aaj-pasaya‘आजचे पसायदान’ या सदरातून माणसाच्या ‘आश्वासक’, ‘विधायक’ क्षमतांचे, विचारशक्तीचे काही पलू उलगडण्याचा प्रयत्न होणार आहे. ते नुसतं तत्त्वचिंतन किंवा खल न राहता रोजच्या व्यवहाराला कसं लागू पडतं हेसुद्धा पाहणार आहोत, दर पंधरा दिवसांनी.
महाराष्ट्रातील काव्य परंपरेतील एक अजरामर तत्त्वकाव्य म्हणजे ‘पसायदान’! ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस पसायदान येते. ‘माणसाने सार्थ जगावे, सर्व प्राणिमात्र-भूतमात्र यांनाही सामावून घेऊन स्वत:चा ज्ञानाचा, जाणिवेचा परीघ वाढवून घ्यावा म्हणजे, मग जे ‘सज्जनपण’ (सदसद्विवेकीपण) आपल्यात येते तेच खरे जगण्याचे सार आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यातून मग सर्व विश्वाच्या सुखाची कामना माऊलींनी केली आहे. ती सुरू होते प्रत्येकाच्या मनातील शांतीपासून, आश्वासकतेपर्यंत, पण ती प्राप्त करणं तितकं सोपं नाही. रोजच्या रहाटगाडग्यात जुंपलेल्या आणि व्यवहारानं बांधल्या गेलेल्या आपल्यासारख्यांना इच्छा असूनही आश्वासक जगण्यात अडथळे जाणवतात. आधुनिक मानसशास्त्रात याबद्दल जे मांडलं जातंय त्याचा आपल्या परंपरेतील अनेक विचारांशी समन्वय आढळतो, जो नक्कीच दिशा देणारा आहे. त्या दृष्टीने हा ‘आजच्या पसायदानाचा’ संकल्प केला आहे.
दुसऱ्या महायुद्धातील संहाराच्या आणि सत्तास्पध्रेच्या कथा आपल्याला आतून-बाहेरून शहारून सोडतात, पण त्याच अंधाऱ्या आकाशात स्वत:च्या प्रबळ इच्छाशक्ती आणि दृष्टिकोनानं प्रसन्नतेचा-आशेचा शिडकावा करणारे काही महाभागही आपल्याला भेटतात. जर्मनीतील एक ज्यू मानसशास्त्रज्ञ व्हिक्टर फ्रँकेल. ज्यूसाठींच्या छळछावणीत स्वत:च्या नावापासून सर्व गमावलेल्या फ्रँकेल यांनी स्वत:चं मनोबल टिकवून ठेवलं, ते एकाच विश्वासावर! ते म्हणत, ‘त्यांनी माझ्याकडून सर्व हिरावून घेतलं- पण त्यांना घेता आली नाही ती एकच गोष्ट-माझा दृष्टिकोन! रोज उठल्यावर ‘मी आहे’ ही अनुभूतीच मला तो दिवस पार पाडण्याचं बळ देत असे!’
विचारांची ही खोली, ही झेप खरं तर माणसाची सर्वात मोठी ताकद आहे. मनाच्या दुर्बलतेवर जेवढं बोललं-लिहिलं-काम केलं जातं तेवढं दुर्दैवानं या दैवदत्त क्षमतेवर झालेलं नाही. मानवी इतिहासातही विध्वंसाची, रक्तपाताची, जिंकण्या-हरण्याची जेवढी तत्पर नोंद घेतलेली दिसते तेवढी समाजधारणेच्या छोटय़ा छोटय़ा प्रयत्नांची क्वचितच दिसते. मानसशास्त्रातही अनेक र्वष हाच पायंडा जास्त प्रबळ होता. मानवी स्वभावाच्या विकृती, त्यातील त्रुटी, समस्या, दुबळेपणा, त्याचे वागण्यावर होणारे परिणाम यावर कित्येक दशकं संशोधन-काम होत राहिलेलं दिसतं. ते अनेक अर्थानी आवश्यक आणि उपयोगाचंही आहे, पण तेवढंच खरं आहे का? माणसाच्या स्वभावातील जातिवंत असा उमदेपणा, आशावृत्ती, सहभावना हीपण तेवढीच सच्ची आहे ना? मग स्व-उत्कर्षांसाठी त्याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो, त्याचाही शास्त्रशुद्ध अभ्यास आणि दैनंदिन जगण्याशी असलेली त्याची जोडणी ही सर्वदूर पोचायला नको का? ‘हीनते’च्या दर्शनापलीकडे जाऊन ‘उत्तमा’चा ध्यास लागायला नको का?
