राजन गवस

‘पदर’ प्रकरण निर्माणच कोणी केलं असेल? असले भलतेसलते प्रश्न डोक्यात कायमचेच भिरभिरायला सुरुवात झाली. मग पुढं सुरू झालं- बाईच्याच साडीचा पदर का महत्त्वाचा? पदरात कुणी विणलं रीतीभातीचं तत्त्वज्ञान? बाई तुझ्या पदरात इस्तु बांधलाय. इस्तु विझता उपयोगाचा नाही, पदर पेटता उपयोगाचा नाही. सगळं सांभाळायचं बाईनंच. पुन्हा बाईनंच बाईच्या डोक्यात पदर भिनवायची जबाबदारी. काय थोर आपली व्यवस्था? पुरुष मात्र नामानिराळा.

suraj chavan will get new home by next diwali
सूरज चव्हाण ‘या’ दिवशी हक्काच्या घरात प्रवेश करणार! भर सभेत अजित पवारांनी दिला शब्द; म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Bigg Boss Marathi season 5 winner suraj Chavan speech at Ajit Pawar Baramati Sabha
Video: तोंड लपवत सूरज चव्हाणची अजित पवारांच्या बारामती सभेत एन्ट्री, एका मिनिटांचं केलं भाषण; म्हणाला, “दादांना झापूक झुपूक…”
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Snehal Tarde
“मी फार प्रेमात…”, लग्नात प्रवीण तरडेंकडे स्नेहल तरडेंनी मागितलेली ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “आयुष्यात कधीही…”
husband wife telling joke
हास्यतरंग : एक जोक…
dumper hit bike, Ratnagiri, Ratnagiri latest news,
रत्नागिरीत डंपरने दुचाकीला उडविले; दोघांचा जागीच मृत्यू
anupam kher kirron kher love story
घटस्फोटित अन् एका मुलाची आई असलेल्या किरण यांच्या प्रेमात पडले होते अनुपम खेर, ‘अशी’ झाली होती पहिली भेट

आमच्या शेजारच्या आजींचा नातू कायम तिच्या पदराला धरून गल्लीतून फिरत असतो. आजी थांबली त्याचं लोंबकळणं सुरू. आजी बसली, याचं मुटकुळं पदरातच लोळायला लागतं. पदराला कितीही हिसडे बसले, आजींची तक्रार नाही. उन्हात पदर पांघरून लुटुलुटु पळणारे पाय उन्हालाच लडिवाळपणे खेळवायला लागतात. उन्हं पदराभोवती रुंजी घालायला सुरुवात करतात. आजी आणि तिचा नातू समोरून चालले की, माझ्या डोळ्यांत पदराची साय पसरत जाते. हळूहळू आईचा पदर आणि त्या पदराच्या आडोशाला उभा असणारा मी. सगळं बालपणच डोळ्यासमोरून तरळत जायला सुरुवात होते. आईच्या अंगावर भरेवाडी भरड लुगडं. ती आयुष्यभर फक्त हिरव्या रंगाचंच लुगडं नेसत आली आहे. बाकी रंगांशी तिचं कधीच जुळलं नाही. आहेर-माहेरात अन्य रंगांचं लुगडं आलं तर ती तसंच ठेवून द्यायची. घरच्या कार्यक्रमात कुणालातरी आहेरात देऊन टाकायची. इतर रंगांशी तिची दुष्मनी होती अशातला भाग नाही. शेतात सूर्यफूल पेरलं. शेत पिवळंधम्मक झालं की, ती आनंदून बहरून जायची. मिरच्या पिकल्या आणि सगळं शेत लालभडक झालं की ती आतल्याआत सुखावून जायची. पण लुगडय़ाच्या बाबतीत मात्र हिरव्या रंगाशिवाय अन्य रंगाला थारा नाही. हातातली काकणं आणि लुगडं हिरवंच. त्यामुळे शेजारणी-पाजारणी तिला ‘हिरवी बाई’ म्हणून हाक घालतात. आईच्या या हिरव्या लुगडय़ाचे काठ मात्र विविध रंगांतले असायचे. तिच्या पदराच्या आड मी लपलेलो असायचो. पदरात स्वत:ला गुंडाळून घेत असताना आईच्या हातचा बेदम मारही खायला लागायचा. पण पदराच्या मुलायम स्पर्शापुढं आईचा बेदम मारही फिका पडत जायचा. आईचा पदर धरून आमची लटांबर सतत तिच्या मागं मागं असायची. सगळ्या बायका चिडवायच्या, ‘घोडा झालास, कधी आईचा पदर सोडणार?’ असा प्रश्नही करायच्या. पण माझं आपलं आईच्या पदरातच वावरणं सुरू असायचं. घागर घेऊन आई पाण्याला बाहेर पडली की, पदराचीच चुंबळ करायची. त्यावर घागर ऐटीत बसायची. घागरीच्या ठिकाणी मला बसव असा हट्ट धरला की दोन-चार रपाटे खायला लागायचे. कधी कधी शेताकडं जाताना डोक्यावरच्या बुट्टीत ती मला बसवून टाकायची. तिच्या कपाळावरचं भलं मोठं कुंकू घामानं ओघळायचं. आई पदरानंच तोंड निरपून घ्यायची. माझं तोंडही अलगद आपल्या पदरानं पुसून पुन्हा कामाला लागायची. कडाक्याच्या थंडीत आईच्या पदराआड लपलं की थंडी कुठल्या कुठं पळून जायची. आईच्या पदरात पडलेला मी तिच्या पदरासोबत वाढत असताना अचानक या पदराचीच भीती वाटायला लागली.

