राजन गवस rajan.gavas@gmail.com

विद्यार्थिदशेपासून वेगवेगळ्या चळवळींत असणारे राजन गवस मोच्रे, आंदोलने, परिषदा यामध्ये अगदी जाजम उचलणे, बॅनर रंगवणे, रात्ररात्र फिरून माणसांना हाक्या घालणे असे कैक उद्योग करून आजच्या मुक्कामावर पोहोचले आहेत. आज पाठीमागे वळून पाहिल्यास या आंदोलने, परिषद, मोर्चे यातून जे काही घडले त्यातून आजचं वर्तमान कसं दिसतं आहे याचा शोध घेणारे, आजच्या वर्तमानाची गुंतागुंत आणि उकल मांडणारे हे सदर दर पंधरवडय़ाने..

In Diwali Uncle burst fire crackers on his head viral video on social media
“काका ऑन फायर”, फटाका पेटवला अन् चक्क डोक्यावरच ठेवला, काकांबरोबर पुढे काय घडलं? पाहा VIDEO
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Steering Committee Approves Maharashtra Revised Curriculum with CBSE Influence
लेख : देशांतर्गत वसाहतीकरणाचा ‘आराखडा’!
objective of implementing the mgnrega
लेख : ‘मनरेगा’च्या मूळ हेतूंकडे दुर्लक्ष नको!
warora assembly constituency
वरोरा विधानसभा मतदारसंघ : काँग्रेसला अंतर्गत संघर्षाचा फटका बसणार? कशी आहे या मतदारसंघाची सद्यस्थिती?
book The only person you are destined to become is the person you decide to be
क्षमताविकासाचे सूत्र
Loksatta anyartha Confusion in MPSC Result MPSC Affected Maharashtra State Public Service Commission Exam Recruitment
अन्यथा: तात्यांचा ठोकळा…!
swara bhasker fahad ahmad trolled
स्वरा भास्करच्या नवऱ्यानं सुप्रिया सुळेंसाठी छत्री धरली; सोशल मीडियावर नवरा-बायको दोघंही ट्रोल

राजन गवस हे एम.ए., एम.एड., पीएच.डी. असून त्यांनी भाऊ  पाध्ये यांच्या साहित्यावर संशोधन केले आहे. ते शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाविद्यालयीन काळातच ते कथा, कविता लिहीत होते. १९८२ मध्ये ‘उचकी’ ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी ‘हुंदका’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यत: कथा-कादंबरी लेखनाचा झाला. ‘चौडक’, ‘भंडारभोग’, ‘कळप’ ‘ब,बळीचा’ या कादंबऱ्यांनी विषयाचे वेगळेपण जपले. उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते. राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत. त्यांना ‘तणकट’ पुस्तकासाठी २००१ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे. विविध चळवळीतील त्यांचा सक्रिय सहभाग विशेष महत्त्वाचा आहे.

वर्तमानाबद्दल बोलताना माहिती-तंत्रज्ञानातील क्रांती आणि ज्ञानाचा विस्फोट हे दोन शब्द सातत्याने कानावर आदळत असतात. अशातच जगाचे रूपांतर ग्लोबल खेडय़ात झाल्याचे सगळे जणच सांगत आहेत. दर क्षणाला नवे काही आपल्या जगण्यात येऊन आदळते आणि आपल्या जगण्याच्या धारणाच बदलून जातात. क्षणापाठीमागची गोष्ट क्षणानंतर कालबाह्य़ होत असतानाच्या या काळात व्यक्ती-समूह, कुटुंब-समाज, नाती-गोतावळा यांचे आंतरसंबंधही विस्कटून विखुरले जात आहेत. अशा काळाचे मापन एकच एक दृष्टिकोन अथवा एकच एक फूटपट्टी घेऊन करता येईल, असे दिसत नाही.

