आरती अंकलीकर
‘संगीताच्या कार्यक्रमांमध्ये- विशेषत: दौऱ्यांमध्ये अचानक कोणती आव्हानं समोर उभी राहतील सांगता येत नाही. शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणात गायक, वाद्यं, वादक आणि त्याबरोबर इतर अनेक गोष्टींचा मेळ घालावा लागतो. एकही गोष्ट जुळून आली नाही, तरी चित्र विस्कटतं. अशा आयत्या वेळी केले जाणारे उपाय महत्त्वाचे. अखेर श्रोत्यापर्यंत ही मागची धावपळ नव्हे, तर केवळ सुरेल गाणंच पोहोचवायचं असतं!’
लहानपणापासून परदेशाबद्दल विलक्षण आकर्षण, उत्सुकता होती. लंडनहून आलेल्या मामीच्या बॅगमधल्या सामानाला येणारा सुगंध, तिची स्वच्छ बॅग, नवे कोरे कपडे, तिची गुलाबी पावलं, गुलाबी हात याचंही! फ्रिजमध्ये भाजी कशी ताजी राहते, तशी पाश्चिमात्य देशात थंडीमुळे माणसंही ताजी राहतात का? असा प्रश्न मी आईला विचारलेला आठवतोय. लहानपणी मामीनं आणलेले ‘कॅमे’ साबण, टेपरेकॉर्डर, कॅसेटस् आठवतात. असं आकर्षण असलेल्या त्या ठिकाणी मला जायला मिळणं म्हणजे गंगोत्रीला जायला मिळतंय असंच मला वाटलं! स्रोताच्या उगमाकडे. एक तो १९८५ चा काळ आणि एक आजचा दिवस.. ‘इम्पोर्टेड’ एकही वस्तू अशी नाही, जी आज भारतात मिळत नाही! पूर्वी ‘कस्टम्स’लादेखील वेळ लागत असे. कसून तपासणी होई. आता मात्र बॅग्ज ‘एक्स-रे’ स्कॅन केल्या, की झालं. त्यात अमेरिका, युरोपहून येणाऱ्या प्रवाशांबद्दल कस्टम्सवाले निश्चिंत असतात! त्याला कारण अमेरिकन डॉलर आणि युरोपियन चलनाचा एक्सचेंज रेट! ‘इलिनॉय युनिव्हर्सिटी अरबाना शॉपेन’ इथे माझं गाणं होतं.
शुक्रवार सकाळची मैफल. कॉलेजमधल्या मुलांसाठी आणि प्राध्यापकदेखील होते. मी आणि माझे साथीदार सकाळच्या विमानानं शिकागोच्या ओ हेअर विमानतळावर आलो आणि तिथून गाडीनं अरबानाला पोहोचलो ११ वाजता. कार्यक्रमही ११ वाजताचाच होता. पोहोचायला उशीर झाला होता, म्हणून १० मिनिटांत तयार झालो आणि हॉलवर आलो. ११.३० वाजले होते आणि हॉल भरलेला. बहुतांशी परदेशी श्रोत्यांत काही भारतीय. काही तिथले संगीतप्रेमी. आम्ही लगबगीनं रंगमंचावर जाऊन बसलो. आमची ओळख निवेदकानं करून दिली. तोपर्यंत आम्ही जुळवण्यासाठी वाद्यं बॉक्समधून काढली. तबला, हार्मोनियम, यासाठी खास बॉक्सेस करून घ्यावे लागतात. प्रवासात वाद्यं मोडू, बिघडू नयेत यासाठी त्या बॉक्सवर ‘फ्रजाईल’ची शेकडो स्टिकर्स लावावी लागतात! अशा स्टिकर्स लावलेल्या बॉक्समधून हार्मोनियम काढली, सूर दिला. काळी पाच तबला काढला, डग्गाही. तबलावादकाच्या चेहऱ्यावरच्या भावांवरून लक्षात आलं, की काहीतरी भानगड झाली आहे. त्यानं तबला-डग्गा काढून समोर ठेवला. डग्गा फुटला होता. डग्ग्याच्या तांब्यानं बनवलेल्या भांडय़ावर कातडं बसवलेलं असतं (पुडी म्हणतात त्याला.) आणि मग त्यावर शाई घोटली जाते. ही डग्ग्याची पुडी फुटली होती. त्यामुळे डग्गा वाजवणं अशक्यच होतं. आता डग्गा शोधणं आलं. तिथली काही मुलं तबला शिकत होती. परमेश्वरकृपा ती हीच! त्यांच्या हॉस्टेल रूमवर जाऊन डग्गा आणेपर्यंत मी संथ आलाप गायले तबल्याशिवाय. साधारणपणे पाच-दहा मिनिटं आलापी करून नंतर तबल्याबरोबरची बंदिश सुरू करायची होती. पण डग्ग्याच्या प्रतीक्षेत मला जवळजवळ अर्धा तास मिळाला आलापीला. वेगळे विचार सुचले, वेगळा रंग आला प्रस्तुतीकरणाला. नंतर दोन-तीन डग्गे आले. त्यातला एक ठीकठाक डग्गा घेऊन पुढचं गाणं झालं. विचलित झालेल्या मनाला ताळय़ावर आणण्यात परत एकदा यशस्वी झालो आम्ही सगळे.
