स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या, अडाणी, अशिक्षित, दरिद्री ग्रामीण शेतकरी आणि तळागाळातल्या लोकांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास साधण्यासाठी १९७७ साली ‘चेतना विकास’ या संस्थेची स्थापना करणाऱ्या, हे काम १५० खेडय़ांमध्ये पोहोचवणाऱ्या, आणि वयाच्या ८५ व्या वर्षीही कार्यरत असणाऱ्या सुमनताई बंग यांच्या ध्येयनिष्ठ, कर्तव्यकठोर परिश्रमाची, सेवेची ही अनोखी कहाणी..
‘चेतनेशिवाय विकास पांगळा आणि विकासाशिवाय चेतना वांझोटी असते.’
वर्धा जिल्ह्य़ातील सुमारे १५० खेडी ‘चेतना विकास’ या संस्थेच्या कक्षेत येतात. ग्रामीण जीवनाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी ही संस्था तीन आघाडय़ांवर कार्य करते. ग्रामीण जीवनातला अडाणी शेतकरी आणि तळागाळातल्या दरिद्री लोकांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास व्हावा, या दृष्टीने माझा मोठा मुलगा अशोक बंग आणि निरंजना बंग हे उभयता कृषी आणि पर्यावरण मार्गदर्शन करतात तर दुसरा मुलगा डॉ. अभय  आणि डॉ. राणी बंग हे उभयता गडचिरोली जिल्ह्य़ातल्या आदिवासी वस्तीत आरोग्य क्षेत्रात कार्य करतात आणि मी स्वत: ग्रामीण स्त्री-जीवनाला विकसित करण्यासाठी गावोगावी शिबिरे, प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करते. कौटुंबिक वाद व संघर्ष याविषयी ‘समाधान केंद्र’ तसेच खेडोपाडी विखुरलेल्या अकरा ‘मैत्री केंद्रां’ंतून कायदेशीर समुपदेशन मिळाल्याने व्यर्थ पायपीट आणि वकिलीचा खर्च वाचतो. स्वातंत्र्य चळवळीने भारावलेल्या जळगाव जिल्ह्य़ातल्या एरंडोल गावी १९२५ साली माझा जन्म झाला. देशभक्तीचं बाळकडू मला कुटुंबातूनच मिळालं. कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे दारिद्रय़ाचं दु:ख, अपमान, अवहेलना बालपणीच भोगल्या. शाळेत जाताना साधारण जुनेच कपडे अन् तेलाअभावी केसाच्या झिपऱ्या झालेल्या पाहताच शाळेत शिक्षिका रागावत, सहज धपाटा घालीत. हायस्कूलमध्ये असताना स्नेहसंमेलनात नाटकाची तालीम पूर्ण झालेली असूनही मला वगळण्यात आल्याची खंत वाटून मनात बीज रुजलं ते दरिद्री बांधवांसाठी विकासाच्या वाटा शोधण्याचं. पुढे सेवा दलाची स्वयंसेविका म्हणून शाखेचे संचलन, सदस्यांच्या नोंदी करणे आणि इतर कामे मी उत्साहात करायची. त्याच दरम्यान मोठा भाऊ स्कॉलरशिपवर अमेरिकेला डॉक्टरी शिकायला गेला असता. डॉक्टर बनून खेडय़ातल्या गरीब, तळागाळातल्या लोकांची सेवा करण्याच्या वेडाने झपाटले; परंतु शिक्षणात आलेल्या अडथळ्यांतून परिस्थितीशी समझोता करीत अव्वल गुणांनी एस.एस.सी. पास झाल्यावर अर्थशास्त्र घेऊन बी.ए. विशेष प्रावीण्याने पूर्ण केले. यापुढे समाजसेवेसाठी शिक्षणाचं व्यापक क्षेत्र निवडलं. बालपणापासून आजूबाजूच्या ग्रामीण वातावरणातल्या अन्यायकारक अशा पुरुषी वर्चस्वाबद्दल मनात मनस्वी चीड वाढत असताना स्वकर्तृत्वावर विश्वास वाढू लागला. आपण लग्न न करता केवळ राष्ट्रसेवा आणि समाजसेवाच करायची मनात ठरलं होतं. पण आता माझे पती ठाकूरदास बंग यांच्या निधनानंतर गतआयुष्याकडे वळून पाहताना ईश्वरी योजनेचे आभार मानावेसे