आम्हा भावंडांत सगळ्यात थोरली बहीण शेतात प्रचंड राबणारी. गुरंढोरं, कोंबडय़ा-शेरडं यांची सगळी उस्तवार अगदी जीव लावून करणारी. एकदा बहिणीला शेताकडून यायला उशीर झाला. आईचा जीव टांगणीला लागला. तिचं सारखं आतबाहेर सुरू. बहिणीला तिच्या मत्रिणी दारासमोर सोडून गेल्या. तिनं उंबऱ्याच्या आत पाय टाकला आणि आईने पिसुळीच्या काठीनं तिला बेदम बडवायला सुरुवात केली. काठीनं बेदम बडवताना तिचं आपलं एकच चाललेलं, ‘‘पदर आलेल्या पोरीनं एवढय़ा वेळ बाहीर थांबावं का?’’ आणि पुन्हा बडवणं सुरू. आई हे काय बडबडते कळायलाच मार्ग नव्हता. बहीण रडून रडून सरकदान. तिच्या हातापायावर पिसुळीच्या काठीचे वळ. मला सहन झालं नाही. आईच्या हातातली काठी हिसकावून मोडून टाकली. आईनं लाथाबुक्क्यांनी मलाच धू धू धुतला. पण मी काही रडलो नाही. आईच थकली. पुन्हा बडबडत बसली. ‘‘पदर आलेल्या पोरीनं अंधार पडायच्या आधी घरात यावं, रीतीनं वागावं.’’ असं बरंच काही. सगळं शांत होईपर्यंत आमचं मुटकुळं भिंतीला टेकलं. आई चुलीसमोर बसून भाकरीला पीठ मळायला लागली. एकूण चेहऱ्यावरनं सगळं विसरली असं वाटत होतं. म्हणून आमचं मुटकुळं घसटत घसटत आईच्या पदराजवळ सरकलं. आईला वाटलं मला भूक लागली. तर मी म्हटलं, ‘‘आई पदर कसा येतो गं?’’ आईनं पिठाच्या हातानं एक सणसणीत थोबाडात लगावली. भिरंभिटीच फुटली. आईचा हात एवढा कधी वाईट लागला नव्हता. आमचं मुटकुळं भेलकांडतच भिंतीवर आपटलं. त्यानंतर पुन्हा कधी आईला त्याविषयी विचारलं नाही. पण कळत गेलं सगळं हळूहळू. आणि ‘पदर’ हा शब्दच डोक्यात घुसत गेला खोल. आईच्या लुगडय़ाचा मऊशार हळुवार पदर आणि पदराचंच नंतर बदलत गेलेलं रूप. बहीण साडी नेसायला लागली. तर आई तिला दरडावून सांगायची, ‘‘अंगभर पदर काढ.’’ मग बहीण लांबलचक अंगभर पदर काढायची. ‘कशाला हवा हा लांबलचक पदर?’ मनात हळूहळू प्रश्न घर करायचा. पण विचारायचं कुणाला? आई डोक्यावर पदर कसा घ्यावा हे बहिणीला प्रात्यक्षिकच करून दाखवायची. ‘‘आपल्या घरात असा पदर घ्यायचा असतो.’’ मग पुन्हा मनात प्रश्न, घराचा आणि पदराचा संबंधच काय? आपोआपच गावातील कोण बाई कसा पदर घेते याचे आमचे संशोधन सुरू झाले. आणि ‘पदर’ या भानगडीनं आमचं डोकं चक्रावून टाकायला सुरुवात केली. ही ‘पदर’ नावाची गोष्ट काही सरळ नाही याचेच सगळे अनुभव. त्यामुळं ‘पदर’ या गोष्टीला घाबरू लागलो. सगळ्याच बायका नेसतात साडी. पण अमकीचा पदर असा आणि तमकीचा पदर तसा हे काय गोमच्याळ? कशाला पडा त्या फंदात म्हणून डोक्यातून विषयच काढून टाकायचा ठरवलं. काही दिवस डोक्यातून हा पदर बाजूला पडला. पण बहिणीमुळंच हा ‘पदर’ पुन्हा जोरात डोक्यात घुसला. झालं असं, बहिणीला स्थळं बघायला सुरुवात झाली. पाहुण्यापतली सगळी मंडळी कामाला लागली. कोणी कोणी स्थळं सुचवायचं. पण घरात पहिली चर्चा- पदर जुळतोय काय? ही नवीनच भानगड. आता हे पदर जुळणं प्रकरण