आपल्याला अकबर-बिरबलाची प्रसिद्ध कथा माहीतच आहे. बिरबलाच्या हजरजबाबीपणाची सतत परीक्षा बघणाऱ्या अकबरानं नेहमीप्रमाणे त्याच्या मते ‘अवघड’ कोडं घातलं. ‘काढलेली रेषा न पुसता छोटी करून दाखव.’ बिरबलाचं उत्तर तयारच होतं. त्यानं त्याच रेषेजवळ एक मोठी रेष मारली आणि जुनी रेष आपसूकच ‘छोटी’ होऊन गेली. तसंच माणसाच्या मनाचंही आहे. मनात जे नकोसं, त्रास देणारं, दुखवणारं, भिववणारं असं काही निर्माण होतं त्याला पराभूत करणारे-मन:स्वास्थ्याकडे नेणारे समर्थ हातही मनातच लपलेले असतात. ते समजून घेण्यासाठी जरा या काही प्रश्नांची उत्तरं आपण आपल्याच मनाला विचारून बघू या.
– शिखरावर पोचायचंच असं ठरवलेला गिर्यारोहक रस्ता कठीण आहे म्हणून डोंगर चढायचं सोडेल का?
– दोन-चार पाककृती फसल्या म्हणून एखादी गृहिणी स्वयंपाक करणं बंद करील का?
– प्रेक्षागृहातून एकही टाळी मिळाली नाही म्हणून एखादा जातिवंत अभिनेता अभिनय विसरेल का?
– बॅलिन्सग बीमवर चालता चालता तोल जातो म्हणून कसरतपटू खेळ सोडून देतो का?
या सगळ्यांना ‘पुढे-पुढे’ चालत राहण्याची ऊर्जा कोठून मिळते? तर मानवी स्वभावाचे-मानसिकतेचे असे काही सुप्त पलू आहेत ज्यांच्या विकासामुळे माणूस सतत ‘उन्नती’कडे वाटचाल करत राहू शकतो. यानिमित्तानं अगदी लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवते. दुष्काळापासून मुक्ती मिळावी म्हणून एका राजाला राजधानीतील शिवमंदिरात दुग्धाभिषेक करायला सांगितला जातो, पण नगरातल्या प्रत्येक घरातील एकानं एक चरवी दूध अर्पण करून तो गाभारा दुधानं पूर्ण भरून टाकायचा, अशी अट असते. राजा तशी दवंडी पिटवतो. राजाज्ञेचं कोण उल्लंघन करू धजणार? पण दुष्काळामुळे मुळात हातातोंडाशी गाठ मुश्कील असते. प्रत्येक जण विचार करतो की, इतर लोक नाही तरी दूध आणणारच आहेत तर मी एक चरवी पाणी नेलं तर कुठे बिघडलं? प्रत्यक्षात गाभारा पाण्यानं भरून जातो. पण एक वृद्धा मात्र घरातील लेकरा-बाळांना, गुरावासरांना हवं तेवढं थोडंफार दूध देऊन झाल्यावर राहिलेलं गडूभर दूध पूर्ण श्रद्धेनं गाभाऱ्यात ओतते आणि क्षणापूर्वी पाण्यानं भरलेल्या गाभाऱ्यात दुधाची गंगा अवतरते. तो दुधानं काठोकाठ भरून जातो. माणसाच्या मनातलं असंच ‘पाण्यासारखं’ हीन, स्वार्थ, निराशा ही ‘श्रद्धेच्या’ बळानं प्रगल्भतेच्या समाधानाच्या ‘दुधामध्ये’ रूपांतरित होऊ शकते, हे नक्की.
