डॉ. राधिका टिपरे
माया वाघीण एकदम चंट होती. बिनधास्त होती. कितीही जीप असल्या, गर्दी असली तरी बिनधास्त आडवी यायची. जीपच्या अगदी जवळून जायची. अशा वेळी जीपमध्ये बसल्या बसल्या काळीज कसं कापतं याचा अनुभव मी अनेकदा घेतलाय. शेलाटा बांधा अन् नाजूक चण असलेल्या मायाचा चेहराही अतिशय गोंडस होता. बहुतेक सगळ्या वाघोबांशी तिनं घरोबा केला होता. या मायासाठी दोन वाघांची अगदी जखमी होण्याइतपत चांगलीच जुंपली होती! ती ‘माया मेमसाब’च होती वाघिणीतली… आणि अचानक ऐके दिवशी ती या जंगलातून गायब झाली…

मागच्या वर्षी मार्च महिन्यातील ताडोबा भेटीच्या सुखद आठवणी मनाशी रेंगाळत असतानाच मी अमेरिकेला निघून गेले. परत येईपर्यंत पावसाळा ऐन भरात असल्याने अभयारण्यं बंद होती. १ ऑक्टोबरला इतर सर्व जंगलांप्रमाणेच ताडोबाही पर्यटनासाठी खुलं झालं, मात्र पंधरावीस दिवसांतच सोशल मीडियावर एक बातमी फिरायला लागली… ‘ताडोबा जंगलाची अनभिषिक्त राणी, पांढरपौनीची माया पंधरा दिवसांत कुणाच्याही नजरेला पडलेली नाही.’ ही बातमी वावटळीप्रमाणं व्हायरल झाली आणि प्रशासन जागं झालं. माया परतून येईल म्हणून काही दिवस वाट पाहिली गेली. मग शोधाशोध… वेगवेगळे निष्कर्ष…वेगवेगळी कारणं दिली गेली. कुठल्याही खाणाखुणा मागे न ठेवता एक जिवंत, उमदं जनावर अचानक नाहीसं झालं होतं. माया अद्याप परतलीच नाही…

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
second phase of tiger migration is complete with another tigress captured from Tadoba
दुसरी वाघीणही महाराष्ट्रातून पोहोचली ओडिशात…आंतरराज्यीय स्थलांतर अखेर…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Similipal Tiger Project officials released tigress relocated from Tadoba Andhari Tiger Project into wild
ओडिशातील ‘मेलेनिस्टिक’ वाघांसोबत महाराष्ट्रातील वाघिणीचा संचार

आता दुसरा पावसाळा संपत आलाय. कदाचित ती नव्या टेरिटरीच्या शोधात गेली असावी असंही बोललं जाऊ लागलं. माया वाघीण बहुतेकांची लाडकी होती. माझीही लाडकी होती ती! कारण प्रत्येक सफारीत ती दिसायचीच. गेल्या दहा वर्षांत मी तिला अनेक वेळा, अनेक रूपात अगदी जवळून पाहिलंय. दिसायला अतिशय देखणी असलेली माया वाघीण एकदम चंट होती… बिनधास्त होती… कितीही जीप असल्या, अगदी गर्दी असली तरी बिनधास्त आडवी यायची. जीपच्या अगदी जवळून जायची.

हेही वाचा : स्त्रियांचं नागरिक असणं!

अशा वेळी जीपमध्ये बसल्या बसल्या काळीज कसं कापतं याचा अनुभव मी अनेकदा घेतलाय. शेलाटा बांधा अन् नाजूक चण असलेल्या मायाचा चेहराही अतिशय नाजूक आणि गोंडस होता. बहुतेक सगळ्या नर वाघोबांशी तिनं घरोबा केला होता…! विशेष म्हणजे, ताडोबा अंधारीच्या जंगलात इतर कुठेही वाघ दिसला नाही, तरी पांढरपौनी तलावाच्या आजूबाजूला माया दिसायचीच. सफारीच्या शेवटी पांढरपौनी तलावाकडून चक्कर व्हायचीच. ठेपा ठरलेला असेल तर बहुतेक वेळा माया दृष्टीस पडायचीच. दुरून का असेना, तिला पाहिल्यानंतर, वाघ बघितल्याच्या आनंदात पर्यटक मंडळी डोळ्यात आनंद घेऊन परतायची… हा अनुभव मी गेल्या दहा वर्षांत किती तरी वेळा घेतला होता.

गतवर्षी मी नेहमीप्रमाणे ताडोबात गेले होते तेव्हा रणरण करणारं ऊन होतं. जंगलात गेल्यावर हे ऊन कधी त्रासदायक वाटत नाही. सकाळच्या सफारीसाठी गेलं, की थंड वारं अंगावर घेत जंगलात शिरताना, नि:स्तब्ध, निरामय जंगलाचा कानोसा घेत उघड्या जीपमधून जंगल न्याहाळणं म्हणजे एक अचाट अनुभव असतो. तसंही जंगल रात्रभर जागंच असतं. झुंजुमुंजु होता होता पेंगुळलेल्या जंगलात जाणं म्हणजे काळजावर अलवार मोरपीस फिरवण्याइतकं सुखाचं असतं…जंगलाचा हा अनुभव मला अतिशय आवडतो, कारण अर्धजागृतावस्थेतील जंगलाची अनाहत स्पंदनं ऐकायला मिळतात. हे सगळं मला प्रचंड हवंहवंस वाटतं. त्यातच नशिबाची साथ असेल तर एखादं राजबिंडं जनावर आपल्या नजरेला पडतं आणि जंगलाची गोष्ट सुफळ संपूर्ण होऊन जाते. दुपारच्या सफारीचा अनुभव वेगळा असतो… उन्हाची तलखी असते… पण एकदा का जंगलात शिरलं की मन अगदी पिसं होऊन जातं… कारण उन्हाळ्यात जंगलाचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर उभं असतं… एकतर पानगळ संपून वसंताच्या आगमनाची लगबग सुरू झालेली असते. बहुतेक वृक्ष हिरवाई लेऊन नटलेले असतात. त्यामुळे जंगलाचे शुष्क आणि कोरडं रूप बदलून; हिरवा पानोरा ल्यायलेले वृक्ष आपल्यासमोर उभे असतात. अख्ख्या ताडोबामधील ‘मोह’ गुलाबी पानोऱ्यांचा शालू परिधान करून डवरलेले असतात आणि रानजांभूळ गर्द हिरवा शालू नेसून जंगलातील हिरवाई गर्द करून टाकतात. विशेष म्हणजे सूर्यास्तापर्यंत आपल्याला जंगलात थांबता येतं. ही वेळ जंगलातील पक्ष्यांची लगबग पाहण्यासाठी अगदी संधीपर्व असतं. अशा वेळी परतीच्या वाटेवर, जामुनझोरासारख्या पाणवठ्यावर जीप लावून थोडा वेळ थांबलं तर पाण्यावर येणारी तहानलेली जनावरं पाहायला मिळतात. रानडुकरांचे कळप, गवे, चौशिंगासारखी हरणं हळूहळू येतात. इकडं तिकडं पाहत पाण्यावर जातात. त्यांचा डौल, त्यांची तगमग… आणि डोळ्यातील भय पाहताना आपणही जंगल वाचत असतो. एकाच वेळी अनेक मोर, लांडोर, जंगली कोंबडे, कोंबड्या येऊन शांतपणे पाणी पिताना पाहिलंय मी…फार छान दृश्य असतं हे, डोळ्यांना सुखावणारं. अशा वेळी तहानलेलं एखादं बिबटं जवळपास असल्याची चाहूल लागली तर, घशाला कोरड पडलेली असतानाही हरणं त्याच पावली परत फिरतात.

हेही वाचा : सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता

ताडोबामधील जामनी तलावाची जागाही अशीच सुंदर आहे. विस्तीर्ण गवताळ पठारावर इतकी जनावरं असतात की पाहत राहावं. चितळ हरणांचे कळप पाहायचे तर जामनीसारखी जागा नाही. शिवाय ‘छोटी तारा’ असतेच आसपास!