असा काळ चिमटीत पकडणे किंवा त्यावर भाष्य करणे केवळ अशक्य झालेले असल्यामुळे सर्वत्र फक्त संभ्रमाचे बुडबुडे अकल्पितपणे उगवताना दिसताहेत. अशा काळात ठाम विधान करणारा क्षण दर क्षणाला हास्यास्पद बनून संशयाच्या भोवऱ्यात अडकला किंवा अडकवला जाण्याची शक्यता अधिक आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, वर्तमान तर विद्रूपतेची परिसीमा गाठत विदूषकी वळणावर येऊन ठेपले आहे. अशा काळात ज्ञानी लोक गांगरून गेले आहेत किंवा गांगरलेपणाचा बुरखा पांघरून बसलेले आहेत हे कळायला मार्ग नाही. शब्द भोवंडून जावेत किंवा शब्दांना भोवळ यावी असे या वर्तमानाने पेरले आहे तरी काय? याचा शोध घ्यायला काय हरकत आहे; पण हा शोध घेतानाही आपण निसरडय़ा वाटेवरून चाललो आहोत याचे भान बाळगायलाच हवे. कारण वाटा, वाटा उरू नयेत फक्त चकव्यांचे जंजाळ, माणसांचे चेहरे हरवलेले बेसुमार मांसल जंगल. प्रदूषित हवेचे क्षितिजव्याप्त कुंपण आणि पाण्याने शेवटच्या घटका मोजण्याचे हे वर्तमान. जंगलात पशुपक्ष्यांची घटती संख्या, गिधाडांचे नामशेष होत जाणे आणि मनुष्यमात्रातील पशुवृत्तीच्या गिधाडी आकांक्षांचा हा काळ. कोण कोणास संपवण्यासाठी चाल करून येत आहे? कोण कोणास गिळंकृत करते आहे? हे स्पष्ट समोर दिसत असताना शोधाचेच मृगजळ व्हावे आणि शोधक हतबल होऊन गलितगात्र अवस्थेत लुळा-पांगळा होऊन पडावा अशी जीवघेणी स्थिती. या साऱ्याला किमान शब्दाचा स्पर्श घडावा म्हणून एक दिशाहीन प्रयत्न करायला काय हरकत आहे? कदाचित मला जे जाणवते आहे तेच दुसऱ्याला वेगळेही जाणवत असेल. त्यांच्या दृष्टीने वर्तमान अतिशय गोंडस आणि आश्वासकही असू शकेल. त्यांचे ते म्हणणे त्यांच्या दृष्टीने योग्यही असू शकेल. माझ्या आस्थेच्या उजेडात मला मात्र ते तसे दिसत नाही ही माझी मर्यादा.

मराठी समूहाचे समग्र वर्तमान तर भलत्याच खाचखळग्यांनी आज भरून गेले आहे. या समूहाचा मराठी चेहरा गलितगात्र होऊन सुरकुतलेला दाखवण्यात काहींना धन्यता वाटते आहे. मराठी समूहाचा बाळसेदार चेहरा काहींच्या अप्रूपाचा भाग बनत आहे, तर कोणास मराठी समूहाच्या पुरोगामीपणाचे थोर अप्रूप वाटून त्यांचे ऊर अभिमानाने भरून येत आहेत. उद्योगात क्रांती, शेतीत क्रांती, शिक्षणात क्रांती, सगळीकडे क्रांतीच क्रांती वावरत असताना क्रांती या शब्दाचा मूळ अर्थच लंपास करून त्याला वेशीवर टांगले जात आहे. अशा वेळी कोणीही मराठी समूहाच्या व्याधींची चिकित्सा करायला तयार नाही. चिकित्सेची भली थोरली परंपरा आपल्याला असताना अशा परंपरेचे आपल्याला विस्मरण झाले आहे की आपण जाणीवपूर्वक त्याकडे पाठ फिरवली आहे, हेही शोधण्याचे धीट प्रयत्न अत्यल्प स्वरूपातच होत आहेत. कधी नव्हे इतका वैचारिक गारठा आपल्याला घेरून बसला आहे.