असं म्हणतात की, एकदा सुख आणि दु:खाचं मोठं भांडण झालं. दु:खानं मोठा अक्राळविक्राळ आकार धारण केला आणि ते म्हणालं, ‘बघ, माझी ताकद बघ! माणसाला आयुष्यातून उठवू शकतो मी. माणसाला सगळ्यात जास्त स्पष्ट आठवणी कशाच्या असतात? माझ्या! तो सगळ्यांत जास्त कुणाला घाबरतो? मला! आयुष्यभर तुझ्या मागे तो धावतो, पण शेवटी त्याच्यावर सत्ता कुणाची चालते, माझी!’ सुख हसून म्हणाले,‘‘ बरोबर आहे. माणूस मला गृहीत धरतो. म्हणून सहजपणे विसरतो. तू त्याला अनपेक्षितपणे धक्का देतोस म्हणून तुझी आठवण त्याला जास्त राहते. पण तू एक विसरतोस की, मी पुढे पुढे जात असतो म्हणूनच त्याला तुझ्या सावलीतून बाहेर पडून माझ्यामागे येण्याचं बळ मिळतं आणि जेव्हा त्यातल्या काही माणसांना कळतं की, पुढे पुढे जाते ती माझी सावली आहे, खरा मी त्यांच्या मनातच आहे, तेव्हा ते तुझ्या विक्राळ रूपालाही घाबरणं सोडून देतात!’’
थोडक्यात काय तर मनाच्या ज्या अफाट क्षमता ‘दु:ख’ नावाच्या नकोशा शत्रूला कायम झुलवत ठेवतात, त्या विकसित होणं महत्त्वाचं! मार्टनि सेलिग्मन या मानसशास्त्रज्ञानं ही ‘आश्वासक मनोरचनेची’ (Positive Psychology) कल्पना प्रथम मांडली. त्याचं असं निरीक्षण होतं की, सतत भेडसावणाऱ्या संकटप्रसंगी काही माणसं चटकन धीर सोडून असहाय बनून परिस्थितीला शरण जातात, जणू ती ‘शरण जाणं’ शिकत जातात आणि स्वत:च्या मानसिक-शारीरिक आरोग्याला पूर्ण उद्ध्वस्ततेकडे नेतात, तर काही जण तशाच परिस्थितीलाही प्रखर चिवटपणे झुंज देऊन त्यावर स्वार होण्याचा प्रयत्न करतात-त्यातून स्वत:चं मन -शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवतात. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत, ज्या माणसाला ‘उन्नत’ बनायला – वर वर चढायला मदत करतात? इतकंच नाही तर दीर्घायुषी व्हायलाही मदत करतात?
‘भावना’ ही मनाची अशीच अखंड ऊर्जेची कोठी असते. सगळ्याच भावना काही आपल्याला हव्याहव्याशा वाटत नाहीत, पण ‘नकोशा’ भावना टळतही नाहीत. ज्या व्यक्ती ‘हव्याशा’ (आश्वासक) भावना दीर्घकाळ सातत्याने अनुभवतात, त्या दीर्घायुषी होण्याची खूप शक्यता असते, असं संशोधन सांगतं. आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मानसशास्त्रज्ञांना वारंवार असं जाणवलेलं आहे की, नकोशा भावनांचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो, तर हव्याशा भावनांचा अनुकूल! हा सिद्धांत तपासण्यासाठी काही संशोधकांनी एका कॅथॉलिक चर्चमध्ये राहणाऱ्या जोगिणींचा (नन्सचा) सखोल अभ्यास केला. जेव्हा त्या जोगिणी चर्चमध्ये प्रथम प्रवेश घेत तेव्हा त्यांच्या पंचविशीत या नन्सना स्वत:चं एक २-३ पानी आत्मवृत्त लिहायला सांगितलं जात असे. अशी काही जोगिणींची आत्मवृत्तं त्यांनी मिळविली आणि त्यांचा अभ्यास केला. त्यात दोन्ही प्रकारच्या भावनांचं मिश्रण होतं, पण या मंडळींनी त्यातल्या आश्वासक (Positive))भावनांवर लक्ष केंद्रित केलं आणि असे शब्द, वाक्यं नोंदवली. त्यांना गणिती भाषेत आणलं. आणि जवळजवळ ६० वर्षांनंतरच्या त्यांच्या एकूण आरोग्य-तगून राहण्याशी त्याचं नात तपासलं. त्यात खूप चक्रावून टाकणारी निरीक्षणं मिळाली. कोवळ्या घडत्या वयातील आश्वासक, हव्याशा भावनांचं खूप जवळचं नातं दीर्घायुषी होण्याशी असतं, हे लक्षात आलं. ज्या नन्सनी अशा प्रकारच्या भावना तरुण वयात जास्त अनुभवल्या किंवा व्यक्त केल्या त्यांचं सरासरी आयुष्य तसा अनुभव तुलनेनं कमी असणाऱ्या नन्सपेक्षा १०.७ वर्षांनी जास्त आढळून आलं. एकीकडे जसा हव्याशा भावनांचा अनुभव दीर्घायुष्याचा मार्ग प्रशस्त करताना दिसतो तसाच दुसरीकडे अतीव आणि सातत्यानं असणारा मानसिक तणाव-पर्यायानं ‘नकोशा’ भावनांची मनातली गर्दी-आपली रोग प्रतिकारक्षमता खच्ची करण्याचं काम करत असते हेसुद्धा संशोधनातून दिसून येतंय. आजारांशी लढा देण्याची आपली ताकद तणावामुळे मार खायला लागते. याचा अर्थ ‘आश्वासक भावनां’चा प्रभाव ‘आजारी’ पडूच देत नाही असा नाही. काही आजारांची मुळं त्या नियंत्रणाबाहेर असणारच. पण त्यांना तोंड देण्याची-चिवटपणे तगून राहण्याची शक्यता मात्र नक्कीच जास्त वाढते. तर भावनांचं हे असं सामथ्र्य म्हणजे एक प्रकारचं वरदानच नाही का? त्याचा जाणीवपूर्वक वापर केला तर रोजचं जगणं अधिक समृद्ध होणार नाही का?
भूतकाळाचं ओझं मनावरून झटकून स्वच्छ-मोकळ्या नजरेनं स्वत:कडे, जगाकडे पाहायला शिकणं हेही असंच एक वरदान आहे. ‘आनंदाची शोधयात्रा’ या मनस्वास्थ्यावरच्या कार्यशाळेत आलेल्या एका मत्रिणीचं मनोगत आठवतं. तिच्या लग्नाची वेळी आईशी झालेल्या छोटय़ाशा वादाची जखम एवढी चिरत गेली की, नंतर दहा र्वष आईशी मोकळा संवादच झाला नाही. मनातला राग, दु:ख सारखं मध्ये यायचं. कार्यशाळेतल्या गप्पांनी, चच्रेनं त्याला मोकळी वाट मिळाली. अश्रूंबरोबर मनातली गाठही वाहून गेली.
हा प्रसंग मी जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा  त्यातील गुंतागुंत मला चक्रावून टाकते. किती किती गोष्टींचं ओझं आपण मनावर बाळगून असतो! कुठल्या तरी क्षणी झालेलं पराकोटीचं भांडण, पुरी न झालेली अपेक्षा, कुणी तरी मारलेला टोमणा, मनासारखं न मिळालेलं/ हुकलेलं यश.. आणि अशा गोष्टींचे लेपावर लेप! एखाद्या छोटय़ाशा खडय़ावर वर्षांनुर्वष शेंदूर फासत राहिल्यावर त्याचा मोठा खडक बनतो ना, तसंच हे! हे ओझं दूर करण्यासाठी आपल्या मनाच्या दोन अत्यंत  महत्त्वाच्या क्षमतांची मदत होऊ शकते. एक म्हणजे क्षमा (किंवा आजच्या भाषेत ’let go करणे) आणि कृतज्ञता..! या दोन गोष्टींच्या जाणीवपूर्वक, विचारपूर्वक वापरातून मनावरचे असे किती तरी ओझ्यांचे दृढलेप आपण दूर करू शकतो. ‘बावर्ची’ या ऋषीदांच्या गाजलेल्या चित्रपटात या युक्तीचं फार मार्मिक चित्रण केलं आहे. त्यातून कुटुंबातील एकेका व्यक्तीचं मन कसं निव्र्याज, मोकळं बनत जातं हे दर्शवलं आहे.
