आरती अंकलीकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘आपल्या मातीतल्या रसिकांचे कान तृप्त करण्याचा आनंद कोणत्याही गायकासाठी औरच! पण आपलं संगीत परदेश दौऱ्यांमध्ये सादर करताना जे अनुभव मिळतात, ते गायक म्हणून आम्हाला अधिक समृद्ध करतात. मला लहान वयातच ‘सवाई’पासून परदेश दौऱ्यांपर्यंतच्या संधी मिळाल्या आणि असंख्य सुरेल आठवणी साठत गेल्या ..’

सवाई गंधर्व महोत्सवात गाणं ही संधी खूप मोठी होती माझ्यासाठी. देशाच्या कानाकोपऱ्यातून संगीत रसिक येतात, जाणकार श्रोते येतात, गायक- वादक येतात. मी पहिल्यांदाच गाणार होते. वय वर्ष होतं वीस. मी माझ्या परीनं तयारी केली. एकामागोमाग एक गायक गाणार होते. रात्री ८-९ वाजता माझी गाण्याची वेळ येईल, असं आयोजक म्हणाले. मी ‘नंद रागा’ची तयारी केली. ७ वाजता आयोजकांचा फोन आला, की कार्यक्रम जरा उशिरा सुरू झालाय म्हणून. त्यामुळे आता माझी गाण्याची वेळ रात्री १० वाजता असणार होती. वेळ बदलल्यामुळे ‘राग’ बदलणं आलंच ओघानं.

आपल्या समृध्द संगीत परंपरेत वेगवेगळय़ा वेळेसाठी वेगवेगळे ‘राग’ आहेत. आठ प्रहर आणि प्रहराप्रमाणे ‘राग’ही बदलतात गायन-वादनाचे. रात्रीच्या पहिल्या-दुसऱ्या प्रहराचे ‘राग’ मी मनात घोळवू लागले. तेवढय़ात फोन आला, की वेळ अजून पुढे गेलीय! आता १२ वाजता गायचंय; मध्यरात्री. परत मनातलं रागचित्र बदलावं लागलं. माझ्याआधी गाणारे गायक मी योजलेले ‘राग’ गात होते. वेळही पुढे जात होती. मला खूप ‘राग’ येत नव्हते त्या वयात. जे येत होते, त्यातला प्रत्येक ‘राग’ मी तेवढय़ाच तयारीनं गातही नव्हते. काही निवडक रागांवर हुकमत मिळवली होती. टेन्शन वाढू लागलं. मी ‘जोगकंस’ गायचं ठरवलं     १२.३० ला. थोडा वेळ ‘राग’ घोळवला मनात. श्रीकांतदादा देशपांडे यांनी तानपुरे मिळवले होते ग्रीनरूममध्ये. नंतर साक्षात आण्णा, पं. भीमसेनजी आत आले. सगळं काही व्यवस्थित आहे ना, ते पाहिलं त्यांनी आणि मानेनंच खूण केली ‘होऊन जाऊ दे’ अशा अर्थाची. मी नमस्कार करून रंगमंचावर गेले तेव्हा रात्रीचे २ वाजले होते. श्रोत्यांनी भरलेला मंडप. सगळय़ा श्रोत्यांचे चेहरे प्रफुल्लित. स्वरांचं चांदणं टिपायला आसुसलेले. कुणाच्याही चेहऱ्यावर रात्रीचे ‘२’ दिसत नव्हते! कलाकारांची मांदियाळी समोर.

