आज आपल्याला एकच ‘वाद’ वा तत्त्व समजून घेतले पाहिजे. ते म्हणजे आत्म्याविषयीचे अपूर्व तत्त्व होय- आत्म्याच्या अनंत शक्तीचे, अनंत सामर्थ्यांचे, अनंत पावित्र्याचे आणि अनंत पूर्णतेचे तत्त्व होय. मला, अपत्य असते तर त्याच्या जन्मापासून मी त्याला हे सांगितले असते की, ‘त्वमसि निरंजन:’- ‘तू ते शुद्ध आत्मतत्त्व आहेस.’ तू शुद्ध, निर्मल, निष्पाप, शक्तिशाली आणि महान असे आत्मतत्त्व आहेस. आपण मोठे आहोत अशी भावना ठेवा म्हणजे तुम्ही मोठे व्हाल.
‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’- ‘उठा, जागे व्हा, व ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका.’ उठा, जागे व्हा, कारण हीच शुभ वेळ आहे. सध्या आपल्यासाठी सर्व गोष्टी अनुकूल आहेत. धीट व्हा, भिऊ नका. केवळ आपल्याच धर्मग्रंथांत ईश्वराला ‘अभी: अभी:’ असे विशेषण लावण्यात आले आहे. आपल्याला अभी: – निर्भय – झाले पाहिजे, म्हणजे आपले काम पूर्ण होईल. उठा, जागे व्हा, कारण आपल्या देशाला अशा मोठय़ा त्यागाची जरुरी आहे. तरुण लोकच तो करू शकतील. ‘तरुण, उत्साही, शक्तिमान, सुदृढ, बुद्धिमान’ अशांचे हे कार्य आहे.
माणूसच तर पैसा निर्माण करतो ना? पैशांनी माणसे निर्माण झाल्याचे का कधी कुठे ऐकलेत? तुम्ही जर आपले मन आणि मुख एक करू शकाल, बोलल्यासारखे वागू शकाल तर पैसा तुमच्या पायाशी पाण्यासारखा वाहत येईल.
पुढे काय होणार या विचारानेच जे हैराण होतात त्यांच्या हातून काहीही कार्य होणे शक्य नाही. जे सत्य म्हणून उमगले ते तात्काळ कृतीत उतरावयास हवे. पुढे काय होणार या विचारांची गरजच काय? दो घडींचे तर हे जीवन, त्यातच जर नफा-नुकसानीचा हिशोब करीत बसलो तर काही साधता येणे शक्य नाही. फलाफल देण्याचा एकमात्र अधिकारी भगवान. त्याला वाटेल ते तो करील. त्यासाठी डोके तापविण्याचे तुम्हाला काय कारण? तिकडे नजर न देता तुम्हाला जे करावयाचे आहे ते करा.
आज आपल्या देशाला जर कशाची गरज असेल, तर ती म्हणजे लोखंडी स्नायूंची व पोलादी मज्जातंतूंची होय; आज आपल्या देशाला गरज आहे अशा दुर्दम्य इच्छाशक्तीची की जी विश्वाची गूढ रहस्ये उकलील आणि जरूर पडल्यास महासागराच्या देखील तळाशी जाऊन व प्रत्यक्ष मृत्यूला तोंड देऊन आपले उद्दिष्ट साध्य करून घेईल.
आपल्या प्रत्येक पानापानातून ही उपनिषदे सामर्थ्यांचा संदेश देत असलेली मला दिसत आहेत. ही एक मोठी ध्यानी घेण्यासारखी गोष्ट आहे; मला जीवनात मिळालेला हा मोठा उपदेश आहे; उपनिषदे सांगतात, ‘हे मानवा, सामथ्र्यसंपन्न हो, दुर्बल राहू नकोस.’ यावर मनुष्य म्हणेल, ‘मानवाच्या ठायी दुर्बलता नसते काय?’ उपनिषदे म्हणतात, मानवाच्या ठायी दुर्बलता असते खरी, पण ती अधिक दौर्बल्याने दूर होईल काय? घाणीने घाण स्वच्छ होईल काय? पापाने पाप नाहीसे करता येईल काय? दुर्बलतेने दुर्बलता जाईल काय? म्हणून हे मानवा, सामथ्र्य मिळव, उठून उभा राहा व बलवान हो. जगात हे एकच वाङ्मय आहे की ज्यात तुम्हाला ‘अभी:’ (भयशून्य) हा शब्द अनेकदा योजलेला आढळेल. जगातील अन्य कोणत्याही धर्मग्रंथात हे विशेषण ईश्वराला किंवा मानवाला लावलेले दिसून येणार नाही.
