भारत ही मधुमेहाची ‘राजधानी’ असल्याने प्रत्येक गरोदर स्त्रीची मधुमेहाची चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी साधारण ४ टक्के गरोदर स्त्रियांमध्ये आढळणारा मधुमेह आता उशिरा येणारं गर्भारपण, बदलती जीवनशैली, वजनातील वाढ यामुळे १५ ते २० टक्क्य़ांच्याही वर आढळला आहे.
ग रोदर आहे, या गोड बातमीमध्ये तरंगण्याचे दिवस म्हणजे नवशिक्या आईबाबांसाठी अतीव सुखद अनुभव. स्त्रीच्या आयुष्यातील ही एक खूप महत्त्वाची गोष्ट. आई आणि बाळ अशा दोन जिवांची भावनिक आणि आरोग्याची नाळ एकमेकांशी जोडण्याचे हे दिवस. अशा वेळी त्या स्त्रीला मधुमेह आहे, असं निदान झालं तर ही ‘गोड’ बातमी खऱ्या गोड बातमीमधली हवाच काढून टाकते आणि आई व बाळ या दोघांचंही आरोग्य धोक्यात येतं.
पूर्वी साधारण ४ टक्के गरोदर स्त्रियांमध्ये आढळणारा मधुमेह आता खूपच जास्त प्रमाणात आढळून येतो आहे. उशिरा येणारं गर्भारपण, बदलती जीवनशैली, वजनातील वाढ यामुळे या ‘जेस्टेशनल डायबेटीस’चं प्रमाण साधारण १५ टक्के तर काही चाचण्यांमध्ये २० टक्क्य़ांच्याही वर आढळलं आहे.
आधी मधुमेह नसलेल्या स्त्रीला गर्भारपणात प्रथमच मधुमेह सुरू झाला तर त्याला ‘जेस्टेशनल डायबेटीस’(जीडीएम) म्हणतात. तर ज्या स्त्रिया आधीपासून मधुमेही आहेत व त्यांना दिवस राहिले तर त्याला ‘प्रीजेस्टेशनल डायबेटीस’ म्हणतात. डायबेटीक प्रेग्नन्सी वा मधुमेहातलं गर्भारपण ही ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ समजली जाते. यामध्ये आई व बाळाच्या मृत्यूचं प्रमाण मधुमेह नसलेल्यांपेक्षा दहापट जास्त असतं. अर्थात योग्य शास्त्रीय उपचारांनी हे प्रमाण खूपच खाली आणता येतं.
भारत ही मधुमेहाची राजधानी असल्याने प्रत्येक गरोदर स्त्रीची मधुमेहाची चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातही पुढील सर्व ‘रिस्क ग्रुप्स’नी विशेष काळजी घेऊन चाचणी करायला हवी.
१) कुटुंबात मधुमेह असणं.
२) अनेकदा नैसर्गिक गर्भपात झालेला असणं.
३) आईचं वय तिशीच्या पुढे असणं.
४) आई स्थूल असणं. (बीएमआय २७ ‘kg/m2  पेक्षा वर.)
५) आधीची बाळं ४ किलोपेक्षा जास्त वजनाची (भारतात साडेतीन किलो) असणं.
६) सोनोग्राफीत बाळाची वाढ अपेक्षेपेक्षा जास्त असणं, पाणी जास्त असणं.
७) आधीचं बाळ मृतावस्थेत जन्मणं.
८) लघवीतून साखर जाणं.
 ‘जीडीएम’चं निदान करण्यासाठी अनेक वेगवेगळय़ा पद्धती वापरल्या गेल्या त्यापैकी  National diabetes data group (NDDG)  किंवा कार्पेटर पद्धत अनेकदा वापरली जाते. ती पुढीलप्रमाणे-
यापैकी कोणत्याही २ ‘शुगर्स’ वाढलेल्या आढळल्या तर मधुमेह आहे, असं समजतात. ज्यांना ३-४ तास वेळ देणं शक्य नाही त्यांना ५० ग्रॅम साखरेचं पाणी देऊन १ तासाने साखर तपासतात आणि ती १४० च्या वर आली तर मधुमेह आहे, असं समजतात. काही चाचण्यांमध्ये ही साखर १३६च्या वर नसावी असंही म्हटलं आहे.
गर्भारपणातील मधुमेहाचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे : आईवर दुष्परिणाम-
१) सिझेरियन जास्त प्रमाणात होतात. २) २० टक्के प्रसूती अपूर्ण वाढीच्या बाळाच्या अपेक्षित तारखेआधीच होतात. ३) १५-३० टक्के  स्त्रियांना रक्तदाब वाढण्याचा त्रास होऊन एक्लम्पसिया होतो. ४) ८० टक्के  स्त्रियांना मूत्रमार्गाचे, श्वसनाचे किंवा क्षयरोगासारखे घातक संसर्ग होतात. ५) डोळे व किडनीवर मधुमेहाचे दुष्परिणाम होण्याचं प्रमाण व गती वाढते. ६) बाळंतपण गुंतागुंतीचं होऊन आई दगावण्याचं प्रमाण जास्त असतं.
बाळावर दुष्परिणाम- १) गर्भपात, अपुरी वाढ, लवकर प्रसूती होणं. २) आईने घेतलेल्या औषधांचे बाळावर होणारे दुष्परिणाम. ३) १० टक्के बाळांमध्ये जन्मजात विकृती असणं- हृदय, मेंदू, किडनी, हाडे, गुद्द्वार यांच्या विकृती. ४) जन्मल्या जन्मल्या श्वसनात अडथळा येणं. ५) बाळांमध्ये जन्मल्यावर हायपोग्लायसेमिया होणं म्हणजेच साखरेचं प्रमाण खूप खाली जाणं. ६) हृदयाच्या कामात विकृती, कॅल्शियमचं प्रमाण खाली जाणं, खूप जास्त प्रमाणात कावीळ होणं.