मी ‘राग’ आळवायला सुरुवात केली. ‘जोगकंस’ मी पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शिकले होते. त्या तालमीवर किशोरीताईंच्या (आमोणकर) तालमीचा मुलामा चढला होता. बेमालूमपणे दोन्ही गायकी एकसंध होऊन गळय़ातून झरत होत्या. माणसाचं शरीर, बुद्धी, मन, आत्मा हा निसर्गाचा अचंबित करणारा चमत्कार आहे. माझं गाणं झालं. खूप आवडलं श्रोत्यांना. मोठमोठय़ा कलावंतांची कौतुकाची थाप पाठीवर पडली. वर्तमानपत्रात मोठे मोठे फोटो आले, सकारात्मक समीक्षणं लिहून आली. इतक्या मोठय़ा रंगमंचावर गाऊन मिळालेली ‘त्या’ वेळची प्रसिद्धी, म्हणजे आजच्या काळात आपला व्हिडीओ व्हायरल होऊन त्याला करोडो व्ह्यूज् मिळण्यासारखंच! गुरुकृपा, मेहनत आणि वेळोवेळी मिळणाऱ्या संधी, यामुळे पुढचा प्रवास दणक्यात सुरू झाला माझा.

१९८६ वर्ष. अमेरिकेत ‘फेस्टिवल ऑफ इंडिया’ होणार होता. त्यात गाण्यासाठी आमंत्रण आलं. मी उत्साहात, आनंदात. तेविसाव्या वर्षी परदेश दौऱ्याची संधी चालून आली होती. सगळं काही ठरलं आणि जाण्याआधी एक महिना सगळं बारगळलं. सगळय़ा उत्साहावर पाणी! पण अगदी १५ दिवसांतच कॅनडाच्या

डॉ. जगन्नाथ वाणी यांचा फोन आला. कॅनडा दौऱ्यासाठी. माझ्या उत्साहावरचं पाणी वाळलंही नव्हतं खरं! दौरा ठरला. कार्यक्रम ठरले. फेब्रुवारी महिन्यात मॉट्रियलला जायचं होतं. पुढच्या २ महिन्यांचा भरगच्च कार्यक्रम होता. पहिलाच परदेश दौरा माझा. व्हिसा झाला. तिकिटं आली. विमानात बसलो. विमान उतरू लागलं मॉट्रियलला. मी खिडकीतून बाहेर पाहात होते. कापूस पिंजल्यासारखे सगळीकडे पांढरेशुभ्र ढग दिसत होते. हळूहळू ढगातून विमान बाहेर आलं. खाली घरं, काही झाडं दिसू लागली. घरांवर, रस्त्यांवर, डोंगरांवर चहूकडे पांढऱ्याशुभ्र बर्फाचं साम्राज्य पसरलं होतं. रस्ता दिसतच नव्हता. बर्फ, बर्फ आणि बर्फ! विमानतळावरून बाहेर पडल्यावर आयुष्यात प्रथमच कडाक्याची थंडी म्हणजे काय असतं याची जाणीव झाली. मुंबईकरानं कॅनडाच्या थंडीसाठी नेलेले गरम कपडे ते काय असणार.. तिथल्या कुटुंबानं आणलेल्या जॅकेटस्मुळे आम्ही बचावलो. पुढचे दोनही महिने कडाक्याच्या थंडीतच गेले. तिकडच्या सगळय़ा कुटुंबांनी खूप मदत केली आम्हाला. १९८७ फेब्रुवारीचा महिना होता, पण प्रगत देशात आल्यानं आम्हाला अचानक २५ वर्ष पुढे, २०१२ मध्ये आल्यासारखं वाटत होतं! प्रथमच गाडीतले हीटर्स, घरातले हीटर्स, सेन्ट्रल हीटिंग अनुभवलं. आम्ही घरातून निघण्याआधी तिथली मंडळी गाडीचा हीटर लावून गाडी उबदार करून मगच आम्हाला गाडीत बसवत. बर्फात घालण्याचे त्यांचे बूट देऊन, प्रेमानं ते आम्हाला घालून, त्यांचे गरम कोट देऊन, आमची उत्तम व्यवस्था ठेवत. पहिला दौरा असा उत्तम पार पडला.

खरं तर १९५६ च्या सुमारास पं. रविशंकर यांनी आपल्या समृद्ध भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख पाश्चात्त्य देशांना करून दिली होती. यहुदी मेन्युहिन, ‘बीटल्स’चे गिटारवादक जॉर्ज हॅरिसन या पाश्चिमात्य कलाकारांच्या सोबतीनं त्यांनी आपलं संगीत, आपली वाद्यं तिथे लोकप्रिय केली होती. त्यामुळे भारतीय संगीताविषयी प्रेम होतं तिथल्या लोकांमध्ये. १९८८ मध्ये मी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. अडीच महिन्यांचा मोठा दौरा.१० आठवडय़ांच्या कालावधीत २५ कार्यक्रम आणि काही लेक्चर्स- अमेरिकी महाविद्यालयांमध्ये. कंठसंगीतातले बारकावे समजणं पाश्चिमात्यांना थोडं कठीण. त्याचं आणि आपलं स्वरसप्तक एक असलं, १२ स्वर असले, तरी आकृतिबंध खूप निराळे आहेत. ‘राग’ ही संकल्पना, ‘ताल’ ही संकल्पना त्यांच्याकडे नाही. एकच राग विस्तृतपणे विलंबित लयीत सुरू करून द्रुत लयीपर्यंत नेऊन प्रस्तुत करणं हेही त्यांना नवीन. उत्स्फूर्तता नवीन. भाषा वेगळी. त्यामुळे बंदिशीतल्या शब्दांचा वापरही अडसर निर्माण करणारा. बंदिशीतले विषय संस्कृतीदर्शक. त्यामुळे शब्दभाव समजणंही कठीण त्यांना. पण विभिन्नता असूनदेखील अनेक पाश्चिमात्य मंडळींना आपल्या संगीतात रुची निर्माण झाली. पं. रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद झाकीर हुसेन अशा अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या संगीताचा प्रसार तिथे करून आम्हा पुढच्या पिढीच्या कलाकारांसाठी रंगमंच खुला केला. जबाबदारी सोपवली. हे काम पुढे नेण्याची.

पहिल्या कॅनडाच्या दौऱ्यात खूप शिकायला मिळालं होतं. विमानप्रवास करून कार्यक्रम असलेल्या शहरात पोहोचणं, तिथल्या ‘होस्ट’ कुटुंबाशी जुळवून घेणं. त्यांच्या घरातले नियम समजून घेणं, ‘अनपॅकिंग’ करणं, आपल्या कपडय़ांची व्यवस्था लावणं, धुणं, इस्त्री करणं इत्यादी. ‘साइट सीइंग’ला जाणं, रियाझ करणं, वेळ मिळेल तेव्हा खरेदी करणं, पुरेशी विश्रांतीही घेणं, गाण्याच्या ‘मूड’मध्ये राहणं आणि उत्तम कार्यक्रम करणं.. आणि दुसऱ्या दिवशी सामान ‘पॅक’ करून पुढच्या प्रवासाला लागणं. अमेरिकेच्या दौऱ्यात तर शुक्रवार, शनिवार, रविवार लागोपाठ कार्यक्रम असत. गुरुवार ते सोमवार श्वास घ्यायलाही वेळ नसे. तब्येत सांभाळून, मूड सांभाळून वरील सगळय़ा गोष्टी करणं म्हणजे तारेवरची कसरत असे. पण खूप आवडत होती ही कसरत. जाऊ तिथे खूप प्रेम, आपुलकी आणि सन्मान मिळे.