गंमत म्हणजे मोठं मांजर जवळपास असेल तर मोर, माकडं, सांबर, चितळ सगळे जण त्याच्या हालचालींची दखल घेत राहतात… पण तेच जनावर निवांत पहुडलेलं असेल तर आजूबाजूचं जंगल चिडीचिप्प होऊन जातं…शांत! गतवर्षीच्या चारही सफाऱ्यांमध्ये अक्षरश: ‘छप्पर फाडके’ व्याघ्रदर्शन झालं होतं, अविस्मरणीय! तसं आता ताडोबा आणि अंधारीचं जंगल तोंडपाठ झालंय… त्या दिवशी आमच्या ड्रायव्हरनं, साबीर शेखनं थेट जीप ताडोबाच्या दिशेनं दामटली…कारण आदल्या दिवशी माया आणि बलराम ही जोडी एकत्र दिसली होती. आम्ही ‘पॉइंट ९७’ या पाणवठ्याच्या दिशेनं पोहोचलो. तिकडे सगळ्या जीप तिथे गोळा झालेल्या होत्या.

सर्व जण वाघासाठी ताटकळले होते. जवळजवळ पन्नास डिग्रीच्या जवळ पारा पोहोचला असताना रणरणत्या उन्हात जीप लावून वाघोबांची प्रतीक्षा करावयाची होती. मी जीप सावलीत लावण्याचा आग्रह धरला. एका लहानशा गल्लीत जीप लावली. समोर एक लहानसा पाणवठा होता. घनदाट वृक्षांनी चोहोबाजूने वेढलेली ती जागा अतिशय सुंदर होती. खूप शांत वाटत होतं तिथं… गर्द सावलीत, फांदीवर हॉक इगल बसलेला होता. छान फोटो मिळाले. पलीकडे सर्व जण वाघाची वाट पाहत होते; पण तो ढाण्या वाघ पाणवठ्याकडून आमच्याच बाजूने येताना दिसला. फक्त दहा फूट अंतरावर होता. फोटोही घेता येईना. समोर वाघ आणि फक्त आमची एक जीप. वाघ वेगळ्याच मूडमध्ये होता. रेंगाळत रेंगाळत, जमीन हुंगत पुढे पुढे जात होता. तो पुढे आणि आमची जीप त्याच्या पाठीमागे. तेवढ्यात गाईडने विशिष्ट आवाज काढून इतरांना वाघ दिसल्याची सूचना दिली, मग सगळ्या जीप जीव काढत धावायला लागल्या. त्या भागात आलेला नवीन, तरणाबांड, आकाराने अतिशय मोठा, आणि बिनधास्त नर होता तो! त्याच्याच मस्तीत होता. जीपचा लोंढा पाहून अजिबात बिचकला नाही. नंतर किती तरी वेळ तो रस्त्याच्या बाजूने चालत राहिला. त्याच्या पंज्याचा आकार पाहूनच काळजात चर्र् होत होते. बराच वेळ तो रस्त्याच्या बाजूने चालत होता. कधी झाडोऱ्यात जाऊन परत बाहेर येत होता! त्या दिवशी ‘मोगली’ या वाघाने सर्वांनाच अगदी मन:पूत दर्शन दिलं. त्याच्या दर्शनाने मन अक्षरश: व्याघ्रमय होऊन गेलं. सुखावून गेलं. गंमत म्हणजे त्यानंतर युवराज आणि दडियाल अशी नावं असलेल्या दोन वाघांचेही दर्शन झालं. सगळे वाघ ताडोबाच्या त्या भागात जणू हिरिरीनं जमा झाले होते… कारण त्या भागाची राणी होती नटमोगरी माया… कुणास ठाऊक, जंगलचा काय नियम असतो, पण देखण्या, चंट मायाच्या क्षेत्रात वाघांचा जमावडा झाला होता हे मात्र अगदी खरं होतं!

