|| वसुंधरा देवधर
निरोगी सस्तन प्राण्याच्या (मिल्क अॅनिमल) स्तनग्रंथीमधून येणारा स्राव म्हणजे दूध. ज्याच्यामध्ये बाहेरून काहीही घातलेले नाही किंवा त्यातून काहीही काढून घेतलेले नाही, हे झाले शुद्ध दूध. या व्याख्येबरोबरच, अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यामध्ये (एफएसएसएआय) गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्या शुद्ध दुधाची मानके निश्चित केलेली आहेत. तसेच टोन्ड, डबलटोन्ड, स्कीम्ड आणि फुल-क्रीम दुधाचीसुद्धा!
गावाकडे जसे ‘धारोष्ण दूध’ मिळते, तसे कोणतेही ब्रॅण्डेड दूध नसते. ते पाश्चराईज्ड आणि त्यातील स्निग्धता, सॉलिड नॉन फॅट (एसएनएफ -स्निग्धांशविरहित) यांचे प्रमाणीकरण करून, मग योग्य दर्जाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत सीलबंद केलेले असते. त्याची वापरण्याची मुदत कमी असते. यूएचटी (अल्ट्रा हाय टेंपरेचर/हीट ट्रीटमेंट) प्रक्रिया केलेले दूध टेट्रापॅकमध्ये मिळते. या प्रक्रियेत दूध अति उच्च तापमानाला काही सेकंद ठेवून, लगेच थंड करून, विशिष्ट पद्धतीनेच पॅक करतात. यामुळे त्याचे आयुष्य वाढते. दुधात उच्च दर्जाची प्रथिने, ए- रिबोफ्लेवीन, बी-३ व बी-१२ ही जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि फॉस्फरस अशी आवश्यक पोषक द्रव्ये असतात. सकाळी न्याहारी बरोबर दूध घेणे हे आरोग्यदृष्टय़ा खूप फायदेशीर ठरते, खासकरून प्रथिने सकाळी पोटात गेली तर त्यांचा स्नायू आणि हाडांच्या बळकटीसाठी अधिक उपयोग होतो, म्हणून एक मोठा कप -साधारण २०० मिली दूध सगळ्यांनी दररोज सकाळी घेणे, आरोग्यासाठी चांगले ठरते. ज्यांना दूध पचतच नाही, त्यांनी ते टाळावे.
दुधाबद्दल समाजमाध्यमातून जे सल्ले येतात ते अधिकृत मानू नयेत. ‘घरात येणारे दूध भेसळयुक्त तर नाही ना?’ अशी शंका असेल तर शासकीय/शासनमान्य प्रयोगशाळेतून नमुना तपासणी करून घेता येते. भेसळ निघाली तर आपण भरलेली फी परत मिळते.
दूध गाईचे की म्हशीचे? तर या दोन्ही दुधातील पोषणमूल्यामध्ये खास फरक नाही. मात्र म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा स्निग्धांश जास्त असतो. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि प्रथिनाबाबत म्हशीचे दूध सरस ठरते. म्हशीचे दूध, साधारणपणे, भारतीय उपखंडात जास्त प्रमाणात सेवन केले जाते आणि दुग्धजन्य पदार्थासाठीही वापरण्यात येते. देशकाल परिस्थितीनुसार याक, शेळी, मेंढी, उंटीण याचेही दूध सेवन केले जाते.
vasudeo55p@gmail.com
chaturang@expressindia.com