अंत:करणापासून मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमच्या हृदयात जगन्माता महाशक्तीच्या रूपाने निवास करो. ‘अभयं प्रतिष्ठाम्’- निर्भयता हाच खरा आधार आहे. ती जगन्माता तुम्हा सर्वाना निर्भय करो. जो स्वत:ची फाजील काळजी घेतो तो पदोपदी संकटात पडतो; आदर व मान नाहीसा होईल म्हणून जो सतत भीत असतो त्याच्या वाटय़ाला नेहमी अपमानच येतो; आणि ज्याला आपला तोटा होण्याची सतत भीती वाटते त्याचा नेहमी तोटा होतो, हे मी जगात पाहिले आहे. ..तुम्हा सर्वाचे सर्वप्रकारे कल्याण होवो.
कार्य करा! धीर धरा! वीर बना! कसलेही आणि कोणतेही साहस करायला तयार व्हा!
हृदय विशाल करा- प्रथमत: हृदयाची तळमळ हवी. बुद्धी वा तर्क यात काय आहे? तर्क आपल्याला किंचित पुढे घेऊन जातो व नंतर त्याची गती कुंठित होते. परंतु हृदयातूनच स्फूर्ती मिळते. प्रेम हे अशक्य गोष्टींना शक्य करते; जगातील सर्व रहस्ये प्रेमाने उलगडतात.
म्हणून माझ्या भावी सुधारक मित्रांनो, भावी देशभक्तांनो, तुमच्या हृदयात तळमळ असू द्या. तुमच्या हृदयात तळमळ आहे काय? देवतांचे व ऋषींचे लाखो वंशज आज पशुतुल्य बनले आहेत हे बघून तुमच्या हृदयाला पीळ पडतो काय? कोटय़वधी लोक आज भुकेने तडफडत आहेत; नव्हे, शेकडो वर्षांपासून ते तसे तडफडत आहेत हे पाहून तुमच्या हृदयाला घरे पडतात काय? आपला देश अज्ञानाच्या काळ्याकुट्ट मेघांनी झाकोळून गेला आहे हे बघून तुमचे हृदय पिळवटून निघते काय? त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात काय?
तुमचे हृदय, तुमच्या आशाआकांक्षा खूप विशाल बनू द्या, सारे जग व्यापू द्या त्यांना.
मला धर्मवेडय़ा माणसाची उत्कटता व जडवाद्याची व्यापकता या दोन्ही हव्या आहेत. आपले हृदय महासागराप्रमाणे सखोल व आकाशाप्रमाणे व्यापक असले पाहिजे.
शक्तीबिक्ती काय, कुणी कुणाला देत असतो? ती तर आहे, तुमच्या आतच आहे अन् वेळ आली की ती आपोआप बाहेर येईल. तुम्ही फक्त कामाला सुरुवात करा आधी. मग पाहाल, इतकी शक्ती तुमच्यात येईल की ती सावरता सावरली जाणार नाही तुम्हाला. दुसऱ्यांसाठी एवढेसे जरी काम केले तरी ती आतली शक्ती जागृत होते, दुसऱ्याबद्दल थोडा जरी विचार केला तरी हृदयात सिंहबळाचा संचार होतो.
फार दिवसांपासून अन्य लोक तुम्हाला सांगत आले आहेत की, ‘तुम्ही दीन आहात, कसलीच ताकद नाही तुमच्यात, तुम्ही दुबळे.’ आणि ते ऐकून आज हजार वर्षे होत आलीत, तुम्हालाही वाटू लागले आहे की, ‘आम्ही हीन आहोत- सर्व बाबतीत अगदी नादान आहोत.’ तीच भावना सतत उराशी बाळगल्याने आज झालाही आहात तसेच (स्वत:कडे बोट दाखवून). हा माझाही देह घडला आहे तुमच्याच देशाच्या मातीने ना? पण तसले विचार कधी चुकूनही माझ्या मनात आले नाहीत व यामुळेच ना त्या भगवंताच्या दयेने, जे सदान्कदा आम्हाला तुच्छ समजतात त्यांनीच मला देवतुल्य मानले व आजही मानतात. तुम्ही देखील ‘आपल्यात अनंत शक्ती वसत आहे, अपरंपार ज्ञान साठविले आहे, अदम्य उत्साह रसरसतो आहे,’ असे चिंतन कराल आणि त्याबरोबरच जर या अंत:स्थ शक्तीला जागे करू शकाल तर तुम्हीही माझ्यासारखे व्हाल.