अर्थातच यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचं प्रमाण जास्त राहतं. गर्भारपणात साखर सतत नियंत्रणात ठेवली तर हे सारे धोके लक्षणीय रीतीने कमी होतात.
जीडीएम रुग्णांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
१) बाळंतपण कायमच सुसज्ज इस्पितळात करावं. २) योग्य मधुमेहतज्ज्ञ व प्रसूतीतज्ज्ञांशी वरचेवर तब्येतीसाठी गाठभेट घेणं चालू ठेवावं.
३) आहार, व्यायाम, इन्शुलिन याची काळजी घ्यावी. ४) आहारामध्ये नेहमीपेक्षा ३०० कॅलरीज (उष्मांक) जास्त घेणं, रोज १५ गॅ्रम जास्त प्रथिने, ४०० मि.ग्रॅ. जास्त कॅल्शियम, ५०० मायक्रोग्रॅम जास्त फोलिक अ‍ॅसिड, भरपूर बी कॉम्प्लेक्स असणं आवश्यक आहे. ५) मेटफॉर्मिन सोडून इतर बऱ्याचशा मधुमेहाच्या गोळय़ा बाळाच्या आरोग्यासाठी बंद ठेवणं. ६) फक्त इन्शुलिनवरच साखर सतत नियंत्रणात ठेवणं, त्याकरता वरचेवर दिवसातून अनेकदा साखर तपासणी करून इन्सुलिन घेत राहणं. ७) प्रसूती सुलभ करणारे माफक व्यायाम करणं. ८) दर आठवडय़ास काही वेळा  किंवा त्याहीपेक्षा लवकर मधुमेहतज्ज्ञांना भेटणं.
बाळ व आईला हा गर्भारपणाचा प्रवास सुखकर होण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचं संपूर्ण सहकार्य व शास्त्रीय वैचारिक बैठक आवश्यक असते. मधुमेहतज्ज्ञ, नर्स, लॅबचे डॉक्टर, आहारतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, नातेवाईक हे सारं टीमवर्क उत्तम असल्यावर बाळ-बाळंतीणही उत्तम राहतात. गर्भारपणात झालेला हायपो टाळला गेला पाहिजे, पण जरी झाली तरी बाळ हा धोका सहज पचवू शकतं. त्यामुळे पटकन २ चमचे साखर खाऊन, त्यावर पोटभर जेवून डॉक्टरांना लगेच भेटावं.
गर्भारपणातील मधुमेहामध्ये साखरेचं प्रमाण खालीलप्रमाणे राखावं म्हणजे धोके कमी राहतात-
उपाशीपोटी -६० ते ९० मि.गॅ्र
जेवणाआधी- ६० ते १०५ मि.गॅ्र
जेवणानंतर १ तास- १०० ते १४० मि.गॅ्र
रात्री २ ते पहाटे ६ मध्ये- ६० ते १२० मि. गॅ्र
सर्व साखर तपासणीचे अ‍ॅव्हरेज- ८७ ते ९७ मि.गॅ्र
Hb A1c  प्रमाण ६.५ च्या आत
बाळंतपणानंतर खूप वेळा ६ आठवडय़ांनंतर साखर नॉर्मलला येऊ लागते व आपण इन्शुलिन थांबवू शकतो. पण काही जणींमध्ये मात्र मधुमेह कायम राहतो. ज्यांचा मधुमेह जातो त्यांना आयुष्यात पुढे मधुमेहाचा धोका राहतोच व यापैकी ५० टक्के स्त्रिया पुढच्या १५ वर्षांत पक्क्या मधुमेही होतात. यापैकी अनेकींना थायरॉईडचे विकारही उद्भवतात.
गर्भारपणातील मधुमेहात सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे विविध तुपाचे, सुकामेव्याचे पदार्थ, लाडू-वडय़ा खाता येत नाहीत हे कुटुंबीयांनी लक्षात ठेवावं आणि कुपोषण व अती पोषण याचे मध्यममान काढून योग्य पोषणाकडे कल ठेवावा.
गर्भारपणाच्या पहिल्या ३ महिन्यांच्या आत बाळाची परिपूर्ण सोनोग्राफी अत्यावश्यक आहे. त्यामुळे बाळाची वाढ, पाणी, व्यंग, हृदय हे सर्व तपासलं जातं. नंतरच्या काळातसुद्धा डॉक्टरी सल्ल्याने सोनोग्राफी करत राहावं.
प्रीजेस्टेशनल डायबेटीक स्त्रियांनी पुढील काळजी घ्यावी. – १. दिवस राहण्याआधी निदान ६ महिने साखर काटेकोर नियंत्रणात राखावी. २. साधारण ८ आठवडे आधीपासून मधुमेहाच्या गोळय़ा थांबवून इन्शुलिनवर साखर नियंत्रणात राखावी. ३. कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स (विशेषत: बी १२), फोलिक अ‍ॅसिड गोळय़ा ३ महिने आधीपासून घ्यायला लागाव्या. ४. गर्भारपणापूर्वी वजन व बीएमआय नॉर्मल (२३ चे आत) राखावा. ५. अनियोजित गर्भधारणा झाल्यास लगेच मधुमेहतज्ज्ञ व प्रसूतीतज्ज्ञांना भेटावं.
शेवटी ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ हे लक्षात ठेवावं. म्हणजे गुड न्यूज ही गुड न्यूजच आणि सदृढ, निरोगी आई आणि बाळ सुखाची गोडी वाढवत राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा