एखाद्या शस्त्रक्रियेपूर्वी पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकाकडून डॉक्टर ज्या संमतीपत्रावर सह्य़ा घेतात, ते संमतीपत्रक म्हणजे काय? संमतीची प्रक्रिया कशी असते? रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांना काय अधिकार असतात? त्यांच्या जबाबदाऱ्या काय? डॉक्टरांची कर्तव्ये कोणती? अशी महत्त्वाची माहिती आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे.
‘ऑन द अदर साईड ऑफ द टेबल’ जाऊन कधी तरी समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेतून विचार करावा लागणे, निर्णय घ्यावे लागणे आपल्याला खूप काही शिकवते, संवेदनशील बनवते, विशेषत: डॉक्टर मंडळींना!
तरुण वयात ह्रदयविकाराचा त्रास झालेल्या भावाला अनोळखी गावात, अनोळखी डॉक्टरांच्या हातांत सुपूर्द केल्यावर, जुजबी माहितीनंतर, ‘‘आत्ताच्या आत्ता एंजिओग्राफी केली नाही तर पेशंटचे काही खरे नाही, वेळ काढू नका, लवकर सही करा, दुसऱ्या डॉक्टरांचे मत घ्यायचे असेल तर स्वत:च्या जबाबदारीवर, सही करून पेशंटला घेऊन जा,’’ असे सांगितले गेल्यावर निर्माण झालेल्या भीती, अपराधीपणा आणि असाहाय्यता अशा संमिश्र भावना कधी विसरता येणार नाहीत.
त्या एका प्रसंगी, कंसेण्ट प्रोसेसचे- संमतीच्या प्रक्रियेचे सगळे बरेवाईट पलू अनुभवले. ही वेळ आपल्यातील अनेकांवर नक्कीच आली असणार असे मला वाटते.
प्रत्येक सुजाण व्यक्तीला मग ती किशोरावस्थेतील असो किंवा प्रौढ, खालील माहिती असणे गरजेचे आहे.-
१. वैद्यकीय उपचार, तपासण्या यासंदर्भात संमती अथवा नकाराचे काय स्थान आहे?
२. संमतीपत्रक म्हणजे काय? त्याचे घटक कोणते? संमतीची प्रक्रिया कशी असते ?
३. रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांना काय अधिकार असतात? त्यांच्या जबाबदाऱ्या काय? डॉक्टरांची कर्तव्ये कोणती? हे माहिती असणे आवश्यक आहे.
संमती हा दोन व्यक्तींमधला एक करार आहे. संमती अनेक प्रकारची असते. आपण जेव्हा ताप, वेदना, अपघाती पडणे-झडणे यासाठी डॉक्टरांकडे जातो. त्या वेळी इलाजासाठी एक्स रे, रक्ततपासणी अशा बाबींसाठी संमती गृहीत धरली जाते; डॉक्टर किंवा नर्स आपल्याला तपासणीची प्रक्रिया समजावतात आणि मग तपासणी केली जाते.
मात्र, काही गंभीर अर्थ किंवा दूरगामी परिणाम असलेल्या तपासण्यांसाठी (उदाहरणार्थ एच.आय.व्ही.) लेखी संमती लागते.
लेखी संमती
शस्त्रक्रिया, गंभीर आजारांवरील उपचार, काही गंभीर परिणाम असलेल्या तपासण्या (एम.आर.आय. वगरे), वैद्यकीय संशोधनात सहभाग, त्याअंतर्गत केलेले उपचार या सर्वासाठी रीटन इन्फॉम्र्ड, व्हॅलिड कन्सेण्ट (म्हणजे सर्व परिणाम समजावून, मग घेतलेली, ग्राह्य़ व लेखी संमती) आवश्यक असते.
बऱ्याच ठिकाणी ही संमती चार ओळींत घेतलेली दिसते. कधी कधी तर कोऱ्या फॉर्मवरच घेतलेली सहीसुद्धा दिसून येते. अशी संमती अयोग्य आणि कायदेबाह्य मानली जाते.
या लेखी संमतीचे काही वाक्यांश फार महत्त्वाचे आहेत. ‘‘मला समजणाऱ्या भाषेत’’, ‘‘समाधानकारकरीत्या’’, ‘‘स्वेच्छापूर्वक’’ आणि ‘‘ग्राह्य’’.
सर्व वैद्यकीय कागदपत्रे, दाखले, सल्ले, रुग्णालयातील लिखाण प्रामुख्याने इंग्रजीत असते. बरेच रुग्ण डॉक्टरांशी चर्चा करायला कचरतात, यात डॉक्टर नाराज होतील ही भीती असतेच. मग कुठचे तरी परभाषीय डॉक्टर आणि नर्स कधी कानावर न पडलेल्या विकारांची वैद्यकीय नावे सांगून समजणाऱ्या भाषेत आणि समाधानकारकरीत्या कसे समजावतील?
प्रत्येक रुग्णाला आपल्या सर्व (अगदी खुळे वाटणाऱ्यासुद्धा) प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवण्याचा अधिकार आहे, तसेच ती त्यांची जबाबदारीही आहे. एका अर्थी रुग्णांच्या शंकांचे समाधान डॉक्टरांसाठीसुद्धा फायदेकारक ठरते. कारण नंतर गरसमज, नाराजी वगरेंना जागाच उरत नाही. कोर्ट कचेरी, नुकसानभरपाईचे खटले टळतात.
थर्ड पार्टी कन्सेण्ट
म्हणजे रुग्णासाठी इतर व्यक्ती; लहान अजाण मुलांसाठी पालक, बेशुद्ध अथवा रुग्णांसाठी त्यांचे जवळचे नातेवाईक; अनाथ, एकटय़ा आणि शंकास्पद निर्णयक्षमता असलेल्या रुग्णांसाठी रुग्णालयातील अधिकारी; हॉस्टेलमधील/अनाथाश्रमातील अजाण मुलांसाठी व मतिमंद मुलांसाठी तेथील वॉर्डन; यांची सही घेतली जाते.
अठरा वर्षांखालील व्यक्ती संमतीसाठी अक्षम मानल्या जातात.
येथे एका अपवादाचा, म्हणजे पाश्चात्त्य देशांतील काही पुरोगामी पद्धतींचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. गुप्तरोगांच्या तपासण्या, त्यांचे निकाल, उपचार हे किशोरवयीन मुलांच्या पालकांपासूनसुद्धा गुप्त ठेवले जातात व फक्त त्या मुलांनाच कळवले जातात व त्यांचे समुपदेशन केले जाते.
जेव्हा शस्त्रक्रियेदरम्यान काही वेगळा विकार आढळतो किंवा काही गुंतागुंत निर्माण होते तेव्हा वाढीव शस्त्रक्रियेची गरज लागते; अशा वेळी डॉक्टर नातेवाईकांची परवानगी आणि सही घेतात. रुग्ण शुद्धीवर असेल तर त्याला किंवा तिला या गुंतागुंतीचे स्वरूप समजावले जाते.
नकाराची सही
अनेकदा असा प्रसंग येतो की, आम्ही गरोदर महिलेला काही गंभीर आजारासाठी रुग्णालयात दाखल व्हायचा सल्ला देतो आणि ती नकार देते. त्या वेळी अशा रुग्णांची लेखी नकारावर सही घेतली जाते. तेव्हा त्या महिला घाबरतात, त्यांना वाटते की आपल्याला पुढे वैद्यकीय उपचार नाकारले जातील. वस्तुस्थिती तशी नसते. उपचार हा जर एक करार असेल तर रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास तो करार मोडल्याचा आरोप डॉक्टरवर होऊ शकतो म्हणून डॉक्टर अशी सही घेतात. नंतरचे उपचार नाकारले जात नाहीत.