वाटतात. मनुष्यत्वाच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या व्यक्तींमध्ये ठाकूरदास बंग यांचे स्थान वैशिष्टय़पूर्ण होते आणि आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि त्यानंतर, गांधी-विनोबा विचारांना अपेक्षित असलेल्या सवरेदयी समाजाला साकार करणाऱ्या क्रांतियज्ञात, त्यांनी वयाची ७० वर्षे समर्पित केली. सवरेदयी कार्यात, गोहत्याबंदीनिमित्त आणि भूदान यज्ञात अखंड पायी भारतभ्रमण करणारे, अनिकेत अवस्थेत राहून, तप:पूत जीवन जगणारे माझे पती निष्कांचन संन्यासी होते. घर-कुटुंब-मुलेबाळे असतानाही त्यांच्या स्वभावातच निर्लेपता आणि वृत्ती निर्मोही होती. १९४२ च्या ‘करा वा मरा’ या गांधीजींच्या आवाहनाने प्रभावित होऊन प्रा. बंग यांनी कॉलेजचा राजीनामा देताना केलेल्या भाषणाने प्रभावित होऊन त्यांच्यासोबत  ४० विद्यार्थ्यांनीही कॉलेज सोडले. भूमिगत राहून असहकार मोहिमेंतर्गत जनजागृतीची कामे करू लागले. ग्रामसेवक प्रशिक्षण कार्यात असताना वर्धा ते सेवाग्राम आणि पवनार गावी सायकलवरून फिरणाऱ्या या ध्येयवादी तरुणाच्या लग्नाची घाई त्यांच्या आईवडिलांना झाली असावी. विवाहाचा प्रस्ताव मंजूर करताना त्यांची मुळी अटच होती, की प्रखर ध्येयवादात झोकून देऊन कार्य करणाऱ्या तरुणीशीच लग्न करीन. सेवा दलातल्या माझ्या कामांची ख्याती त्यांच्यापर्यंत पोहोचताच वधुपरीक्षा ठरली. मला त्या वेळी एकच प्रश्न विचारला, ‘मी स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय आहे, मला फाशीदेखील होऊ शकते, तेव्हा तू काय करशील?’देशभक्तीचे संस्कार बालपणीच वृत्तीत रुजल्यामुळे मी चटकन म्हणाले, ‘‘तुमचे अपुरे काम पूर्ण करीन.’’ या उत्तराने प्रसन्न होऊन आमचा विवाह ठरला. केवळ सहा आणे खर्चून गांधी प्रतिमेला हार घालून अत्यंत साधेपणाने आमचा विवाह संपन्न झाला. स्त्री-पुरुष भेदाला अधोरेखित करणारे कुंकू, बांगडय़ा आणि मंगळसूत्र या सौभाग्य लेण्यांना मी लग्नातच फाटा दिला होता. आमच्या विवाहाने माझ्या मनातले देशप्रेम आणि समाजसेवेच्या तळमळीला अधिक समृद्ध बनविले. स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, झेंडावंदन, विदेशी मालावरचा बहिष्कार, इ. असहकार आंदोलने सुरू होती. स्वातंत्र्याचं वारं संचारलेलं प्रत्येक मन ध्येयवेडं आणि निष्ठावंत होते. ध्येयवेडय़ा निष्ठावंत पतीच्या खांद्याला खांदा भिडवून प्रत्येक कार्यात त्यांना साथ देताना, माझी ध्येयवादी मनोवृत्ती सुखावत होती. झोकून देऊन समरसून काम करणे, जिवापाड मेहनत करणे हेच आमच्या जीवनाचे सूत्र बनले. स्वातंत्र्यप्राप्तीची चिन्हे दिसू लागताच. प्रा. बंग यांना ‘ओहायो’ विद्यापीठातून, अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. करण्यासाठी, व्हिसा, पासपोर्ट इतर कागदपत्रांसह प्राप्त झाला. त्या वेळी गांधी कुटीत त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेले असता, बापू म्हणाले, ‘‘अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी अमेरिकेत जाण्यापेक्षा खेडय़ात जा!’’ बस्स! या विषयात अनेक सुवर्णपदके प्राप्त केलेल्या प्रा. बंग यांनी बापुकुटीबाहेर येताच सर्व कागदपत्रे शांतपणे फाडून टाकली. बापूजींच्या एका वाक्याने जीवनाची दिशा पालटली. काही काळ आमचे गोपुरीत वास्तव्य असताना विनोबांच्या मार्गदर्शनानुसार ‘कांचनमुक्तीचा प्रयोग’ करायचे ठरले. त्यासाठी ‘सुकाभाऊ चौधरींकडून’ प्रथम दान मिळालेल्या जमिनीवर आमचा ‘साधनाश्रम’ अगदी स्वश्रमातून तयार झाला. संपूर्ण स्वावलंबनाने शेतीची अवजारे तयार करून तीन वर्षे शेती केली. स्वेच्छादारिद्रय़ाच्या या व्रतात, अत्यंत कष्ट करूनही वेळप्रसंगी मीठभाकरीही कशी पारखी होते, हा अनुभव आला, पण अपार कष्टातून मिळणाऱ्या अन्नाला गोडी अमृताची होती. १९५३ साली भूदान चळवळीत सक्रिय सहभागासाठी प्रा. बंगनी पुन्हा एकदा कॉलेजचा राजीनामा दिला. पुढे विनोबाप्रेरित भूदान यज्ञात, त्यांनी आपले ‘जीवनदान’ घोषित केले. त्या वेळी ‘साधनाश्रमाची शेती’ औजारांसह भूमिहीन लोकांत वाटप करून भारत भ्रमणासाठी निघून गेले. पुन्हा निष्कांचन अवस्थेत अशोक आणि अभय या आमच्या दोघा मुलांच्या संगोपनाची, शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी माझी एकटीची राहिली. गरजेपोटी, चरितार्थासाठी, महिलाश्रम शाळेत सुरुवातीला १२० रुपये वेतनावर काही वर्षे नोकरी केली.  मुलांना शाळेत सायकलने नेणे-आणणे, त्यांचा अभ्यास सांभाळून सारी कामे स्वावलंबनाने पार पडत. त्याच दरम्यान मी आणि कुटुंबापलीकडे मन सतत झेपावत असताना, ‘साम्ययोग’ मासिकाच्या संपादनाचं काम मी काही वर्षे केले. तसेच फावल्या वेळात सूतकताई, खादी प्रशिक्षण, शेती मार्गदर्शन, इ. रचनात्मक कामांतूनही माझा जनसंपर्क वाढू लागला. ग्रामीण स्त्रिया अपार कष्टांबरोबर अनिष्ट रूढी, परंपरा आणि चुकीच्या विचारसरणीला बळी पडतात ही गोष्ट माझ्या मनाला खटकत असे. मुकाट अन्याय, अत्याचार सहन करण्याने मी अस्वस्थ होत असे. शिक्षणातून मुलामुलींची वैचारिक बैठक पक्की व्हावी, तसेच मुला-मुलींना रोजगार उत्पन्न होऊन स्वावलंबी जीवन मिळावे या उद्देशाने गांधी-विनोबा विचारप्रणालीची ‘नयी तालीम’ ही शाळा मी सेवाग्रामला काढली. स्त्री-पुरुष समानता, स्त्री शिक्षण या विषयांवर सभेत माझे बोलणे सुरू असताना १९७४ साली मिसाबंदी अंतर्गत मला अटक होऊन एकोणीस महिने बिहार व नागपूर जेलमध्ये राहावे लागले. मुद्दाम ‘सी क्लास’ मागितल्यामुळे गरीब, अडाणी गुन्हेगार स्त्रियांशी संवाद साधता येऊन त्यांचे भावविश्व समजून घेण्याची संधीच एकप्रकारे मिळाली. माझी दोन्ही मुलं लहान असताना मी कौटुंबिक जबाबदारीत गुंतले होते; तरी माझा अशोक बारा वर्षांचा आणि अभय आठ वर्षांचा असताना, भूदान चळवळीत अखंड भारतभ्रमण करणाऱ्या पतीप्रमाणे, भूदान चळवळीला हातभार लावण्याच्या उद्देशाने आम्ही तिघे सुटीच्या दिवसात वर्धा जिल्ह्य़ातल्या खेडोपाडी भूदानाची भूमिका मांडत पदयात्रा करीत होतो. खेडय़ातल्या रस्त्यांतून वादळ, ऊन-पाऊस झेलीत चालणाऱ्या या पदयात्रांनी; खेडय़ांतल्या लोकांच्या अडीअडचणी, दु:खाचे जवळून दर्शन घडले. कृतनिश्चय केल्याप्रमाणे एक वर्षांसाठी घरादाराला कुलूप लावून, मुलांना शिक्षणासाठी खान्देशात मामाकडे ठेवून मी भारतभर पदयात्रेसाठी निघाले. अडाणी, अशिक्षित, दरिद्री