काय? विचारायचं तरी कोणाला? तरी धाडस करून भावकीतल्या माझ्याच वयाच्या पोरांना चाचपून बघितलं. तर तीही माझ्यासारखीच कोरी करकरीत. मग सगळ्यांचा शोध सुरू. तर वेगळंच समोर आलं. पाहुण्यापत आलेलं स्थळ बसतं की नाही याचं संक्षिप्त रूप म्हणजे पदर जुळतो का? म्हणजे पुन्हा नवीनच गुंता. आता हे पदरावरून पदर जुळणं, भारीच भंपक प्रकरण. पण त्यात सगळी मंडळी भलतीच आग्रही. सगळीकडं निरोप धाडून चौकशी. चौकशीची पुन्हा चौकशी. वाईट चिकित्सक असतात लोक. थोडं कुठं जुळत आलं की, लगेच कोण तरी नवा शोध लावून यायचाच. पदर जुळत नाही. या पदर प्रकरणानं माझं डोकं भयंकरच खायला सुरुवात केली. त्यात बहिणीचं लग्न मोडणारे भावकीत होतेच. त्यामुळे पदरानं उरलीसुरली मनातली जागा गमावायला सुरुवात केली. हे ‘पदर’ प्रकरण निर्माणच कोणी केलं असेल? असले भलतेसलते प्रश्न डोक्यात कायमचेच भिरभिरायला सुरुवात झाली. मग पुढं सुरू झालं- बाईच्याच साडीचा पदर का महत्त्वाचा? बाईच्या भोवतीच का गुंडाळला गेलाय पदर? पदरात कुणी विणलं रीतीभातीचं तत्त्वज्ञान? पुरुषाच्या धोतराला काठ आणि बाईच्या लुगडय़ाला पदर. कोणाच्या डोक्यात पहिल्यांदा उगवली असेल ही कल्पना? कोणी पसरवलं असेल हे पदराचं तत्त्वज्ञान? काय घडवलं-बिघडवलं या पदरानं? पदरच विभागतो माणसाला जातीजातीत. प्रत्येक जातीतही पुन्हा असते पदराचेच साम्राज्य. हे सांगणार, रुजवणारे लोक कोण? कोणी पसरवलं हे पदराचं तत्त्वज्ञान? आणि बायका एवढं का सांभाळतात या पदराला? असल्या बेसुमार प्रश्नांनी डोक्याचा भुगा केला. पदर डोक्यावरनं खाली पडणं म्हणजे कुळाला बट्टा. पदराचा आणि कुळीचा संबंध काय? किती खुळचट जगत आलेत आपले लोक? कापाड आणि माकाड फाटून जाणार. असं हेच लोक बोलतात. आणि पदरात जगण्याची रीत गुंतवतात. पदरात कसला आलाय थोरपणा? हे प्रश्नच कोणाला महत्त्वाचे का वाटत नाहीत? जनाईने घातला होता एकदा पदराला हात. पण पुढं पदर कोणीच का नाही घेतला केंद्रभागी? असलं काय काय सुरू होता होता बाईचीच अगतिकता मनात घर करायला लागली. बाई तुझ्या पदरात इस्तु बांधलाय. इस्तु विझता उपयोगाचा नाही, पदर पेटता उपयोगाचा नाही. सगळं सांभाळायचं बाईनंच. पुन्हा बाईनंच बाईच्या डोक्यात पदर भिनवायची जबाबदारी. काय थोर आपली व्यवस्था? पुरुष मात्र नामानिराळा.

‘पदर सांभाळायचा कसा? विश्लेषित करायचा कसा? पदर नाकारायचा कसा?’ असलं काय काय डोक्यात चालू असतानाच मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करणारी आमची कन्या चुडीदारमध्ये समोर आली. अरे वा, या पिढीने नाकारला की बदल. पण पुन्हा जिवाचा थरकाप झाला. तिचं आयुष्य कोणी पदरात बंदिस्त तर करून टाकणार नाही ना? अंगाचं पाणी पाणी. मेंदूचा चुराडा. एकूण ‘पदर’ ही भानगडच भयंकर. शोधतील उद्याच्या पोरी यातूनही नवी वाट. एवढंच म्हणणं आपल्या हातात.

chaturang@expressindia.com