आरती अंकलीकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘आपल्यातील उत्तम, सर्वोत्तम गुण बाहेर यायचे असतील तर रियाझाला पर्याय नाही, कोणत्याही क्षेत्रात. पण त्याहीबरोबरीनं गरजेचा असतो आपल्यापेक्षा जास्त ताकदीचा स्पर्धक. साधना सरगम या अत्यंत ताकदीच्या गुणी गायिकेनं मला माझ्यातलं उत्तम देण्यासाठी भाग पाडलं. लहानपणापासून ती माझी प्रेरणास्थान झाली. तोच रियाझ उपयोगी पडला बालपणीच्या मित्रमैत्रिणींबरोबर शिकताना, गाताना. आम्ही सहा जण रात्र रात्र मैफल गात असू. त्या वेळीही स्पर्धा होतीच, पण आपल्यातलं सर्वोत्तम ते देण्याची.. त्यासाठी ‘जिंकू किंवा हरू, पण रियाझ करू’ हे ब्रीदवाक्य झालं.’’ 

गेल्या आठवडय़ात इंदोरला माझ्या गाण्याचा कार्यक्रम होता. शास्त्रीय संगीत खूप आवडीनं ऐकतात तिथले श्रोते. मध्य प्रदेश सरकारदेखील शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक उपक्रम राबवतं. अगदी धृपद गायकीसाठीदेखील..

 त्या दिवशी खूप गर्दी झाली होती इंदोरच्या कार्यक्रमाला. अनेक जाणकार श्रोते उपस्थित होते. कार्यक्रम संपला की बऱ्याच श्रोत्यांना कलाकारांना भेटून प्रत्यक्ष दाद देण्याची इच्छा असते, उत्सुकता असते. सेल्फीदेखील काढायची असते अनेकांना. असंच एक जोडपं आणि त्यांच्याबरोबर एक छोटीशी मुलगी, फ्रॉक घातलेली. ७-८ वर्षांची असेल. ते भेटायला आले. त्या मुलीची आई मला म्हणाली, ‘‘आमच्या आसावरीला गाण्याची खूप आवड आहे. ती नियमितपणे शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना येते आमच्याबरोबर आणि अगदी तन्मयतेनं ऐकते कार्यक्रम. शास्त्रीय संगीत शिकतेसुद्धा आहे.’’ त्या चिमुकलीला भेटताना, फोटो काढताना, तिला सही देताना खूप बरं वाटत होतं. संगीताचं उज्ज्वल भविष्य अशाच चिमुकल्यांच्या हाती आहे. तिचं येणं, भेटणं संगीताच्या भविष्यासाठी खूप आशादायी वाटलं. त्या वेळी मला आठवली, अशीच एक ६-७ वर्षांची चिमुरडी.. खरं तर धिटुकलीच ती!

  ती रंगमंचावर तानपुरा छेडत गात होती. मागच्या लेखामध्ये तानपुऱ्याबद्दल लिहीत असताना विचारांच्या ओघापलीकडून तिचा छोटय़ाशा भोपळय़ाचा तानपुरा वारंवार डोकावत होता. गोबऱ्या गालांची, दोन वेण्या, छानसा फ्रीलचा, पफ बाह्यांचा रंगीबेरंगी फ्रॉक. चिमुकले हात, नाजूक बोटं. भोपळय़ाच्या वर फक्त चेहरा दिसत होता तिचा. हार्मोनियमच्या साथीला तिची आई. ती मुलगी माना डोलावत,  हातवारे करत अतिशय सुरेल गात होती. विलंबित ख्याल. संथ लयीत आलापी, त्यानंतर द्रुत बंदिश, ताना.. सगळं काही सुरेख बांधलेलं. लयीत, सुरात. सहा-सात वर्षांचं कोवळं वय. एवढय़ाशा मेंदूत इतकं गाणं? विस्मयकारक होतं.  मीसुद्धा तेव्हा ७-८ वर्षांचीच होते. म्हणजे सहा वर्षांची गायिका आणि सात वर्षांची श्रोता!