एकदा अटलांटाला होतं गाणं. संध्याकाळी साडेसहा वाजता. शनिवार होता. लॉस एंजलिसचे माझे स्नेही, संगीतप्रेमी मोहन असवानी खास आले होते इतक्या दुरून गाणं ऐकायला. त्यांची पत्नीदेखील. सकाळपासून पूरिया धनाश्री मनामध्ये रुंजी घालत होता. ‘म रे ग’ ही संगती. ‘म ध प म धनी ध प’मधल्या कोमल धैवतावरून अलगद मिंडेनं पंचमावर येणं. संध्याकाळच्या वेळी मनाला लागणारी हुरहुर पूरिया धनाश्रीच्या कोमल स्वरांतून उत्तम साकारता येते. तरल भावना व्यक्त करण्यासाठी तितकेच तरल स्वरसमूह. जळी-स्थळी-काष्ठी पूरिया धनाश्री दिसत होता. चार वाजता जाण्यासाठी तयार झालो आम्ही. सकाळी पूरिया धनाश्रीच्या ताना घोटता घोटता मी स्वत: इस्त्री केलेली साडी आता नेसली होती. मंद परफ्यूम. सुधीर नायक आणि मुकुंदराज होते साथीला. गाडीत बसलो आम्ही. पुढे बसायला आवडत नसे मला. सीटबेल्ट लावावा लागत असे आणि त्यामुळे साडीची इस्त्री खराब होई. त्या वेळी मागे बसणाऱ्यांना बेल्ट लावण्याचा नियम इतका कडक नव्हता. सुधीर पुढे. आमचे होस्ट गाडी चालवत होते. मी पूरिया धनाश्रीत रमलेली. गाडीत मागे जाऊन बसले. मुकुंदा बाजूला. सुधीरनं बेल्ट लावला. आम्ही नाही लावला साडीच्या इस्त्रीच्या काळजीमुळे. जिवापेक्षा इस्त्रीची चिंता! निघालो संथ लयीत. अजून हायवे यायचा होता. थोडं ट्रॅफिक होतं. आमच्यासमोर गाडय़ांची रांग होती. समोरूनही गाडय़ा येत होत्या. थोडा वेग घेतला गाडीनं. होस्ट काका गप्पांत रंगले होते सुधीरबरोबर. अचानक समोरची गाडी थांबलेली लक्षात आलं. काका ब्रेक दाबत नाही हेही लक्षात आलं. ‘‘काका, ब्रेक दाबा’’ असं ओरडलो आम्ही तिघं. कोणत्या विचारात होते काका, कुणास ठाऊक.. आमची गाडी समोरच्या गाडीवर जाऊन धडकली जोरात. समोरची गाडी तिच्या पुढच्या गाडीवर. पाच गाडय़ा धडकल्या होत्या एकामागोमाग. काका शॉकमध्ये आणि आम्हीदेखील. बेल्टमुळे सुधीर सुरक्षित होता. मी आणि मुकुंदा दोघंही समोरच्या सीटवर आदळलो. फार लागलं असं वाटलं नाही त्या वेळी. खाली उतरलो सगळे. पुढच्या गाडय़ांमधली मंडळीदेखील खाली उतरली. सगळं काही शांतपणे. आरडाओरडी, बाचाबाची, शिवीगाळ काही नाही. पोलिसाला फोन केला कुणीतरी. लगेच पोलीस आले. शांतपणे पाहणी केली. अपघाताबद्दल सगळी माहिती रेकॉर्ड केली त्यांनी.
आमची गाडी मात्र चालणं कठीण होतं. समोरच्या बाजूला धडकल्यामुळे बरीच हानी झाली होती गाडीची. काकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी फोन करून हकिकत सांगून दुसरी गाडी मागवली. ती अर्ध्या तासानं आली. तोपर्यंत आम्ही आमचे दुखरे गुडघे, झटका बसलेली मान, कोपर इत्यादी अवयव निरखून पाहात होतो. काही औषधं मागवली. साडीच्या इस्त्रीबरोबर पूरिया धनाश्रीची घडीही विस्कटली होती! पुरिया धनाश्रीच्या विचारांची जागा धक्का, भीती, वेदना यांनी घेतली होती. दीड तास उशिरा पोहोचलो कार्यक्रमस्थळी. येता येता थोडं आभाळ भरून आलेलं दिसलं. हॉलमध्ये शिरताच आतुरतेनं वाट पाहणारे श्रोते, मोहनभैय्या, भाभी सगळे दिसले. त्यांच्या सगळय़ांच्या डोळय़ांत आता उत्तम गाणं ऐकायला मिळणार हे भाव दिसले. हे भाव कलावंताचा अहंकार जागृत करतात. ग्रीन रूममध्ये गेलो. वाद्यं सुरांत मिळवली आणि सैरभैर झालेलं मन ‘मियाँ मल्हार’वर जाऊन बसलं. गेल्या दोन-तीन तासांत अनुभवलेले सगळे संमिश्र भाव त्या मल्हारातून प्रकट झाले. मिंड, बेहलावे, गम, ताना.. दुखऱ्या अंगाचा विसर पाडून मल्हारात गुंगवण्याची कला मनच जाणे! मनात आलं, तर शरीरापलीकडे जाता येतं. मन हे इंजिन आहे आणि शरीर म्हणजे रेल्वेचा डबा. मन बैल आहे, शरीर म्हणजे गाडी.
मेलबर्न फेस्टिव्हलमध्ये गाणं होतं मार्च २०२३ मध्ये. तीन दिवसांचा महोत्सव. जयतीर्थ मेवुंडीपण आला होता गायला. तन्मय देवटके हॉर्मोनियमला आणि यशवंत वैष्णव तबल्याला. माझी एक शिष्यादेखील राहते मेलबर्नमध्ये. आदल्या दिवशी आम्ही सगळय़ांची एक तालीम घेतली. छान तानपुरे मिळाले तिथे. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात रंगमंचासमोर ५०-५० मंडळी भारतीय बैठकीत बसली होती गाद्यांवर. मागे ४०० जण खुर्चीवर. भारतीय बैठकीत मांडी घालून बसलेले श्रोते. सगळे गोरे होते; ऑस्ट्रेलियन. अत्यंत बारकाईनं गाणं ऐकणारे. प्रत्येक हुकमी समेवर उत्कटतेनं दाद देणारे. अतिशय सूक्ष्मतेनं ऐकणारे, समजदार श्रोते. आपल्या संस्कृतीत न वाढलेले. विदेशी दिसणारे, पण मनानं भारतीय! प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीय संगीताचा अभ्यास करत होता. कोणी सतार, कोणी तबला, कोणी कंठसंगीत. भारतीय शास्त्रीय संगीतावर अलोट प्रेम करणारी परदेशी मुलं पाहून मन आनंदानं भरून आलं. गायक आणि श्रोत्यांमधला संवाद छान जमला या मैफलीत.
आपण मांडलेला प्रत्येक सूक्ष्म विचार समोरचा लक्ष देऊन ऐकतोय, त्याला समजतंय माझं म्हणणं, हे कळल्यावर कलाकार खुलतो. स्वरांमधला भावच तिथे अर्थप्रवाही होतो. शब्द अडथळा निर्माण करत नाहीत. स्वरप्रधान, लयप्रधान शास्त्रीय संगीताचा एक उत्तम आविष्कार या महोत्सवात गाण्याची, ऐकण्याची संधी मिळाली. मार्च २०१६ चा सुमार. मी आणि माझ्याबरोबर साथीला येणारे दोन साथीदार विभव खांडोळकर (तबला) आणि मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम) अमेरिकन व्हिसासाठी मुंबईतील कॉन्सुलेटला गेलो. सोमवार होता. गुरुवारी रात्रीची फ्लाईटची तिकिटं बुक केली होती न्यूयॉर्कची. सोमवारी व्हिसा, इंटरव्यू, बुधवारी पासपोर्ट घ्यायचा आणि गुरुवारी निघायचं. सात आठवडय़ांचा दौरा ठरला होता. १७-१८ कार्यक्रम ठरले होते. अमेरिकेत प्रमोद मराठेनं उत्तम तयार केलेला शिष्य मिलिंद आणि रामदार पळसुलेचा अत्यंत सुमधुर, मुलायम ठेका देणारा गोव्याचा शिष्य विभव. त्याचा भजनी ठेका आणि त्यातल्या लग्ग्यांमध्ये तर अक्षरश: मध ठिबकतो. तन्मयतेनं गाणे ऐकून, त्यात रमून, गाण्याला साजेसं वादन करण्यात त्याचा हातखंडा. आम्ही तिघं व्हिसा, मुलाखतीत उत्तीर्ण झालो. हायसं वाटलं. आता दोन दिवसांत पॅकिंग करून गुरुवारी निघायचं.. विभव गोव्याला गेला आई-वडिलांना भेटायला. एक दिवसात परतणार होता. मी मंगळवारी सकाळी काही कामासाठी विभवला फोन केला. त्यानं उचलला नाही. दोनदा, चारदा, अनेक वेळा केला. एक वाजता फोन उचलला गेला. त्याचा काका बोलत होता. ‘‘विभवचं ऑपरेशन चालू आहे.’’ काका. विभव गोव्याला गेला, तेव्हा त्यांच्या नवीन घराचं बांधकाम चालू होते. त्याची पाहणी करण्यासाठी तो गच्चीवर गेला आणि तिथे पडला आणि त्याच्या उजव्या हाताला लागलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर एक्स-रे काढून कळलं, की मनगटच फ्रॅक्चर झालंय उजव्या हाताचं. शस्त्रक्रिया करणं अत्यावश्यक होतं. माझ्या तोंडून शब्द फुटेना. डोळय़ांसमोर विभव, त्याचा मुलायम ठेका, अमेरिकेचा मोठा दौरा, त्याचं ऑपरेशन, त्याचं मनगट, सगळे येऊन गेलं. आपण चितारलेल्या ओल्या चित्रावर कुणीतरी बोळा फिरवतंय असं वाटलं. विभवची खूप काळजी वाटली. ऑपरेशननंतर प्लास्टरमध्ये हात दोन-तीन महिने, मग फिजिओथेरपी. सहा महिने तरी पोराचे वाया जाणार होते. बोटांना संदेश वाहून नेणाऱ्या नसा परत पूर्ववत काम करतील की नाही, याची साशंकतादेखील होती. आता विभवचं येणं रद्द. दौरा रद्द करायचा की जायचं?.. अमेरिकेतल्या वेगवेगळय़ा शहरांतल्या संस्था, ज्यांनी कार्यक्रम ठरवले होते, हॉल बुक केले होते, तिकिटं विकली होती, त्यांचं काय? मिलिंद आणि मी दोन महिने अमेरिकेला जायचं म्हणून भारतातल्या कार्यक्रमांना नकार दिला होता. कल्लोळ! मंगळवारी संध्याकाळी आम्ही भेटलो. मी, मिलिंद, रामदास- ज्यानं हा दौरा ठरवला होता. असं ठरलं, की अमेरिकेतल्या तबलावादकांबरोबर हा दौरा करायचा. तिथे जो उत्तम असेल, जो उपलब्ध असेल त्याला संगतीला घेऊन. आव्हानात्मक होतं! रोज नवीन शहर, नवीन तबलावादक, खूप तालमी करायला लागल्या. पण दौरा पार पडला सुरळीत. चित्र रेखाटताना काही रंगांची रचना मनात योजली असताना, एखादा रंग संपल्यावर त्या जागी दुसरा रंग वापरावा लागला, की जसं वाटे तसं वाटलं. पण चित्र पूर्ण केलं. पाहणाऱ्याला कळलंही नाही. रंग संपलेले! आमचा दौरा यशस्वी झाला. परतल्यावर विभवला भेटलो. फिजिओथेरपी सुरू होती त्याची. सहा महिन्यांनी तो पुण्यात आला. तबल्याचा रियाज सुरू केला त्यानं. हळूहळू मनगटाचे स्नायू मोकळे होऊ लागले, बोटं चालू लागली आणि बघता बघता काही महिन्यांत विभवच्या हाताची गोडी परत आली. तेच मुलायम हात, तोच मधाळ ठेका. आमचा विभव आम्हाला मिळाला. जसा होता तसा!