या दौऱ्यात अल्बुकर्कीला कार्यक्रम होता शुक्रवारी संध्याकाळी. गुरुवारी एका विद्यापीठात ‘लेक्चर-डेमॉन्स्ट्रेशन’ असल्यानं शुक्रवारी सकाळचं विमान घेऊन आम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळी पोहोचलो. विमानतळावर सामानाची वाट पाहत उभे होतो. बॅगा आल्या, हार्मोनियम आलं, पण तबला आलाच नाही खूप वेळ. आम्ही एअरलाइनच्या ऑफिसमध्ये विचारपूस केली. तबला पोहोचलाच नव्हता आमच्या विमानानं. त्याच दिवशी संध्याकाळी कार्यक्रम होता. त्यात शुक्रवार असल्यामुळे सगळी मंडळी कामात व्यग्र. अजून इंटरनेट बोकाळलं नव्हतं. फोनवरच चौकशी सुरू होती. संध्याकाळी हॉलवर पोहोचलो. केदार पंडित होता माझ्याबरोबर त्या दौऱ्यात तबल्याच्या संगतीसाठी. बरेच तबले आणि डग्गे ठेवले गेले त्याच्यासमोर निवडीसाठी. तो एकेक वाजवून पाहू लागला आणि शेवटी एक तबला-डग्गा जोडी त्यानं पसंत केली. माझा स्वर ‘काळी ५’, परंतु त्या सुराचा एकही तबला त्यात नव्हता. मग केदारनं एक पंचमाचा तबला निवडला आणि त्या सुराच्या तबल्यावर आम्ही पूर्ण कार्यक्रम पार पाडला. एरवी तानपुरा, तबला दोन्ही ‘काळी ५’च्या षड्जामध्ये वाजत असतात आणि आमच्या रागविस्ताराचा, रागप्रस्तुतीचा डोलारा हा या षड्जावर दिमाखानं उभा असतो. पंचमाच्या तबल्यामुळे हा डोलारा थोडा डगमगला, परंतु आम्ही आमचं कौशल्य पणाला लावलं आणि तो सावरून धरला.

पुढच्या एका दौऱ्यात मुकुंदराज देव तबला साथीला होता. लॉस एंजेलिसला कार्यक्रम. पडदा उघडला. श्रोतृवर्गावर एक नजर फिरवली मी गाणं सुरू करण्याआधी. तानपुरा छेडत होते मी. समोर पाहिलं, तर पाकिस्तानचे सुप्रसिद्ध तबला नवाझ उस्ताद तारी खान, अब्दुल सत्तार खान पहिल्या रांगेत बसलेले. मेहंदी हसनजी आणि गुलाम अलीजींबरोबर अनेक मैफली त्यांनी त्यांच्या अप्रतिम वादनानं गाजवल्या होत्या. गजलला त्यांच्यासारखी साथ करणारे दुर्मीळच. दडपण आलं थोडं. अर्थात दडपणाचा दुसरा अर्थ- आपलं सर्वोत्तम देण्याची इच्छा आणि त्यासाठी एकाग्र होऊ पाहणारं मन. मुकुंदराजकडे पाहणं टाळलंच मी. एक तबलावादक म्हणून त्याला जे दडपण आलं असेल त्याची मला कल्पनाही करायची नव्हती. मी माझ्या विश्वात, माझ्या कोषात जाऊ पाहत होते. सूर लावला मी. मन स्थिर केलं आणि मग ते त्या हॉलमधून केव्हाच उडून जाऊन ‘मारुबिहागा’त जाऊन बसलं. मध्यंतर झालं. उत्तम चालू होता कार्यक्रम. सगळं जुळून आलं होतं. तारीजी भेटायला आत आले. खूप खूश झाले आम्हा सर्वावर. मुकुंदराजनं मला खूण केली आणि माझ्या लक्षात येण्याआधीच तारीजींना विचारलं, ‘‘तुम्ही मध्यंतरानंतर संगत कराल का? नम्र विनंती आम्हा सर्वाची!’’ ते चक्क कबूल झाले. आमचा आनंद गगनात मावेना. सहजपणे अशी संधी चालून आली. विश्वविख्यात तारीजी, गझल गायनाच्या तबलासंगतीत त्यांचा हात धरणारा मिळणं कठीण. असे स्वभावाने साधे, प्रेमळ, संगीतावर अपरंपार प्रेम करणारे. कोणताही बडेजाव नाही, आढेवेढे नाहीत. मुकुंदराजच्या तबल्याचंही भाग्य मोठं. तारीजींनी धुवांधार संगत केली. मी एक दादरा आणि गझल गायले. ‘शम्मे मेहफिल’ही. स्वर्गीय अनुभव होता हा माझ्या परदेश दौऱ्यातला!

परदेश दौऱ्यातील इतरही खूप आठवणी आहेतच.. त्या १ जुलैच्या लेखात.