  ‘गोल्डस्पॉट’ नावाची स्पर्धा होती ती. आई-बाबा मला ती स्पर्धा ऐकायला घेऊन गेले होते. त्या मुलीचं गाणं ऐकून आम्ही थक्क झालो सगळे. भारावून गेलो. थोडासा आनंद, थोडं आश्चर्य, थोडी ईष्र्या.. खूपशी प्रेरणा! संमिश्र भाव होते. पण हे मात्र खरं, की तिचं गाणं ऐकून मलाही उत्तम गाण्याची तळमळ निर्माण झाली. त्या धिटुकलीचं नाव साधना घाणेकर! आताची प्रसिद्ध गायिका साधना सरगम. त्या वेळी ती खूप उत्तम रागसंगीत गात असे. आताही नक्कीच गात असेल, पण गेली २५-३० वर्ष मी तिला उत्कृष्ट पार्श्वगायिकेच्या भूमिकेत पाहिलं आहे. गोड, सुरेल गळय़ाची साधना पं. जसराजांकडे शिकत असे आणि त्याआधी तिच्या आईकडे. तिची ‘जयजयवंती’तील ‘चंद्रबदन राधिका’ अजून कानात रुंजी घालते आहे. साधना माझं पहिलं प्रेरणास्थान! अनेक स्पर्धामध्ये आम्ही भाग घेत असू. अटीतटीची स्पर्धा होती आमच्यात. कधी तिचा नंबर पहिला, तर कधी माझा. प्रत्येक गाणं उत्तम गायचंच आणि साधनापेक्षाही उत्तम गायचं हे तेव्हा माझं लक्ष्य असे! इतक्या ताकदीची आणि तयारीची प्रतिस्पर्धी मिळणं हेही महत्त्वाचं नाही का? To compete with the Best! आपलं वाढणं नक्की असतं त्यामुळे.

वनिता समाज मंडळात एकदा मराठी गीतांची स्पर्धा होती. १९७५ चं वर्ष असावं. खूप स्पर्धक होते. हॉल अगदी गच्च भरलेला श्रोत्यांनी. पं. हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके (बाबूजी) आणि  शोभा गुर्टू असे दिग्गज परीक्षक होते. साधना साईबाबांचं एक गीत गायली. अप्रतिम गायली अगदी. मी विंगेतून ऐकत होते. गाणं ऐकून खूप टेन्शन आलं. समोर श्रोत्यांमध्ये आई-बाबा बसले होते माझे. तिचं गाणं संपल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरही दडपण दिसलं मला. माझं दडपण आणखीनच वाढलं त्यामुळे! मध्ये २-३ गाणी झाली. तरी साधनाच्या गाण्याचा असर काही डोक्यातून जात नव्हता. तेच गाणं जणू हॉलभर भरून राहिलं होतं. माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जाऊन बसले. आई-बाबांनी नजरेनं ‘चीअर अप’ केलं.

  हार्मोनियमचा सूर मिळाला. तबलावादकानं त्या सुरात तबला मिळवला. मी डोळे मिटून मन एकाग्र केलं आणि खळे काकांच्या ‘भेटी लागी जीवा’चा आर्त स्वर आळवला. अंतऱ्यातील ‘भुकेलिया बाळ अति शोक करी’ ही ओळ गायल्यावर मला आठवतंय, की बाबूजी उठून उभे राहिले आणि मला मनापासून दाद दिली. साधनाच्या उत्तम गाण्यानं त्या दिवशी माझ्या सादरीकरणाला खरं तर मदतच केली होती. मोकळय़ा रस्त्यावर आपल्या बाजूच्या लेनमधली गाडी जेव्हा वेगानं धावू लागते, तेव्हा आपण नकळत आपला वेग वाढवतो.. तसं काहीसं. साधनाच्या गाण्याच्या तयारीमुळे मी माझ्यातलं उत्तम ते देऊ शकले होते. मग कळत गेलं, की ‘उत्तम’ ही आपली पहिली पायरी असते. पुढच्या पायऱ्या दृष्टिपथात येऊ लागल्या, की रोज पुढच्या पायरीवर जायचं आणि ‘उत्तम’ची पायरीही उंचवायची. जितक्या पायऱ्या चढत जातो तितकी शिडी अजून उंच वाढतच जाते, सर्वोत्तमपर्यंत. निरोगी स्पर्धेला असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या वेळच्या स्पर्धामध्ये भपका नव्हता. साधा रंगमंच. खूप लायटिंग नसे. भर गाण्यावर होता, सादरीकरणावर नाही. म्हणून जिवाचे कान करता येत होते. मोठा सुंदर होता तो काळ. घरात ना टीव्ही होता ना फोन. जीवनाची लय काहीशी विलंबित. पण मुंबईत असल्यानं ‘मध्यलय’ म्हणा ना!

 आम्ही माटुंग्याला राहात असू. गर्द झाडी होती भोवताली. पक्ष्यांच्या किलबिलाटातच माझा रियाझ सुरू होत असे. आजच्याएवढा गजबजाट नव्हता तेव्हा. मोकळे रस्ते. दुतर्फा गाडय़ाही पार्क केलेल्या नसत. रस्त्याच्या मध्यभागीच आमचा खेळ रंगे. ५-६ मिनिटांनंतर एखाद् दुसरी गाडी जात असे. आमचे गुरू पं. वसंतराव कुलकर्णी यांच्या शिष्यांचा- आम्हा मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप होता. त्यातला पहिला  नरेंद्र दातार. आता कॅनडामध्ये स्थायिक झालाय तो. मोठा इंजिनीयर झालाय. पण गाणं उत्तम चालू ठेवलंय. खूप शिष्यही तयार करतोय. दुसरा, रघुनंदन (आताचे सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर) आपला सगळय़ांचा आवडता, माझा बालमित्र! पहिलीपासूनचा. एकाच वर्गात होतो आम्ही. तिसरा, राधारमण कीर्तने. पं.जसराज यांचा शिष्य. तोही अमेरिकेमध्ये उत्तम शिष्य तयार करतो आहे. चौथी सुजाता घाणेकर. अमेरिकेत गुरू म्हणून तिचंही खूप मोठं नाव झालंय. तीसुद्धा अनेक उत्तम शिष्य तयार करते आहे. तशीच साधना पालकर. आम्ही सगळे महिन्यातल्या एका शनिवारी कुणा एकाकडे गायला बसत असू. रात्री ९ वाजता मैफल सुरू होई. ती सकाळी दूधवाला आल्यावर ताज्या दुधाचा चहा होईपर्यंत चालत असे. अदृश्य स्पर्धाच ती आमच्यातली. दर महिन्याला नवीन रागाच्या सादरीकरणाचा विचार. त्या अनुषंगानं भरपूर रियाझ होत असे. रियाझ आणि सादरीकरणातला फरक स्पष्ट होत गेला अशा मैफिलींमुळे. तो माहीत असणं आणि अनुभवणं यात फरक आहे.

    एक मोठी स्पर्धा आठवतेय, १९७६ च्या डिसेंबर महिन्यातली.  सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिना- निमित्त. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गायची होती त्यात. ‘जो तुम तोडो पिया’ हे भैरवीतलं गोड गाणं म्हणायचं ठरवलं होतं मी. खूप रियाझ करून अगदी ‘जसंच्या तसं’ गाणं बसवलं. गाणं छान झालं, पण दुसरा नंबर आला. पहिली आली पिनाज मसानी. तिनं त्या गाण्यात स्वत:चे खूप आलाप, बोल-आलाप गात गाणं ‘ओरिजिनल’ पेक्षा बरंच वेगळं सदर केलं. खरं तर मलाही खूप आलाप गाता आले असते, गाता येतही होते. पण वसंत देसाईंच्या मूळ गाण्याप्रमाणे गाण्याचा आमचा निर्णय तिथे चुकला होता. खूप खूप वाईट वाटलं. वाईट वाटून खूप रियाझ करायचं ठरवलं. ‘जिंकू किंवा हरू.. पण रियाझ करू’ हे ब्रीदवाक्य!

    या स्पर्धाच्या गर्दीमध्ये मनाला स्पर्शून जाणारी स्पर्धा माझ्या भावाची. माझा मोठा भाऊ राजू मतिमंद. डाऊन सिंड्रोम त्याला. त्याच्या बरोबर खेळणारी सगळीच मुलं कमी-जास्त त्याच्यासारखीच. त्यांची धावण्याची शर्यत होती ब्रेबॉन स्टेडियममध्ये. राजूला चीअर करायला आम्ही सगळे पोहोचलो स्टेडियमवर. संपूर्ण कुटुंब. शर्यत सुरू झाली. ‘राजू.. राजू.. राजू..’ दुमदुमवून टाकलं स्टेडियम आम्ही! सगळी मुलं धावू लागली. ३-४ मुलं पोहोचलीसुद्धा अंतिम रेषेपर्यंत. राजू धावत होता. धावता धावता त्यानं इतर मुलांकडे मागे वळून पाहिलं. इकडे आम्ही चीअरअप करत होतो. ‘‘धाव राजू, धा..व!’’.

   इतक्यात त्याचा मित्र धडपडला आणि सावरून सावकाश धावू लागला. आम्ही पाहतोय तर राजू त्याची वाट पाहात तिथेच थांबला होता. त्याचा मित्र त्याच्याजवळ आल्यावर दोन्ही मित्रांनी हातात हात घेतले आणि आनंदानं हसत हसत शर्यत पूर्ण केली. राजू जिंकला होता!

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sur sanvad aarti anklekar great the best singer sadhana sargam chaturang article ysh