एखाद्या वेठबिगाराच्या किंवा माथाडी कामगाराच्या तरुण मुलानं वैफल्याने आत्महत्या केली असं वाचतो का कधी आपण? हा सगळा प्रश्न शहरी – सुशिक्षित मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गामध्येच का येतोय? व्यसनं म्हणू नका, मनोविकार म्हणू नका.. आणि शेवटी कीटकनाशकाचा आसरा! मला तरी प्रश्न पडतो..
स भा संपली तरी जमलेली मंडळी सभागृहाबाहेर पडायला तयार नव्हती. ठिकठिकाणी घोळक्याने – पुंजक्याने उभी राहून कुजबुजत, चुटपुटत, हळहळत रेंगाळत होती. म्हटलं तर नेहमीचीच माणसं आणि नेहमीचंच कॉलनीचं सभागृह. पण प्रसंग विपरीत होता. ‘सी १२’ मध्ये राहणाऱ्या बाणवलींच्या १८ वर्षे वयाच्या मुलाच्या निधनाबद्दल घेतलेली शोकसभा. ज्याच्या पुढय़ात उभं आयुष्य मखमली रुजाम्यासारखं डौलाने उलगडू शकलं असतं त्या उत्साही – चुळबुळ्या कॉलनी हीरो जिमी बाणवलीने कीटकनाशक ढोसून आयुष्यावर लाथ मारली.
जिमी बाणवलीचे आजवरचे एकूण ‘पराक्रम’ बघता तो काहीही करू शकतो याबद्दल कॉलनीवासीयांना खात्रीच होती. पण हे म्हणजे त्याने काहीच्या काहीच केलं. त्यात आणखी जाता जाता, ‘माझ्या डिपार्चरला कोणालाही जबाबदार धरू नये’ अशी चिठ्ठी सोडून घोळ वाढवून ठेवला. असं लिहिणारा स्वत: सफाईने सुटतो आणि मागच्या सगळ्यांना कायमचं पुरतं अडकवून जातो तसा काहीसा प्रकार झाला. सगळीकडे तर्काचं काहूर माजलं.
‘त्या पोराला फॅशन फोटोग्राफी करायची होती. बाणवलीनं त्याला बळेबळे इंजिनीअरिंगला ढकलला. म्हणून तर नसेल नाराजी?’ ‘बाणवली एकदा बोललेला, पोरगा क्रेडिटकार्डावर वेडीवाकडी बिलं करून ठेवतो. फेडताना घाम फुटतो. तेच कारण असणार.’ ‘मध्येमध्ये एक पोरगी फिरायची वाटतं त्याच्याबरोबर. आताशा दिसेनाशी झालीये. पोरीच्या नादानंच घोटाळा झाला की काय?’ ‘बाकी बाणवली पोराचे खूप लाड करायचे नाही? नीट बी. ई. पार पाडलंस तर कुठली ती हार्ले की कुठली मोटरसायकल घेऊन देईन असं बोलला होता तो. आता सगळ्याला खीळ बसलीच ना?’
‘लाडाचं सोडा हो. आपणपण आपापल्या पोरांसाठी जिवापाड करत असतोच की. असं झालं एकदम की संपलंच की सगळं. बाणवलीनं आता कोणासाठी जगावं? कोणाच्या तोंडाकडे बघावं?’
मोठय़ांनाही थक्क करणारा खरा प्रश्न हा होता. शेवटी जे ‘सी १२’ मध्ये घडलं ते एखाद्या ‘ए-५’ किंवा ‘एफ -९’ मध्येही घडू शकलं असतंच की!
हॉलच्या एका पंख्याखाली जमलेला बापलोकांचा घोळका यावरच उसासत होता.
‘‘आताच्या आपल्या पोरांना काय कमी पडतं हेच कळत नाही एकेकदा.’’
‘‘नाहीतर काय. आपल्याला आपल्या लहानपणी बरचसं मिळालेलं नव्हतं, मन मारावं लागलं होतं, ती वेळ आपल्या पोरांवर येऊ नये म्हणून जीव टाकतो आपण..’’