ग्रामीण शेतकरी आणि तळागाळातल्या लोकांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास साधण्यासाठी १९७७ साली ‘चेतना विकास’ या संस्थेची स्थापना झाली. बचत गटांमार्फत संस्थेची शिबिरे, प्रशिक्षण वर्ग सुरू होऊन शेतीनिष्ठ नवीन प्रयोगांची माहिती व्हावी या उद्देशाने गावोगावी शैक्षणिक सहलींचे (स्त्रियांच्या) आयोजन असे कार्य सुरू झाले. आजमितीला १५० खेडय़ांमध्ये ‘चेतना विकास’चे समाजजागृतीचे काम सुरू आहे.आंजी परिसरातल्या मांडवा, मुळई या खेडय़ांत बालवाडी, बालभवन आणि बालसंगोपन केंद्र सुरू करण्यात आली. यात सक्रिय आणि उत्साही सहभाग होता माझी उच्चविद्याविभूषित स्नुषा ‘स्व. पद्मजा बंगचा’. या केंद्रामुळे मजूर, कष्टकरी स्त्रियांची दैनंदिन अडचण दूर होऊन नवीन पिढीच्या शिक्षण व संगोपनाची सोय झाली. वयाची ८५ केव्हाच आटोपली तरी कामांची यादी संपत नाही की माझी अंत:प्रेरणा अन् उत्साह आटत नाही. माझ्या दीर्घायुष्याचे रहस्य कदाचित कार्यामागची माझी मनस्वी तळमळ असावी. ग्रामीण भागात आजही जातिभेद, श्रेष्ठ-कनिष्ठता संघर्षांचे कारण आहे. म्हणूनच या जातिभेद आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेवर कुठाराघात करण्याच्या प्रयत्नात आमची शिबिरे प्रशिक्षण वर्ग, मुद्दाम बौद्ध किंवा आदिवासी वस्तीत घेतली जातात. निवासाची सोय इथेच कुठेतरी असते. तळागाळातल्या लोकांमध्ये आत्मसन्मान वाढावा हाच उद्देश असतो. आमच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी श्री. मोरूभाऊ हे इतर कामांसोबत पंचायत राज अंतर्गत, ग्रामपंचायत, ग्रामसभेच्या सबलीकरणाचे काम दक्षतेने करतात; म्हणूनच ग्रामपंचायतचा कारभार अधिक कार्यक्षम झाल्याचे दिसून येते. महिला उमेदवार सरपंच म्हणून निवडून येत असून पारदर्शित्वाबरोबर गावांचे प्रश्न नियमितपणे व कळकळीने मांडण्याचा, सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामपंचायत सदस्य व गावकरी, गावाच्या विकासासाठी जागृत होऊन मोकळेपणाने प्रश्न मांडू लागले आहेत. परस्पर सहमतीने प्रश्न सोडवले जात आहेत. शांताबाई डुकरेंसारख्या खंबीर नेतृत्व करणाऱ्या सरपंच गावाचा चेहरामोहराच बदलवीत आहेत. वध्र्यातील ‘चेतना विकास’च्या आमच्या फार्मवर माझा मोठा मुलगा अशोक आणि निरंजना बंग यांचा सेंद्रिय शेती, फळबागा, कम्पोस्ट व गांडूळ खत प्रकल्प सुरू असून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या प्रायोगिक शेती प्रकल्पात खेडय़ापाडय़ातील शेतकरी आणि शेतीनिष्ठ लोकांना, गावक ऱ्यांच्या बचत गटामार्फत आयोजित विविध प्रशिक्षणे, शैक्षणिक सहली यात सहभागी करून घेतले जाते. वर्धा जिल्ह्य़ासाठी ‘चेतना विकास’चे समाधान केंद्र कौटुंबिक वादविवाद, संघर्ष यासाठी कायदेशीर ‘समुपदेशनाचे’ कार्य करते. याव्यतिरिक्त समाधान केंद्राला संलग्न ११ ‘मैत्री केंद्र’ वेगवेगळ्या गावी पोलीस ठाण्याच्यालगत बाजाराच्या दिवशी सुरू असतात. ४० टक्के केसेसमध्ये परस्पर समझोता होऊन संसार मार्गी लागतात. मात्र लांब पल्ल्याच्या गावांतून येणाऱ्या केसेसमध्ये वेळेचा अपव्यय होतो. एकंदरीत ८० टक्के उत्तम प्रतिसाद ग्रामीण जनतेचा मिळतोय. ‘दारू आणि सट्टा’ ही ग्रामीण भागातली व्यसने कुटुंब व्यवस्थेला खिळखिळी करीत आहेत. यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारू पिऊन शिविगाळ करीत मारहाण करणाऱ्या माणसांविरुद्ध गावोगावच्या महिलांनी कंबर कसलीय. गावातल्या सुजाण तरुणांना दारूबंदी धडक मोहिमेत सहभागी करून घेतलंय. निर्भीड आणि धीट सुमन गवळी, काशीबाई जवादे, यशोधरा जारुंडेसारख्या महिलांना पाहताच दारू प्यायलेल्यांची पाचावर धारण बसते. ‘मीच माझी उद्धारकर्ती’ अशी खात्री पटून स्त्री भ्रूणहत्या. हुंडाबळी याबाबत स्त्री खंबीरपणे निर्णय घेतेय अशा धडाडीने कार्य करणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देणाऱ्या स्त्रियांचा परिचय इतरांना व्हावा या उद्देशाने गेली चाळीस वर्षांहून अधिक आमचे ‘सखी’ हे स्त्रियांचे, स्त्रियांसाठी, स्त्रियांनी चालविलेले त्रमासिक सुरू आहे. महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक व सामाजिक अन्यायाला वाचा फुटावी, त्यांना त्यांचा हक्क व अधिकार समजावा, लोकांचे आग्रह-दुराग्रह गळून पडावेत, दारू-सट्टय़ाचे उच्चाटन होऊन गावचा विकास व्हावा हा एकमेव उद्देश हे त्रमासिक चालविण्यामागे आहे. कोणतेही सामाजिक काम हे लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखे आहे. ‘चेतना विकास’च्या कार्याचे क्षेत्रच मुळी खेडेगावाचा विकास हेच आहे. चरितार्थासाठी घराबाहेर, शेत-शिवारात राहणाऱ्या या ग्रामीण जनतेच्या विकासाचा प्रयत्न सुरुवातीला निराशाजनक असला, तरी शिबिरे प्रशिक्षणांचे फायदे लक्षात आल्याने शिबिरे यशस्वी होत आहेत. स्त्री आणि बालकल्याणाच्या कार्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझा गौरव केलाय तसेच अहिल्याबाई होळकर पुरस्काराने मला सन्मानित केले. १९९९ मध्ये कुसुमताई मधुकरराव चौधरी पुरस्काराने माझा सत्कार झाला. याबाबत मी स्वत: ऋणी आहे. दोन्ही मुलं आपापल्या क्षेत्रात समरसून काम करीत आहेत. यथावकाश सुना-नातवंडांनी घर गजबजलेय. माझ्या सर्व सुना, नातसुना श्रीमंत माहेर लाभलेल्या, उच्चविद्याविभूषित आहेत. मला सार्थ अभिमान वाटतोय या सर्वाची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचा. डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग हे दांपत्य गडचिरोली जिल्ह्य़ात ‘शोधग्राम’ येथे  खास आदिवासींसाठी किर्र् जंगलात वास्तव्य करीत आहेत. त्यांची शोधग्राम ही संस्था ग्रामस्वराज्याचे छोटेसे अंग आहे. त्यांची मुले डॉ. आनंद आणि डॉ. अमृत आणि कुटुंबीय आरोग्यसेवा देत आहेत. युवकांसाठी ‘निर्माण’ संघटना ही गावच्या समस्या सोडविण्यासाठी ‘जीवन समर्पण’ करणाऱ्या ४०० तरुणांची संघटित फौज आहे. ‘कोवळी पानगळ’ अर्थात ‘कुपोषण बालमृत्यू’ टाळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अशोक आणि पद्मजा बंग या उभयतांची मुले डॉ. आकाश, डॉ. आलोक आणि त्यांच्या सुविद्य डॉ. पत्नी वध्र्याजवळील कस्तुरबा हॉस्पिटलला आरोग्य सेवा देत आहेत. सेवेची माध्यमे वेगवेगळी असली, तरी पिंड एकच, समाजसेवेचाच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा