वसुंधरा देवधर
घरातील जे दोन पदार्थ कधीही संपू दिले जात नाहीत, त्यापैकी एक साखर आणि दुसरं मीठ. साखर या सखीनंतर आता मीठ हा मित्र.
साखरेप्रमाणे मीठ ही अलीकडे अनारोग्याचे कारण मानले जात आहे आणि त्याला आधार आहे तो प्रक्रियाकृत अन्नाच्या अतिरेकी सेवनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्या – रक्तदाब आणि त्यातून अखेरीस हृदयविकार! आपल्या देशातही थेट सेवनासाठी जे खारवून टिकवलेले व प्रक्रियाकृत चटकमटक पदार्थ उपलब्ध आहेत, त्यांचे अतिरिक्त सेवन झाले तर आवश्यकतेपेक्षा अति जास्त मीठ (सोडियम)आपल्या शरीरात जाईल. ते आरोग्याला त्रासदायक ठरू शकेल. मात्र सर्वसामान्य भारतीय स्वयंपाकघरातले पदार्थ बनतात आणि नेमाने खाल्ले जातात, त्यातून अतिरिक्त मीठ खाण्याने होणाऱ्या आरोग्य समस्यांना निमंत्रण मिळेल, असे दिसत नाही. कारण पदार्थात चवीपुरते मीठ घातलेले असते. म्हणून मीठ वरून घेणे शक्यतो टाळावे हे बरे. लोणची, पापड, भजी यांसारखे पदार्थ पारंपरिक जेवणात ‘डावी बाजू’ समजले जातात, यामुळे आपोआप विविध अन्नघटकांचे योग्य प्रमाणात सेवन होते. नुसत्या लोणच्याशी नियमितपणे जेवणे जसे योग्य नव्हे, त्याचप्रमाणे वरण-भात, भाजी-पोळी, अंडं-ताजे मासे याऐवजी विविध प्रकारचे चिवडे / चिप्स आणि पापड खाऊन पोट भरणेही टाळले पाहिजे. तसेच आधुनिक स्वयंपाकघरातील अजिनोमोटो (एमएसजी – मोनो सोडियम ग्लुटामेट)चा वापर विवेकाने केला पाहिजे.
नैसर्गिक मीठ ज्या वेळी शुद्ध केले जाते, त्या वेळी त्यात असणारी काही आवश्यक नैसर्गिक द्रव्ये नाहीशी होतात. त्यापैकी काही परत बाहेरून घातली जातात – जसे आयोडाइड. याबरोबर शेंदेलोण (लवणचे बोली रूप लोण) आणि पादेलोण अशा नावाची मिठे नुसती अगर निरनिराळ्या तयार मसाल्यांतून (चाट मसाला /जलजिरा) आपल्या स्वयंपाकघरात येतात. ‘काला नमक’ या नावाने जगप्रसिद्ध झालेले मीठ हिमालयात मिळते. त्यामध्ये अगदी अल्प प्रमाणात लोह आणि गंधक आढळून येतात.
मानवी शरीरातील रक्तदाब नियंत्रण, स्नायूंच्या हालचाली आणि चेतासंदेश वहन अशा महत्त्वाच्या क्रियांसाठी आहारात योग्य प्रमाणात मीठ (सोडियम) असणे आवश्यक असते. म्हणून आहारातील मिठाच्या प्रमाणाबाबतचे निर्णय स्वत:च्या मनाने घेऊ नयेत.
vasudeo55p@gmail.com
chaturang@expressindia.com