खरं सांगायचं तर ताडोबाचे जंगल कधीही निराश करत नाही. काही ना काही नजरेला पडत राहते आणि मन सुखावून जातं. जंगल वाचायचं असेल तर अधून मधून ताडोबाला भेट द्यायला हवी असं मला नेहमी वाटतं. इथं जंगल ओसंडून वाहत असतं, असं मला अगदी मनापासून वाटत राहतं. निसर्ग खऱ्या अर्थानं जवळून न्याहाळायचा असेल तर जंगलभेटी इतकं सुख कशातच नाही. असो, दुसऱ्या दिवशी सकाळी मोहार्लीच्या गेटमधून आत शिरताच जंगलाचा गंध थेट मस्तकामध्ये भिनला. एक अतिशय मोहक सुगंध अवघ्या वातावरणात भरून राहिला होता. हा सुगंध मला ताडोबा आणि पेंचच्या जंगलात कैक वेळा अनुभवायला मिळाला होता. तेलिया तलावाला वळसा घालून आम्ही ताडोबाच्या दिशेनं निघालो. त्या बाजूला सोनम वाघीण असते, पण ती काही भेटली नाही. ताडोबा तलावाला वळसा घालून पंचधाराकडे काही मिळतंय का, हे पाहून हिलटॉप ओलांडून जाताना एकदोन जीप उभ्या दिसल्या. जवळ पोहोचेपर्यंत वाघांच्या डरकाळ्या ऐकू यायला लागल्या. आतापावेतो अनेक वेळा, वाघिणींना गुरगुरतांना ऐकलं होतं, पण वाघांना डरकाळ्या फोडून गुरगुरतांना पहिल्यांदाच ऐकत होते. हिलटॉप हा ताडोबातील ओसाड डोंगर तुकडा आहे. बाजूलाच असलेल्या गर्द झाडीत दोन वाघांची जुंपली असल्याचे कळलं. वाघ दिसत नव्हते, पण भयंकर आवाज कानावर पडत होते. जीपमध्ये बसल्या बसल्या काळजाचा थरकाप होत होता. कॅमेरा तयार ठेवून मी आपली टकटकी लावून जीपमध्ये उभी होते. दोन वाघ एकमेकांशी भांडतानाचा फोटो मिळेल या आशेने; पण छे…! नंतर कळलं की आधी बाहेर भांडून ते भिडू झाडीत शिरले होते.

हेही वाचा : स्वभाव-विभाव: समाजासाठी विघातक विकार

दोन्ही वाघांचे भांडण झाडीच्या आतमध्येच संपलं बहुधा आणि वेगानं एक भलादांडगा वाघ लंगडतच झाडोऱ्यातून बाहेर पडताना दिसला. जखमी झालेला होता तरीही उन्मादात असल्यागत, बलराम नाव असलेल्या त्या बलदंड वाघानं लंगडत, पण अतिशय वेगाने त्या खडकाळ, गवताळ मैदानात तीन गोल चकरा मारल्या आणि तो तेथून चालता झाला. गाईड म्हणाला, ‘विजयी वाघ अशा तऱ्हेने आपला विजय व्यक्त करतो!’ कुणास ठाऊक! त्यानंतर काही वेळातच, अपमानित झालेला, हरलेला ढाण्या वाघ बाहेर आला. त्या वाघाच्या देहबोलीवरून कळत होतं, की तो या लढाईत हरलाय. बऱ्यापैकी जखमी झालेला होता. काही क्षणांसाठी तो वाघ एका झाडाच्या सावलीत बसून राहिला…मात्र नंतर तो झाडीत दिसेनासा झाला… त्या भागात नव्यानेच आलेला रुद्रा हा तरणाबांड देखणा वाघ होता… माया वाघीण बलराम सोबत असतानाच हे महाशय तिकडे आले होते. ‘माया’ साठी दोघांची जुंपली होती! माया मात्र शेपटी ताठ करत तेथून निघून गेली म्हणे…!

जंगल भेटीत कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही! त्या दिवशी जिंकणाऱ्या वाघाचा विजयोन्माद पाहायला मिळाला. नामोहरम झालेल्या वाघाचं दु:खही जवळून पाहायला मिळालं. दोघेही तुल्यबळ होते. बलरामपासून झालेला छावा सध्या मायाबरोबर असल्यामुळे मायावर तो हक्क दाखवत असावा बहुधा… कुणास ठाऊक!

दुसऱ्या दिवशी दुपारी वेळ न दवडता आम्ही त्याच भागात गेलो. मायाचा ठावठिकाणा शोधायचा होता. पांढरपौनी तलावापासून काही अंतरावर असलेल्या जामुनबोडी या पाणवठ्याजवळ पोहोचलो तेव्हा जखमी झालेला रुद्रा तिथं गवतात बसलेला पाहायला मिळाला. उंच वाढलेल्या गवतात आडवा तिडवा पसरलेलाच वाघ दिसतही नव्हता. क्षणभराने रुद्रा उठून बसला. डोळ्याजवळ भली मोठी जखम होती. त्याचा उजवा जबडाच फाटलेला होता आणि जखमेवर बसणाऱ्या माश्यांमुळे तो अतिशय संत्रस्त झाला होता. तो गवतातून उठला आणि बरोबर आमच्या जीपसमोर मोकळ्या जागेत येऊन बसला. त्याच्या अंगावर बऱ्याच जखमा होत्या. खरं सांगू, त्याचा तो दीनवाणा अवतार बघवत नव्हता पण निसर्ग त्याच्या वाटेने जात असतो. माश्यांपासून सुटका करून घेण्यासाठी काही वेेळातच रुद्रा पाण्यात शिरला… आम्ही त्याच रस्त्यावरून काही अंतरावर असलेल्या पांढरपौनी तलावाकडे निघालो; तर तिकडे बरीच गर्दी होती. बहुधा माया तिकडेच होती, मात्र अचानक समोरून माया वाघीण शांतपणे येते आहे हे लक्षात आलं आणि आम्ही हादरलोच… हर्षवायू झाला नाही एवढंच!

हेही वाचा : स्त्री ‘वि’श्व: ‘हाऊस हसबंड’ असणं!

समोरून माया येत होती. केवळ आमची एक जीप तिच्या समोर होती… केवढं राजसी जनावर ते! काय तिचा रुबाब! मायाचा तो ‘कॅटवॉक’ कधीही विसरणार नाही मी. खूप छान फोटो मिळाले. सुधीरनी छान व्हिडीओही घेतला. आमच्या जीपच्या बाजूने ती पुढे जामुनबोडीकडे जात राहिली. कदाचित जखमी रुद्राला भेटण्यासाठीच! बलराम आणि रुद्रा या दोघांमधून बहुधा या वेळी तिनं रुद्रा या तरण्याबांड जोडीदाराची निवड केली होती. असो! त्यानंतर पुढे काय झालं माहीत नाही कारण दुसरे दिवशी सकाळीच आम्ही पुण्यासाठी परत निघालो. माया वाघिणीची आणि माझी ती शेवटची भेट. नंतर पावसाळ्यात जंगलाचे दरवाजे बंद असताना असं काय घडलं, की माया नाहीशी झाली…! कशी, का हे मात्र कुणालाच ठाऊक नाही… !

या वेळी ताडोबाच्या जंगलात पोहोचल्यावर हे सर्व आठवलं. आणि माझं मन उदास झालं. माया वाघिणीशिवाय ताडोबाचं जंगल सुनं सुनं वाटलं मला. पांढरपौनी तलावाकडे जायची वेळच आली नाही. मायाची जागा आता छोटी तारा आणि तिची मुलगी रोमा या वाघिणींनी घेतलीय. कोअरमधल्या सफारीमध्ये पंचधाराच्या गर्द झाडोऱ्यात ही रोमा भेटली. मायासारखीच देखणी वाघीण. नवथर आणि छान तरणीताठी. चोहोबाजूंनी जीपचा वेढा पडल्यानंतर कुठून बाहेर पडावे हे न कळल्यामुळे गोंधळून गेलेली रोमा ताडोबा तलावाच्या दिशेने जाताना गर्द झाडीत दिसेनाशी झाली. नंतर ती बाहेरच आली नाही. वाघ पाहण्यासाठी धडपडणाऱ्या आमचीच मला लाज वाटली. का कोण जाणे, पण या वेळी ताडोबामध्ये मन रमलं नाही.
ताडोबाची भेट नेहमीच हवीहवीशी वाटते, पण यापुढे मायाची कमी जाणवत राहील हे नक्की…!
radhikatipre@gmail.com