अतिवृद्ध किंवा मरणासन्न व्यक्तींवरील उपचार, शस्त्रक्रिया, अकाली जन्म होऊ घातलेल्या व वाचण्याची शक्यता नसलेल्या बाळासाठी शस्त्रक्रिया नाकारण्याची वेळ कधी तरी येते. मग डॉक्टर तशी नकारात्मक सही घेतात, हे निर्णय घेणे कठीण असते पण योग्य समुपदेशनाने यात मदत होऊ शकते.
संमतीपत्रक म्हणजे काय?
संमतीपत्रक हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील लेखी करार म्हणायला हरकत नाही. यावर स्थळ, तारीख, रुग्णालयाचे नाव, डॉक्टरांचे नाव, रुग्णाचे नाव, वय, कुठल्या विकारासाठी कुठची शस्त्रक्रिया केली जात आहे, रुग्णाला कुठच्या इतर विकारांमुळे वाढीव धोके संभवतात हे सर्व प्रादेशिक आणि इंग्रजी भाषेत नमूद केलेले असते. त्यावर रुग्ण किंवा कायदेसंमत पालक यांची सही किंवा आंगठा एका साक्षीदाराच्या देखत घेतले जातात. मग साक्षीदार आणि सही घेणारे डॉक्टर / नर्स सही करतात.
ही सही शस्त्रक्रियेच्या वेळी घेणे योग्य मानले जात नाही कारण त्या वेळी रुग्ण सारासार विचार करून होकार किंवा नकार देण्याच्या मन:स्थितीत नसतात.
भूल देण्यासाठी वेगळी संमती घेतली जाते.
शोधप्रबंध लिहिण्यासाठी, शस्त्रक्रियेचे किंवा विकारग्रस्त अवयवाचे छायाचित्र घेण्यासाठी संमती घेतली जाते. अशा वेळी ते छापताना रुग्णाची ओळख गुप्त ठेवणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आणि रुग्णाचा अधिकार आहे. डॉक्टरांकडे उपचार घेताना रुग्णांची काही खासगी माहिती सांगावी लागते. ती गोपनीय (गुप्त) राखण्यासाठी डॉक्टर बांधील असतात.
या माहितीच्या गोपनीयतेचा अधिकार कधी नाकारला जातो?
जर न्यायालयीन कामकाजासाठी ही माहिती देण्याचे आदेश असले तर ती द्यावी लागते. तसेच जर एखाद्या गुप्तरोगपीडित व्यक्तीमुळे इतर लोकांमध्ये गुप्तरोग पसरण्याची शक्यता असेल तर काही न्यायसंस्था त्या पीडित व्यक्तीला तो अधिकार नाकारतात. अमेरिकेसारख्या देशांत त्या व्यक्तीच्या साथीदाराला, पीडित व्यक्तीचा उल्लेख न करता, धोक्याची सूचना आणि तपासणीचा सल्ला दिला जातो. मानवाधिकारांचे एवढे संरक्षण आपल्याकडे कधी होईल कोण जाणे!
थोडक्यात सांगायचे तर रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टर या सर्वानी थोडा वेळ काढून आणि विचार करून आपले संमती देण्याचे, घेण्याचे कर्तव्य बजावले तर कठीण प्रसंग आणि निर्णयसुद्धा सुकर होतील.
(समाप्त)
संमतीपत्रक
एखाद्या शस्त्रक्रियेपूर्वी पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकाकडून डॉक्टर ज्या संमतीपत्रावर सह्य़ा घेतात, ते संमतीपत्रक म्हणजे काय? संमतीची प्रक्रिया कशी असते? रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांना काय अधिकार असतात? त्यांच्या जबाबदाऱ्या काय? डॉक्टरांची कर्तव्ये कोणती? अशी महत्त्वाची माहिती आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे.
आणखी वाचा
First published on: 22-12-2012 at 05:06 IST
मराठीतील सर्व आरोग्यम् बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surgery letter of consent