मराठी समूह आज ज्या वर्तमानात जगतो आहे, त्याचा एकरेषीय शोध घेता येईल का? घेतल्यास तो योग्य ठरेल का? असे प्रश्न कळीचे तर बनतातच, पण त्याबरोबरच ते घाबरवून टाकणारेही आहेत. हा संपूर्ण समूह कधी नव्हे इतका उथळ, भावविवश दिसू लागण्याची कारणे काय आहेत? हे आज शोधणे ही आपली जबाबदारी आहे. क्षण दर क्षणाला या समूहात उठणारी वादळे, भडकणाऱ्या भावना आणि घोंघावणाऱ्या, गरगरून टाकणाऱ्या, विद्रूप विचित्र घटना संपूर्ण समाजमानस ढवळून काढताहेत. अशा काळात समाजमाध्यमातून, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चाललेल्या थयथयाटाला संपूर्ण मराठी समूहाचे भान तरी आहे का? हे शोधणे जिकिरीचे बनले आहे. मराठी समूह असा जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेल्या सामान्य शोषित-पीडित माणसाला या परिघाच्या मध्यवर्ती घ्यायला हवे. हा शोषित-पीडित समूह वगळून मराठी समूह अस्तित्वातच येऊ शकत नाही; पण आज यांना वगळूनच मराठी समूह असा शब्द वापरण्याची पारंपरिक रीतच अनुसरली जाते आहे. त्यामुळे आपोआपच संख्येने प्रचंड असणारा हा समूह मराठी समूहाच्या परिघाच्या बाहेरच चर्चाविश्वाने ठेवल्याचे ठळकपणे जाणवते आहे.

मराठी समूह आज एकाच वेळी अनेक काळांत जगतो आहे. कोणी मूठभर लोक एकविसाव्या-बाविसाव्या शतकाच्या उंबरठय़ात आहेत. तर कोणी विसाव्या शतकाच्या मध्यावरही पोहोचलेले नाहीत. काही जण पंधराव्या-सोळाव्या शतकाच्या धारणा, प्रथा-परंपरा घेऊन तलवारीला धार लावण्याच्या नादात आहेत, तर कोणी भाकरीच्या शोधात अकराव्या-बाराव्या शतकातच अडकून पडलेले आहेत. कोणाला संपत्तीच्या महापुरात सर्वत्र झगमगाट दिसतो आहे, तर कोणाला कालबाह्य़ होत चाललेला रुपया अजूनही गाडीच्या चाकाएवढा दिसतो आहे. अशा कैक शतकांत विभागलेल्या समूहाला एकाच तराजूत तोलणे आणि त्यावर भाष्य करणे म्हणजे आपलेच अडाणीपण जाहीर करण्यासारखे आहे.

मराठी समूहात नागर-अनागर अशी विभागणी करायला अभ्यासक आज तयार नाहीत. त्यांच्या मते महाराष्ट्रात खेडे, गावगाडा उरलेलाच नाही. संपूर्ण महाराष्ट्राचे नागरीकरण झाले असून नागर-अनागर अशा सीमारेषा पुसून गेलेल्या आहेत. त्यांनी कोणते खेडे, गावगाडा वाचलेला आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. मराठी समूहातल्या खेडय़ाचे वास्तव हेसुद्धा वेगवेगळय़ा काळांत पसरलेले वास्तव आहे. महानगराशेजारची खेडी, नगराशेजारची खेडी, निम्न शहराजवळपासची खेडी, महामार्गाजवळची खेडी आणि जिथे रस्ताच पोहोचलेला नाही अशी खेडी वेगवेगळ्या वर्तमानांत जगताहेत. काही ठिकाणच्या उपजाऊ जमिनी हातोहात लंपास केल्या जात आहेत, तर काही ठिकाणी रासायनिक खते आणि कीटकनाशकांनी मातीलाच बकाल केले आहे. एकीकडे विकासाचे झगमगीत विश्व, तर दुसरीकडे बकाल, ढासळलेल्या घराच्या िभती. कोण औषधांना महाग तर कोण अजूनही पारंपरिक गावकीच्या शोधात. एकाच गावात दोन गावांची निर्मिती असे हे खेडय़ाचे वर्तमान. कधीकाळी मराठी समूहात समतेच्या, जातिअंताच्या विविध चळवळी जन्म पावल्या. शिक्षण गोरगरिबांच्या चुलीपर्यंत पोहोचवण्याच्या निर्धाराने विविध अभियानांचा जन्म झाला. त्या मराठी समूहातील जातवास्तव, आरोग्यवास्तव, शिक्षणवास्तव आज काय आहे हे शोधण्याची कधी नव्हे इतकी निकड निर्माण झाली आहे.

