरजूंना दान करायला सांगायचीस. मी खट्टू व्हायची, परंतु आज कळतंय की, त्या वेळेस तू माझ्याकडून ‘सीएसआर’ अर्थात आपली समाजाप्रति जबाबदारी काय असते याचा पाया घालून दिलास. माणसानं आपलं काम करावं, परिणामांचा विचार करू नये हे तू तुझ्या कृतीतून आम्हाला सांगितलंस.’’
‘‘अक्षता, हा संस्कार मला माझ्या आजीकडून मिळाला. माझी विधवा आजी गावातील सर्व वर्गातील स्त्रियांसाठी सुईणीचं काम करत असे. त्यांना त्यांच्या आरोग्याप्रति जागरूक करत असे. माझे वडील नास्तिक होते. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ असं ते मानत. त्यामुळे माझ्यावरही तो संस्कार झाला.’’
‘‘अम्मा, आपण भगवद्गीतेत वाचलंय की, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’… तूही त्याच मार्गावर मार्गक्रमण करते आहेस… बरोबर ना! ’’
‘‘अक्षता, एक आठवण सांगते, वीस वर्षांपूर्वी मी वेश्या व्यवसायातील स्त्रियांसाठी काम करत होते. त्या वेळेस मला वाटलं की, मी यातल्या दहा जणींच्या आयुष्यात जरी बदल घडवून आणू शकले तरी समाजासाठी मोठी गोष्ट आहे. पण मी अशा तीन हजार स्त्रियांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. सुरुवातीला मला त्यांच्याकडूच त्रास दिला गेला. पण मी माझं काम नेटानं करत राहिले. यात तुझ्या वडिलांचं- नारायण मूर्तींचंही खूप सहकार्य मिळालं. ते माझे उत्तम मित्र आहेत. अक्षता, तू मघाशी म्हणालीस की अम्मा… तू मला हा संस्कार दिलास, हे शिकवलंस. पण तुला हे माहितीय का, तू मला काय दिलंस? तू माझ्या समाजकार्याला दिशा दिलीस. तू सोळा वर्षांची होतीस तेव्हा… तुझा मित्र आनंद खूप हुशार, पण त्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं त्याच्या पुढच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मी प्रश्नपत्रिका काढत असताना तू माझ्याकडे आलीस आणि म्हणालीस, ‘अम्मा, तू आनंदला आर्थिक मदत करशील का?’ मी तेव्हा प्रश्नपत्रिका तयार करण्यात गर्क असल्याने पटकन म्हणून गेले की, ‘त्याला तू पैसे दे.’ तर तू चिडून म्हणालीस, ‘तू मला दहा रुपयेही देत नाहीस. माझे वाढदिवस कसे साजरे करायचे हेही तूच ठरवतेस. मी कुठून पैसे देऊ?’ पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट तू मला सांगितलीस, तू म्हणालीस, ‘तू सामाजिक कार्य करू शकत नसशील तर तुला त्याविषयी सल्ले देण्याचा अधिकार नाही.’ आणि सरळ तिथून निघून गेलीस. पण तुझ्या त्या शब्दांनी मी आतून हलले. तेव्हाच मी ठरवलं, आपल्या समाजसेवेच्या कामाला आकार द्यायला हवा. अक्षता, तू माझी गुरू आहेस. यावरून माझ्या बालपणाचा एक किस्सा सांगते, माझी आजी ६२ वर्षांची होती तेव्हा तिनं माझ्याकडे अक्षरओळख करून देण्याचा हट्ट धरला. मी म्हटलं, ‘तू म्हातारी आहेस. तुला काय याचा उपयोग?’ त्यावर ती म्हणाली, ‘शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते.’ हे वाक्य मनावर कोरलं गेलं. मी एखाद्या कडक शिक्षकासारखं तिच्याकडून अक्षरं घोकून घेतली. तीही तीन महिन्यांत अक्षरओळख शिकून पुस्तक वाचायला शिकली. गुरूंना नमस्कार करण्याची आपली परंपरा आहे. ती जेव्हा वाचायला शिकली तेव्हा ती गुरू या नात्यानं माझ्या पाया पडली. तू मला अक्षरओळख शिकवलीस, तू माझी गुरू आहेस, असं म्हणून… लहान असून गुरू होण्याची परंपरा तू चालू ठेवलीस…’’
‘‘अम्मा, आणखी एक गोष्ट म्हणजे, तू मला आणि रोहनला कुठल्याही प्रकारची सक्ती केली नाहीस. जे हवं होतं ते करू दिलंस. ही तुम्हा दोघांच्या पालकत्वातली फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं.’’
‘‘हो अक्षता, हल्ली तरुणांच्या, मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या ऐकते तेव्हा खूप दु:ख होतं. पालकांनी आपल्या मुलांची तुलना करू नये. तुमचं मूल जसं आहे तसं स्वीकारा. मुलांना त्यांच्या प्रतिभेप्रमाणे वाढू द्यावं, ताण हा आयुष्याचा एक भाग आहे. तो खुबीनं कसा हाताळावा हे मुलांना शिकवायला हवं. आईवडिलांनी आपल्या मुलांना नैतिक मूल्यं शिकवणं गरजेचं आहे. ही मूल्यंच त्यांच्या जीवनाचा खरा आधार आहेत. मी तुम्हाला नेहमीच देशाचा उत्तम नागरिक बनविण्याचा प्रयत्न केला. अक्षता, एक दिवस तुझ्या मुलांना तुझा अभिमान वाटेल.’’
‘‘अम्मा, मला वाटतं, आई-वडिलांनी आपल्या मुलांना प्रथम प्राधान्य द्यावं. काम आणि घर यांच्यात योग्य ताळमेळ साधावा. तंत्रज्ञानामुळे आपण खूप प्रगती केली आहे हे जरी खरं असलं तरी ‘संवाद’ हाच पालकत्वाचा मूलाधार आहे यात शंकाच नाही. मुलं आणि पालकांमध्ये संवाद हा आवश्यकच आहे. संवादाला पर्याय नाही…’’
‘‘ खरंय तुझं म्हणणं अक्षता. पालकांनी मोबाइलच्या स्क्रीनमधून आपलं डोकं बाहेर काढावं. त्यापेक्षा त्यांनी पुस्तकात डोकं खुपसावं. तरच मुलंही पुस्तकात लक्ष घालतील. मुलांना भरपूर गोष्टी सांगा. मी आजही कृष्णा, अनुष्काला गोष्टी सांगत असते. आमचं आजी आणि नातींचं गोष्टीचं जग वेगळं आहे. इतकं की, आपल्या भारतीय संस्कृतीतल्या अनेक गोष्टींवर आधुनिक लंडनसंस्कृतीचा मुलामा चढला आहे. त्या दोघीही मी सांगितलेल्या गोष्टी त्या ज्या संस्कृतीत वाढत आहेत त्या रूपात मला पुन्हा सांगत असतात… संस्कृती जरी भिन्न असली, त्यांचे संदर्भ जरी बदललेले असले तरी ‘गोष्ट सांगणं’ त्या तयार करणं ही प्रक्रिया पुढे चालू आहे. आणि तूही तुझ्या मुलींमध्ये ती रुजवते आहेसच हे महत्त्वाचं… म्हणजेच पालकत्वातील संवादाचा संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे… तो अधिक समृद्ध होत आहे…’’
lata.dabholkar@expressindia.com