‘‘आपण आपलं मन मारतो एकेकदा, पण त्याचं खाणंपिणं, कपडालत्ता, हौसमौज, शिक्षण यावर जीव टाकतो.’’
‘‘आपल्या बायका तर तेवढी १५-२० वर्षे फक्त पोरांसाठीच जगतात जशा काही! ह्य़ांची दहावीची.. बारावीची र्वष म्हणजे घराघरात कर्फ्यू लागतो आताशा’’
‘‘आमच्याकडे त्याला ‘आणीबाणी’ म्हणतात. कौटुंबिक आणीबाणी!’’
‘‘एवढं करून पोरानं कमी मार्क काढले, अगदी नापास झाला तरी त्याला बोलायचं नाही! उगाच त्याने मनाला लावून घेऊन काही वेडंवाकडं करायला नको.’’
‘‘हो रे ऽ पूर्वी, म्हणजे आपल्या लहानपणी आपण आपल्या पेरेंट्सना घाबरायचो, आता पोरांच्या असल्या धाकात राहायची वेळ आलीये.’’
‘‘एवढं करून ही कधी आपल्याला फटकारून जातील याचा नेम नाही. त्यांना जपताना, वाढवताना आपण कधी म्हातारे होऊन जातो. हे कळतही नाही. बाणवलीने काय कमी केलं होतं या जिम्यासाठी?.. सारखा एकेक फोन, घडय़ाळ अशा नवनव्या गोष्टी मिरवत फिरायचा. बाणवली वर्षांनुर्वष एक जुनी मोटार वापरतोय!’’
‘‘बिचारा!’’
एका अर्थाने बापलोक बाणवलीला नव्हे तर स्वत:लाच ‘बिचारं’ म्हणवून घेत होते. आणि बिचाऱ्या चेहऱ्यांनी, बिचाऱ्या भाषेमध्ये आपल्या बिचारेपणाच्या पाटय़ा तपासून बघत होते. आपण इतकं करतो पोरांसाठी, तरीही हे नष्टचर्य का, या प्रश्नाशी झुंजत होते.
हॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यात गोळा झालेल्या आजोबावर्गाला तर त्यांच्याहूनही बिचारेपण आलेलं होतं. आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने जग सोडलं की म्हाताऱ्यांचा धीर सुटतो त्यातला प्रकार. तोंडातल्या कवळ्या, कानातली श्रवणयंत्रं, हातातल्या काठय़ा सांभाळत त्यांची घुसमट बाहेर पडत होती.
‘‘परवा तेरवा आला होता हो जिम्या आमच्याकडे’’
‘‘होय का? मला याच हॉलमध्ये केलेली त्याच्या वाढदिवसाची पार्टी आठवतेय. दिव्यांच्या माळा काय सोडलेनी.. ढँणढँण म्युझिक काय वाजवलेनी रात्रीपर्यंत?.. पाचपन्नास पोरं गोळा केलेनी..’’
‘‘तो सगळा थाट फक्त वाढदिवसाचा होता? एवढं काय झालं माणूस एक वर्षांने वाढला तर?’’
‘‘आताची पोरं आयबापाची लाडकी असतात बापू! त्यांचे वाढदिवस म्हणजे घरातली करयच असतात एकेकांची!’’
‘‘आमच्या लहानपणी आमचे वाढदिवस आईबापांना ‘आठवले तर फार’ अशी अवस्था होती. सख्खी-चुलत – आश्रित मिळून ८-१० पोरं घरात. कोण कॅलेंडरं बघत बसलंय शिंचं? फारच नाद धरला तर आई पानावर मोरंब्याचा ठिपका टेकवायची! झाऽऽला वाढदिवस!’’
‘‘आता खूप घरांध्ये उलटी स्थिती असते नाऽ! पाच-सहा मोठय़ा माणसांमध्ये एखादं मूल! आईवडलांनी ‘घेत नाही’ म्हटलं तर की ती लगेच आजीआजोबांकडे त्या वस्तूसाठी हात  पसरायला मोकळी! पहिली दुसरीतल्या पोरांचे पहिलेदुसरे नंबर आले परीक्षेत, तरी घरातून बक्षिसांची खैरात होते पोरांवर.’’