स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. सत्तर-ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात अनेक चळवळी निर्माण झाल्या. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढे उभे केले गेले. जातिअंताच्या चळवळी याच काळात अधिक जोमाने कार्यरत झाल्या. धरणग्रस्तांचे लढे, शेतकरी, शेतमजुरांचे लढे जिद्दीने लढवले गेले. देवदासी, बेरड, रामोशी, माकडवाले अशा परंपरेने बहिष्कृत केलेल्या लोकांना आत्मभान देण्यासाठी प्रयत्न केले गेले. सामान्य माणसांच्या मनात असणारी भुताखेतांची भीती घालवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. यातूनच मराठी समूह कात टाकून नव्याने उभारी घेईल असे चित्र निर्माण झाले होते. यातील असंख्य लढय़ांची नोंद आपण करू शकलो नाही. या लढय़ांचे पुढे झाले काय? ज्या प्रश्नासाठी, ज्या माणसांसाठी लढे उभे केले गेले त्यांचे आजचे वर्तमान काय? या साऱ्याचा शोध घेतला गेला पाहिजे, कारण या साऱ्यातून बळ घेऊन जे बाहेर पडले त्यांनी परत फिरून आपल्या पाठीमागच्या लोकांना किती हात दिला हे शोधू गेल्यास वेगळेच वर्तमान आपल्यासमोर येण्याची शक्यता आहे. शेतीभातीच्या बाबत आज वेगवेगळे आवाज उमटताना दिसत आहेत. हे सारे आवाज कोणत्या शेतकऱ्यांबाबत बोलत आहेत? यात भूमिहीन, अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्याला किंचितशी तरी जागा आहे का? उपजाऊ जमीन संपत चालली असताना मातीचे कण्हणे कोणाला ऐकू येते आहे का? खेडय़ापाडय़ातही ओंजळभर पाणी शुद्ध मिळू नये? अशा वेळी पशुपक्षी, प्राणी, किडा-मुंगी यांनी जगावे तरी कसे? जंगलातून वाघ, गवे, हत्ती माणसांच्या वस्तीवर चाल करून येत आहेत. याविषयी कोणीच काही बोलायला तयार नाही. अशा वेळी सह्य़ाद्रीचे महाकाय डोंगर गुपचूप घशात घालण्याचे काम राजरोसपणे चालले आहे. खेडय़ांचे जगणे अशा अनेक प्रश्नांनी भयव्याकूळ बनले आहे. कधी काळी या प्रश्नाबाबत मराठी समूहात संवेदनशीलता होती. ही संवेदना अचानक गारठून कशी गेली? हेही शोधणे कधी नव्हे इतके गरजेचे बनले आहे.

कधी काळी विद्यार्थिदशेपासून वेगवेगळ्या चळवळींचा मी सहप्रवासी होतो. मोच्रे, आंदोलने, परिषदा यामध्ये जाजम उचलणे, बॅनर रंगवणे, रात्ररात्र फिरून माणसांना हाक्या घालणे असे कैक उद्योग करून आजच्या मुक्कामावर आल्यावर पाठीमागे वळून पाहिल्यास काय दिसते याचा शोध घेणे माझे मलाच गरजेचे वाटू लागले आहे. यातून मनात घुसमटीला कुठे तरी मूस फुटेल म्हणून कधी तरी आपल्यासारख्यांना भेटून मन मोकळे करावे या इराद्याने तुम्हास भेटण्याचे ठरवले आहे. संवाद जुळलाच तर सतत भेटत राहू. विसंवाद वाढला तर मधेच आपल्या वाटा वेगवेगळ्या असण्याची शक्यताही मनाशी बाळगू. सुरुवातीला इतकेच.

chaturang@expressindia.com