जरा शोधक नजर आपण आजूबाजूला टाकली तर आपल्याला दिसतं, की काही जण ‘कशातही’ समाधानी असतात, तर काही जण ‘कशातही’ नसतात! समाधानाच्या संकल्पनेचा शोध घेणाऱ्या एका संशोधनात असं आढळून आलं होतं की जसजसं शिक्षण, पसा, समाजातलं स्थान चढतं होत गेलं तसतसं एका टप्प्यानंतर लोकांमधली ‘समाधाना’ची सर्वसाधारण भावना कमी कमी होत गेली होती. म्हणजेच या सर्व गोष्टी एका मर्यादेपर्यंत आनंद देत होत्या, पण निव्वळ त्यांची चढती भाजणी ही हमखास आनंदाची/समाधानाची गॅरंटी नव्हती, तर काही काळानं समाधानाच्या उतरंडीकडेच नेणारी होती.. म्हणजे पुन्हा मनात प्रश्न-संपत्ती मिळवायचीच नाही का? अपेक्षा करायचीच नाही का? प्रतिष्ठा, सन्मान, प्रसिद्धी कायम वाईटच का? तर असं अजिबात नाही. आधुनिक पसायदान म्हणतं की, ‘भरभरून मी धन मिळवावं. जग जिंकोनी घर सजवावं. अपयश किंवा अपमानाचे दिवस, दरिद्री सारे दूर सरावे..’ पण काय किंमत देऊन? शरीरस्वास्थ्याची? मन:स्वास्थ्याची? नात्यागोत्यांची? सदसद्विवेकाची? ‘आश्वासक मानसशास्त्र’ नेमकं इथेच आपल्याला सजग करतं. ‘ ठेविले अनंते तसेचि रहावे’ हे फक्त एका जागी साचून राहणं नाही किंवा अडचणी-समस्यांचा निष्क्रिय स्वीकार नाही, तर स्वत:तल्या प्रबळ क्षमता जाणून वापरण्यासाठीचा मानसिक विसावा आहे.
आज भोवतालीची दुनिया विक्रमी-ब्रेकलेस गतीनं धावत आहे. ‘स्पीड’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ५० च्या खाली वेग आणला की संपलं. माध्यमं तर अतृप्ती विकायलाच बसली आहेत. छोठय़ा छोटय़ा प्रसंगांत स्वत: आनंद घेणं आणि ‘विदाऊट प्लॅनिंग’ तो दुसऱ्यालाही देणं विरळ होत आहे.
काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या दिवशी रस्त्यावर उभी होते. गर्दी बेफाम होती. एक तरुण मुलगा शेजारी उभा होता. अचानक तो जवळ उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलिसाकडे गेला. काही तरी बोलणी झाली. त्यांनी खांद्यावर हात टाकून एकमेकांना जवळ घेतलं, हसले आणि तो मुलगा परत माझ्याशेजारी येऊन उभा राहिला. मी कुतूहलानं त्याला विचारलं, ‘तू ओळखतोस का त्यांना? नाव काय त्यांचं? ‘छे हो’!  अहो, मी त्यांना सहज ‘दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!’ असं म्हटलं. आपण मारे खरेदी करतो-फिरतो, खातो पितो, तेव्हा त्यांना डय़ुटी असते ना! त्यांनाही आनंद झाला, मलाही बरं वाटलं.’
त्या मुलाची ती सहज कृती माझा पुढचा दिवस ‘आश्वासक’ करून गेली. छोटय़ा निरपेक्ष आनंदातून समाधानाची साय हळूहळू जमत जाते नाही का? ‘आजचे पसायदान’ या सदरातून माणसाच्या अशा ‘आश्वासक’, ‘विधायक’ क्षमतांचे, विचारशक्तीचे काही पलू उलगडण्याचा प्रयत्न होणार आहे. ते नुसतं तत्त्वचिंतन किंवा खल न राहता आपल्या रोजच्या व्यवहाराला कसं लागू पडतं हेसुद्धा शिकून पाहू या. वर्ष पाहता पाहता संपेल, पण ही यादी संपणार नाही, कारण प्रत्येक जण त्यावर जेवढा विचार करील तेवढी ती त्या व्यक्तीसाठी अजून समृद्ध होईल. या दोन्हीसाठी हे आधुनिक पसायदान आपल्याला ‘आजच्या’ संदर्भात मदत करील असा विश्वास वाटतो. 
डॉ. अनघा लवळेकर- anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Marathwada Socio economic backwardness,
मराठवाड्याच्या अस्वस्थतेची पाळंमुळं
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Story img Loader