‘‘आताची मुलं नशीबवानच म्हणायची याबाबतीत!’’
‘‘तुम्हाला सांगतो अण्णासाहेब, अहो, कधी जायचं- कुठे जायचं- तिथे काय खायचं.. कोणाला भेटायचं हेसुद्धा पोरांना विचारून करतात. हो काही काही घरांमध्ये! पोरांचं मतबीत घेऊन. आता बोला!’’
‘‘असेल बुवा. आपण लहान असायचो तेव्हा फारच लहान असायचो नै?’’
मुलांना काही कळत नाही, मुलांना विचारायची गरज नाही, मुलांच्या सगळ्या निर्णयाची जबाबदारी मोठय़ांची यावर ठाम होते आपल्या घरचे. ‘गप्प बसा’ संस्कृती! पुल म्हणायचे तशी’’
‘‘हे काय चांगलं होतं का?’’
‘‘मुळीच नाही हो! वाईटच होतं. पण व्हायचं काय की इतपत वाईटाची सवय जडल्याने पुढे आयुष्यातल्या वाईटसाईट गोष्टी आपण निमूट पत्करू शकायचो. फार अपेक्षाच नसायच्या कोणाकडून! घरी थपडा खायच्या तशा बाहेर थपडा खायच्या.’’
‘‘त्याचीच प्रतिक्रिया असेल का? आताच्या पालकांचं पोरांना गोंजारणं ही?’’
‘‘शक्य आहे. पण नुकसान होतंसं वाटतंय. दोन्ही पक्षांचं!’’
‘‘पालकांचं होतंय, कबूल. बाणवलीच्या चेहऱ्याकडे बघवत नाही हो अगदी. पण पोरांचं नुकसान कसं?’’
‘‘जिम्याचं झालं तसं! घरी असेपर्यंत रात्रंदिवस कौतुक, स्तोम, अती संरक्षण. पण बाहेरची दुनिया निष्ठूर क्रूर. ती तुम्हाला माणूस म्हणून जगू देईल याचीपण खात्री नाही. मग कसं पेलायचं हे अंतर? की करा त्या गाण्यात म्हटल्यासारखं. जहां नही चैना.. वहाँ नही रहना..’’
‘‘एवढं सोन्यासारखं पोरगं गेलं हो! केवढय़ा महागडय़ा कॉलेजात घातलं होतं त्याला?’’
‘‘म्हणजे पुन्हा तेच ना? जास्त पैसे टाकून जास्त संरक्षण विकत घेण्याचा प्रयत्न! अरे पण किती दिवस असं करता येईल? कधी ना कधी पोरांना बाहेरच्या जगाशी एकटय़ाने लढावं लागणारच ना?’’
‘‘हे तुमचं अती होतंय बरं का अण्णासाहेब!’’
‘‘शक्य आहे. पण मला अती वाटतंय ते आताच्या शहरी – पांढरपेशा पालकांचं. मला सांगा, एखाद्या वेठबिगाराच्या किंवा माथाडी कामगाराच्या तरुण मुलानं वैफल्याने आत्महत्या केली असं वाचतो का कधी आपण? हा सगळा प्रश्न शहरी – सुशिक्षित मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गामध्येच का येतोय? व्यसनं म्हणू नका, मनोविकार म्हणू नका.. आणि शेवटी कीटकनाशकाचा आसरा! तोही एका परीने स्वार्थच की. माझ्या पोटात तुटत नाही असं नका समजू. पण घरात आपण राजे. आपला शब्द अंतिम, असं अती भासवलं जातंय आणि बाहेर गिधाडं घिरटय़ा घालताहेत. म्हणून नंतर ही विपरीत वेळ येत नसेल कोणाकोणावर?.. मला तरी प्रश्न पडतो.. बघा बुवा..’’
आजोबा उमदेपणाने म्हणाले. लोक बघत राहिले आणि ऐकतही.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
pm modi rally in pune pm modi mega roadshow in pune ahead of maharashtra assembly elections
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद ; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देशाचा विकास’; पुण्यातील सभेत विधान
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…