जेवढे शक्य असेल तेवढे तरी आधी कर ना आणि पैसा नसेल तर नको देऊ, पण चार गोड गोष्टी तर बोल, दोन प्रेमळ उपदेशाचे शब्द तर सांग त्यांना. का यालाही तुला पैसा वेचावा लागणार आहे? वत्सांनो, कामाला लागा, कामाला लागा! कामातील कठीण भाग आता पुष्कळसा सोपा झाला आहे. म्हणून प्रतिवर्षी त्याची प्रगती होत राहील.. आतापर्यंत तुम्ही कार्याची एवढी प्रगती केली याबद्दल आनंद वाटू द्या. जेव्हा मन उदास होईल तेव्हा मागील वर्षी तुम्ही केवढे कार्य केले त्याचा विचार करा. आपल्याजवळ काहीही नव्हते अशा अवस्थेपासून आपण सुरुवात केली आणि वर आलो; आता साऱ्या जगाचे डोळे आपल्याकडे लागले आहेत. केवळ भारतच नव्हे, तर समस्त जग आपल्याकडून मोठमोठय़ा गोष्टींची अपेक्षा करीत आहे.
तुम्ही सच्चा दिलाचे आहात काय? मरण आले तरी तुम्ही नि:स्वार्थ राहू शकता काय? तुमचे हृदय प्रेमाने भरले आहे काय? जर असे असेल तर तुम्ही कुणालाही, एवढेच नव्हे तर मृत्यूलाही भिण्याचे कारण नाही. वत्सांनो, पुढे चला! साऱ्या जगताला ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. हा प्रकाश मिळविण्यासाठी ते मोठय़ा उत्सुकतेने आपल्याकडे पाहात आहे. केवळ भारतापाशीच हा ज्ञानाचा प्रकाश आहे. तो इंद्रजाल, जादू व भोंदूगिरी यांमध्ये नसून धर्माच्या खऱ्या स्वरूपासंबंधीच्या -सर्वोच्च आध्यात्मिक सत्यांच्या- महान उपदेशात तो सामावलेला आहे. जगाला हा प्रकाश देण्यासाठीच प्रभूने या जातीला अनेक आपत्तींमधून वाचवून आत्तापर्यंत जिवंत ठेविले आहे. आता हा प्रकाश देण्याची वेळ आली आहे. हे वीर युवकांनो, विश्वास असू द्या, की तुम्ही सर्व जण महान कार्ये करण्यासाठी जन्माला आला आहात. कुत्र्यांच्या भुंकण्याने भयभीत होऊ नका- एवढेच नव्हे, तर आकाशातून वज्रपात जरी झाला तरी भिऊ नका. उठा, उठा, कामाला लागा.
उत्साहाने हृदय भरून घेऊन चारही दिशांना पसरा. काम करा, काम करा. नेतृत्व करीत असताही सेवक बना. नि:स्वार्थ व्हा आणि एखादा मित्र अन्य एखाद्या मित्राची त्याच्या पाठीमागे तुमच्यापाशी निंदा करू लागला तर ती कधीच ऐकू नका. अनंत धीर असू द्या- मग यश तुमचे आहे हे निश्चित. ..कोणत्याही प्रकारचा दांभिकपणा, फसवेगिरी व दुष्टावा आपल्यात असता कामा नये. ..छक्केपंजे, अनीती यांचा स्पर्शदेखील नको. गुप्त भामटेगिरी, गुप्त बदमाशी असले काहीही आपल्यात नको -कानाकोपऱ्यात बसून गुप्तपणे काहीही करायला नको. ‘माझ्यावर गुरूची विशेष कृपा आहे,’ असा दावा कुणीही करता कामा नये. एवढेच नव्हे तर आमच्यामध्ये कुणी गुरूदेखील न राहो. माझ्या साहसी मुलांनो, सतत पुढे चला; पैसा असो नसो, माणसे असोत नसोत; सर्वदा पुढे जात राहा. तुमचे हृदय प्रेमभावनेने ओथंबले आहे काय? भगवंतावर तुमची श्रद्धा आहे काय? याच गोष्टी असल्या की पुरे. थेटपर्यंत पुढे व्हा, तुम्हाला रोधण्याची मग कुणाचीही हिंमत नाही.. नेहमी सावध राहा. जे जे म्हणून असत्य असेल ते कटाक्षाने टाळा; सत्याची कास कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. अशाने उशिरा का होईना, पण यश आपले आहे हे निश्चित समजा.. फक्त एकटय़ा आपल्यावरच साऱ्या कार्याची मदार आहे अशा भावनेने काम करा. भावी पन्नास शतके तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहेत. भारताचे भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे. कंबर कसून कामाला लागा.
(रामकृष्ण मठ, नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या ‘भारताचे पुनर्जागरण’ या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा